top of page

चर्चेतील लैंगिक प्रकरणे किती खरी किती खोटी?

  • Aug 5, 2025
  • 6 min read

महाराष्ट्रासह देशभरात एकापाठोपाठ घडलेली तीन लैंगिक संबंधांची आणि एक मद्यपान-अमली पदार्थ बाळगण्याचे प्रकरण चर्चेत आहेत. या प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तची नावे चर्चेत आलेली असल्यामुळे ज्या घटना घडल्याचे सांगितले जाते त्या खरोखर घडल्या असाव्यात की घटनांची नुसतीच बदनामीकारक चर्चा असावी? अशा दोन शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात आहेत.चर्चेत आलेली चार प्रकरणे अनुक्रमे अशी -

  • पहिले नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण - महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधीमंडळात एक पेनड्राईव्ह दाखवून नाशिक येथील एका हॉटेलात हनी ट्रॅपमध्ये 71 सरकारी अधिकारी, नेते - पुढारी अडकल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली.

  • दुसरे जामनेर (जि. जळगाव) येथील भाजप कार्यकर्ता प्रफुल्ल रायचंद लोढा याने सरकारी नोकरी - सरकारी ठेके - पैसा याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुली-विवाहितांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची तीन प्रकरणे. या विषयाशी संबंधित तीन गुन्हे लोढा विरोधात पोलिसात दाखल आहेत.

  • तिसरे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित ‌‘हनी सीडी‌’चे प्रकरण. हे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून कथित प्रकारात चर्चेत आहेत. महाजन यांच्यासंदर्भात लंपट लैंगिक संबंधाचा कोणताही पुरावा अद्याप समोर नाही.

  • चौथे प्रकरण हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) नेत्या सौ. रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती प्रांजल खेवलकर यांचे कथित मद्य अमली पदार्थ सेवन प्रकारातील ‌‘रेव्ह‌’ वा ‌‘खासगी पार्टी‌’त सहभागाचे आहे. या आरोपात खेवलकर यांना पुण्यात अटक झाली आणि महाराष्ट्रासह देशभरात चारही प्रकरणे जबरदस्त चर्चेत आली.

या चार प्रकरणात काही समान धागे हे जागा आणि व्यक्ती यांच्याशी संबंधित आहेत. जसे उपरोक्त चारही प्रकरणांमध्ये राज्यातील विद्यमान मंत्री-भाजपचे नेते गिरीश महाजन व माजी मंत्री-राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांच्यातील परस्पर वैमनस्याचा आणि राजकीय विरोधाचा रंग हा ठासून भरला आहे. नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात संशयाचे एक बोट महाजन यांच्याकडे ठरवून नेले गेले. महाजन हे सध्या नाशिकचे पालकमंत्री असून दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी तेच करीत आहे. नाशिक हनी ट्रॅपशी महाजन यांच्याविषयी चर्चेत असलेल्या ‌‘हनी सीडी‌’चा विषय जोडला गेला आहे. लैंगिक छळ प्रकरणातील संशयित आरोपी लोढा हा भाजपचा कार्यकर्ता असून तो खडसे-महाजन यांच्याही संपर्कात होता. तो राहणारा पहूरपेठ येथील असून हे गाव जामनेर तालुक्यातील आहे. महाजन हे जामनेरचे रहिवासी आहेत. लोढा यानेच महाजन यांच्या हनी सिडीची चर्चा पसरवली. खेवलकर यांच्या विरोधातील कथित रेव्ह पार्टीचे प्रकरणही बचावाच्या काही मुद्द्यांमुळे चुकीचे ठरू शकते अशी चर्चा आहे. म्हणजेच वरील चारही प्रकरणे घडली कवा नाही? हा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात आहे. वरील चारही प्रकरणांचा आरोप म्हणून मागोवा घेतला तर लक्षात येते की मंत्री महाजन यांच्या बाजूने जळगाव जिल्ह्यातील भाजपचे आमदार-खासदार उभे आहेत. त्यांनी एकत्रितपणे महाजन यांच्या हनी सीडी प्रकरणाला खोटे ठरवून खडसे यांच्यावर बेछूट आरोप केले आहेत. खडसे यांनीही महाजन यांच्यावरील आरोपात लोढा, भविष्यकार अनिल थत्ते व अजित पवार यांची पूर्वीची महाजन विरोधातील वक्तव्ये वापरली आहेत पण महाजन यांची लैंगिक संबंधाची सीडी असल्याचा पुरावा दिलेला नाही. म्हणजेच तूर्त प्रकरण खोटे-कथित आहे. लोढा यांच्यावरील मुली-विवाहिता यांच्या लैंगिक छळाचे प्रकरण खरे असून गुन्हे दाखल आहेत. प्रांजल खेवलकर यांच्यावर पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या कथित रेव्ह-खासगी पार्टीतील काही विषय नंतर घुमजाव करणारे ठरले आहेत. खेवलकर हे दोन मित्र व दोन तरूणींसह एका पार्टीत आढळले. तेथे मद्यपान सुरू होते. एका तरुणीच्या पर्समध्ये गांजा आढळला असे पोलिसांनी म्हटले आहे पण अवघ्या पाच जणांच्या खासगी पार्टीला रेव्ह पार्टी म्हणणे पोलिसांच्या अंगलट आले आहे. शिवाय खेवलकर यांच्याकडे मद्यप्राशनाचा परवाना असल्यामुळे त्यांनी मर्यादेत केलेले मद्यप्राशन हा गुन्हाही ठरत नाही. खेवलकर यांना खासगी पार्टीत मित्रांनी बोलावून त्यांच्या बदनामीचा कट इतर कोणाच्या तरी निर्देशानुसार केला असे आता सांगितले जात आहे, मात्र खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये काही अलील मेसेज व मुलींसोबतची छायाचित्रे आहेत अशीही चर्चा पसरविण्यात आली आहे. म्हणजेच चारही प्रकरणात अंतिमतः संबंध हा खडसे-महाजन यांच्यातील व्यक्तिगत संघर्षाचा आहे. चारही प्रकरणातील वास्तव - वस्तुनिष्ठ व सत्य माहिती लक्षात घेतली तर केवळ लोढा विरोधात दाखल प्रकरण वगळता इतर तीन प्रकरणात अद्याप तरी ठोस-परिस्थितीदर्शक पुरावे नाहीत. म्हणूनच प्रश्न उभा राहतो की लैंगिक संबंधाची, हनी ट्रॅपची, हनी सीडीची व रेव्ह-खासगी पार्टीची प्रकरणे खरी आहेत की खोटी? तटस्थपणे चारही प्रकरणांची माहिती घेतली तर लक्षात येते प्रफुल्ल लोढा विरोधात दोन अल्पवयीन मुली व एका विवाहितेने अनुक्रमे अंधेरी एमआयडीसी, साकीनाका व पुणे पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. लोढा हा मुली-महिलांबाबत पूर्णतः लंपट, अनैतिक कृत्ये करणारा असल्याचे आढळले आहे. त्याच्या मोबाईल डाटात अलिल कॉल व काही फोटो आढळली आहेत. सध्या तरी लोढा प्रकरण हे पोलीस दप्तरी सत्य आहे. त्यामुळेच तो पोलीस कोठडीत आहे. लोढाचे गुन्हे जामनेरमध्ये नाही तर मुंबई-पुण्यात घडले आहेत. नाशिक हनी ट्रॅपशी त्याचा संबंध नाही. मंत्री महाजन यांच्या चारित्र्याला संशयाचे डाग लावणाऱ्या हनी सीडीचा एकही पुरावा नाही मात्र महाजन यांच्या चारित्र्यावर संशय घेणारी वक्तव्ये लोढा, थत्ते व अजित पवार यांनी केली आहेत. महिलांशी संबंधित लैंगिक विषयांमध्ये महाजन यांचेच नाव का पुढे आले? या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आता संपूर्ण राज्याला आहे. महाजन यांच्या कथित लफड्यांची हनी सीडी, फोटो, मेसेज वगैरे अजून तरी समोर नाही. एक मात्र खरे आहे की, महाजन यांच्या चारित्र्याबद्दल कोणीही त्यांची बाजू घेताना दिसत नाही. महाजन यांच्या लफड्याचा काही तरी पुरावा असावाच असे अनेक जण खासगीत म्हणतात. नाशिक हनी ट्रॅप प्रकरण तूर्त कथित आहे. तेथील एका हॉटेलचे नाव चर्चेत होते. ते हॉटेल काँग्रेसच्या नेत्याचे आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात हॉटेलात काहीही आढळले नाही. नाशिक हनी ट्रॅप प्रकणात 12 प्रकरणांमध्ये एक समान धागा आहे. एका महिलेने (ती होमगार्ड होती असेही सांगण्यात येते) ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पोलीस खात्यातील विविध अधिकारी यांच्यावर बलात्काराचे आरोप करीत गुन्हे दाखल केले. नंतर हे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून संशयित आरोपी व संबंधित अधिकारी यांच्याकडून आर्थिक लाभ घेऊन तडजोडीने गुन्हे निकाली काढले. तशा नोंदी पोलीस ठाण्यात आहेत. अशी बारा प्रकरणे असून त्याचा तपशील चौकटीत दिला आहे. पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणे पाहता त्याचे नाव नाशिक हनी ट्रॅप नव्हे ठाणे येथील ब्लॅकमेलगची प्रकरणे दिसतात. या आरोपात विनाकारण नाशिक शहराचे नाव व हॉटेल व्यवसायाची बदनामी झालेली दिसते. प्रांजल खेवलकर यांच्यावर दाखल रेव्ह वा खासगी पार्टीचे प्रकरणही ओढून-ताणून उभे केलेले दिसते. चारही प्रकरणांचा जामनेर, पहूर, नाशिक, ठाणे येथून आढावा घेतला तर चर्चित-कथित विषय समोर येतात. संशयाची केवळ टांगती तलवार नेत्यांच्या डोक्यावर असून सहभाग-समावेशाचा एकही ठोस पुरावा समोर येत नाही. म्हणूनच चारही प्रकरणातील लोढावर दाखल गुन्हे वगळता इतर प्रकरणे कथित, बिनबुडाची, दिशाभूल करणारी ठरतात. सर्वसामान्य लोकांनी अशा प्रकरणात स्वतःची तर्कबुद्धी वापरून स्वतःचे मत तयार करायला हवे. इतरांचे मत-तर्क फास्ट-फॉरवर्ड करायची गरजच नाही.

नाशिक हनी ट्रॅप प्रकरण खरे का वाटते?

1) काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या प्रकरणाचा उल्लेख विधी मंडळात करून पेनड्राईव्ह दाखवला. 2) विजय वडेट्टीवार, एकनाथ खडसे व संजय राऊत यांनीही या प्रकरणाला जोडून इतर आरोप केली. खडसेंनी गिरीश महाजन यांचा संबंध जोडला. राऊत यांनी शिवसेना फोडण्यासाठी हे प्रकरण वापरले असा दावा केला. 3) गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री असून त्यांचेही नाव ‌‘हनी सीडी‌’ प्रकरणात आहे. 4) मुंबईतील पत्रकार हेमंत जोशी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये नाशिक हनी ट्रॅपमध्ये सहदेव व शैलेश कुटे यांचे नाव लिहिले आहे. 5) या प्रकरणात कल्पना पाटील या महिलेने दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या 12 तक्रारी समोर आहेत.

* नाशिक हनी ट्रॅप प्रकरण खोटे का वाटते?

1) नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात मुली-महिलांनी आमिष वा प्रलोभन दाखवून ट्रॅपमध्ये अडकविले अशी सध्या कोणत्याही पुरूषाची तक्रार नाही. 2) करूणा मुंढे यांनी एका पीडित महिलेला माध्यमांच्या समोर आणले. त्या पीडित महिलेने दावा केला की पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर बलात्कार केले. (याच महिलेने तक्रारीनंतर आरोपींशी तडजोड करून तक्रारी मागे घेतल्या आहेत.) 3) नाशिक पोलिसांना प्राथमिक चौकशी केल्यानंतर कोणत्याही हॉटेलचे नाव तूर्त समोर नाही. 4) नाना पटोले यांनी आरोप केलेले संशयित हॉटेल काँग्रेस नेत्यांचेच आहे. 5) एका महिलेने केलेल्या लैंगिक छळाच्या सर्व तक्रारी ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांशी संबंधित आहेत. त्यात नाशिकचे नाव नाही.

* गिरीश महाजन यांचे ‌‘हनी ट्रॅप‌’ प्रकरण खरे का वाटते?

1) गिरीश महाजन यांच्याकडे संशयाचे बोट दाखवणारा पहिला आरोप प्रफुल्ल लोढा (रा. पहूरपेठ, ता. जामनेर) याने केला. त्याने नाव घेतले नाही; पण ‌‘एक बटण दाबले तर हाहाकार होईल‌’ असे म्हटले. 2) महाजन यांच्या चारित्र्याशी संबंधित ‌‘काकी‌’ हे पात्र अजित पवार यांनी विधीमंडळातही सांगितले. ‌‘किती काकी‌’ आहेत ते शोधावे लागेल‌’ असे पवार म्हणाले. 3) अनिल थत्ते यांनी महाजन यांचे लैंगिक संबंध एका आयएएस अधिकारी महिलेशी आहेत असा आरोप केला.

* गिरीश महाजन यांचे ‌‘हनी ट्रॅप‌’ प्रकरण खोटे का वाटते?

1) महाजन यांचे नाव गेली पाच वर्षे या प्रकरणात गोवले आहे; मात्र कोणताही पुरावा समोर नाही. 2) महाजन यांच्याविषयी संशय निर्माण करणारा लोढा आता स्वतः अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या तीन प्रकरणात आरोपी असून पोलीस कोठडीत आहे. 3) लोढाकडे हनी सीडी असावी म्हणून पोलिसांनी त्याच्या घराची झडती दोन वेळा घेतली. एकदा अनिल देशमुख गृहमंत्री असताना व आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते असताना. 4) महाजन विरोधात ना कोणाची तक्रार आहे ना पुरावा आहे.

* प्रांजल खेवलकर विरोधात ‌‘रेव्ह पार्टी‌’ प्रकरण खरे का वाटते?

1) पुणे पोलिसांनी खेवलकर यांना तीन मित्र व दोन मुलींसोबत एका ठिकाणी मद्यपान करताना ताब्यात घेतले. 2) त्यांच्याजवळ गांजा / हुक्का / अमली पदार्थ आढळले असा दावा केला. 3) पाच जणांची पार्टी खेवलकर यांच्या नावे बुक होती असे पोलीस म्हणतात. 4) खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अलील मेसेज व फोटो आहेत असा दावा पोलिसांनी केला. 5) खेवलकर यांच्या वैद्यकीय तपासणीत मद्यपान केल्याचे आढळले आहे.

* प्रांजल खेवलकर विरोधात ‌‘रेव्ह पार्टी‌’ प्रकरण खोटे का वाटते?

1) रेव्ह पार्टीचे प्रचलित स्वरूप पाच जणांच्या खासगी पार्टीत नाही. पोलिसांनी समोर आणलेले प्रकरण खासगी पार्टीचे आहे. 2) खेवलकर यांच्याकडे मद्यपानाचा सरकारी परवाना आहे. 3) खेवलकर व त्यांचे मित्र बंद खोलीत बसले होते. उलट पोलिसांनी तेथे घुसून त्यांच्या खासगी कार्याच्या अधिकारात हस्तक्षेप केला. 4) पोलिसांनी नंतर काही विधाने बदलली. जसे - रेव्ह पार्टी आम्ही म्हटले नाही. खेवलकर विरोधात अगोदर गुन्हे दाखल नाहीत. 5) खेवलकर यांना पार्टीच्या ठिकाणी बोलावून अडकविण्यात आले आहे.

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणानंतर सोशल मीडियात वरील चौकट शेअर झाली आहे. यातील तपशीलात दाखल गुन्हे / तक्रारदार / आरोपींची नावे आणि प्रकरणे नंतर निकालात कसे निघाले हा तपशील आहे.

दिलीप तिवारी

जळगाव 9552585088 (लेखक हे सकाळ जळगाव आवृत्ती / देशदूत जळगाव आवृत्ती व तरूण भारत जळगाव आवृत्तीचे माजी संपादक आहेत) प्रसिद्धी : मासिक साहित्य चपराक ऑगस्ट २०२५ <3d-flip-book id="6216">

Recent Posts

See All
Narendra Modi: The 'Tapa'poorti of a 'Shrimant'Yogi

The Sage on the Throne: Modi's Twelve-Year Culmination On September 17th of this year, the Prime Minister of the nation and the paramount leader of the Bharatiya Janata Party, Narendra Damodardas Modi

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page