top of page

बलिदानाची परंपरा विसरू नका - रवींद्र सिन्हा

  • Mar 30
  • 1 min read

प्राधिकरण (प्रतिनिधी) - “स्वातंत्र्यपूर्व काळातील संकटं, समस्या वेगळ्या होत्या. आजच्या समस्या आणि संकटं वेगळी आहेत; परंतु या दोन्ही कालखंडात वेगळेपणा असला तरी राष्ट्रप्रेम, कर्तव्य आणि जबाबदारी यात आजही बदल नाहीच. आज आपल्या सर्वांपुढे पाणी टंचाई, प्रदूषण, वाढते शहरीकरण, बेरोजगारी, भूक आणि इतर अनेक आव्हाने आहेत, ज्यांचा सामना करण्यासाठी आजचा तरुण जागरूक, सक्षम आणि कृतिशील असला पाहिजे आणि त्यासाठी त्याला भारतातील बलिदान परंपरा माहीत असली पाहिजेच. शिवाय वर्तमान कायदे व नियमांचेही ज्ञान असले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक, पर्यावरण कार्यकर्ते रवींद्र सिन्हा यांनी व्यक्त केले.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी संत ज्ञानेश्वर उद्यान, रावेत प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी रावेत प्राधिकरण येथे दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमासाठी परिसरातील रावेत प्राधिकरण नागरिक समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय ग्राहक मंच तसेच परिसरातील हौसिंग सोसायटींचे सदस्य आणि अन्य सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी मोरेश्वर भोंडवे, चंद्रकांत सावंत, तृप्ती राठोड, हर्षल भारंबे, धीरज ठाकूर आदींच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

उपस्थितांनी वीर राजगुरू यांच्या बलिदानाचे स्मरण करताना क्रांतिकारकांच्या शौर्यगाथांचा उल्लेख करत तरुणांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही केले. यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण तसेच विविध भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांकडून सर्वानुमते आपले सामाजिक कर्तव्य ओळखून देशसेवेसाठी तत्पर राहण्याचा संकल्प केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपेंद्रदादा धोंडे यांनी केले तर धीरज ठाकूर यांनी गीत सादरीकरण केले. यावेळी महान बलिदानी क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page