top of page

जगण्याची असीम उर्मी

  • Mar 23
  • 2 min read

या गीतात अवखळ रस आहे. राजस, धीरगंभीर नाही; तर उन्मुक्त, थोडासा वेडावलेला, थोडासा धडधडणारा श्वास आहे. ‌‘आज फिर जीने की तमन्ना है‌’ हे वाक्य जणू आत्म्याने स्वतःशी केलेलं गुपित बोलणं. कुणाला सांगायचं नाही पण स्वतःला आठवण करून देणं. कालच्या अंधारातून डोळे चोळत बाहेर पडलेली स्त्री आज पहिल्यांदाच उजेडाकडे चालते आहे. उजेड इथे फक्त प्रकाश नाही; तो स्वतःवरचा विश्वास आहे.


‌‘काँटों से खींच के ये आँचल‌’मध्ये काटे फक्त बाहेरचे नाहीत. समाजाचे टोचरे शब्द, मनात साचलेली अपराधभावना, आपल्याच अंगावर चढलेले बंधनांचे धागे त्या सगळ्यांतून पदर ओढून काढणं म्हणजे स्वतःची सुटका करून घेणं. ‌‘तोड़ के बंधन बांधे पायल‌’ इथे फार सूक्ष्म उलथापालथ आहे. बंधन तोडून पायल बांधणं म्हणजे नव्या गुलामगिरीत शिरणं नाही; चालायला सुरुवात करणं आहे. पायातली पायल म्हणजे चालताना वाजणारी स्वतःची जाणीव. तिचा आवाज स्वतःलाच ऐकू यावा म्हणून.


कोणी रोखू नये अशी ‌‘दिल की उड़ान‌’ ही बंडखोर उड्डाण नाही; ती सावध उंची आहे. उडायचंय पण आकाशाशी भांडून नाही. उडताना हसणं येतंय, थोडंसं घाबरणंही आहे. त्या हसण्यामागे जुन्या जखमांची आठवण आहे; त्या घाबरण्यामागे नव्या वाटेचा अंदाज. म्हणूनच ‌‘आज फिर मरने का इरादा है‌’ हा मृत्युचा विचार नाही; जुन्या स्वतःला मागे टाकण्याचा निर्धार आहे. आतली कालची मी आज मरावी आणि आजची मी उद्या जन्म घ्यावा, एवढाच त्या ओळीचा अर्थ.


‌‘कल के अंधेरों से निकल के‌’ ही बाहेर पडणारी व्यक्ती एखाद्या चमत्कारामुळे उजेडात आलेली नाही. तिने डोळे चोळले आहेत. म्हणजेच, तिने वास्तव पाहायचं धाडस केलं आहे. ‌‘फूल ही फूल ज़िंदगी बहार है‌’ ही घोषणा भोळी वाटते पण तिच्यामागे अनुभवाची थरथर आहे. फुलं दिसतात कारण काट्यांची आठवण अजून ताजी आहे. बहार उमलते कारण हिवाळा अंगावरून गेला आहे.


‌‘मैं हूँ खुमार या तूफ़ां हूँ‌’ या प्रश्नात स्वतःची ओळख अजून ठरलेली नाही. नशेत आहे का मी, की वादळ आहे? दोन्हींचं मिश्रणच कदाचित माणूस असतो. म्हणूनच ‌‘डर है सफ़र में कहीं खो न जाऊँ मैं‌’ हे भीतीचं कबूलनामं येतं पण तरीही ‌‘रस्ता नया‌’ स्वीकारला जातो. रस्ता नवा आहे, म्हणून हरवण्याची शक्यता आहे आणि हरवण्याची शक्यता आहे, म्हणून चालण्याला अर्थ आहे.


सचिन देव बर्मन यांच्या सुरांतून हे शब्द नदीसारखे वाहतात. पाणी शांत आहे पण आत खोलवर प्रवाह आहे. लतादीदींच्या आवाजात या प्रवाहाला काठ मिळतो. तिचा सूर कुठेही आरडाओरड करत नाही; तो मनात घर करतो, खुर्ची ओढून बसतो आणि हळूच म्हणतो, ‌‘आज पुन्हा जिवंत राहायचं आहे.‌’ शैलेन्द्र यांच्या शब्दांतला शाही रस असा आहे की तो राजदरबारात मिरवत नाही; तो साध्या घरात, साध्या माणसाच्या मनात, मुकाटपणे मुक्काम करतो.


हे गीत ऐकताना आपल्याला मोठं धैर्य मिळत नाही; आपल्याला रोजचं धैर्य मिळतं. उठायचं, चालायचं, पडायचं, पुन्हा उठायचं. मोठी क्रांती नाही; लहानशी पण प्रामाणिक पुनर्जन्माची चाहूल.


- रमा जाधव

प्रसिद्धी साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page