मेईअळगन : आत्मिक सौंदर्याची गुरुकिल्ली शोधणार्या माणसांची कहाणी | Meiyazhagan : A Heartwarming Tale of Self-Discovery and Liberation
- Jyoti Ghanshyam
- Jun 12, 2025
- 14 min read
कधीकधी लहानपणीच्या भूतकाळातल्या दुःखदायक आठवणींचे ठसठसते क्षण नेणीवेच्या तळाशी गाडले जातात आणि माणूस त्यांच्यापासून दूर पळत राहतो. वर्तमानात जगू पाहणार्या माणसाला वास्तवाला सामोरे जायची भीती वाटते. म्हणून माणूस त्यापासून दूर पळत राहतो आणि एखाद्या क्षणी ते वास्तव अवचित सामोरे येते तेव्हा असेल-नसेल ते धाडस एकवटून त्याचा सामना करावा लागतो. ‘मेईअळगन’मधल्या अरुलमोलीला अत्यंत नाखुशीने का होईना हे धाडस करावे लागते तेव्हा त्याला स्वतःचा शोध लागत जातो आणि तो मुक्ती साधतो. या प्रवासात त्याला ज्याचे नावच काय, कुठलीही पुसटशी आठवण मनाच्या सांदीकोपर्यात दडून बसलेली नसते असा एक अनोळखी बालमित्र भेटतो, लहानपणी दुरावलेली बहीण, मैत्रिण भेटतात आणि मंदिरातला हत्ती... तोही भेटतो आणि ‘मेईअळगन’ही एका माणसाला त्याच्या नकळत त्याचे ‘स्व’ सापडण्याची हृदयस्पर्शी कहाणी बनते.
‘मेलोड्रामा अंडरप्ले केला तर तो अत्यंत प्रभावशाली ठरतो’ असे कुण्या शहाण्या माणसाने लिहून ठेवले आहे. ‘मेईअळगन’ हा या जातकुळीचा चित्रपट आहे. चित्रपट सुरू होतो तेव्हा तंजावरच्या पुरातन शिवमंदिरातली रात्रीची आरती होऊन गर्भगृहाचा दरवाजा बंद होत असतो पण मंदिराच्या प्रकारातल्या एका दगडी बेंचवर झोपलेला तरुण अरुल दिसतो आणि अरे, देवही निद्राधीन झाले पण हा अजून इथेच? असा प्रश्न पडत औत्सुक्य निर्माण होते. तेवढ्यात फ्रेममध्ये एक एवलीशी सोंड येत अरुलच्या कानाशी गुलुगुलु करू लागते. दाक्षिणात्य मंदिरातला हत्ती म्हणजे साधासुधा का असतो, परमेश्वराचा दूतच जणू! अरुलच्या कानी सांगू पाहतोय की लेका, जा की आता घरी! पण अरूलला घर कुठे आहे? त्याचे वडीलोपार्जित घर दुरावण्याची घडी आली आहे म्हणून त्याच्या काळजाला घरे पडतायत. त्याच्या आईच्या स्वैपाकघरात घट्ट बसवलेला दगडी पाटा पहारीने उचकून काढला जातो तेव्हा त्याच्याइतकेच प्रेक्षकांच्या काळजावरही घाव पडत जातात. घराचे दार बंद होते, किल्ल्या परक्यांच्या हाती सोपवल्या जातात आणि अरुलला निघावे लागते. गाव सुटते म्हणजे फक्त गावच सुटते थोडेच? तिथली माती, घरदार, माणसे, मंदिर, आशीर्वाद देणारा तो हत्ती, ‘अरे, नंबीमास्तरांचा मुलगा का रे तू?’ ही ओळख गमवून शहराकडे जायचे असते. तिथे स्थलांतरिताचे उपरे जिणे जगायचे असते. त्याचे हे तुटलेपण गावाकडचे लागेबंधे तोडून आलेल्या प्रत्येकाचे काळीज विदीर्ण करत जाते. अरुलची कहाणी फक्त त्याची राहत नाही, ती प्रेक्षकाशी नाते जोडत, जागतिक स्तरावर जाते.

काही वर्षे उडी घेऊन अरुलच्या भूमिकेतल्या अरविंद स्वामीच्या सहजसुंदर अभिनयाचा प्रवास सुरू होतो. आपले चित्रपट, काही सन्माननीय अपवाद वगळता ‘बोल’पटच असतात आणि ‘मेईअळगन’ त्याला अपवाद नाही! पण इथे दिग्दर्शकाला अरविंद स्वामी सापडला आहे, तो त्याच्या पहिल्या दृश्यापासून त्याचे शहरी अवकाशापासून तुटलेपण अगदी नीटच दर्शवत जातो. पुढे घटनांपेक्षा संवादांना जास्तच अवकाश दिल्यामुळे चित्रपटाचा अवधी तीन तास झाला आहे. पुरुष व्यक्तिरेखांच्या संवादांना, जेवणाच्या पंगतीला, अरुल आणि मित्राच्या रात्रीच्या दृश्यांना थोडी कातरी लावली असती तर बरे झाले असते असे वाटल्यावाचून राहत नाही. अरविंद स्वामी (त्याच्या काहीशा स्थूल आणि बेढब शरीरयष्टीचा, खप्पड गालांचा आणि बोलक्या डोळ्यांचा वापर करत) ‘अभिनय’ न करता आपली व्यक्तिरेखा कशी जिवंत करतो ते ‘बघणे’ विलक्षण अनुभव देत जाते.
अरूलला लग्नासाठी गावी जाणे कितीही नकोसे असले तरी बहिणीच्या लग्नासाठी जाणे आवश्यक आहे. भुवना त्याची लाडकी होती, गाव सोडून निघताना त्यानेच त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट करत ओक्साबोक्शी रडणार्या या लहानग्या मुलीला काकांच्या हाती सोपवले होते पण भावकीतल्या कोर्टकज्जामुळे घर जबरदस्तीने सोडावे लागले तेव्हा त्याच्या मनाला बसलेला डंख अजून कुठे मिटला आहे? अरुलला शहरात मोठे घर आहे, गच्चीवर पोपटांच्या थव्यांना सकाळ-संध्याकाळ खाऊ घालण्याइतपत सुबत्ता आणि निवांतपणाही आहे पण त्याला आतून काहीतरी टोचत-बोचत आहे. तो त्यानेच ओढून घेतलेला अलिप्ततेचा अवकाश स्पष्ट दिसत राहतो.
अरुल लग्नाच्या हॉलमधे येऊन पोचतो. इथे त्याची भेट बालमैत्रिण लताशी होते. तारुण्यात पाय टाकताच लग्नाच्या बेडीत बांधून सासरी रवानगी केली गेलेली ही साधीसुधी ग्रामीण गृहिणी. लेखक-दिग्दर्शक सी प्रेमकुमार यांनी अरुल आणि ‘तो’ या केंद्रीय पुरुष-व्यक्तिरेखांना मोठा अवकाश आणि बहुआयामीत्व दिले आहे पण लताप्रमाणे अरूलची पत्नी हेमा, मित्राची पत्नी नंदिनी, मंदिरासमोर फुले विकणारी ती अनाम मुलगी या स्त्री-व्यक्तिरेखांना अगदी मोजक्या रूप-रेषा-रंगांमधून सुडौल चित्र साकार करावे तशा खड्या केल्या आहेत (या व्यक्तिरेखांचे प्रयोजन, व्यक्तिमत्त्वांचा आलेख आणि कथानकाच्या उभारणीतले योगदान हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) लताचे अरुलशी लग्न करायचे स्वप्न तिच्यापाशीच राहून गेले होते कारण तिच्या वडिलांना ती गावात राहायला हवी होती आणि पुरुषसत्तेचा दबाव स्वीकारून मनाला मुरड घालून जगण्यापलीकडे तिच्या समोर दुसरा पर्याय कुठे होता? भूतकाळातले हळवे टप्पे मनात गाडून जगणारी ही दोन माणसे समोरासमोर येतात आणि त्या हळुवार धक्क्याने अरुलच्या नेणिवेचा एकेक पापुद्रा उकलायला सुरुवात होते. अरुलला भेटून खुर्च्यांच्या रांगेतून ती नेमकी उलट्या दिशेने बाहेर पडते. त्याच्या पाठीमागून जाताना ती त्याच्या पाठीवर झर्रकन ओझरता स्पर्श करून निघून जाते तेव्हा ती फ्रेममध्ये नसते पण अरुलचा चेहरा किती हृदयस्पर्शी क्षण निर्माण करतो!
मेलोड्रामाची कमतरता भरून काढण्यासाठी त्याला अचानक एक तरुण भेटतो. तो आल्याआल्याच त्याचे डोळे झाकून विचारतो, ‘ओळख बघू कोण ते?’ आता असला वेडेपणा करण्याचा मक्ता लहान मुलांचा! मोठ्यांना ते कसे शक्य आहे? पण असा वेडेपणा करणार्या ‘त्या’चे नाव अरुलला तर्हेतर्हेकने प्रयत्न करूनही आठवत नाही ते नाहीच. किंबहुना त्याला ‘तो’ कोण होता, नात्यागोत्याचा की मंदिरात नित्यनेमाने भेटणारा मित्र हे अजिबात आठवत नाही. तो विस्मृतीच्या अंधाराच्या गर्तेत चाचपडत राहतो आणि त्याचा हा शोध चित्रपटाचे केंद्र बनतो. यात ‘त्या’ला अरुलचे सगळेच माहीत असते, ‘त्या’च्या स्मृतीत तो लहानपणचा अरुल अजून तसाच जिताजागता असतो. हा मित्र निर्मळ, साधा... द्वेष, पश्चाताप, राग याचा मागमूसही नसणारा पण अरुलला जंग जंग पछाडूनही ‘तो’ कोण आहे हे समजत नाही. का समजत नाही? तर शक्यतांची अनेक वळणे निर्माण होऊनही, दिग्दर्शक त्याला ती संधी मिळूच देत नाही. अरुल भुवनाच्या लग्नात स्टेजवर तिला दागिने घालताना, पायात पैंजण घालताना भावविवश होतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यातही नकळत अश्रू तरळतात पण असेही वाटते की कसे शक्य आहे हे? पुरुषांना रडताना पाहायची सवय नसते आपल्याला. आपल्या चित्रपटांमध्ये तो मक्ता स्त्रियांनाच कायम बहाल करण्यात आला आहे. अलीकडच्या तामिळ आणि मल्याळम चित्रपटांनी ही चाकोरी पारच मोडून टाकली आहे. इथले पुरुष मनातले नैराश्य, प्रेम, आनंद, उद्वेग दडवून ठेवत नाहीत. ते रडतातही. भुवनाला आहेर देताना अरविंद स्वामी कमाल करतो. भुवनाच्या भूमिकेतल्या स्वाती कोंडेची त्याला उत्तम साथ मिळाली आहे. अरुलची मित्राचे नाव-गाव शोधण्याची, खरे तर त्याला टाळण्याची असफल धडपड हसवत-रडवत ठेवते आणि दुसरीकडे गमावलेले संचित पुन्हा सापडण्याचा त्याचा आंतरिक कल्लोळ आतून हलवत राहतो. असा दुस्तर प्रवास उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.
या मित्राच्या भूमिकेतला कार्ति हा तामिळमधला मोठा स्टार. बॉलीवूडप्रमाणे तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटसृष्टीतही घराणेशाही रुजलेली आहे. कार्ति या घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती त्याचा भाऊ सूर्या आणि वहिनी ज्योथिका या सुपरस्टार्सनी केली आहे. त्यामुळे तो आत्मविश्वासाने वावरतो एवढेच. अरुलची व्यक्तिरेखा जितकी शांत, स्थिर अंतर्मुख तितकीच याची बडबडी, खट्याळ, बहिर्मुख. मुळात ‘बोल’पट असलेल्या चित्रपटात त्याच्या लांबलचक बडबडाटाचा त्रासच होतो पण त्यामुळे अरुल आणि ‘त्या’ची बायको नंदिनी यांचा संयमित अभिनय उठून दिसतो. अरुलला त्याचे वडील, पत्नी आणि त्याचे आयुष्य ज्या गोष्टी कधी समजवू शकले नाही, त्यांची ‘तो’ सहज वाच्यता करतो आणि त्याच्या गळी उतरवतो. अर्थात अरुलला मित्राचे नाव आठवत नाही ते नाहीच पण आता ‘त्या’ने अजाणतेपणाने त्याचे आयुष्य व्यापले आहे. चित्रपटाचा शेवट काय होतो? अरुलला ‘त्या’चे खरे नाव कळते का? नाव कळल्यानंतर पुन्हा त्यांची भेट होते का? आयुष्याला अपूर्णतेचा शाप असतो, त्यामुळे या एकत्र आलेल्या व्यक्तिरेखा दुरावण्याचीच शक्यता जास्त असते.

चित्रपट अरविंद स्वामीच्या अभिनयामुळे कायम स्मरणात राहावा. खरे तर आता पन्नाशी पार केलेला स्थूल आणि बेढब अरविंद स्वामी या भूमिकेसाठी फारसा योग्य नाही. शिवाय हेमा, लता, नंदिनी, फुलविक्रेती आणि ‘तो’ या व्यक्तिरेखा त्याच्यासमोर वयाने लहान, अगदी कोवळ्या वाटतात आणि अरविंद स्वामी ‘रोजा’, ‘बॉम्बे’मधला अजून तसाच कसा असेल हे जाणूनही काही तरी चुकतेय ही भावना छळत राहते. गाव सोडून जाताना असलेले हत्तीचे पिल्लू पुढे बलदंड हत्तीच्या रूपात सामोरे येते तेव्हा आपल्या जुन्या घरासमोर उभे राहताना आतून कुणी ‘कोण आहे रे?’ हा प्रश्न येतो तेव्हा गडबडून जाताना, भुवनाच्या पायी पैंजण चढवताना, त्याची लहानपणीची सखी सायकल दिसल्यावर, एनसीसीच्या ग्रुपफोटोत मित्राचा शोध घेताना तो जी काही कमाल करतो ती त्याचे शारीरिक बेढपपण पार विसरायलाच लावते. सर्वसाधारण पुरुष आपले बालपण, मनातील सल, अतृप्त इच्छा, प्रेम, आपल्या माणसांवरील माया व्यक्त करताना दिसत नाहीत पण ‘मेईअळगन’मधल्या पुरुष व्यक्तिरेखा एका पातळीवर येऊन मनातले व्यक्त करतात, रडतात, हसतात. आजवर कुठल्या सिनेमात एका पुरुषाने दुसर्याचे डोळे झाकून, ओळख बघू कोण ते? असे विचारलेले पाहिले आहे का आपण कधी? पोपटांना खाऊ घालणारा, लहानपणच्या हत्तीकडे आसुसून बघणारा, बहीण-बायकोला जपणारा, अधिकार न गाजविणारा पुरुष जगातला सगळ्यात सुंदर माणूस कसा असतो ते इथे दिसून येते आणि त्याचा शोध आपला होऊन जातो.
‘मेईअळगन’मधल्या स्त्री-व्यक्तिरेखाही खासच आहेत. हेमा, नंदिनी, भुवना, लता आणि फुलविक्रेती या सगळ्याजणी कशा झर्यासारख्या नितळ, स्वच्छ आणि प्रवाहित आहेत. लेखक -दिग्दर्शक सी. प्रेमकुमार यांनी त्या खास नजाकतीने लिहिल्या आहेत. त्या कथाप्रवाहात योग्य वेळी अवतरतात, आपली कामगिरी करून नाहीशा होतात पण त्या अदृश्य झाल्यावरही प्रेक्षक त्यांच्या विचारात गुंतून राहतो. लता म्हणते की माझ्या वडिलांनी मी दूर कशी राहणार म्हणून तुझ्याशी लग्न ठरवायला नकार दिला, आता मी इथेच असते पण आता माझ्याकडे कोण बघतंय? तेव्हा मनात चर्र झाल्याशिवाय राहत नाही. ती ते इतके सहज बोलून जाते कारण पुरुषसत्ता स्वीकारून तिने जगणे शिकून घेतले आहे. त्याबद्दल तिच्या मनात कुठेही कटुता नाही. लग्नाआधीच्या प्रेमाची भेट झाल्यावर काय अपेक्षा असते की काही क्षोभनाट्य घडावे, सनसनाटी निर्माण व्हावी पण इथे तसे काही होत नाही. तरल जाणिवांची मृदु देवाणघेवाण होते ती महत्त्वाची!
ही अरुलच्या स्वतःच्या शोधाची तर आहेच पण त्याहीपेक्षा स्वतःला मुक्त करण्याची कहाणी आहे. भूतकाळातल्या कुठल्याशा खिंडीत त्याचे मन अडकले आहे, त्यामुळे येणारे थिजलेपण आहे, अडलेला श्वास आहे. चेतनाहीन शरीर, भावनाहीन चेहरा होत गेलेला अरुल तसाच जगत आला होता, तसाच कुणाच्याही खिजगणतीत न येता मरूनही गेला असता पण काळाचे पडदे भेदून येणारा तो हत्ती त्याला त्याची जुनी ओळख, ते प्रेमाचे लागेबांधे असणार्या जगाकडे घेऊन जातो. तंजावरचे बृहडेश्वर मंदिर, हत्ती, बस कंडक्टर, एवढेच काय मित्राच्या बागेतला नाग ही सगळी त्याच्या भूतकाळाशी जुळलेली प्रतीके आहेत. तो त्या घरात मागे सोडून आलेली सायकल हे गतीचे प्रतीक आहे, ती त्याला पुन्हा सापडते तेव्हा त्याचे साचलेले आयुष्य गतिमान होत एक वर्तुळ पूर्ण होते आणि त्याच्या मुक्तीचा मार्ग खुला होतो.
तामिळ चित्रपटसृष्टीत छायाचित्रणकार म्हणून कारकीर्द गाजवल्यानंतर सी. प्रेमकुमार दिग्दर्शनाकडे वळले. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘96’ हा तमिळ ‘रोमँटिक ड्रामा’ चित्रपट तिकीटबारीवर तसेच अनेक देशी-परदेशी पुरस्कार जिंकून अतिशय यशस्वी ठरला. त्यांनी पुढे त्याच्या कन्नड आणि तेलुगू आवृत्त्याही दिग्दर्शित केल्या. ‘मेईअळगन’ हा त्यांचा दुसराच चित्रपट. या दोन्ही चित्रपटात घटना अंगावर आदळत नाहीत. मोजक्याच घटना अगदी संथपणे घडत जातात. त्यामुळे जितका अलगद चित्रपट उलगडतो, तितकाच अलगद प्रेक्षकाला त्यात गुंतवत अंतरंगात घर करत जातो. ही जितकी गाव सोडून शहरात गेलेल्या आणि काही कारणाने परत आलेल्या एका माणसाची तितकीच दोन पुरुषांमध्ये जुळलेल्या प्रेमाची, त्यातून मागे सोडून आलेल्या अनेक साध्या-सुध्या लोकांशी जोडल्या जाणार्या नात्यांची, पर्यायाने आपल्या मुळांशी पुन्हा जुळत स्वतःच स्वतःला सापडण्याची अनेकस्तरीय कहाणी आहे.
ही तुमची-माझी कहाणी आहे.
- यशोधरा काटकर
9821148810
A Heartwarming Tale of Self-Discovery and Liberation
Sometimes, painful childhood memories are buried deep in our subconscious, and we keep running away from them. A person trying to live in the present is afraid to face reality. So, they keep running, and then, at some point, that reality suddenly confronts them. It's then that they must gather whatever courage they have and face it. In 'Mei Ayalagan', Arulmoli, albeit reluctantly, has to summon this courage, and in doing so, he begins to find himself and achieves liberation. In this journey, he meets an unknown childhood friend whose name, let alone any faint memory, isn't hidden anywhere in his mind. He meets his long-lost sister and a friend from childhood, and even the temple elephant. They all meet him, and 'Mei Ayalagan' becomes a heartwarming story of a person unknowingly finding their true 'self'.
"If melodrama is underplayed, it becomes extremely impactful," someone wise once wrote. 'Mei Ayalagan' is a film of this kind. The movie begins with the night aarti concluding at the ancient Shiva temple in Thanjavur, and the doors of the sanctum sanctorum closing. But a young Arul is seen sleeping on a stone bench in the temple courtyard, prompting the question, "Oh, even the gods have gone to sleep, but he's still here?" This creates curiosity. Just then, a tiny trunk enters the frame and playfully tickles Arul's ear. A temple elephant in South India isn't just any elephant; it's like a messenger of God! It seems to be whispering to Arul, "Son, go home now!" But where is Arul's home? The time has come for his ancestral home to be lost, and his heart is breaking. When the heavy stone grinding slab, firmly set in his mother's kitchen, is pried out with a crowbar, the audience's hearts ache as much as his. The door of the house closes, the keys are handed over to strangers, and Arul has to leave. When you leave a village, it's not just the village you leave behind, is it? You leave behind the soil, the home, the people, the temple, the blessing elephant, and the identity of "Oh, are you Nambimaster's son?" He has to go to the city to live the life of a stranger, a migrant. This brokenness of his heart shatters the hearts of everyone who has left their village ties behind. Arul's story doesn't remain just his; it connects with the audience, making it a universal tale.
Jumping forward a few years, the journey of Arvind Swami's naturally beautiful performance as Arul begins. Our films, with some honorable exceptions, are mostly 'talkies', and 'Mei Ayalagan' is no exception! But here, the director has found Arvind Swami, who from his very first scene perfectly portrays his detachment from the urban space. Further, giving more space to dialogues than events has made the film three hours long. One can't help but feel that cutting some of the male characters' dialogues, the dining scenes, and Arul and his friend's night scenes would have been better. Watching Arvind Swami (using his somewhat stout and ungraceful physique, sunken cheeks, and expressive eyes) bring his character to life without 'acting' offers a unique experience.
No matter how much Arul dislikes going to his village for a wedding, it's essential for his sister's marriage. Bhuvana was his beloved, and when he left the village, he was the one who insisted on taking her with him, crying inconsolably, only to leave her with their uncle. But the sting of having to leave their home due to family court disputes hasn't faded from his mind yet. Arul has a big house in the city, enough prosperity and leisure to feed flocks of parrots on the terrace morning and evening, but something is still bothering him deep inside. The space of detachment he has created for himself is clearly visible.
Arul arrives at the wedding hall. Here he meets his childhood friend, Lata. A simple rural housewife, she was married off and sent to her in-laws' house as soon as she entered youth. Writer-director C. Premkumar has given Arul and 'him' (the central male character) a large space and multi-dimensionality. However, like Lata, Arul's wife Hema, his friend's wife Nandini, and the nameless girl selling flowers in front of the temple are skillfully crafted female characters, drawn with precise lines and colors (the purpose of these characters, the arc of their personalities, and their contribution to the narrative's construction is a subject for a separate article). Lata's dream of marrying Arul remained hers because her father wanted her to stay in the village, and what other option did she have but to accept patriarchal pressure and live with a stifled heart? These two people, living with tender past moments buried in their hearts, come face to face, and with that gentle jolt, a layer of Arul's subconscious begins to peel away. After meeting Arul, she walks out of the row of chairs in the opposite direction. As she walks past him, she brushes his back fleetingly and disappears from the frame, but Arul's face creates such a heartwarming moment!
To compensate for the lack of melodrama, he suddenly meets a young man. As soon as he arrives, he covers Arul's eyes and asks, "Guess who?" Now, such childish antics are usually reserved for kids! How is it possible for adults? But Arul, try as he might, can't remember the name of 'him' who engages in such antics. In fact, he doesn't remember at all who 'he' was, whether a relative or a friend he regularly met at the temple. He fumbles in the abyss of forgetfulness, and this search becomes the center of the film. In this, 'he' knows everything about Arul; in 'his' memory, the childhood Arul is still alive and well. This friend is pure, simple... without a trace of hatred, regret, or anger. But Arul, despite his best efforts, doesn't understand who 'he' is. Why doesn't he? Because despite creating many possibilities, the director never gives him that opportunity. When Arul becomes emotional while putting jewelry on Bhuvana and anklets on her feet on stage at her wedding, tears well up in the audience's eyes too, but one also wonders, "How is this possible?" We're not used to seeing men cry. In our films, that privilege has always been granted to women. Recent Tamil and Malayalam films have completely broken this mold. Men here don't hide their despair, love, joy, or indignation. They cry too. Arvind Swami is incredible when he gives a gift to Bhuvana. Swathi Konde, playing Bhuvana, provides excellent support. Arul's futile struggle to find his friend's name and village, or rather to avoid him, keeps us laughing and crying, and on the other hand, his inner turmoil of finding lost treasures again keeps moving us from within. This film, unfolding such a difficult journey, takes the audience to a different level.
Karthi, who plays the role of this friend, is a big star in Tamil cinema. Like Bollywood, nepotism is prevalent in Telugu, Kannada, and Tamil film industries too. Karthi is a product of this nepotism. This film was produced by his brother Suriya and sister-in-law Jyothika, both superstars. Hence, he carries himself with confidence. Arul's character is as quiet, stable, and introverted as this one is talkative, mischievous, and extroverted. In a film that is fundamentally a 'talkie', his lengthy chatter becomes bothersome, but it makes the restrained acting of Arul and 'his' wife Nandini stand out. The things that Arul's father, wife, and his life could never make him understand, 'he' effortlessly articulates and makes him comprehend. Of course, Arul never remembers his friend's name, but now 'he' has unknowingly pervaded his life. What happens at the end of the film? Does Arul learn 'his' real name? Do they meet again after he learns the name? Life is cursed with incompleteness, so it is more likely that these reunited characters will drift apart again.
The film should always be remembered for Arvind Swami's acting. In truth, the stout and ungraceful Arvind Swami, now past fifty, is not quite suitable for this role. Moreover, the characters of Hema, Lata, Nandini, the flower seller, and 'him' seem younger, even naive, compared to him, and even knowing that Arvind Swami can't still be exactly like he was in 'Roja' or 'Bombay', a sense of something being amiss lingers. But when the elephant calf from the village appears as a powerful elephant later, when someone from inside asks, 'Who is it?' when he stands in front of his old house and he gets flustered, when he puts anklets on Bhuvana's feet, when he sees his childhood companion, the bicycle, and when he searches for his friend in the NCC group photo, the magic he creates makes you completely forget his physical clumsiness. Generally, men don't express their childhood, inner pain, unfulfilled desires, love, or affection for their loved ones, but the male characters in 'Mei Ayalagan' come to a certain level and express what's in their hearts, cry, and laugh. Have you ever seen a man blindfold another and ask, "Guess who?" in any movie? A man who feeds parrots, looks longingly at the childhood elephant, cares for his sister and wife, and doesn't assert authority, shows how the most beautiful person in the world behaves, and his search becomes our own.
The female characters in 'Mei Ayalagan' are also special. Hema, Nandini, Bhuvana, Lata, and the flower seller are all as clear, pure, and flowing as a spring. Writer-director C. Premkumar has crafted them with special grace. They appear at the right moment in the narrative, perform their roles, and then disappear, but even after they are gone, the audience remains engrossed in their thoughts. When Lata says that her father refused to arrange her marriage with Arul because she would live far away, and that she stays here now but who looks at her now, one can't help but feel a pang in the heart. She says it so easily because she has learned to live by accepting patriarchy. There is no bitterness in her heart about it. When love before marriage is encountered, what is expected? Some dramatic scene, some sensation? But nothing of the sort happens here. The gentle exchange of subtle feelings is what's important!
This is Arul's journey of self-discovery, but even more so, it is a story of liberating himself. His mind is stuck in some pass of the past, resulting in a frozen state, a choked breath. Arul, who had become a lifeless body and an emotionless face, would have lived and died unnoticed, but the elephant that comes through the curtains of time takes him to his old identity, to the world with loving ties. The Brihadeeswarar Temple in Thanjavur, the elephant, the bus conductor, and even the snake in his friend's garden are all symbols connected to his past. The bicycle he left behind in that house is a symbol of movement; when he finds it again, his stagnant life becomes dynamic, completing a circle and opening his path to liberation.
After a successful career as a cinematographer in the Tamil film industry, C. Premkumar turned to direction. His directorial debut, '96', a Tamil 'romantic drama', was very successful at the box office and won many national and international awards. He later directed its Kannada and Telugu versions as well. 'Mei Ayalagan' is only his second film. In both these films, events don't crash down on you. A few events unfold very slowly. As a result, the film unfolds gently, engaging the audience subtly and making a home in their hearts. This is a multi-layered story of a person who left his village for the city and returned for some reason, and also a story of love that blossoms between two men, of the relationships formed with many simple people left behind, and, by extension, of reconnecting with one's roots and finding oneself.
This is your story, and mine.
Yashodhara Katkar 9821148810
.jpg)







Comments