संवाद साधनांद्वारे किती होतोय खराखुरा संवाद?

‘मेरे पिया गये है रंगून, किया है वहां से टेलिफुन; तुम्हारी याद सताती है, जीया मे आग लगाती है…’ हे प्रचंड गाजलेलं गीत आहे! 1949 साली आलेल्या ’पतंगा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका शमशाद यांनी गायलेलं. कोणत्याही कलाकृतीवर तत्कालीन समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव असतो हे विचारात घेऊन हे गीत ऐकल्यास लक्षात येते की त्या काळी समाजाला टेलिफोनचे किती प्रचंड कौतुक होते! दूरवरच्या जीवलगाला टेलीफोनवर बोलता येणे ही बाबच मुळी प्रचंड कुतुहलाची आणि कौतुकाची! शमशाद बेगमच्या आवाजातून हा भाव खूप सुंदररित्या व्यक्तही झाला आहे.


टेलीफोन, टेलीग्राम (तार) ही त्या काळी दुरवरच्या जीवलगाला बहुतांशी माहितीच्या आदानप्रदानासाठी वापरली जाणारी साधने. काही मुठभर लोकांच्याच आवाक्यात असणारं हे साधन मात्र सर्वसामान्यांपासून तसं दूरच होतं. कुठल्या तरी सुखवस्तु, संपन्न हवेलीत, एखाद्या सरंजामदाराच्या घरात हा टेलीफोन असायचा. (किमान मला तरी तो जुन्या चित्रपटांच्या माध्यमांतून असाच भेटला.) अगदी अलीकडच्या काळात म्हणजे साधारण बावीस-तेवीस वर्षापूर्वी गावात लँडलाईन फोन आले. तेही अगदी मोजक्या बारा-पंधरा घरी आणि मग अख्ख्या गावासाठी निरोप देण्याघेण्याचं, शिवाय बोलावून आणायचं काम टेलीफोन धारकाला करावं लागे. आजच्या तरूण पिढीला अत्यंत आश्चर्य वाटेल पण टेलीफोन घरी असणं म्हणजे अक्षरक्षः प्रतिष्ठेची गोष्ट आणि त्याचा वापरही अगदी व्यावसायिक कारणांसाठी किंवा तातडीच्या निरोपांसाठी किंवा अगदीच निकडीचे असेल तरच खाजगी संभाषणासाठी व्हायचा; तोही अगदी मर्यादीत स्वरूपात. आजच्यासारखं फोन कानाला लावला की तास न् तास गप्पा मारणारी बहाद्दर मंडळी तेव्हा अगदीच क्वचित आढळत असावीत.

एक तर फोन हे साधन सर्वांना सहज उपलब्ध नव्हतं. शिवाय टेलीफोन हे साधन तसं पाहता खाजगी संभाषणासाठी फारसं उपयुक्तही नव्हतं. हेही एक कारण असावं. टेलीफोनवर बोलायचं म्हणजे एका विशीष्ट ठिकाणीच बसून बोलावं लागे. हवं तेव्हा, हवं तिथं त्याला थोडच नेता यायचं! म्हणजे फोनच्या खाजगीपणालाही मोठीच मर्यादा होती.

त्यानंतर आलेल्या मोबाईलने मात्र संभाषणात खाजगीपण जपता न येण्याची ही अडचण दुर केली. 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिला मोबाईल कॉल केला गेल्याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यावेळेसचे फोन कॉलचे दर जाणून घेतल्यानंतर तर मला गरगरायलाच झालं; 16 रु. प्रती मिनीट! अर्थातच ही चैन बहुसंख्य भारतीय जनतेला परवडणारी नव्हतीच. या क्षेत्राचा खर्‍याअर्थाने विकास आणि विस्तार झाला तो इ. स. 1990  नंतर. 2001 नंतर मात्र हा वेग प्रचंड वाढला. हा वेग इतका प्रचंड होता की 2001 ते 2011 या दहा वर्षांच्या काळात मोबाईल फोन धारकांची संख्या वीस पटीने वाढली. आज भारतीय दूरसंचार क्षेत्राचा जगात दुसरा क्रमांक लागतो. मोबाईल आणि इंटरनेटने मानवी जीवन अक्षरक्षः झपाटून टाकले आहे. वापरावयाच्या सुलभतेमुळे, सहज उपलब्धतेमुळे मोबाईलचा वापर आणि प्रभाव वाढत आहे आणि वाढतच राहणार आहे.

अवघ्या पाऊणशे वर्षात संवाद क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे! कुठल्या तरी सुखवस्तु, संपन्न हवेलीत आढळणारा टेलीफोन विरुद्ध आज म्हशीच्या पाठीवर बसून मजेत मोबाईलवर बोलणारा गुराखी; या दोन चित्रांमधील तफावतच संवादाच्या बाबतीत भारतीय समाजाने केलेल्या प्रगतीबाबत खूप काही बोलून जाते. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतात टेलीफोन धारकांची संख्या अवघी 82000 होती. जानेवारी 2016 मधे भारतातील मोबाईल धारकांच्या संख्येने शंभर कोटींचा आकडा पार केल्याचे नुकतेच वाचनात आले.

एकाच ठिकाणी बसून बोलायच्या अडचणीला दूर सारत आलेल्या मोबाइलनंतर आता आलेल्या संवाद क्रांतीने तर जगभरात अक्षरक्षः धुमाकुळ घातला आहे. संवादक्रांती हा शब्द मी जरा व्यापक अर्थाने वापरला आहे. संवादक्रांती म्हणत असताना मला समाजमाध्यमे आणि संदेशासाठी वापरली जाणारी संदेश साधने (मेसेजींग ऍप्स) दोन्ही अभिप्रेत आहेत. जगभरात समाज माध्यमांचा वापर साधारण 1990 सालापासून सुरू झाला. असंख्य वेगवेगळी संकेतस्थळे विकसित होत राहिली, वापरात येत राहिली आणि नष्टही होत राहिली. ही माध्यमे बहुतांश संगणकाच्या सहाय्याने वापरली जायची. 2005 साली भारतात आर्कुट आले आणि समाजमाध्यमांनी भारतीय समाजमनालाही स्वतःकडे सावकाश आकर्षित करायला सुरूवात केली. त्यानंतर लगेच 2006 साली आलेल्या फेसबुकने तर या आकर्षणाचा वेग आणखी वाढवला. नित्य नवीन सुधारणांसह फेसबुकची लोकप्रियता वाढतच गेली. स्वतःच्या फेसबुक प्रोफाइलच्या माध्यमातून शब्दशः जगभराशी संवाद साधणे शक्य झाले. समान आवडीनिवडी, कार्यक्षेत्र, पार्श्वभूमी असलेल्या लोकांशी भौगोलिक सीमा ओलांडून संवाद साधणे शक्य झाले. बरं, त्यासाठी ती व्यक्ती प्रत्यक्ष संपर्कात असण्याचीही गरज नाही. समाजमाध्यमांच्या नंतर आलेल्या संदेश माध्यमांनीही भारतीय समाजमनावर अक्षरशः गारूड केले आहे. याहु मेसेंजर, स्काइप, फेसबुक चॅट इत्यादी नंतर 2009 साली आलेल्या व्हाटस ऍपने तर जगभर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. त्यानंतर आणि त्याच्या जोडीनेही अनेक संवाद साधने आली आणि येत असली तरीही ‘व्हाटस ऍप’ त्याची लोकप्रियता टिकवून आहे. समाजमाध्यमे आणि संदेश साधने स्मार्ट फोनवर वापरता येत असल्याने तर यांचा प्रचार-प्रसार प्रचंड वेगाने झाला आहे.

माणसं बोलत सुटली आहेत नुसती; बोलणे, बोलणे आणि नुसते बोलणे! चालताबोलता, उठताबसता माणसं नुसती बोलत सुटली आहेत, व्यक्त होत आहेत. फेसबुक, व्हाट्स ऍप, ट्वीटर, व्ही चॅट, स्काईप, हाईक, टेलीग्राम इत्यादी इत्यादी असंख्य ऍप्लीकेशन्स आज व्यक्त होण्यासाठी उपलब्ध आहेत. माणूस बोलण्यातून, देहबोलीतून, आवाजातील चढउतारातून बोलतो हे तर जणू विस्मरणातच गेलं आहे. आता तो बव्हंशी फक्त बोटांच्या टोकांनी, छोट्याशा पडद्याच्या माध्यमातून बोलतोय. समोर बसलेल्या माणसाला दुर्लक्षून दूरवर पसरलेल्या अनेक माणसांशी बोलतो. कधी कधी तर त्याचा हा संवाद एकतर्फीच असतो पण तरीही तो बोलतच राहतो. का? कशासाठी? एवढी निकड निर्माण झाली आज बोलायची? हे बोलणं खरंच गरजेचं आणि उपयुक्त आहे की गुंतागुंतच निर्माण करत आहे मानवी जीवनात? नेमकं फलित तरी काय या बोलबोल बोलण्याचं याचा गांभीर्यानं विचार करण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे.

मुळात अभिव्यक्ती ही माणसाची मुलभूत गरज आहे. मनात असलेल्या सगळ्याच्या सगळ्या भावना, विचार, कल्पना त्याला कोणासमोर तरी व्यक्त करायच्या असतात. काही फार थोडी सृजनशील माणसं त्यांच्या कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. म्हणून तर ती बहुतांश अंतर्मुख असतात, आपल्याच जगात हरवून गेलेली. परंतु ज्यांना कलेचं अंग नाही अशा बहुसंख्य माणसांना अभिव्यक्त होण्यासाठी संवादावर अवलंबून रहावे लागते! म्हणजेच काय तर माणुस मुळात ’संवाद वेडा’ आहे. बोलत राहणे, संवाद साधत राहणे ही त्याची मुलभूत गरज आहे. अगदी मितभाषी वाटणारी माणसंही देहबोलीतून व्यक्त होतच असतात, विशीष्ट माणसाजवळ खुलतात, किमान दुसर्‍याचं लक्षपूर्वक ऐकतात तरी. बोलणे आणि बोलणार्‍यांच्या हजार तर्‍हा! असो.

जगभरात समाजमाध्यमे लोकप्रिय होण्यामागे काय कारणे असतील ती असोत पण भारतीय समाजाचा विचार करता ढासळणारी कुटुंब आणि समाजव्यवस्था, समाजमाध्यमांच्या आधीच झपाट्याने वाढलेल्या आणि अजूनच वाढत चाललेल्या लोकप्रियतेसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असावी असे वाटते. जोडीला अनुकरणप्रियता हेही दुय्यम कारण आहेच. मागच्या काही वर्षांत कुटुंबाचा आकार लहान होत होत आता तर तो बहुतांशी कुटुंबात लघुत्तमवर येऊन ठेपला आहे. आधीच कुटुंबात माणसे कमी आणि त्यातही प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र. समाजव्यवस्थेतही इतका पराकोटीचा बदल झाला आहे की शेजारी कोण राहतो याचाही पत्ता महानगरात राहणार्‍यांना बर्‍याचदा नसतो. तर छोट्या शहरात, खेड्यापाड्यात आत्मीयता हरवून एकप्रकारचा अलिप्त कोरडेपणा वागणुकीत आलेला. जो तो स्वतःला एका विशिष्ट कोशात गुरफटवून धावतोय. प्रत्येकाची एकच तक्रार : ‘वेळ नाही.’ कुणाकडेच कुणासाठी वेळ नाही तर मग बोलायचं तरी कोणाशी ? माणसाची अभिव्यक्तीची गरज कशी पूर्ण होणार मग? एखाद्या थकल्याक्षणी आधार हवा असतो, आनंद, दुःख,राग व्यक्त करायचा असतो तेव्हा आवश्यक असणारी माणसं जवळजवळ नाहीशीच झाली आहेत. त्यात स्वतःची व्यग्रता सांभाळत सांभाळत बोटांच्या टोकावर उपलब्ध असणारी माणसं मग जवळची वाटू लागतात. स्वतःच्या संवादाचं खाजगीपण जपत, सहजपणे कुठूनही संवाद साधता येणे हा या संवाद साधनाचा सर्वात मोठा फायदा. बरं, त्यावेळेस समोरची व्यक्ती उपलब्ध असावीच असेही बंधन नाही. फार जवळच्या माणसांना आपले म्हणणे, भावना त्यांच्या अनुपस्थीतीतही पोहचवता येतात. यातून माणसाच्या मनाची व्यक्त होण्याची भूक भागतेय पण त्याची मानसिक आधाराची गरज पूर्ण होतेच असे मात्र ठामपणे म्हणता येत नाही. कोणतेही तंत्रज्ञान, साधन जिवंत माणसाची, जिवंत संवादाची जागा कधीच घेऊ शकत नाही. एका आश्वासक स्पर्शाची, स्निग्ध प्रेमळ कटाक्षाची जागा हजारो लिखीत शब्दही घेऊ शकत नाहीत. त्यामुळे कधी नव्हे तेवढं बोल बोलूनही मानसिक समाधान नाही ते नाहीच. हजारो मित्रांची आभासी जगात यादी असूनही मनात एक प्रचंड रिकामी पोकळी; त्यातून येणारी निराशा, चिडचिडेपणा, उद्भवणारे मानसिक आजार जगभरातल्या विचारवंतांना चिंता करायला भाग पाडणारा विषय झाला आहे.

संवाद माध्यमांच्या अतिरेकी वापराने सामाजिक वीण विस्कळीत झाली का विस्कळीत समाजव्यवस्थेने विषण्ण झालेला माणूस संवाद माध्यमांचा अतिरेकी वापर करायला प्रवृत्त होत आहे याचा शोध घेण्याची गरज आहे कारण फक्त शहरी भागापर्यंत ही समस्या मर्यादित न राहता तिने आता गावातली तरूण पिढीही  कवेत घ्यायला सुरूवात केली आहे.

या प्रमुख समस्यांसोबतच माणसामध्ये वैयक्तिक पातळीवर बळावत चाललेला दिखाऊपणा ही एक नवीनच समस्या. एक प्रकारचे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व घेऊन माणसे अशा जगात वावरतात. ते वास्तवात आहे त्यापेक्षा वेगळे काहीतरी भासवण्याचा प्रयत्न होतो. संवादासाठी बनवलेल्या या साधनांतून खराखुरा संवाद कितपत घडतोय हे ठरवणे अवघड आहे. जे मनात येईल ते लगेच, चटकन बोलून मोकळे होत गेल्याने त्यावर फारसे चिंतन, स्वतःचे विचार स्वतःच पडताळून पाहणे असे सहसा घडत नाही. त्यातून एक प्रकारच्या उथळ, असंयमी वागण्याला खतपाणी मिळते, आत्मकेंद्रीपणा बळावत जातो. आभासी जगात फार वेळ घालवणार्‍या माणसाचे खर्‍याखुर्‍या नातेसंबंधांकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून जीवनात एक प्रकारचा ताण निर्माण होतो. एकटेपणावर उपाय म्हणून कुणी संवाद माध्यमांकडे वळले असेल तर त्यांनी वेळीच सावध व्हायला हरकत नाही.

कोणतेही तंत्रज्ञान वाईट कधीच नसते. त्याचा वापर कसा केला जातोय यावर त्याचे फायदे आणि तोटे अवलंबून असतात. जबाबदार समाजघटक म्हणून संवाद माध्यमांचा वापर सजगपणे करण्याची जवाबदारी शेवटी प्रत्येकच वापरकर्त्यावर येऊन पडते. संवाद माध्यमांचा फार चांगला वापर स्वविकासासाठी करून घेता येतो. संपूर्ण जग आज एका व्यासपीठाप्रमाणे प्रत्येकाला  उपलब्ध झाले आहे. एरवी ज्या लोकांपर्यंत पोहचणे भौगोलिक व  इतर मर्यांदांमुळे शक्य नव्हते त्या लोकांशी चांगले व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, आपल्या अंगी असणारी कौशल्ये त्यांच्यापर्यंत पोहचवणे थोड्याशा जागरूक प्रयत्नांनी शक्य होत आहे. संवाद माध्यमात समान आवडी निवडी असणार्‍या लोकांचे विविध समूह आहेत. त्या माध्यमातून नवनवीन कौशल्ये शिकता येतात. आपल्या माणसांसोबतची नात्याची वीण जागरूकपणे सांभाळत चांगल्या नवीन लोकांशी चांगले संबंध जोडणेही शक्य होते.

शेवटी गरज आहे ती प्रत्येकाने जागरूक रहायची. हाती असलेलं हे जादुई उपकरण का आणि कशासाठी वापरायचं आहे याचं स्पष्ट भान असेल तर याच्या वापरातून उद्भवणारे धोके टाळून याचा स्वविकासासाठी आणि चांगली माणसे जोडण्यासाठी, असलेली माणसे टिकवून ठेवण्यासाठी चांगला वापर करून घेता येतो. संवाद माध्यमांच्या उपयुक्त आणि सुरक्षित वापरासाठी सर्वांना शुभेच्छा!

विद्या बयास-ठाकुर
शिरूर ताजबंद जि.लातुर
70386 65684

टीम चपराक

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

हे ही अवश्य वाचा