गाय, वाद आणि उपयोगिता

सध्या गाईवरून देशभरात चांगलेच रणकंदन सुरू आहे. गाई वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षक वाटेल तसा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे गाईच्या उपयोगिता मुल्यावर चर्चा होण्यापेक्षा तिच्या धार्मिक मुद्द्यावरच जास्त गोंधळ होऊ लागला आहे. काही विचारवंत तर गोवंश आधारित शेती आता कालबाह्य झाली आहे. गाय कधी नव्हे तेवढा अनुपयुक्त पशू ठरला आहे, अशाही बिनदिक्कत भांडवली थापा मारत सुटले आहेत. मुळात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर दिसत असताना. गोवंश आधारित शेती कालबाह्य ठरल्याची बतावणी करणे, खरे तर किव आणणारे आहे. देशी गोवंशाच्या आधारे विषमुक्त अन्न पिकवता येऊ शकते. याचे सप्रमाण उदाहरण पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दाखवून दिले आहे.


अगदी 90 च्या दशकापर्यंत प्रत्येक शेतकर्‍याच्या दारात बैलजोड दिसत असे. त्यानंतर मात्र धवलक्रांती आणि हरितक्रांतीचे परिणाम देशी जनावरांच्या मुळावर उठले. येथील शेतकरी, जे की देशी जनावरांच्या उत्तम वंशावळीची पैदास करीत ते यांत्रिक शेतीकडे वळाले. धवलक्रांतीमधून ‘डेअरी’ व्यवसाय सुरू झाले. जास्त दुग्धोत्पादनासाठी गुणवत्तेचा विचार न करता येथील राजकीय, सामाजिक, भांडवली व्यवस्था शेतकर्‍यांना भूलथापा देऊ लागली. विदेशी जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी जातीच्या प्राण्यांचे विर्य देशी गायीच्या गर्भात कृत्रिम रित्या सोडले जाऊ लागले; मात्र तत्पूर्वीच गुजरात राज्यातील देशी गीर जातीच्या गायी ब्राझील देशामध्ये जाऊन तेथील दुग्धोत्पादनाला नवा आयाम देत होत्या. मात्र येथील भांडवली व्यवस्थेने जास्त दुग्धोत्पादन क्षमता असणार्‍या गीर, साहीवाल, राठी, थारपारकर, लालसिंधी या देशी जातीच्या गायींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दुग्धोत्पादन क्षमता कमी असणार्‍या मात्र शेताकामात अग्रेसर तसेच आपल्या देखणेपणाने मन जिंकणार्‍या खिलार, कांक्रेज, देवणी, लालकंधारी, हल्लीकर, कंगायम या आणि अशा अनेक जातींच्या देशी गायींच्या माध्यमातून धवलक्रांती करणार्‍यांनी विदेशी जर्सी, होस्टेन फ्रिजीयन प्राण्यांपासून वासरे जन्माला घालण्याचा सपाटा लावला.  साहजिकच पूर्वी भारतात अढळणार्‍या 60 ते 70 देशी गायींच्या जातींमधील काही जाती नष्ट पावल्या. आता फक्त 35 च्या आसपासच देशी जाती काही जाणत्या शेतकर्‍यांमुळे टिकून आहेत.
विदेशी अनुकरणाच्या प्रभावाखाली आपल्या देशी अस्मितांविषयी सुशिक्षीत वर्गात मोठा न्यूनगंड आहे. हा न्यूनगंड फक्त राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीलाच प्रभावित करीत नाही. तर जे श्रेष्ठ आहे, गुणवत्ता प्रधान आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा, त्या सार्‍या गोष्टींना हे ‘डिमॉरलायजेशन’ अंकित करते. त्यात धवलक्रांती, हरीतक्रांतीने आपली शेती आयतीच भांडवलीकरणाच्या हाती दिली. त्यामुळे सकस धान्य पिकवणारा आपला शेतकरी ‘हायब्रीड’ पिकवू लागला. ग्रामीण भागात एक म्हण आहे. एखादी व्यक्ती सदृढ नसेल तर जुनी जाणती माणसे त्याला ‘त्यो जर्सा हाय’ असं म्हणतात. भारतीय देशी गायी कमी दूध देतात. हा न्युनगंड येथील शेतकर्‍यांच्या गळी उतरवण्यात येथील व्यवस्था यशस्वी झाली. कृत्रिम रेतनाद्वारा तयार केलेल्या संकरीत विदेशी प्राणी देशभरातील शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहचवण्यात ही यंत्रणा यशस्वी झाली; मात्र यामुळे सर्वात मोठे नुकसान देशी गायींचे झाले. कित्येक जाती नष्ट झाल्या. तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.  ज्या जाती धवलक्रांतीच्या दृष्टचक्रातून वाचल्या त्यांना प्राणीमित्र संघटनांकडून संपवण्याचे काम सध्या सुरू आहे.
देशी गाईच्या आणि विदेशी जर्सी प्राण्याच्या दुधामध्ये मोठ्याप्रमाणात फरक आहे. जर्सी प्राण्याच्या दुध ए -1 प्रकारात मोडते. तर देशी गाईचे दुध ए-2 प्रकारातील आहे. ए-1 जनुक असणार्‍या विदेशी प्राण्याच्या दुधामध्ये मानवी शरिराला अपायकारक ‘बीटा कॅसोमॉरफिन-7’ हा घटक तयार होतो. ‘बीटा कॅसोमॉरफिन-7’ घटक मानवामध्ये विविध रोगांना आमंत्रण देतो. उदा.- कोलायटिस, हृदयरोग, मधुमेह, कानांचा रोग, तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. नेमका हाच घटक देशी गाईच्या दुधामध्ये नसतो. त्यामुळे देशी गाईच्या दुधाची गुणवत्ता व औषधी गुणधर्म देखील वाढतात. भारतात अढळणार्‍या सर्व भागातील देशी गाईचे दुध ए-2 प्रकारातीलच आहे. याबाबत जाणकरांनी इंटरनेटवरून अधिक माहिती शोधावी.
देशी गोवंशाबाबत शेतकर्‍यांच्या मनात आजही आत्मियता आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासनाने गाईचे केवळ धार्मिक महत्त्व न सांगता. आपल्या देशी गाईचे शेतीसाठी उपयोगिता मूल्य दाखवून द्यायला हवे. तसेच जास्त दूध देणार्‍या देशी जाती सहजपणे शेतकर्‍याला उपलब्ध करून दिल्या तर रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांपासून आपण वाचू. आज देशातील कोणत्याही फळबाग पट्ट्यातून आपण फिरलो. तर फळबागांच्या हंगामाच्या काळात अक्षरश: दररोज कोट्यावधी लिटर किटकनाशके फवारली जातात. म्हणजे फळ फुलोर्‍यात आल्यापासून ते पिकवून तुमच्या हातात येईपर्यंत किटकनाशकात बुडवून ठेवले जाते, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेती तंत्रज्ञान यशस्वी करणारे शेतकरी देखील आज लाखोंच्या घरात आहे. कळस (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शशिकांत पवार (मो. 9423034897) या शेतकर्‍याने कोणत्याही खत, किटकनाशकांच्या मदतीशिवाय नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून डाळिंबांचे यशस्वी उत्पादन घेतले. या शेतकर्‍याचे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधक संस्थेने या शेतकर्‍याच्या डाळिंब बागेचा सलग तीन दिवस अभ्यास केला. डाळिंबावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव होतो. तेल्या रोगाने डाळिंब बागपट्टा उद्ध्वस्त होतो. मात्र केवळ देशी गाईच्या गोमुत्रापासून तयार केले जीवामृत, दशपर्णी अर्क, निम अर्क, सिताफळाच्या बीयांचे तेल यापासून  डाळिंब बागेतील किड व रोगव्यवस्थापन शशिकांत पवार यांनी केले. या झिरो बजेट शेतीमधून पवार यांनी कोणत्याही उत्पादन खर्चाशिवाय लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवले. आज रासायनिक शेतीमध्ये कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च लाखोंच्या घरात जातो. रब्बी, खरिप हंगामात किटकनाशक, बुरशीनाशक उत्पादक कंपन्या समोर ‘टार्गेट’ ठेवून लाखो लिटर रसायने विकतात. भांडवली व्यवस्थेला बळी पडलेली आपली कृषी विद्यापिठे, कृषी विभाग आणि शेतीतज्ज्ञ देखील क्षणिक लाभासाठी नैसर्गिक शेतीच्या तंत्राकडे दुर्लक्ष करून रासायनिक शेतीला बळ देतात. रासायनिक शेतीत उत्पादित होणारा आणि सर्वसमान्य माणसाच्या आहारात येणारा रोजचा भाजीपाला, फळे, दूध, धान्य यामुळे ‘स्लो पॉयझेनिंग’ होत आहे. याकडे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. राहता राहिला मुद्दा शेतकर्‍यांच्या सध्याच्या अवस्थेचा तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य असेल तर मिळणारे सर्व उत्पादन हा त्या शेतकर्‍याचा नफा ठरेल. आंध्रप्रदेश सरकारने नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला. तेथील शेतकर्‍यांना वेळोवेळी नैसर्गिक शेतीचे धडे मिळावेत. यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. तेथील राज्य सरकार नैसर्गिक शेतीच्या कार्यशाळा आयोजित करून शेतकर्‍यांना ‘झिरो बजेट’ शेतीचे धडे देत आहेत. हे स्वत: सुभाष पाळेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र आपले राज्य शासन या शेती तंत्राला शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. तसेच केवळ पुरस्कार देऊन या शेतीतंत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतकर्‍यांनी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांची कर्जमुक्ती यासर्व विषयांवर अनेक पर्याय येथील काही जाणकारांकडे आहेत. केवळ भांडवली फायदे न पाहता शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी प्रत्येक पर्यायाचा सकारात्मक विचार व्हायला हवा. तरच शेती हा नफ्याचा व्यवसाय ठरेल.

– रवीकिरण सासवडे
9689849009

टीम चपराक

हे ही अवश्य वाचा