शेतीबाडीच्या कविता

साहित्य चपराक’चे सहसंपादक आणि प्रतिभावंत कवी माधव गिर यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे दोन अस्सल कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड वाचकप्रियता लाभली. शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शेतीबाडी’ या अष्टाक्षरी खंडकाव्यात त्यांनी अनेक प्रश्‍न सुहृदयतेने हाताळले आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले गिर सर स्वतः शेतकरी असल्याने त्यात शेतकर्‍यांच्या सुखदुःखाचे प्रतिबिंब लखलखीतपणे उमटले आहे. सध्याच्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमिवर त्यांच्या ‘शेतीबाडी’तील काही रचना खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी. आपल्याला त्या आवडतील याची खात्री आहेच. या कवितांवरील  आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा; तसेच या कविता जास्तीत जास्त शेअर करा.

जातीचा मी शेतकरी                                      

जातीचा मी शेतकरी
माझी पुरातन कुळी
किती खोदले तरीही
नाही सापडत मुळी

थोडे उचलून धरा
मग बघा चमत्कार
माळरानाला येईल
फळा फुलांचा बहार

जवारीच्या कणसांनी
माझी माय हेलावते
चांदण्याच्या आडोशाला
मंद मंद विसावते

भुईमूगाच्या फुलात
तिला हळद लागते
गर्द हिरव्या पानात
काळी माऊली सजते

गहू भरल्या रानात
तिचे अंग शहारते
रूप फुलतं भुईचं
भुई गर्भार दिसते

तूर उडीद मूगाचा
तिचा मोठा वानवळा
याच्याशिवाय भुकेचा
आहे रिताच सोहळा

येता आभाळ भरून
क्षण असे सजतात
शब्द शब्द माझे सारे
काकरीत भिजतात

नांगराच्या शेतामध्ये
येता पावसाची झडी
ढेकळात फुलवितो
जीवनाची शेतीबाडी
श्री. माधव गिर
संपर्क क्रमांक – 8975878803

टीम चपराक

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

हे ही अवश्य वाचा