माझं लिखाण!

ज्या समाजात आपण राहतो, ज्या समाजाने आपली जडणघडण  केली त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. विधात्याने जर माझ्या हातात लिखाणाचे कौशल्य दिले असेल तर मी माझी लेखणी समाजाला काहीतरी चांगलं देण्यासाठी वापरावी किंबहुना प्रत्येक कलावंताने आपली कला समाज समृद्धीसाठीच निर्माण करावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनच मी लिहितो.
1991 साली माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले ते विविध मासिकातील विनोदी कथांचे. आजवर छोटी मोठी मिळून 27 पुस्तके माझ्या नावावर आहेत. मला तर वाटतं कवितांप्रमाणेच गद्य लेखनसुद्धा ‘स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग’चं असतं. अन्यथा एरवी सामान्य वाटणारा साहित्यिक असामान्य वाङ्मय कसं निर्माण करू शकतो? माझ्या लिखाणाची सुरूवातही काही स्वान्त सुखाय झालेली नाही. अचानक आलेल्या अपयशांच्या लाटांनी खचून गेलेला मी, आत्महत्येच्या दिशेने चाललो असताना सुचलेल्या कवितेने मला वाङ्मय प्रदेशात आणलं आणि जगण्याचा आत्मविश्‍वास दिला; मात्र अपयशाची सल कायम पाठिशी राहिली. त्यामुळे पाय जमिनीवर राहिले. कविता, एकांकिका, कथा, लेख, नाटक, नभोनाट्य असं चौफेर लिखाण केलं. त्यामागे आईवडिलांचे आशीर्वाद, भावंडांची, पत्नीची, मुलांची साथ आणि वाचकांच्या शुभेच्छा नक्कीच आहेत.

काहीतरी नवीन सुचणं ही जर दैवी देणगी असेल तर खरंच तो ‘चालवितो हाती धरोनिया.’
रोजच्या अनुभवातील विसंगतींवर कथा लिहायचो. कॉलेजमध्ये गरजेसाठी एकांकिका लिहिल्या. पुरूषोत्तम करंडकला ‘मी उभा केव्हाचा’ एकांकिका बक्षीस विजेती ठरली आणि लिखाणाचा हुरूप वाढला.

हळूहळू दिवाळी अंकांच्या संपादकांची पत्रं यायला लागली. कथेत जिवंतपणा जाणवतो असे ते लिहायचे. आवाज, बुवा, जत्रा, मोहिनी, श्यामसुंदर, धमाल धमाका, विशाल विटा अशा अंकात कथा लिहिल्या. पुस्तके प्रकाशित व्हायला लागली. साकेत, पुष्प नवभारत, आभा, त्रिदल, उन्मेश अशा प्रकाशकांनी काढली.

2002 साली पुण्याहून श्री. घनश्याम पाटील ह्यांचे पत्र आले. ‘चपराक’ नावाचा दिवाळी अंक काढतोय.
कथा पाठवा! पाठवली; पण एके दिवशी सकाळीच श्री. पाटील नगरला घरी हजर. माझ्या हातात मानधनाचे पाकीट देत म्हणाले, ‘‘इथून पुढे तुमची सगळी पुस्तके मी काढणार!’’ असा मुलुखावेगळा प्रकाशक मिळणं हे देखील लेखकाचं भाग्यच म्हणायचं. माझ्या लिखाणावरच त्यांचं प्रेम आजही तसंच आहे, म्हणूनच एक नव्हे ही चार पुस्तके ‘चपराक प्रकाशन’ने काढली.

मी चपराक साठी 2002 पासून लिहित असलो, तरी माझा पहिला कथासंग्रह 2008 साली ‘खुलजा सिम सिम’ नावाने प्रकाशित झाला. ‘साक्षात हिटलरलाही खदाखदा हसायला लावणार्‍या कथा’ अशी जाहिरात पाटलांनी केली. कथा आहेतही तशाच. सूत्रसंचालकाला आलेला गमतीदार अनुभव, आटींपायी वैतागलेला आदर्श शिक्षक, स्वत:च्याच शिस्तीचा दणका स्वत:लाच बसलेला बॉस, गुंड मुलाचं निर्व्याज प्रेम अशा 14 कथा वाचल्याशिवाय वाचक पुस्तक खाली ठेवतच नाही. त्यातील बर्‍याच कथा कथाकथनासाठी घेतल्या जातात.
दरम्यान मी अहमदनगर येथील समाचार वृत्तपत्रातून ‘मनोतरंग’ नावाचं सदर लिहित होतो. सुमारे सहाशे लेख लिहिले. सहा वर्षे हे सदर चालू होते. वाचकांच्या प्रचंड आवडीचे हे सदर. दर शनिवारी आठ-दहा नवे फोन असायचे, वाचकांच्या पत्रांनी दोन बॉक्स फाईल भरल्यात. (तेव्हा फेसबुक, व्हॉट्सऍप नव्हते.) पहिल्या सत्तर लेखांचे पुस्तक पुण्याच्या ‘उन्मेश प्रकाशन’ने त्याच नावाने काढले. तर ‘चपराक प्रकाशन’ने दुसर्‍या 75 भागांचे पुस्तक ‘ओविली फुले मोकळी’ नावाने काढले. केवळ एक शब्द घेऊन त्यावर तीन-चारशे शब्दांचं विनोदी, वैचारिक, अध्यात्मिक लिहायचो. खरं तर ते ‘शुगर कोटेड मेडिसिन’ होतं; पण अबालवृद्धांना आवडायचं. विषयच बघा, माणूस, प्रश्‍न, दिशा, स्पर्श, दर्शन… प्रसिद्ध साहित्यिक शं. ना. नवरे ह्यांनी पत्र पाठवून लिहिलं होतं, ‘आपले लेखन मन:पूर्वक, पोटतिडकीने लिहिलेले जाणवले. त्यामागे जीवनविषयक श्रद्धा आहे, संस्काराचे महत्त्व, नात्यांचे भान आहे. विज्ञानाकडे डोळेझाक नाही की अंधश्रद्धेशी जवळीक नाही. वाचताना वाचकाला आधारछत्र सापडल्यासारखं वाटतं. तो जगण्यावर प्रेम करू लागतो. लेखक म्हणून ही तुमची हेवा करण्यासारखी कमाई आहे!’ बस आणखी कोणती पावती हवी असते लेखकाला? या लेखांची एक लेखमाला ‘शब्दतरंग’ नावाने साप्ताहिक ‘चपराक’ मध्ये चालू आहे. या लेखांची अजून तीन-चार पुस्तके नक्कीच होतील. वाचकांच्या प्रेरणेमुळेच नंतर अहमदनगरमधील सर्व वृत्तपत्रातून स्तंभलेखन केलं.
‘चपराक प्रकाशन’ने दिमाखात ‘ओविली फुले मोकळी’ हे माझं रौप्य महोत्सवी पुस्तक प्रकाशित केलं ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते. आणखी कोणते सुवर्णक्षण हवे असतात लेखकाला?

घनश्याम पाटील पुस्तके प्रकाशित करण्याबाबत गुणग्राही आहेत. ‘चपराक प्रकाशन’ची सर्व पुस्तके तावून सुलाखून निवडून घेतली जातात. तिथे मग ज्येष्ठ, नवोदित असा पंगतीप्रपंच नाही. विशिष्ठ दर्जाचे असेल तेच घेतले जाणार. ‘चपराक’च्या कार्यालयात अशाच एकदा गप्पा मारताना पाटील म्हणाले, ‘‘आपण सगळ्या प्रकारची पुस्तके छापली. कथा, कादंबरी, कविता, तुम्ही अजून काय लिहिले आहे?’’ मी म्हटलं, ‘‘माझी तीन-चार नाटके आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत गाजलेली. ‘पाषाणगंध’ तर बक्षीस विजेते आहे.’’ पाटील म्हणाले, ‘‘आपण छापू.‘‘ नाटके छापण्याच्या बाबतीत प्रकाशकांची वेगवेगळी मते असतात; पण ते म्हणाले, ‘‘द्या पाठवून’’ आणि ऑगस्ट 2015 ‘पाषाणगंध’ प्रकाशित झाले.
हे नाटक लिहिताना माझ्या मनात खूप काहूर होते. तर्‍हेवाईक नातेवाईक, भाऊबंदकी, सासुरवास, जुनी चाललेली संस्कृती वगैरे आणि जन्माला आलं ‘पाषाणगंध’.

खेडेगावातला चौसोपी वाडा विकण्याचा निर्णय घेणारे तीन भाऊ, वाड्यात राहणारी वहिनी, तिला सांभाळणारा वेडसर मुलगा ह्यांच्यातलं मानसिक द्वंद्व! एका रात्रीत घडणारं हे नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. ‘अरे असंच घडतं आमच्या घरात’ असं प्रेक्षक जेव्हा म्हणतात तेव्हाच नाटक लिहिल्याचं समाधान मला मिळतं. पुढे या नाटकावरच नगरच्या डॉ. जोशी ह्यांनी एमफील केलं. ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही मोठ्या दिमाखात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि श्री. सदानंद मोरे सर ह्यांच्या हस्ते झाला.

हे चालू असतानाच मी ‘धनंजय’सारख्या दिवाळी अंकासाठी भूतकथा, रहस्यकथा, गुन्हेगारी कथासुद्धा लिहित होतो. दरवर्षी पणजीहून गणाधीश खांडेपारकर मला अगोदरच मानधन पाठवून त्यांच्या ‘मैफल’ दिवाळी अंकासाठी सामाजिक कथा मागवित. धनंजयच्या राजेंद्र कुलकर्णींना तर दिवाळीची कथा फेब्रुवारीला लागायची. ह्या सर्वांसाठी मी सात-आठ वर्षे कथालेखन केलं. मला नेहमी वाटतं, भूतं वाईटच असतात का? काही भुते प्रेमळ पण असतील. त्यांना लहान मुले आवडत असतीलही. मग त्या दृष्टिनं काही कथा लिहिल्या. काही खुनाच्या, कारस्थानाच्या कथाही लिहिल्या. पाटील म्हणाले, ‘‘तुमच्या विनोदी कथा पुस्तक रूपाने आल्यात, ह्या कथांचेही वाचक स्वागत करतील’’ आणि पुस्तक काढले ‘हॅपी रिटर्न्स’. ह्या 18 कथांपैकी काही कथांची नावेच तुम्हाला पुस्तक वाचायला उद्युक्त करतील. ‘सूर्य न पाहिलेला माणूस’, ‘कमनशिबी’, ‘पराजय’, ‘दुहेरी’, ‘नशीब.’

माझ्या लेखन प्रवासात मी खूप लेखक वाचले पण आदर्श कुणाचा घेतला नाही, त्यामुळे जे लिहिलं त्याची शैली स्वतंत्र होती. कुणाची कॉपी नव्हती. बळजबरीनं कधी लिहिलं नाही. अगदी मनोतरंग सदर देखील मी स्वत:हून बंद केलं, तेव्हा वाचकांचे फोन आले ‘‘सदर बंद करायचा तुम्हाला काय अधिकार?’’ असं हक्काच प्रेम करणारे वाचक मला मिळाले. स्पर्धेसाठी, बक्षिसासाठी वा प्रकाशनासाठी कधी ओळखी काढल्या नाहीत; मात्र सगळं कुटुंबच उच्चशिक्षित असल्याचा फायदा झाला. वडील ज्ञानेश्वरीचे पारायण करीत. दाखले देत. थोरल्या बंधूंचे नाटक, सिनेमा साहित्य यावर अफाट वाचन व लिखाण या सर्वाचा फायदा झाला. आयुष्यभर इमानदारीने बँकेत नोकरी आणि लिखाण एवढेच केले. घरच्यांनी सर्व जबाबदार्‍या सांभाळल्या, पत्नीने तर तिची नोकरी सांभाळून! नोकरी करतानाही हेवेदावे, बदल्या, राजकारण, कार्यक्रम असला की रजा न देणे, हेवी डेस्क्स, खेडेगावी बदली सगळं अनुभवलं. स्थानिक साहित्य क्षेत्रातही भलेबुरे अनुभव आले; पण त्याचा उपयोग लिखाणासाठीच झाला. निंदकाचे शेजारचे घर फायद्याचे ठरले. किंबहुना असे अनुभव प्रेरणा देतात.

‘खुलजा सिम सिम’मधल्या कथा ह्या बातम्या, टीव्ही मालिकावरून घेतल्या आहेत. प्रेमभंग झाला म्हणून मुलगा आत्महत्या करण्यासाठी विष घेतो, नंतर त्याला जगावसं वाटतं आणि तो डॉक्टरकडे पळत जातो ह्या थीमवर कथा रंगते, वडील चेष्टा करतात. शेवटी ते विष नसते पण प्रेयसी मिळते अशी ही कथा. तर खुलजा…. मध्ये टीव्ही कार्यक्रमात उघडलेल्या दालनातली तरुणीच गिफ्ट म्हणून पाहिजे असा हट्ट गावचे पाटील करतात. तर मुलाच्या खोड्यांना  कंटाळलेला बाप आपण आजारी असताना तोच मुलगा देवापाशी प्रार्थना करताना पाहतात अशा अनेक कथा लिहितानाच मला हसू येत होते.

ओविली फुले मोकळी तर कोणतेही पान उघडून वाचावे असे. शांतता लेख लिहिताना मी चर्चमधली शांतता आवडते असं लिहिलं तेव्हा अनेक ख्रिश्‍चन मित्रांनी अभिनंदन केले. ह्या संग्रहातले काही लेख तर टायपिंग इन्स्टिट्युटने ‘लेसन’ म्हणून विद्यार्थ्यांना दिले. काही लेखाच्या प्रती प्रिंट करून सामाजिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांना वाटल्या. एका वाचकाने मोठ्या पत्रात एकच ओळ लिहिली, ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ ‘स्पर्श’ वाचताना एका मातेला अश्रू अनावर झाले. अशा हजारो आठवणी या लेखांच्या आहेत. ‘ह्या लेखांची स्फुर्ती घेऊन मी लिहितो’ असं एका नवोदित लेखकाने पत्र पाठवलं. मला वाटतं हे मला मिळालेलं सर्वात मोठं यश आहे.

‘पाषाणगंध’चा शेवट पाहून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. शेवटी जो दरिद्री भाऊ असतो, तोच ‘उपाशी पोटी राहिलो तरी पूर्वजांचा स्पर्श असलेली वास्तू विकू देणार नाही’ असं म्हणतो  तेव्हा श्रीमंत भावाला त्याची किंमत कळते; पण तोपर्यंत अनाथ जगूने प्राण सोडलेला असतो. प्रत्येक प्रवेश प्रेक्षकांच्या हृदयात शिरतो. काही वाक्य सुभाषिते म्हणून योग्य आहेत असे परीक्षण छापून आले होते. हेच नाटकाचे यश आहे.
सदानंद भणगे म्हणजे विनोदी लेखक असे म्हणणारे वाचक माझ्या धनंजय मधल्या कथा वाचून चक्रावले. बायकोच्या नियोजनबद्ध खुनाच्या योजनेत स्वतःच फासणारा नायक, वाचकांशी बोलणारी व्यक्तीच भूत असणे या कल्पनाच वाचकांना नवीन होत्या. चोरी करून साईबाबांच्या दर्शनात चुकून आलेला चोर साईबाबांचा चेहेरा बदलेला पाहून घाबरतो, चोरी टाकून देतो तेव्हा त्याला बाबा हसताना दिसतात. ह्या कथा वाचून मला दूरदूरहून पत्रे आली.

‘चपराक प्रकाशन’नं हे सारं पुस्तकरूपात आणलं. वाचन संस्कृती संपत आली म्हणणार्‍यांनाच चपराक बसावी असे हे सारे अनुभव आहेत. वाचन समाधीत वाचक वेगळ्याच विश्वात जाऊन आपली सुखदु:खं विसरतात हे मात्र नक्की! विनोदी प्रसंग, बातम्या लिहून ठेवतो. त्या लिखाणाला उपयोगी पडतात. रिक्षावाल्याने स्वत:च्या मुलांचा खून डोंगरावरून ढकलून केला, बायकोला मारले त्यावर नाटक उभे राहिले. खेड्यातल्या श्रीमंताने मुलीच्या लग्नासाठी मुलांच्या मुलाखती घेतल्या त्यावर विनोदी कादंबरी झाली. टिपकागदावर शाईचा थेंब पसरत जावा तसा सुचलेला विचार विस्तारत जातो हीच लिखाणाची प्रक्रिया. खरं तर ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वाचल्यानंतर वाटत त्यांनी दुसर्‍यांना काही लिहायला ठेवलेच नाही.

स्वभावातले काही दोष म्हणजे खोटं बोलता येत नाही आणि नाटके लिहिता आली तरी ‘नाटकी’ वागता येत नाही. उगाच डोस्टोव्हस्की वाचतो, काफ्का वाचतो असं सांगण जमत नाही. खरं तर घनश्याम पाटलांसारखे गुणग्राही प्रकाशक (वयानं लहान पण अनुभावनं खूप मोठे. साप्ताहिक, मासिक, 500 पानी दिवाळी अंक, 100 पुस्तके प्रकाशित करणारे) आणि त्यांची उत्साही टीम, गावोगावीचे वाचक, लिहायला उद्युक्त करतात. ईश्वरी ध्यास मानून लिखाण केलं की वाचकांना ते आवडतं. शेवटी रोबर्ट फ्रोस्ट म्हणतो तसं अजून खूप बाकी करायचं आहे. माईल्स टू गो बिफोर आय स्लीप!

– सदानंद भणगे, अहमदनगर
9890625880

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा