'तू है तो': एका अनोख्या प्रेमानुभूतीचा वेध (Mr. & Mrs. Mahi)
Mr. & Mrs. Mahi मधील हे गाणं शब्दांनी जरी साधं भासतं तरी त्याच्या भावछटांमध्ये एक खोल, पाण्याखालचा प्रवाह आहे. ऐकताना जाणवतं, जणू एखादा भटका प्रवासी आपल्या पायाखालच्या वाटा विसरून गेला आहे; त्याला फक्त एकच दिशा ठाऊक आहे, ‘ती’. काही शब्द मनाच्या अशा खोल कप्प्यात जाऊन विसावतात, जिथं वेळ थांबते, तर्क वितळतो आणि फक्त भावना उरतात. ‘तू है तो दिल धड़कता है’ ही केवळ प्रेमाची कबुली नाही तर जिवंत राहण्याचं कारण आहे. हृदयाची गती, श्वासांची लय, अस्तित्वाचं मर्म, सगळं तिच्या नावाने सुरू होतं, तिच्यानेच टिकून राहतं.

या गीतातला प्रियकर जणू आपल्या प्रेयसीवर फक्त प्रेम करत नाही तर तिच्या उपस्थितीतच श्वास घेतो, तिच्या अस्तित्वावरच जगतो. ‘तू ना तो घर घर नाहीं लगता.’ येथे ‘घर’ म्हणजे केवळ भिंती आणि छप्पर नाही तर तिच्या हाताचा स्पर्श, तिच्या डोळ्यातला ओलावा, तिच्या हसण्याने भारलेली हवा.
‘तू है तो डर नहीं लगता, गम ना आते हैं’ या ओळी प्रेमाचा खरा चमत्कार उलगडतात. प्रेम हे फक्त आनंद देणारं फूल नाही तर एक कवच आहे, जे भयाला बाहेरच रोखतं, दुःखाला दरवाज्याबाहेर थांबवतं आणि आत फक्त शांतता आणि विश्वासाचा प्रकाश ठेवतं. ‘सौ जन्म भी कम क्यों लागे, तेरे साथ में’ या भावनेत वेळेचं भान संपून जातं. तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण अनंतासारखा भासतो आणि अनंतसुद्धा कमी पडतो. काळाचं चक्र जिथं थांबतं, तिथून या नात्याची खरी सुरुवात होते.
‘मैं मुसाफिर, तू मुसाफिर’ जीवनाच्या या प्रवासात अंतिम ध्येय काहीही असो, मार्ग सुंदर होतो कारण दोघे एकत्र चालतायत. इथे देवाचं घर म्हणजे दूर कुठला आकाशातील दरबार नाही तर तिच्या हाताची घट्ट पकड, तिच्या नजरेतलं शांत आश्वासन. शेवटच्या प्रतिमेत ‘तू समुंदर गहरा है, सागर नहीं लगता’, ही ओळ, ती केवळ खोल नाही तर असीम आहे. समुद्राला किनारा असतो, लाटांना मर्यादा असते; पण तिच्या गहिराईला मोजमाप नाही, तिला नाव नाही, ती फक्त अनुभवायची आहे.
एकूण हे गीत प्रेमाचं असं रूप दाखवतं, जिथं दोन मने एकमेकांत इतकी गुंफली जातात की बाकीचं विश्व धूसर होतं. प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वर, ही फक्त भावना नाही ती हृदयाची थेट धडधड आहे. प्रेमाची ही अनुभूती कुठल्याही मोठ्या घटनांमध्ये नाही, तर रोजच्या श्वासांमध्ये, नजरेतून फिरणाऱ्या चेहऱ्यात आणि हाताच्या स्पर्शात दडलेली आहे.
- रमा जाधव
+91 80079 97223
प्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक २० ते २६ एप्रिल २०२६
.jpg)



Comments