कोपर्डी हत्या प्रकरण – कच्चे दुवे

कोपर्डी येथील निर्भया बलात्कार व खून प्रकरणात अनेक कच्चे दुवे असून यातील आरोपींची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याचे काम पाहत असून, निवृत्त सरकारी वकील बाळासाहेब खोपडे हे आरोपींची बाजू मांडत आहेत. याबाबत ‘द वीक’ च्या 11 जूनच्या अंकात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा एक विशेष लेख प्रकाशित झाला असून, तो ‘चपराक’च्या वाचकांसाठी देत आहोत. या प्रकरणाला अनेक कंगोरे असून, प्रत्यक्ष साक्षी आणि पुराव्यांच्या आधारावर हे प्रकरण वेगळेच वळण घेईल, अशी शक्यता आहे.

कोपर्डी येथील 15 वर्षाच्या शाळकरी मुलीच्या निर्घृण हत्येमुळे दलित आणि मराठा समाजात महाराष्ट्रात अभूतपूर्व दरी निर्माण झाली आणि त्यातूनच  गेल्या वर्षी राज्यभर मोर्चांची लाट उसळली. त्याचे पडसाद आजही उमटताना दिसतात. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावात 13 जुलै रोजी तिचा मृतदेह सापडला होता. तिचे हात खांद्यापासून निखळलेले होते. ती विवस्त्रावस्थेत होती आणि देहावर अत्याचाराच्या खुणा होत्या.

कोपर्डी हे गाव दुष्काळग्रस्त कर्जत तालुक्यात आहे. गावात अवघी 470 घरे असून लोकसंख्या 2200 आहे. गावातील बहुतेक रहिवासी मराठा समाजाचे आणि सुद्रिक आडनावाचे आहेत. तिचेही आडनाव सुद्रिक होते. गावात दलितांची जवळपास 12 घरे आहेत. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे याच घरातले आहेत. यातील दोघे मयताच्या नात्यातीलच एकाच्या विटभट्टीवर काम करत होते.

गुन्ह्याचे तपशील वृत्तपत्रात झळकताच राज्यात उद्रेक उसळला. मराठा तरुणांनी आपल्या संतापाला सोशल मीडियावरून वाट करून दिली. लवकरच राजकीय नेत्यांनी कोपर्डीला भेट देणे सुरु केले. महाराष्ट्रात लोकसंख्येने 38% असलेला मराठा समाज या उद्रेक व उद्वेगातून एकत्र येऊ लागला. औरंगाबादच्या मूक मोर्चात जवळपास तीन लाख लोकांनी सहभाग नोंदवल्याचे पाहून राजकीय नेतृत्वही हादरले. त्यांनी हा खटला दृतगती न्यायालयात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सुरू केली. मराठा आरक्षण व ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा कराव्यात या मागण्याही पुढे सरकवल्या गेल्या. मराठा आणि दलित समाजाचे धृवीकरण भयप्रद अवस्थेला पोहोचले.

दलित अभ्यासक विनय काटे म्हणतात, सोशल मीडियातून खूप जहर ओकले गेले. 2016 मधील नाशिकच्या दंगली विद्वेष आणि कुटिल धृवीकरणाचा परिपाक होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण न्यायालयात ज्येष्ठ सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम हाताळतील, असे जाहीर केले. सरकार उज्ज्वल निकम यांच्या नावाभोवती असलेल्या वलयाचा वापर करत भडकलेली आग शांत करू पाहत होते. अहमदनगर जिल्हा न्यायालयासमोर गुन्हा घडून गेल्यानंतर 89 दिवसांनी सुनावणी सुरु झाली. ‘द वीक’ला या गुन्ह्याचा एफआयआर, आरोपपत्र, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती मिळाल्या. यात काही गोष्टींचा मेळ लागत नाही.  एफआयआरमधील काही अंश विवेचनात स्पष्टता यावी यासाठी देत आहे.

बळी गेलेली मुलगी नववीत शिकत होती आणि 12 व 13 जुलै रोजी ती आजारी असल्याने शाळेत जाऊ शकली नाही. 13 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या आजोळघरातून काही मसाले आणण्यासाठी पाठवले होते. ती मुलगी सायकलवरून तेथे गेली, मसाल्यांची पिशवी घेऊन आपल्या घराकडे निघाली. ती परतत असताना, आजोळघरापासून ती साधारणपणे दिडशे फुटांवर आली असता तीन आरोपींनी तिला थांबवले. त्यांनी निर्दयपणे तिच्यावर हल्ला करून, बलात्कार करुन खून केला. त्यानंतर तिचे प्रेत तिच्या आजोबांच्या घराच्या दिडशे फूट अंतरावर शेतात तिरके ओढत नेले. हे घडत असताना शिवराम गोरख सुद्रिक या मयताच्या चुलतभावाने पाहिले.

शिवरामच्या जबाबात म्हटले आहे की त्याने निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या पप्पू शिंदेला सात ते सव्वासातच्या दरम्यान पाहिले. शिवरामने त्याला हाक मारली तर तो पळून गेला. मग तो त्या निंबाच्या झाडाकडे गेला असता त्याला नग्नावस्थेतील नि:श्चल मयत दिसली. तोवर बळीची आई आणि थोरली बहिण तेथे आले. शिवराम म्हणतो की तो मग शिंदेच्या मागे धावला पण त्याने त्याला हुलकावणी दिली. तिसरा आरोपी भैलुमेचे मराठा असलेले वकील बाळासाहेब खोपडेंना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ते निवृत्त झालेले सरकारी वकील असून त्यांनी ही केस स्वत:हून लढवायला घेतली आहे. ‘माझ्या आतल्या आवाजाने मला मराठा समाजाची गरिमा वाचवायला सांगितले,’ असे ते म्हणतात. ‘पुराव्यांच्या कमतरतेनेच त्यांना हे वकीलपत्र घेण्यास प्रेरित केले’ असेही ते म्हणाले.
तक्रारीमध्ये शिवराम घटनास्थळी आरोपी क्रमांक 2 व 3 उपस्थित असल्याचे म्हणतच नाही.

खोपडे म्हणाले! याचाच अर्थ असा होतो की इतरांना अकारण गोवण्यासाठी नंतर बनावटपणा केला गेलेला आहे. तक्रार दाखल केल्यादिवशीच नोंदवलेल्या पुरवणी जबाबातही अन्य आरोपींचा उल्लेख नाही. ही घटना पावणेसात ते सव्वासातच्या दरम्यान घडली असे कागदपत्रं म्हणतात. आरोप केलेले अपहरण, हल्ला, बलात्कार, खून आणि तिचे प्रेत हलवण्याचे काम हे फक्त अर्ध्या तासात कसे झाले? हा खोपडेंचा प्रश्न आहे. ‘द वीक’ने घटनास्थळाला आणि लालासाहेब बापू सुद्रिक (मयताचे आजोबा) यांच्या घरालाही भेट दिली. तिचे आजी-आजोबा घरीच होते परंतु जरी शेताचा संपूर्ण पट्टा मोकळा असला तरी त्यांनी काही ऐकले अथवा पाहिले नाही, असे मयताची आई रेखा सुद्रिकने सांगितले.
जबाबांमधील विसंगती उघड आहेत. उदाहणार्थ रेखा सुद्रिकने न्यायालयासमोर सांगितले की जेव्हा घटना घडली तेव्हा तिचा नवरा शेतावर कामाला गेला होता. ‘वीक’शी बोलताना मात्र तिने सांगितले की तो त्यावेळेस कर्जत येथे असलेल्या त्यांच्याच हॉटेल ‘गारवा’त होता.

मयत मुलीच्या शाळेतील हजेरीपुस्तकातील नोंदीही बुचकळ्यात टाकणार्‍या आणि प्रश्‍न उपस्थित करणार्‍या आहेत. खोपडे म्हणाले की, जून महिन्यासाठीच्या हजेरी पुस्तकाच्या पानावर वरच्या उजव्या बाजूला पान नंबर नव्वद छापलेला आहे पण जुलै महिन्यासाठीच्या पानावर मात्र कोणताही नंबर नाही. त्या पानावर नजर टाकली तरी 12 व 13 जुलैची उपस्थिती दर्शवणारी झ ची खूण अनुपस्थिती दर्शवण्यासाठी अ अशी छेडछाड करत बनवण्यात आली आहे. शिक्षकांनी हे अमान्य केले पण त्यांनीच ‘13 जुलै रोजी रात्री आठ वाजता मयत’ असे हजेरीपुस्तकावरील त्या पानावर मयताच्या नावासमोर लिहिले असल्याचे मान्य केले. येथे हे लक्षात घेतले पाहिजे की रात्री आठ वाजता मृत्युची वेळ आहे हे त्याने लिहिले हे उल्लेखनीय आहे. यामुळेच मी यांना बनावट पुरावे म्हणतो.

कर्जत पोलीस स्टेशनची डायरी नोंदवते की कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावातील लालासाहेब सुद्रिक यांनी रात्री 9.40 वाजता कळवले की कोणीतरी त्यांच्या 16 वर्षीय नातीचा खून केला आहे. एवढे सांगून फोन बंद केला गेला. खोपडे विचारतात, तक्रारदार आणि मयताच्या आईने पप्पू शिंदेला सव्वा सातला पाहिले. मग त्यांनी फोन करायला 9.40 पर्यंतचा वेळ का घेतला आणि कोणीतरी खून केला असे का म्हटले? ‘वीक’कडे फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टेमचे अहवाल आहेत. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये ’पप्पू शिंदेने खून केला’ असे नमूद केलेले आहे. डॉक्टरला पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधे आरोपीचे नाव नमूद करणे गरजेचे वाटावे हे नवलच आहे! असे खोपडे वकील म्हणतात.

फॉरेन्सिक रिपोर्ट नमूद करतो की मयताच्या देहावर मिळालेल्या चावल्याच्या जखमांशी आरोपी नं 2 व 3 च्या जबड्यांची ठेवण जुळत नाही. आरोपींच्या कपड्यांवर योनीस्त्रावाची कसलीही चिन्हे मिळालेली नाहीत. त्याच रिपोर्टमधे वीर्याचेही चिन्ह नाही असे नोंदवण्यात आले आहे. या अहवालात आलेली बाब म्हणजे कोणताही पुरुषी डीएनए मयताच्या शरीरावर अथवा कपड्यांवर मिळालेला नाही. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालावर मिळालेला नाही.
सरकारपक्षाच्या साक्षीदारांनी आरोपी शिंदेला 13 जुलैला निळ्या रंगाच्या टीव्हीएस मोटरसायकलवर पाहिले असे जबाबात नोंदवले आहे. घटनास्थळाजवळच ही मोटरसायकल पार्क केलेली होती असाही आरोप आहे. काही साक्षीदारांनी सांगितले की शिंदेने गुन्हा घडण्याच्या तीनच दिवस आधी ही बाईक खरेदी केली होती. मयताच्या आजीने, लक्ष्मीबाई सुद्रिकने सांगितले, नात्यातीलच वीटभट्टी चालवणार्‍याने आपल्याकडे काम करणार्‍या शिंदेला ऐंशी हजार रुपये मोटारसायकल घेण्यासाठी कर्जाऊ दिले होते. ‘द वीक’कडे या मोटारसायकलचे दिनांक 14 जुलैची, म्हणजेच गुन्हा घडल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवसाची तारीख असलेले या मोटरसायकलचे इन्व्हाईस आहे.. त्यावर शिंदेला मोटारसायकल विकली असल्याचे म्हटलेले आहे. आरटीओच्या फॉर्म 20 वरही (हा वाहन नोंदणीसाठी आवश्यक मानला जातो.) शिंदेच्या सह्या आहेत. पण या फॉर्मवर नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेला चासिज आणि इंजिन नंबर मात्र नाही. खोपडे विचारतात की हंगामी रोजंदारीवर काम करणार्‍याला मोटारसायकल घेण्यासाठी 80 हजार रुपये हातऊसने दिले जातात आणि त्याला गुन्हा घडल्याच्या दुसर्‍या दिवशी ते वाहन त्याच्या नावावर करून मिळते ही बनावटगिरी आहे.

शेडगावमध्ये राहणार्‍या पप्पू शिंदेच्या वडिलांना, बाबुलाल शिंदेंना ‘द वीक’ने भेट दिली. ते म्हणाले, मी त्यावेळेस पंढरपूरला गेलो होतो. घरी माझी बायको, सून आणि पप्पू होते. पप्पू हा बापू सुद्रिकच्या येथे दारू प्यायला जात असे. मयत मुलीशी त्याचे खेळीमेळीचेच संबंध होते. पप्पू शिंदे सुद्रिकांच्या व्हरांड्यात दारू पीत असे. एकदा त्याने सुद्रिकांच्या घरातून रडण्याचा व जोरात शिवीगाळीचा आवाज ऐकला आणि तेथून घाबरून पळत सुटला. दारुच्या नशेत पळताना तो अनेकदा पडला. त्यानंतर काय झाले हे त्याला आठवत नाही, असेही बाबुलाल शिंदेंनी सांगितले. आरोपी नंबर 2, संतोष भवाळ हा विटभट्टीवरच राहतो आणि पप्पूबरोबर तो कधीही दारू प्यायला गेला नाही. आरोपी नंबर 3, नितीन भैलुमे हा बाहेर गेला होता. तो परतला न परतला तोच सुद्रिकांची माणसं आली आणि त्याला मारहाण करू लागली. मुलीला कोणी मारले हे मला माहीत नाही पण निरपराधांना बळीचा बकरा बनवू नये, असे बाबुलाल म्हणाला.

उज्ज्वल निकम यांना या केसबाबत विचारले असता ते म्हणाले की, सुनावणी सुरू आहे. माझी साक्षीदारांची तपासणी लवकरच संपेल. अद्याप तपास अधिकार्‍यांचा जबाब नोंदवायचा आहे. बचाव पक्षाच्याही साक्षीदारांचीही यादी आहे. ही सध्याची केसची स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत म्हणाले, एवढा दुबळा पुरावा सुनावणीत टिकेल असे वाटत नाही. हा मामला मात्र गंभीर होत चालला आहे. एप्रिलमध्ये आरोपींवर न्यायालयाच्या आवारातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. आरोपी व त्यांचे नातेवाईक भयाच्या छायेत जगत आहेत तर दुसरीकडे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भावना आहे.

सौजन्य; ‘द वीक’ (11 जून 2017)

विसंगती व अनुत्तरीत प्रश्‍न
1. गुन्ह्याची माहिती अडीच तासांनी पोलिसांना का दिली आणि त्यात आरोपीचे नाव जर माहीत होते तर का दिले गेले नाही?
2. बारा व तेरा जुलैला मयत खरेच शाळेत अनुपस्थित होती की तिच्या उपस्थितीला नंतर अनुपस्थितीत बदलवले?
3. बलात्कार झाला तर मयताच्या शवविच्छेदन अहवालात योनीस्त्राव/पुरुषी वीर्य याची अनुपस्थिती का? डीएनए अहवालही मयताच्या शरीरावर पुरुषी डीएनए नसल्याचे का सांगतो?
4. आरोपी पप्पू शिंदेला गुन्हा घडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मोटरबाईक कशी मिळाली? हंगामी रोजंदारीवरील कामगाराला 80 हजार रुपये रक्कम हातउसने कसे दिले गेले?
5. फिर्याद व जबाबात एवढ्या विसंगती कशा निर्माण झाल्या?

निरंजन टकले

ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

हे ही अवश्य वाचा