वाडे चिरेबंदी; रस्ते माणुसकीचे!

पाचशे वर्ष दिमाखाने उभी असणारी किल्ल्याची वास्तू जशी नगरची शान आहे, तशाच अनेक ऐतिहासिक वास्तू देखील शहरात आहेत. नगर शहरात नऊ वेशी होत्या! पैकी माळीवाडा आणि दिल्ली दरवाजा वेस आजही अस्तित्त्व टिकवून आहेत. त्या पाडण्याची मोहीम निघाली होती पण इतिहास संशोधकांनी कोर्टात जाऊन त्या वाचवल्या. त्यावेळी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांची मदत झाल्याचा इतिहास आहे. बागरोजा, दमडी मशीद, चांदबीबी महाल अशा अनेक वास्तू नगरची शान आहेत; तरीही आम्हाला आठवतात ते आमचे दगडी वाडे! आमच्या शाळेच्या इमारती!

1965-70 च्या दरम्यान आम्ही सोसायटी हायस्कूलमध्ये शिकलो. त्या शाळेतल्या एका इमारतीचे भाडे एक रुपया होते. शाळेतच असणार्‍या मोने कला मंदिराने तर अनेक दिग्गज कलावंत पाहिले होते. ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’ ते थेट दादांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ इथे रंगले होते. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आम्हीही तिथे वावरलो. डाव्या बाजूच्या वर्गात गॅदरिंगच्या आदल्या रात्री बुंदीचे लाडू वळण्यासाठी आम्हाला बोलावल्याचे आठवते. बुंदीची ती रास आजही डोळ्यासमोर दिसते. ‘पंख हवे मज’ नाटकात काम करताना दिग्दर्शक रासोटे सरांची बोलणीही खूप खाल्ली होती. आता मालिकांमुळे ‘ओरडा खाल्ला’ असा वाक्प्रचार आलाय. असो!

प्रत्येक गल्लीत मोठमोठे वाडे हे जुन्या नगरचे वैभव होते. काही वाड्यांचे दर्शनी दार एका गल्लीत तर मागचे दार दुसर्‍या गल्लीत उघडत असे. डांगे गल्लीतल्या आमच्या वाड्याचे मुख्य दार किल्याच्या दारासारखे होते. लहान मुलांना ते उघडतच नसे. पंचवीस खोल्यांच्या या वाड्याच्या प्रत्येक खोलीला दोन सागवानी नक्षीदार दारे आणि दोन खिडक्या होत्या. वाड्याबाहेर मोठा ओटा. महालक्ष्मीच्या आरासीसारखा दिसायचा वाडा. पुढे पालिकेच्या एका फतव्याने ओटे पाडले गेले आणि ओट्यावर मन मोकळी करणारी माणसं चार भिंतीत गेली. आता तर ती गावाबाहेर बंगल्यात वा अपार्टमेंटस्मध्ये बंदिस्त झालीत. वाडा संस्कृती नष्ट झाली तसं नगरचं हे वेगळेपणही संपलं.

दुमजली वाड्यांच्या माळवदावर किंवा गच्चीवर रंगायच्या कोजागिरीच्या रात्री. तिथे लाऊडस्पीकर नसायचा. सुप्त गुणांच्या गायिकागायक असायचे. चंदन चारोळे आणि  मनुका  घातलेले आटीव दूध आणि त्याबरोबर साखरेच्या पाकाचा त्रिशंकू आकाराचा खाद्यपदार्थ; त्याला ‘चिपाडे’ म्हणायचे! ते नगरचे वैशिष्ट्य होते. उन्हाळ्यात सगळ्या भाडेकरू अन् मालकांच्या गाद्या गच्चीवर यायच्या. अगदी थेट पहिल्या पावसाचे थेंब अंगावर पडायला लागले तरी गच्चीवरच झोपावसं वाटायचं. पाऊस सुरु झाला की धार्‍यांवर पत्रे टाकण्यासाठी पळापळ सुरु व्हायची. (धारी म्हणजे सूर्यप्रकाश यावा म्हणून छताला जाळी बसवली जायची!) कधी गच्चीवर अंगतपंगत बसायची! म्हणजे वाड्यातल्या सगळ्यांनी आपापले अन्नपदार्थ घेऊन यायचे आणि सर्वांनी एकत्र जेवण करायचे. खूप आपलेपणा असायचा. कोणी आजारी पडलं तर सगळे धावायचे. अशावेळी असलेली भांडणंही मिटायची.

अरुंद, धुळीने माखलेले रस्ते हे नगरचे वैशिष्ट्य. कापड बाजार नवी पेठ आणि चितळे रोड हेच काय ते मोठे रस्ते. ह्याच मार्गावरून गणपती विसर्जनाची मिरवणूक वा ताबुतांची मिरवणूकही जायची. संध्याकाळी तरुण मंडळी ह्याच रस्त्याने फिरायची. कोणी नुसतं दिसलं वा हसलं तरी आनंद व्हायचा. संक्रांतीला हलवा, तिळगुळ किंवा दसर्‍याला सोनं देण्यासाठी लोक रस्त्यातच एकमेकांना मिठ्या मारत वा आदरानं पाया पडत. सण समारंभात मात्र नगरकर अजूनही पूर्वीच्या प्रथा पाळतात. अनेक शहरातून दसर्‍याचे सीमोल्लंघन बंद झाले; पण आम्ही नगरकर अजूनही नवे कपडे, टोपी घालून, टोपीत देवासमोर नवरात्रात उगवलेले गव्हाचे कोंब घालून मार्केट यार्डात शमीची पूजा करायला जातो. गुरुजी पूजा सांगतात. भारावलेल्या वातावरणात, माळीवाडा महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परत येतो. घरी भगिनी ओवाळतात; मग बळीराजाची पूजा केली जाते आणि सोने वाटायला बाहेर पडतो. त्या दिवसापासूनच दिवाळीचे वेध सुरु होतात. वाड्यांवरच्या दर्शनी भिंतींवर असणार्‍या कोनाड्यातून पणत्या लावल्या जायच्या. टीव्ही  तर जाऊ द्या रेडीओच काही श्रीमंतांकडे असायचे मग ‘बिनाका गीत माला’ ऐकण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी व्हायची.

दिवाळीची सुटी लागली की पाय वळायचे बुरुड गल्लीत! तेथून आकाशकंदिलासाठी कामट्या तासून मिळायच्या. कापड बाजारच्या कोपर्‍याच्या दुकानातून पतंगाचा ताव घेतला जायचा. घरी येऊन वाटीत कणकेत पाणी घालून खळ तयार करायची आणि चांदणी किंवा विमानाच्या आकाराचा आकाशदिवा तयार व्हायचा. (दरम्यान खळीची वाटी जळायची म्हणून आईची बोलणीही खावी लागायची.) पण त्या आकाशदिव्याने मिळणारे  समाधान आज विकत घेतलेल्या आकाशकंदिलात मिळत नाही हे नक्की! संक्रांतीला घरोघरी महिला शेगडीवर परात ठेऊन तिळाचा हलवा करण्यात मग्न होत. हलव्याला हळूहळू काटा यायला लागायचा. ते पाहणंही मजेशीर असायचं.

वाडे जसे मोठे होते तशी माणसांची मनंही मोठी होती. एखाद्या दुकानातून फोन करायची वेळ आली तर ‘एक रुपया सुटा असेल तर फोन करा’ असं रुक्ष आवाजात कोणी सांगायचं नाही. आता मोबाईलने प्रत्यक्ष संवादच संपवले आहेत. मात्र त्या आधीचे वास्तूवैभव आजही आहे. अहमदनगर शहराची स्थापना करणारा अहमद निजामशहा बस स्थानकापासून अडीच किलोमीटर असणार्‍या सीना नदीच्या काठी असलेल्या बागरोजा या वास्तूत चिरविश्रांती घेत पहुडला आहे. बादशहा आणि त्याच्या पत्नीची कबर असलेल्या या वास्तूच्या घुमटाच्या आत, तसेच बाहेर भिंतीवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर कुराणातली वचने कोरलेली आहेत. घुमटाच्या मध्यभागी असणार्‍या झरोक्यातून मध्यान्हीची सूर्यकिरणे कबरीवर पडतात. या बागरोजा जवळच तालीकोटच्या लढाईचे स्मारकही  आहे. शहरीकरणाच्या आणि औद्योगिकरणाच्या रेट्यात शहर कितीही बदलले तरी या ऐतिहासिक खुणा कधीच पुसल्या जाणार नाहीत हे नक्की!

सदानंद भणगे, अहमदनगर
9890625880

टीम चपराक

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

हे ही अवश्य वाचा