एकाच या जन्मी जणू…

इतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले.


आपला समाज परिवर्तनशील आहे. वेळोवेळी बदलत्या काळानुसार आपल्या समाजात परिवर्तन घडून येते आणि समाजाने ते परिवर्तन उशीरा का होईना स्वीकारलेले आहे. पुरुषांनी बायकोसाठी वडाची पूजा करणं हे सुद्धा एक सामाजिक परिवर्तनाचंच उदाहरण आहे पण या गोष्टीवरुन मनामधे एक संभ्रम निर्माण झाला आहे. आज विज्ञानवादी युगात आपला प्रगत देश खरंच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे की त्याच जुन्या अर्थहीन परंपराना गोंजारत आपल्याला अजून पाठीमागे घेऊन जात आहे.

आज 21 व्या शतकात अश्या प्रकारे उपक्रम राबवून खरोखरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देता येईल का? खरं तर आज इंटरनेटच्या युगात सुशिक्षित समाजाने बदल घडवून आणणे हे गरजेचेच आहे पण अशा तर्‍हेने बदल घडवून काय साध्य होणार आहे? बरं एक वेळ ही ज्याची त्याची श्रद्धा आहे असं आपण मानू या. पुरुषांनी बायकोसाठी व्रत करणे, वड पूजणे याला काही हरकत नाही. पण यातून खरोखरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश मिळतो का? आणि असे वड पूजल्याने खर्‍या अर्थाने स्त्रियांना या समाजात समानतेची वागणूक मिळेल का? तमाम स्त्री वर्गाच्या मूळ समस्या मिटून  खर्‍या अर्थाने त्यांना समानतेचा दर्जा मिळणार आहे का? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

जर स्त्रियांना खर्‍या अर्थाने समानतेचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर  इतर बर्‍याच गोष्टी त्यांना करता येतील….. आज स्त्री आणि पुरुष दोघेही कमावते झाले आहेत. दोघेही नोकरी करतात. घराबाहेर पडतात. पण संध्याकाळी दोघेही घरी आले की किचनचा ताबा बाईच संभाळते. जर स्त्रीला समानतेचा दर्जा द्यायचा असेल तर अगदी किचनपासून  सुरुवात करावी. ती ऑफिसवरुन घरी आली की तिला एक कप चहा तरी करुन द्यायची पुरूषाची तयारी असावी. किती पुरुष आपल्या बायकोला स्वयंपाकात मदत करतात? कितीजण घरामधे निम्म्या निम्म्या कामाची विभागणी करतात? कितीजण आपल्या बायकोला बँकेच्या व्यवहाराची माहिती करुन देतात ? तिला पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देतात?  या गोष्टी आधी लक्षात घ्यायला पाहिजेत.

आपल्या देशाच्या प्रगतीमधे स्त्रियांचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे. तरी देखील पुर्वीपासूनच असलेल्या आपल्या पुरुषसत्ताक समाजामधे स्त्रियांना आजही दुय्यम दर्जाचे स्थान दिले जातेे. आजही आपल्या समाजात स्त्रीला अनिर्णयक्षम समजले जाते. आजही अनेक क्षेत्रात स्त्रीला डावलले जाते. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र असो तिच्यात असलेल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. इथे भारताच्या पहिल्या आय.पी.एस. ऑफिसर किरण बेदी यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणार्‍या परेडसाठी दिल्ली पोलीस दलाच्या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी जेव्हा किरण बेदी यांचं नाव अग्रस्थानी होतं पण तेव्हा वरिष्ठांना त्यावर विचार करावा लागला. त्यावेळी त्यांनी  ठामपणे आपल्या वरिष्ठांना विचारले की माझ्यात असलेल्या शारीरिक क्षमतेवर विश्वास नाही कि मी एक स्त्री आहे म्हणून मला डावलंले जातेय… ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्‍याच वेळा स्त्रीला ती कितीही बुद्धिमान असली, शरीराने, बुद्धीने कितीही सक्षम असली तरी ती एक स्त्री आहे म्हणून तिला अनेक करीअरच्या सुवर्ण संधीला मुकावं लागते.
पूर्वी स्त्रिया शिकत नव्हत्या त्याकाळची गोष्ट वेगळी होती, पण आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.

एकीकडे तिची बुद्धीमत्ता स्वीकारायची आणि तिला धर्म, संस्कार, व्रतवैकल्ये या बेड्यांमधे अडकवून ठेवायचे आणि वर परत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करायच्या. आज सुद्धा अनेक कुटुंबामधे स्त्रियांना शिक्षण घेऊन नोकरी करण्या इतपतच तिला स्वातंत्र्य मिळाले आहे. या पलिकडे त्यांच्यासाठी स्त्री स्वातंत्र्याची अशी वेगळी व्याख्या नाही. स्त्रियांना जर समानतेचा दर्जा द्यायचा असेल तर तिला विचार स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आणि जर अशा सामाजिक उपक्रमातून आज पुरुष बायकोसाठी वटपौर्णिमा साजरी करुन स्त्रियांना समानतेचा दर्जा देणार असतील तर पुढील बाबींवरही त्यांनी नक्कीच विचार करावा….
लग्नानंतर पुरुष बायकोच्या माहेरी नांदायला जातील का?
लग्नात हुंडा आणि रुखवत घेणं बंद करतील का?
विवाहित म्हणून एखादा तरी सौभाग्य अलंकार परिधान करतील का?
लग्नानंतर स्वतःचे नाव व आडनाव बदलून बायकोचे नाव लावतील का?
मुले झाल्यावर जन्मदाखल्यावर आईचे नाव लावतील का?
असं जर झालं तर आपण म्हणू या मग स्त्री-पुरुष समानता आहे…
वडाची पूजा करुन सात जन्म तोच जोडीदार मिळेल की नाही सांगता येत नाही पण या जन्मात तरी बायकोला समजून घेऊन तिला चारचौघात आत्मविश्वासाने, सन्मानाने जगण्यासाठी तिला प्रोत्साहित करायला पाहिजे. मग तिलाही आपलं आयुष्यवर प्रेम करावं वाटेल आणि असं म्हणावं वाटेल *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी….

■ सविता इंगळे
9822018281

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

हे ही अवश्य वाचा