इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे

Doctor Sadashiv Shivade

स्वामीनिष्ठ बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ डॉ. सदाशिव शिवदे यांना देण्यात येत आहे. मंदिरस्थापत्य व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार धैर्यशील पाटील, शिरीष चिटणीस यांच्या उपस्थितीत आज, रविवार, दि. 4 जून रोजी सायं. 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. यानिमित्त डॉ. सदाशिव शिवदे यांचे स्नेही आणि पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख…

Doctor Sadashiv Shivade
Doctor Sadashiv Shivade

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाचगणी जवळच्या हुमगावची. या गावात जत्रा भरली होती. पहिल्या दिवशी छबीना निघाला. दुसर्‍या दिवशी कुस्तीचा आणि तमाशाचा फड रंगला. या फडात एकाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास सांगितला. गर्दीतले लोक ऐकत होते. त्यात जावळी तालुक्यातील कुडाळ या गावचे गुरांचे डॉक्टर सदाशिव शिवदेही होते. तरूण वयातल्या शिवदेंनी महाराजांचे ते चरित्र ऐकले आणि ते अस्वस्थ झाले. ते तो फड अर्धवट सोडून निघाले. कुडाळी नदीवरून जाताना ते बेचैन झाले. राजांचे असे अय्याशी, रंगेल वर्णन त्यांच्या डोक्यातून काही जाईना! मग ते परत फिरले. फडावरील मंडळींची आवराआवर सुरू होती. त्यांनी विचारले, ‘‘मगाशी संभाजीराजांची भूमिका कोणी केली?’’ त्यांनी सांगितले ते त्या तमाशा कंपनीचे मालकच होते. शिवदे त्यांना भेटले आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला. ‘‘संभाजीराजांचे हे विकृत चित्रण का रंगवता?’’ असे त्यांनी दरडावून विचारले.
त्याने सांगितले, ‘‘साहेब आम्हाला माफ करा. आम्ही वर्षानुवर्षे जे ऐकतोय तेच सादर करतो. महाराजांची आम्हाला खरी माहिती नाही. कुणाचा अभ्यासच नसल्याने आम्हाला पोटासाठी हे ऐकीव लोकांपुढे मांडावं लागतं.’’ त्यावर तेही चमकले. आपल्याला तरी महाराजांचा पूर्ण अभ्यास कुठे आहे, असा विचार करत ते बाहेर पडले. ही घटना मात्र त्यांच्या मनावर कोरली गेली.

सदाशिव शिवदे यांना बालपणापासून कवितांची आवड. अधूनमधून ते वृत्तपत्रातून लिहित असत. गुरांचे डॉक्टर असल्याने शेती, शेतकरी, गुरं हेच त्यांचं विश्‍व. 1995 ला ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आणि पुण्यात दाखल झाले. इथे आल्यावर सर्वप्रथम ते अखिल भारतीय इतिहास परिषदेत गेले. ललित साहित्याबरोबरच त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. भरपूर वाचन करणं, असंख्य संदर्भ तपासून पाहणं, भाषेचा अभ्यास करणं यात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम. ए. मराठी केलं होतंच. पुण्यात त्यांनी इतिहास आणि संस्कृतचा अभ्यास केला. ‘मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने’ या विषयावर पीएच. डी. केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तो प्रबंधही प्रकाशित केला.

कोणी न केलेलं काम आपण करायचं असा चंग त्यांनी बांधला. हुमगावची घटना डोक्यातून गेली नव्हतीच. त्यामुळे आधी त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला. त्यातून ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ हा संशोधनात्मक ग्रंथ साकार झाला. या चरित्रग्रंथाने  छत्रपती संभाजीराजांविषयीचे अनेक गैरसमज दूर सारले. विश्‍वास पाटील यांनाही ‘संभाजी’ ही कादंबरी लिहिताना या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा लागला.
महाभारतात व्यास मुनींनी इतिहासाची जी व्याख्या केलीय तशी व्याख्या जगात आजवर कोणत्याच इतिहासकाराने केली नाही. ते म्हणतात,
इतिहास प्रदीपेन मोहावरणघातिना ।
लोकगर्भगृहं कृत्स्नं यथावत् संप्रकाशितम्॥
याचा अर्थ आहे, ‘‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. या ज्योतीने अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होऊन आपल्या नगरीचे, पूर्वजांचे व राजाचे सत्य स्वरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते.’’
त्यामुळे राष्ट्राची ही ज्योत काळवंडू नये यासाठी गेल्या वीस वर्षात जे सातत्याने झिजत आहेत, देहाची काडं करत आहेत त्यापैकी डॉ. सदाशिव शिवदे हे एक महत्त्वाचं नाव आहे. ‘महाराणी येसूबाई’, ‘रणरागिणी ताराराणी’, ‘दर्याराज कान्होजी आंग्रे’, ‘सेनापती हंबीरराव मोहिते’, ‘शिवपत्नी सईबाई’, ‘छत्रपती राजाराम-महाराणी ताराराणी’ हे संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी अभ्यासपूर्णरित्या साकारून आपला वैभवशाली इतिहास नव्या पिढीपुढे सशक्तपणे मांडला आहे. ‘परमानन्द् काव्यम्’चा अनुवाद त्यांनी केला. ‘मराठ्यांचे लष्करी प्रशासन’ हा त्यांचा अनुवादित ग्रंथही सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.  ‘युद्धभूमीवर श्रीशंभूराजे’, ‘स्वराज्याचे पंतप्रधान – मोरोपंत पिंगळे’ हे ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासकांसाठी संजीवनी देणारे ठरलेत.

15 मे 1915 साली भारत इतिहास संशोधक परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, ‘जर तुमच्या पूर्वजांच्या यशोदुंदुभीचा तुम्हास आदर असेल, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या रक्तामांसाचे असाल, जर त्यांची स्मृती तुम्हाला कायम ठेवावी वाटत असेल तर तुम्ही इतिहास संशोधनाच्या या कार्यास मदत करा…’ ‘केसरी’तील लोकमान्यांचे हे भाषण वाचून प्रभावित झालेल्या डॉ. सदाशिव शिवदे यांनी निवृत्तीनंतर हा वेगळा मार्ग चोखंदळपणे निवडला आणि आज ते या क्षेत्रातील ‘मनोरा’ बनले आहेत. प्रताप दुर्गा महात्म्य (1749), सईदाकेकदी नोंदी नाटकम् (तमिळ नाटकातील ऐतिहासिक उल्लेख), मोरोपंत पिंगळे पंतप्रधान यांच्या वंशजांचा ब्रिटिश सरकारकडे अर्ज, भुईंजकर जाधवराव घराण्यातील एक महजर, तुळजाभवानीची भोपे यांना निजामाने दिलेली पर्शियन सनद, डोंगरगाव-जोरी पाटील घराण्याची हकिकत व महजर यावर त्यांनी संशोधन केले.

Ghanshyam Patil with Doctor Sadashiv Shivade
Ghanshyam Patil with Doctor Sadashiv Shivade

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सभासद ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील युवा इतिहासकारांची त्यांनी एक फळी निर्माण केलीय. वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून सातत्याने लेखन, अनेक इतिहास परिषदांत सहभाग, शोधनिबंध वाचन आणि मार्गदर्शन यामुळे त्यांची सुकीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वाडे त्यांनी उजेडात आणले. पुणे सोडून महाराष्ट्रातील शंभर वाड्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि लेखमाला चालवली. ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे’ हा त्यांचा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित झालाय. गुरांचे डॉक्टर असल्याने त्यांचे शेती जीवनाशी संबंधित अनुभवविश्‍व समृद्ध आहे. गुरं कसा लळा लावतात हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी ‘माझी गुरं, माझी माणसं’ हा अस्सल ग्रामीण कथासंग्रह लिहिला. तोही वाचकप्रिय ठरला. त्यांनी जी ऐतिहासिक काव्ये लिहिली त्यातील निवडक गीतांची ‘महाराष्ट्राचे महामेरू’ ही सीडीही प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मानपत्रे त्यांनी अस्सल ऐतिहासिक भाषेत लिहिली आहेत. लवकरच या मानपत्रांचे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा मानस आहे. ‘मानपत्र’ हा स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो हे केवळ डॉ. सदाशिव शिवदे यांच्यामुळेच महाराष्ट्राला कळले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत विवेकशील व प्रज्ञावंत असल्यामुळे त्यांचे अत्यंत विश्‍वासू चिटणीस बाळाजी आवजी यांचा वंश त्यांच्या कारकिर्दीत वर आला. रियासतकार सरदेसाई यांनी लिहिले आहे –
‘‘शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेत पेशवा मोरोपंत किंवा सेनापती प्रतापराव गुजर यांजप्रमाणे, किंबहुना त्यांच्याहून जास्त बाळाजी आवजी चिटणीस यांचा उपयोग झाला आहे. 32 वर्षे शिवाजी महाराजांचा हा विश्‍वासू लेखक असल्यामुळे तो त्यांचा केवळ द्वितीय अंतःकरण होता असे म्हटले तरी चालेल.’’

बाळाजी आवजी चिटणीसांचे सुपूत्र खंडो बल्लाळ चिटणीस या व्यक्तीचे कर्तृत्व हे मराठेशाहीच्या स्थैर्यास कारणीभूत आहे. त्यामुळेच बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस’ पुरस्कार दिला जातो. गेल्या वर्षी हा पुरस्कार एअर चीफ मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांना प्रदान करण्यात आला होता. यंदा तो ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांना प्रदान करण्यात येत असल्याने एका सच्च्या इतिहासकाराचा गौरव होणार आहे. संभाजीराजांचे कर्तृत्व संशोधनातून वाचकांपुढे आणणार्‍या डॉ. शिवदे यांची कामगिरी मोलाची आहे. संभाजीराजांवर त्यांनी आजवर 750 हून अधिक व्याख्याने दिली असून अजूनही त्यांचे अग्निहोत्र सुरूच आहे.
इतिहास संशोधनाचे कार्य कसे असावे? असे विचारल्यावर डॉ. सदाशिव शिवदे काश्मीरचे कवी कल्हण यांच्या भाषेत सांगतात,
श्‍लाघ्यः स एव गुणवान्रागद्वेषबहिष्कृतः ।
भूतार्थकथने यस्स स्थेयस्येव सरस्वती ॥
(ज्याची वाणी राग-द्वेषांपासून अलिप्त होऊन ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्याच्या कामी दृढ राहते (कुठेही पक्षपात करीत नाही) तोच गुणवान पुरूष (अर्थात इतिहासलेखक) प्रशंसनीय समजावा.)
आजच्या वातावरणात इतिहास संशोधन म्हणजे मोठी शिक्षा वाटावी असे चित्र आहे. या द्वेषमूलक वातावरणात डॉ. शिवदे यांच्यासारखे अभ्यासक ठामपणे भूमिका मांडत आहेत. नवनवीन संशोधन पुढे आणत आहेत. म्हणूनच त्यांच्या या कार्याचे मोल शब्दातित आहे. त्यांच्या भावी प्रवासास आमच्या शुभेच्छा!

Article by Ghanshyam Patil on Doctor Sadashiv Shivade in Sanchar
Article by Ghanshyam Patil on Doctor Sadashiv Shivade in Sanchar

– घनश्याम पाटील, पुणे
7057292092

(पूर्वप्रसिद्धी : दैनिक संचार / दैनिक आपलं महानगर)

टीम चपराक

हे ही अवश्य वाचा