प्रभावशाली प्रशासक
- 2 days ago
- 15 min read
भारत हा जगात विद्वानांचा देश म्हणून ओळखला जातो. अगदी प्राचीन काळापासून भारतीय कला, ज्ञान, शास्त्र, समाज, परंपरा आणि शिक्षण ह्यांचे परकीयांना आकर्षण होते. जगातील चार प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेली हडप्पा संस्कृती ही भारतीय सामाजिक परिस्थितीचा उत्तम नमुना म्हणून आजही ओळखली जाते.
प्राचीन भारतापासून ते आधुनिक भारतापर्यंत भारतीय समाज व्यवस्थेत काळानुसार अनेक स्थित्यंतरे झाली. अनेक विद्वान भारतात होऊन गेले. देशाला आणि समाजाला त्यांनी दिशा दाखविली. भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या अनेकांची चरित्रे आज बाजारपेठेत सहज उपलब्ध आहेत. अनेकांची माहिती चित्रपट आणि नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर वेळोवेळी आली आहे परंतु भारतीय इतिहासात अजूनही असे अनेक चेहरे आहेत ज्यांची जितकी चर्चा होणे अपेक्षित होते ती तितकी झाली नाही. ह्यामागे कारण कोणतेही असेल पण काळाने त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय त्यांना कधीच दिला नाही.
भारतातीय समाजव्यवस्थेवर आणि इतिहासावर छाप पाडलेल्या अशाच काही प्रमुख जणांची ओळख आपण आज ‘चपराक’च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महात्मा बसवेश्वर
महात्मा बसवेश्वर लगायत समाजाचे प्रचारक म्हणून ओळखले जातात. भारताच्या दक्षिणेत विशेषत: कर्नाटकमध्ये लगायत समाजाचे मोठे वर्चस्व आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या 244 जागांपैकी जवळपास 100 जागांवर लगायत समाजाचे थेट वर्चस्व असल्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे लगायतच ठरवित असतात. कर्नाटकच्या राजकारणात आणि समाजकारणात महात्मा बसवेश्वर हे नाव अत्यंत प्रभावी आहे मात्र कर्नाटकच्या बाहेर गेल्यावर बसवेश्वरांची जेवढी ओळख भारतीय समाजाला होणे आवश्यक आहे तितकी दुर्दैवाने ती झालेली नाही.
महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा 1105 मध्ये आजच्या कर्नाटक जिल्ह्यातील बिजापूरमधील बागेवाडी येथे उच्चवर्णीय समाजात झाला होता. बसवेश्वरांच्या वडिलांचे नाव मादरसा तर आईचे नाव मादलंबिका होते. बसवेश्वरांना एक थोरली बहीण होती तीचे नाव नागम्मा असे होते. बसवेश्वर हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धिचे आणि चिकित्सक वृत्तीचे असल्यामुळे त्यांना समाजातील भेदाभेद, रूढी, परंपरा आणि चालीरीतींवर सतत प्रश्न पडायचे. स्वत: ते उच्चवर्णीय समाजात जन्मले असल्यामुळे त्यांना जातीभेद अगदी जवळून पाहता आला. आपल्या जवळच्या लोकांना, सवंगड्यांना जातीभेदामुळे कशी वागणूक मिळते हे त्यांना अनुभवता आले.
बसवेश्वर साधारणपणे आठ ते दहा वर्षाचे असताना त्यांचा उपनयन संस्कार (मुंज) करण्याची वेळ येते तेव्हा ते आपल्या वडिलांना विचारतात...
“माझी मुंज तुम्ही करत आहात! पण ताईची का नाही?”
त्यावर बसवेश्वरांचे वडील म्हणतात, “नागम्माची मुंज होऊ शकत नाही कारण ती स्त्री आहे.”
बसवेश्वरांच्या मनात स्त्री-पुरुष भेदाच्या विरोधातील पहिली ठिणगी पडते ती येथेच. स्त्री-पुरुष दोघेही समान असून दोघांना ईश्वराने बनविले असल्यामुळे सर्व अधिकार हे दोघांना समान मिळायला हवेत अशी महात्मा बसवेश्वरांची शिकवण होती.
आजच्या काळात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बातम्या दररोज वृत्तपत्रात येत असताना बाराव्या शतकातील बसवेश्वरांचा स्त्री-पुरुष समानतेचा विचार म्हणजे तत्कालीन कर्मठ समाजाला आव्हान देणार होता.
आजच्या बागलकोट जिल्ह्यातील कुडल संगमनाथ हे एक बाराव्या शतकातील धार्मिक स्थळ होते. त्या ठिकाणी बसवेश्वरांचे प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षणानंतर बसवेश्वर मंगळवेढा येथे तत्कालीन राजाच्या दरबारात कारकून म्हणून रूजू झाले.
महात्मा बसवेश्वरांचे मामा बलदेवराय हे कालाचुरी राज्याचा राजा असलेल्या बिजल राजाच्या दरबारात सरदार होते. आपला भाचा हुशार आहे, तो विद्वान आहे, आपल्या राज्यात त्याला काहीतरी चांगले काम मिळावे ह्या हेतूने बलदेवराय हे बसवेश्वरांना राजा बिजलाच्या दरबारात घेऊन गेले.
बसवेश्वर पुढे आपली बुद्धिमत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर बिजलाच्या दरबारात कारकुनापासून ते महामंत्री (पंतप्रधान) पदापर्यंतचा प्रवास करतात. महात्मा बसवेश्वरांच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा मोलाचा फायदा वेळोवेळी राजा बिजलाला झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
महात्मा बसवेश्वर महामंत्री असल्यामुळे सत्ता आणि ताकद या दोन्ही गोष्टी त्यांच्या हाती केंद्रित होत्या. सत्तेचा आणि बळाचा वापर समाजासाठी योग्य प्रकारे कसा करायचा ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा बसवेश्वर आहेत.
कायदा करून समाज घडविण्यापेक्षा असा समाज निर्माण कराव की, ज्यामुळे कायद्याची गरज भासणार नाही, असे बसवेश्वर कायम सांगत असत. महात्मा बसवेश्वर हे संत असण्याबरोबरच तत्त्वज्ञ, कुशल प्रशासक आणि उत्तम कवी होते. आज त्यांची जवळपास पंधराशे वचने (अभंग) अस्तित्वात आहेत. आपल्या वचनातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी वेळोवेळी केल्याचे दिसून येते. ‘कायक वे कैलास’ अर्थात ‘काम हाच परमेश्वर आहे’ हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे.
बाराव्या शतकात जातीभेद आणि वर्णव्यवस्था उच्च पातळीवर पोहोचली असताना जगात कोणतेही काम हे श्रेष्ठ कवा कनिष्ठ नसते तर आपले काम हाच आपला परमेश्वर आहे असा संदेश आपल्या वचनातून देऊन बसवेश्वरांनी सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी ‘आराम हराम है’ अशी घोषणा दिली होती. म्हणजेच दुसऱ्याच्या कष्टावर जगणे हे हराम आहे. महात्मा बसवेश्वरांनी नेहरुंचा हाच संदेश कन्नड भाषेत कायक वे कैलास ह्या वचनाच्या माध्यमातून दिला.
भारत जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. लोकांनी, लोकांपासून, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या केली जाते. लोकशाहीची संकल्पना ही संसदेशिवाय अशक्य आहे. जेथे लोकशाही आहे तेथे संसद ही असली पाहिजे.
जगात अमेरिका, युके, फ्रान्स आणि इतर पाश्चिमात्य देश स्वत:ला लोकशाहीचे खंदे समर्थक म्हणवून घेत असले तरी जगात पहिली संसद निर्माण करण्याचा मान हा महात्मा बसवेश्वरांकडे जातो. ‘अनुभव मंडप’ नावाची जगातील पहिली ‘धर्म संसद’ ही बसवेश्वरांनी निर्माण केली होती. सर्व जाती-धर्माचे, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता सर्वांना अनुभव मंडपात मुक्त प्रवेश होता. अनुभव मंडप हे सामाजिक समस्यांच्या चर्चेचे व्यासपीठ होते. समाजातील सर्व प्रकारचे लोक तेथे आपले विचार मांडीत असत. अनेक सामाजिक समस्यांचे निराकरण हे अनुभव मंडपात होत असे.
बसवेश्वरांच्या अनुभव मंडपात 770 शरण (संत) होते. त्यापैकी 700 शरण हे पुरुष तर 70 शरण ह्या स्त्रीया होत. ह्यापैकी 250 शरण हे वचनकार होते. अनुभव मंडपात ज्या चर्चा होत असत त्या वचनांच्या रूपाने लिहून जतन करण्याचे काम हे 250 शरण करीत असत.
महात्मा बसवेश्वरांनी कर्मकांड नाकारले होते. देवाच्या नावाने होणारी हसा आणि बळी त्यांनी नाकारले होते. देव सर्वत्र आहे, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे असे ते कायम सांगत असत. चांगले वागा ! चांगले बोला ! चांगले राहा! असा त्यांचा विचार होता. महात्मा बसवेश्वरांनी आयुष्याची सात मूल्ये आपल्या वचनातून पुढीलप्रमाणे सांगितली आहेत...
नको करू चोरी, नको करू हत्या,
नको कोणा रागावू, नको बोलू मिथ्या,
नावडे तयाचा नको तिरस्कार,
नको आत्मवृष्टीचा बडिवार,
कोणासमय न करावा मानभंग कधी,
हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी,
आमच्या कुडाळसंगास प्रसन्न करण्याची,
हीच असे हो रीती!
म्हणजेच,
1. चोरी करू नकोस.
2. हत्या करू नकोस.
3. कोणावर रागवू नकोस.
4. खोटे बोलू नकोस.
5. आवडत नाही त्याचा तिरस्कार करू नकोस.
6. स्वतःचे कौतुक करू नकोस.
7. कोणाची तोंडावर खोटी स्तुती करू नकोस.
परमेश्वराजवळ जाण्यासाठी तप करण्याची गरज नाही. उपास करण्याची गरज नाही तर ही सात मूल्ये जरी पाळली तरी परमेश्वराजवळ तुम्ही जाऊ शकता असा विचार बसवेश्वरांनी आपल्या वचनातून दिला.
कृष्णा आणि मल:प्रभा नद्यांच्या संगमावर कुडल संगम ही जागा आहे. तेथे 1167 ला वयाच्या 62 व्या वर्षी महात्मा बसवेश्वरांनी अखेरचा श्वास घेतला. इतर महापुरुषांप्रमाणे महात्मा बसवेश्वर ह्यांच्या कार्यकाळाबद्दल अनेक मतभेद आहेत परंतु 1105 ला त्यांचा जन्म झाला आणि 1167 ला त्यांचा मृत्यू झाला असे अनेक विद्वान मानतात.
महात्मा बसवेश्वर शरीराने जरी गेले असले तरी त्यांचे विचार आजही जगाला दिशादर्शक आहेत. महात्मा बसवेश्वरांनी स्वतःला कधीच परमेश्वराचा अवतार मानले नाही परंतु त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य इतके मोठे होते की लोकांनी त्यांच्यात परमेश्वर पाहिला. आजही कर्नाटक आणि सीमावर्ती भागातील घराघरात बसवेश्वरांचा विचार आहे. ज्याला कन्नड भाषा येते आणि महात्मा बसवेश्वर माहीत नाहीत, असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
महात्मा बसवेश्वर हे विचारवंत होते, समाजसुधारक होते, तत्त्वज्ञ होते, ते उत्तम कवी आणि त्याचबरोबर प्रशासक सुद्धा होते. बसवेश्वरांच्या महामंत्री पदाच्या संपूर्ण कार्यकाळात राजा बिजलाला एकही युद्ध करावे लागले नाही हीच बसवेश्वरांच्या कामाची पावती म्हणता येईल.
रझिया सुलतान
भारत हा अगदी प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश राहिला आहे. प्राचीन भारतीय सभ्यता असलेल्या हडप्पा संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुष असा भेद केलेला कोठेही दिसत नाही परंतु हडप्पा संस्कृतीनंतर आलेल्या वैदिक संस्कृतीमध्ये कालांतराने स्त्री-पुरुष भेद सुरु झाल्याचे दिसून आलेले आहे. वैदिक संस्कृती ही वेदवाङ्मयावर आधारित अशी संस्कृती होती. वैदिक संस्कृतीचा काळ हा साधारणपणे अकराशे वर्षांचा मानला जातो. ह्याच काळात वेदांची रचना झाली. सुरुवातीच्या काळात लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी अशा विद्वान स्त्रियांचा उल्लेख झाल्याचे पुरावे आज उपलब्ध आहेत. पुढे जसा काळ बदलत गेला तशी सामाजिक असमानता आणि स्त्री-पुरुष भेद समाजात मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. स्त्री ही चूल आणि मूलपर्यंत मर्यादित ठेवण्याचा पहिला प्रयत्न हा तेव्हा झाला तो आजपर्यंत सुरू आहे.
भारतीय इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असे तीन भागात वर्गीकरण केले जाते. प्राचीन भारतीय इतिहासाची सुरुवात ही हडप्पा संस्कृतीपासून झाली असे अनेक इतिहासकार मानतात पण राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातून पाहिले तर प्राचीन भारतीय इतिहासाची सुरुवात ही जनपदे आणि महाजनपदे ह्यांच्या निर्मितीपासून झाली असे म्हणले जाते. मध्ययुगीन भारताची सुरुवात दिल्लीच्या सुलतानशाहीपासून सुरू झाल्याचे बोलले जाते तर काही ठिकाणी मुघलांच्या आगमनापासून मध्ययुगीन भारत सुरू झाल्याचे सांगितले जाते. सुरुवात कोठूनही असली तरी दिल्लीची सुलतानशाही ही भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना असल्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
दिल्ली सुलतानशाहीचा काळ हा 1206 ते 1526 पर्यंत आहे. ह्या तीनशे वीस वर्षांच्या काळात सुलतानांच्या पाच घराण्यांनी दिल्लीवर राज्य केले.
1. गुलाम वंश (1206 ते 1290)
2. खिल्जी वंश (1290 ते 1320)
3. तुघलक वंश (1320 ते 1414)
4. सय्यद वंश (1414 ते 1451)
5. लोधी वंश (1451 ते 1526)
दिल्लीच्या सुलतानशाहीचा संस्थापक कुतुबुद्दिन ऐबक (कार्यकाळ : 25 जून 1206 ते 4 नोव्हेंबर 1210) हा अफगाणिस्तानमधील साम्राज्याचा राजा असलेल्या महमंद घोरीचा गुलाम असल्यामुळे त्याने सुरु केलेली सुलतानांची वंशावळ ही गुलाम वंश म्हणून ओळखली जाते. कुतुबुद्दीन ऐबकनंतर दिल्लीवर अनेक सुलतानांनी राज्य केले. काही सुलतान हे यशस्वी आणि पराक्रमी होते तर काही सुलतान हे राज्य कारभारास पूर्णपणे नालायक असे होते. दिल्लीचे सर्व सुलतान हे पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक होते, त्याला अपवाद होता तो फक्त रझिया सुलतानचा!
रझिया सुलतान ही दिल्लीचा दुसरा सुलतान इल्तुकमीशची मुलगी होती. ती अत्यंत पराक्रमी स्त्री होती. स्वतःचे निर्णय स्वतःच्या बुद्धिने ती घ्यायची. रझिया ही शस्त्र चालविण्यात तरबेज होती. ती अनेकदा हत्तीवरून दिल्लीच्या रस्त्यांवर फेरफटका मारताना दिसायची आणि अंगावर कायम योद्ध्याचे कपडे घालून फिरायची. एखादी मुस्लिम महिला जी समाजाचे कोणतेही नियम न पाळता थेट महालाच्या बाहेर येऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरते, राजकारण आणि प्रशासनात लक्ष घालते ही गोष्ट आज वाचायला आणि लिहायला जितकी सोपी वाटते तितकी ती त्याकाळी निश्चितच सोपी नव्हती.
आजही इराण, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया, येमेन, कुवेत अशा मुस्लिम राष्ट्रात इस्लामिक नियम अत्यंत कठोरपणे पाळले जातात. 2021 मध्ये इराणमधील तेहरानच्या रस्त्यांवरून फिरताना म्हासा अमिनी नावाच्या 23 वर्षांच्या मुलीचे डोक्यावरील केस हिजाबमधून बाहेर बाहेर आले म्हणून स्थानिक पोलिसांनी तिला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली होती. पुढे आठ दिवसांनी ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
आधुनिक जगाच्या इतिहासात जर अशा प्रकारच्या घटना होत असतील तर तेराव्या शतकातील समाज आणि तत्कालीन कायदे कशाप्रकारे असतील ह्याचा अंदाज न बांधलेलाच बरा!
19 नोव्हेंबर 1236 ते 20 एप्रिल 1240 ह्या जवळपास साडेतीन वर्षांच्या काळात रझियाने दिल्लीवर सुलतान म्हणून राज्य केले. रझियाला भारतीय उपखंडातील पहिली महिला मुस्लिम शासक म्हणून ओळखले जाते. रझियाच्या आधी अनेक महिलांनी शासक म्हणून राज्य केल्याची उदाहरणे अस्तित्वात असली तरी त्या महिला ह्या कोणाचा तरी आधार घेऊन शासक बनल्या होत्या. उदा. राजाचा मृत्यू झाल्यामुळे आणि राजपुत्र वयाने लहान असल्या कारणामुळे राजपुत्राचा राज्याभिषेक करून त्याच्या नावाने राणीने कारभार करणे कवा कोणत्यातरी कट-कारस्थानात सहभागी होऊन अप्रत्यक्षपणे सत्ता आपल्या हातात ठेवणे इत्यादी! परंतु रझियाचे उदाहरण हे वेगळे होते. ती कोणाचाही आधार न घेता थेट सत्तेच्या गादीवर बसलेली पहिली मुस्लिम महिला होती.
रझियाचे वडील सुलतान इल्तुकमीश ह्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून स्वत:हून रझियाची निवड केली होती. सुलतानासमोर अनेक पर्याय उपलब्ध असताना त्या काळात एखाद्या महिलेची थेट शासक म्हणून निवड करणे ही अत्यंत कठीण गोष्ट त्यांनी करून दाखवली होती. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता प्रशासनात आणण्याचे पहिले श्रेय सुलतान इल्तुकमीश ह्यांना दिले पाहिजे.
सुलतान इल्तुकमीश ह्यांची दिल्लीच्या प्रशासनावर जबरदस्त पकड होती. आपल्याला राज्यकारभारात मदत करण्यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील विद्वान असलेल्या 40 लोकांचा एक गट तयार केला होता. ह्या गटाला ‘चहेलगानी’ कवा ‘चाळीसी’ असे म्हटले जायचे. ह्या चहेलगानीमध्ये काही मुस्लिम हे तुर्की वंशाचे तर काही भारतीय वंशाचे होते. तुर्की वंशाचे मुस्लिम स्वतःला भारतीय मुसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत असल्यामुळे ह्या चहेलगानीमध्ये तुर्की मुस्लिमांचा एक गट आणि भारतीय मुस्लिमांचा दुसरा गट पडल्याचे सुरवातीपासूनच दिसून येते.
सुलतान इल्तुकमीश ह्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून रझियाची निवड केली तेव्हा चहेलगानीतील सर्व सदस्यांनी सुलतानच्या निर्णयाला एकमताने पाठबा दिला. साहजिकच त्यांचा विचार असा होता की, सुलताननंतर रझिया आपल्याला आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. अप्रत्यक्षपणे रझियाला कठपुतळी बाहुली बनवून आपण दिल्लीवर राज्य करु. प्रत्यक्षात मात्र उलटेच झाले. रझिया सुलतान झाल्यावर तिने चहेलगाणींना मिळालेले अवास्तव महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. तुर्की वंशाचे मुस्लिम काढून तेथे भारतीय मुसलमानांची नेमणूक करण्यास सुरुवात केली. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली. परिणामी, चहेलगानीमधील काही सदस्यांनी रझियाविरोधात कारस्थाने रचून रझियाची सामाजिक आणि राजकीय अशी दोन्ही पातळ्यांवर बदनामी आणि कोंडी करण्यास सुरुवात केली. एकीकडे दिल्लीची सत्ता सांभाळत असताना रझियाचा निम्म्यापेक्षा अधिक वेळ हा चहेलगानींच्या कारस्थानांना उत्तर देण्यात जात होता. दिल्लीचे तख्त हे अंतर्गत कलहाने घेरले होते. अखेर 15 ऑक्टोबर 1240 रोजी आजच्या हरियाणा राज्यातील कैथल येथे चहेलगानी पुरस्कृत काही भाडोत्री मारेकऱ्यांनी रझिया सुलतानची हत्या केली आणि एका अशा शासकाचा अंत केला जो दिल्लीला राजकीय स्थैर्य देऊ शकला असता.
रझियाच्या हत्येनंतर दिल्लीत अनेक वर्षे गोंधळाची परिस्थिती होती. शेवटी बल्बनच्या सत्ताकाळात (कार्यकाळ : 18 फेब्रुवारी 1266 ते 13 जानेवारी 1287) दिल्लीला स्थैर्य प्राप्त झाले. बल्बन 1266 ला जरी दिल्लीच्या सत्तेवर आला असला तरी सुरुवातीच्या अनेक सुलतानांना त्याने आपले बाहुले बनवून दिल्लीच्या गादीवर बसविले होते. बल्बनच्या मृत्युनंतर तीन वर्षांनी जलालउद्दीन खिल्जीने दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना करणाऱ्या गुलाम वंशाचा शेवट करून दिल्लीवर खिल्जी वंशाची स्थापना केली.
सुलतान महमंद-बिन-तुघलक
दिल्लीची सुलतानशाही ही मध्ययुगीन भारतीय इतिहासाचा एक मोठा भाग आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीमुळे भारताची विशेषत: उत्तर भारताची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक गती बदलली. दिल्लीवर राज्य केलेल्या प्रत्येक सुलतानाची बौद्धिक पातळी, नेतृत्व क्षमता आणि विचारशीलता ही वेगळी होती त्यामुळे प्रत्येक सुलतानाच्या कार्याचा अभ्यास हा वेगवेगळ्या नजरेने करावा लागतो.
दिल्लीच्या गादीवर 1325 ला बसलेला सुलतान महमंद-बिन-तुघलक हा इतर सुलतानांपेक्षा अनेक बाबतीत वेगळा होता. तो उच्चविद्याविभूषित सुलतान होता. गणित आणि खगोलशास्त्राची त्याला उत्तम जाण होती. तो प्रचंड न्यायप्रिय होता. आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला संपूर्ण आणि योग्य न्यायय मिळेल यासाठी तो प्रयत्नशील होता. प्रचंड मोठ्या सैन्याचा आणि आर्थिक संपत्तीचा तो अधिपती होता. ऐवढे सर्व काही असूनही महमंद-बिन-तुघलक हा भारताच्या इतिहासात ‘मूर्ख सुलतान’ म्हणून ओळखला जातो.
भारतातील अनेक भागात विशेषतः उत्तर भारतात अनेक म्हणी आणि वाक्प्रचारात आजही त्याचा उल्लेख आढळतो. कोणतीही राजवट कवा सरकार जेव्हा अविचारीपणाने निर्णय घेते तेव्हा अशा राजवटीला तुघलकी राजवट म्हणून आजही संबोधले जाते ते ह्याच सुलतान महमंद-बिन-तुघलकमुळे. महमंद-बिन-तुघलक हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील अजरामर सुलतान आहे पण कोणत्या चांगल्या कामासाठी नव्हे तर तो त्याच्या मूर्खपणासाठी!
सुलतान महमंद-बिन-तुघलकने 1325 ते 1351 पर्यंत दिल्लीचा सुलतान म्हणून राज्य केले. आपल्या कार्यकाळात महमंद-बिन-तुघलकने असे अनेक निर्णय घेतले ज्यामुळे त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आणि जनतेच्या मनात एक मूर्ख शासक म्हणून परिचय झाला.
महमंद-बिन-तुघलक हा दयाळू आणि प्रजाहित दक्ष असलेला सुलतान होता. आपले म्हणणे खरे करण्यासाठी तो अनेकदा अत्यंतक्रूर सुद्धा होत असे. सुलतानाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयामागे वाईट हेतू होता असे म्हणणे योग्य होणार नाही परंतु त्याचे दुर्दैव म्हणा कवा त्याला सुचलेली दुर्बुद्धी म्हणा त्याने घेतलेले महत्त्वाचे जवळपास सर्वच निर्णय हे त्याच्यावरच उलटले आणि परिणामी त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
सुलतान महमंद-बिन-तुघलकने घेतलेेले काही महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामुळे त्याला मूर्ख म्हणले जाऊ लागले ते पुढीलप्रमाणे...
1. कर पद्धतीत बदल
1325 मध्ये सत्तेवर आल्यावर सुलतान महमंद-बिन-तुघलकने अल्लाउद्दीन खिल्जी पासून सुरू असलेल्या कर पद्धतीत अचानक बदल करण्याचे ठरविले. अल्लाउद्दीन खिल्जी उत्पन्नाच्या पन्नास टक्के कर लावित असे. एवढा मोठा उत्पन्न कर लावण्यामागे राज्यातील कोणतीही व्यक्ती श्रीमंत होऊ नये अशी त्याची धारणा होती. अल्लाउद्दीन खिल्जीच्या मतानुसार श्रीमंत लोक हे राज्याचे शत्रू असतात. गरजेपेक्षा जास्त संपत्ती लोकांना सत्तेविरोधात उठाव करण्यासाठी प्रेरणा देते. खिल्जींनंतर सत्तेवर आलेल्या गयासुद्दीन तुघलकने अल्लाउद्दीन खिल्जीपासून सुरु असलेला उत्पन्न कर हळूहळू कमी करीत दहा टक्यांपर्यंत खाली आणला. सुलतान महमंद-बिन-तुघलकने उत्पन्न कर एकदम दहा ते वीस टक्क्यांपर्यंत वाढविला. परिणामी, दिल्लीच्या जनतेवर वाढीव कराचा एकदम बोजा पडला. अचानक वाढविलेला कर भरणे जनतेला अशक्य झाले. जे लोक कर भरीत नव्हते कवा ज्यांना भरणे शक्य नव्हते त्यांच्यावर कर भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. सुलतानाच्या पहिल्याच मोठ्या अविचारी निर्णयामुळे अनेक शेतकरी आणि शेतमजूर दरोडेखोरांच्या टोळ्यांमध्ये सहभागी होऊन लूटमार करु लागले. सुलतान महमंद-बिन-तुघलकच्या ह्या निर्णयामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. राज्याची अर्थव्यवस्था बिघडली आणि गरिबी व गुन्हेगारीत प्रचंड मोठी वाढ झाली.
सुलतानला जेव्हा परिस्थिती समजली तेव्हा त्याने परत जुनी करपद्धती लागू केली परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता.
2. कृषी पद्धती बदल
भारत हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अगदी सुरुवातीपासून अनेक राज्यांची अर्थव्यवस्था कृषी आणि कृषीपुरक उद्योगांवर अवलंबून होती आणि आजही आहे. दिल्ली आणि उत्तर भारताचा संपूर्ण परिसर हा गंगा, ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांमुळे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त होता. परिणामी, दिल्लीच्या सुलतानांच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून शेतीकडे पाहिले जात होते.
सुलतान महमंद-बिन-तुघलक हा विद्वान असल्याने तो विज्ञाननिष्ठ होता. राज्याचे आणि जनतेचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने त्याने पारंपरिक कृषी पद्धतीत बदल करण्याचे ठरविले.
जमिनीचे क्षेत्रफळ आणि सुपिकतेनुसार पीकांची यादी निर्माण करुन ती पीके आपल्या जमिनीत उगविण्याची सुचना त्याने शेतकऱ्यांना केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी दिवाण-ए-कोही नावाचा स्वतंत्र विभाग त्याने राज्यात सुरु केला. सुलतानाने जगभरातून अनेक कृषीतज्ज्ञांना पाचारण केले. आपले सर्व अधिकारी कामाला लावून संपूर्ण राज्यातील कृषीपुरक जमिनीचे मोजमाप त्याने सुरु केले.
टाकावू आणि गायरान जमीन सुपीक करण्यासाठी त्याने जमिनीवर अनेक प्रयोग केले. सुलतानने टाकावू जमीन सुपीक बनविण्याच्या नादात जवळपास 70 लाख रुपये खर्च केले. राज्याच्या खजिन्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली. सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. शेवटी नाईलाजाने सुलतान महमंद-बिन-तुघलकला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
3. राजधानीत बदल
दिल्लीत सुलतानांची सत्ता आल्यापासून सुलतानांनी आपली राजधानी अनेकदा बदलली आहे परंतु त्या बदलामागे काही व्यावहारिक कारण होते.
दिल्ली ही सुरुवातीपासूनच परकीय आक्रमकांचे विशेषत: मंगेल आक्रमकांचे लक्ष्य होती. वर्षातून किमान एकदा मंगोल दिल्लीच्या आसपासच्या परिसरात येऊन लूटमार करुन जात असत. मंगोल आक्रमणामुळे दिल्लीची सुरक्षा करणे हे मोठे आव्हान दिल्लीच्या सत्ताधीशांसमोर कायम होते.
सुलतान महमंद-बिन-तुघलकने दिल्लीवरील मंगोल आक्रमणाचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने आपली राजधानीच दिल्लीवरुन हलविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे सुलतानच्या विचित्र स्वभाव आणि निर्णयक्षमतेमुळे जनतेत तो मूर्ख म्हणून कुप्रसिद्ध झाला होता. आपल्या बदनामीपासून दूर जाण्यासाठी आणि मंगोल आक्रमणापासून दिल्ली वाचविण्याच्या हेतूने त्याने 1327 ला संपूर्ण दिल्ली खाली करुन राजधानी दौलताबादला हलविण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली सोडताना त्याने दिल्लीत एकही माणूस न दिसण्याचा आदेश दिल्यामुळे जे लोक दिल्ली सोडण्यास तयार नव्हते त्यांची कत्तल केली गेली. आपले घर, जमिन आणि बसविलेला संसार सर्व मागे सोडून दौलताबादला जाण्यास लोक तयार नव्हते परंतु सुलतानाच्या भीतीमुळे नाईलाजाने लोक त्याच्या बरोबर प्रवासात सामिल झाले. दिल्लीवरून दौलताबादला 1500 किमीचा प्रवास करुन आल्यावर तेथे राजधानी उभी करण्यात सुलतानचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. जनतेला शारीरिक त्रास झाला तो वेगळाच!
दिल्लीपासून दूर आल्यामुळे सुलतानची दिल्लीवरील पकड ढिली झाली. दक्षिणेतून दिल्लीकडे लक्ष देणे त्याला अशक्य झाल्याने त्याने 1335 ला पुन्हा एकदा दौलताबादवरुन दिल्लीकडे जाण्याचे आदेश दिले.
4. खुरसानची मोहिम
महमंद-बिन-तुघलक काळात सुलतानांचे राज्य हे भारताच्या जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक भूभागावर पसरले होते. दिल्लीचे सुलतान हे भारतीय उपखंडातील एक मोठी ताकद म्हणून ओळखले जात होते.
सुलतान महमंद-बिन-तुघलक सुरुवातीपासूनच साम्राज्य विस्ताराच्या भूमिकेचा समर्थक होता. भारताबाहेर आपले साम्राज्य वाढवण्यासाठी त्याने आजच्या इराणमधील खुरसान प्रदेशाची निवड केली. खुरसानचा प्रदेश हा जकण्यासाठी अवघड असल्यामुळे मोहिमेच्या यशासाठी त्याने खुरसानच्या आजूबाजूच्या राजांची मदत घेण्याचे ठरविले. युद्धासाठी आपल्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर भरती त्याने सुरु केली. सर्वांना एक वर्ष आधीच पगार देऊ केला. पगाराची ही रक्कम त्या काळात जवळपास तीन लाख रुपयांच्या आसपास होती. मोहिमेची जोरदार तयारी करण्यात आली परंतु जेव्हा प्रत्यक्ष मोहिमेवर जाण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी आपले हात मागे घेतले आणि नेहमीप्रमाणे सुलतानला निर्णय मागे घ्यावा लागला.
5. चलनात बदल
सुलतान महमंद-बिन-तुघलकच्या काळात चांदी आणि तांब्याची नाणी चलन म्हणून वापरले जात असत. चांदी आणि तांब्याची नाणी ही धातूंपासून बनविली जात असल्यामुळे या दोन्ही धातूंना मोठी मागणी होती. चलन निर्मितीसाठी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे चांदी आणि तांब्याची कमत मोठ्या प्रमाणावर वाढत होती. चांदी आणि तांब्याच्या वाढत्या किंमतीवर उपाय म्हणून सुलतान महमंद-बिन-तुघलकने पितळीची नाणी छापण्याचे आदेश दिले. सदर आदेश देताना पितळीच्या नाण्याची कमत ही चांदीच्या नाण्यासमकक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. परिणामी, लोकांनी परस्पर पितळीची नाणी छापून त्यावर चांदीचा मूलामा देऊन ती नाणी चांदीची असल्याचे भासवून त्याची काळ्याबाजारात विक्री सुरू केली. बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणात नकली चलनी नाण्यांचा प्रवेश झाल्यामुळे दिल्लीतील महागाई प्रचंड वाढली. नकली चलणांची माहिती सुलतानाला मिळताच त्याने पितळीची नाणी मागे घेण्याचे आदेश दिले परंतु तोपर्यंत नकली नाण्यांनी राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस आणली होती.
1351 मध्ये एका साम्राज्य विस्ताराच्या मोहिमेत असताना वयाच्या 61 व्या वर्षी आजच्या पाकिस्तानातील सध येथे सुलतान महमंद-बिन-तुघलकचा मृत्यू झाला आणि एका प्रयोगशील सुलतानाचा अंत झाला.
सुलतान महमंद-बिन-तुघलकच्या मृत्युबद्दल लिहिताना एक इतिहासकार लिहितो, सुलतानाच्या मृत्युने जनता आणि सुलतान ह्या दोघांची सुटका केली. मृत्युमुळे जनता सुलतानपासून सुटली आणि सुलतान जनतेपासून सुटला.
महमंद-बिन-तुघलक मूर्ख सुलतान म्हणून ओळखला गेला असता तरी त्याने आयुष्यात अनेक चांगले निर्णय घेतले. सुलतानचे संपूर्ण आयुष्य हे राज्यशास्त्र आणि प्रशासनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक धडा आहे. फक्त अभ्यास करून आणि ज्ञान मिळवून यश मिळवता येत नाही. त्यासाठी संयम, विवेक आणि योग्य नियोजन हे अत्यंत आवश्यक असते हा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो.
सम्राट कृष्णदेवराय
केंद्रीय सत्ता जेव्हा कमकुवत झाल्याचे दिसून आले आहे तेव्हा स्थानिक शक्तीनी आपले डोके वर काढले आहे.
सुलतान महमंद-बिन-तुघलकच्या काळात दिल्लीच्या सुलतानांचे राज्य आजच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमारचा काही भाग, संपूर्ण उत्तर भारत ते दक्षिणेला मदुराईपर्यंत पसरले होते. एवढ्या मोठ्या विशाल साम्राज्याचा अधिपती असलेला सुलतान महमंद-बिन-तुघलक हा विचित्र आणि लहरी स्वभावाचा राजा होता. तो कधी काय करेल ह्याचा कोणताही नेम नसल्यामुळे आणि अविचारी निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे सुलतान महमंद-बिन-तुघलक जनतेत ‘मूर्ख राजा’ म्हणून प्रसिद्ध होता.
भारतीय उपखंडात पसरलेले विशाल साम्राज्य दिल्लीत बसून सांभाळणे अवघड वाटल्यामुळे आणि मंगोल आक्रमकांपासून आपल्या राजधानीचा बचाव करण्यासाठी सुलतान महमंद-बिन-तुघलकने आपली राजधानी 1327 ला दिल्लीवरून आजच्या महाराष्ट्रातील दौलताबाद येथे हलविण्याचा निर्णय घेतला. पुढील काही वर्षात त्याची उत्तर भारतावरील पकड कमकुवत झाल्यामुळे अनेक सरदार सुलतान विरोधात उठाव करू लागले. उत्तर भारत हातातून निसटून जाईल ह्या भीतीने नेहमीच्या स्वभावाप्रमाणे सुलतानने पुन्हा एकदा आपला निर्णय फिरवित 1335 ला पुन्हा एकदा दिल्लीकडे कुच केले. सुलतान दिल्लीला आला तर त्याची दक्षिण भारतावरील पकड ढिली झाली. उत्तर भारतातील सरदारांचा आदर्श घेत दक्षिण भारतातील सरदार आणि सैन्य अधिकारी ह्यांनी सुलतान विरोधात बंड सुरु केले.
दिल्ली ते दौलताबाद आणि दौलताबाद ते पुन्हा दिल्ली ह्या राजधानी बदलाच्या 9 वर्षांच्या कालखंडात सुलतानची राज्यकारभाराची घडी पूर्णपणे विस्कटली होती. प्रशासन आणि सैन्य ह्यावर त्याचा कोणताही प्रभाव राहिला नव्हता. प्रशासनाला आलेल्या मरगळीचा फायदा घेत हरिहर आणि बुक्क ह्या दोन भावांनी स्वतःला सुलतानपासून वेगळे होत असल्याचे जाहीर करून दक्षिण भारतात विजयनगर नावाच्या शक्तिशाली हदू साम्राज्याची निर्मिती केली.
भारतीय उपखंडाच्या जवळपास सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक भूभागावर जेव्हा इस्लामिक राजवट होती तेव्हा दक्षिण भारतात विजयनगर नावाचे शक्तिशाली हदू साम्राज्य फक्त आपले अस्तित्वच टिकवून नव्हते तर आपली स्थापत्य शैली, भव्य मंदिर निर्माण आणि कलागुणांसाठी तत्कालीन जगातील एक नावाजलेले साम्राज्य होते.
दिल्लीवर ज्याप्रमाणे सुलतानांच्या पाच घराण्यांनी राज्य केले त्याचप्रमाणे दक्षिण भारतावर तीनशे वर्ष राज्य केलेल्या विजयनगर साम्राज्यावर चार राजघराण्यांनी राज्य केले.
1. संगमा वंश (1336 ते 1485)
2. सालुवा वंश (1485 ते 1505)
3. तुलुवा वंश (1505 ते 1570)
4. अराविडु वंश (1570 ते 1650)
विजयनगर साम्राज्याचा ह्या महान कालखंडात विजयनगरवर एकूण 29 राज्यांनी राज्य केले. त्यापैकी सर्वात यशस्वी, महान, पराक्रमी राजा म्हणून सम्राट कृष्णदेवराय (कार्यकाळ 1509 ते 1529) यांना ओळखले जाते. ज्याप्रमाणे अकबराच्या काळात मुघल साम्राज्य सर्व बाबतीत संपन्न आणि शक्तिशाली होते त्याचप्रमाणे सम्राट कृष्णदेवराय ह्यांच्या काळात विजयनगरचे साम्राज्य हे यशाच्या अत्युच्च बदूपर्यंत पोहोचले होते.
सम्राट कृष्णदेवराय स्वतः विद्वान होते. ते कुशल प्रशासक होते. ते युद्धशास्त्रात निपुण होते आणि ते एक कवी होते. त्यांनी लिहिलेला अमाक्तुमाल्यदा हा ग्रंथ तेलुगु भाषेतील एक प्राचीन ग्रंथ म्हणून ओळखला जातो.
विजयनगर साम्राज्याचे मुख्य शत्रू असलेले ओडीसाचे गजपती आणि बहमनी साम्राज्यापासून वेगळे झालेले दख्खनचे पाच सुलतान (आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, बरिदशाह आणि इमादशाह) ह्यांच्यावर त्यांनी विजय मिळवून भारतीय उपखंडातील सर्वात शक्तिशाली हदू राजा म्हणून गौरव मिळविला होता. दक्षिण भारतावर जेव्हा सम्राट कृष्णदेवराय राज्य करत होते तेव्हा उत्तर भारतात बाबरने दिल्लीतील सुलतानांची सत्ता उलथावून मुघल साम्राज्य स्थापन केले होते. बाबरने आपल्या बाबरनामा नावाच्या ग्रंथात विजयनगरे सम्राट कृष्णदेवराय आणि चित्तोरचे राणा सांगा यांचा उल्लेख महान हदू राजा म्हणून केल्याचे आढळून येते.
सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म विजयनगरची राजधानी असलेल्या आजच्या कर्नाटकमधील हंपी येथे 1471 ला झाला. त्यांचे वडील तुलवा नरसा नायक हे विजयनगरचे तत्कालीन सम्राट असलेले नरसहदेवरायांच्या दरबारात सेनापती म्हणून कार्यरत होते. 1491 ला सम्राट नरसहदेवरायांचे निधन झाल्यानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी तुलवा नरसा नायक यांनी राज्याचे नेतृत्व आपल्या हातात घेतले आणि तेथून विजयनगरवर तुलुवा राजघराण्याची स्थापना झाली.
कृष्णदेवराय हे तुलुवा राजघराण्यातील तिसरे राजा होते. विजयनगरच्या उत्तर सीमेवर दख्खनच्या सुलतानांचे राज्य असल्यामुळे आणि विजयनगरशी शत्रुत्व असल्यामुळे हे सुलतान विजयनगरच्या सीमांवर आळीपाळीने आक्रमण करीत असत तर दुसरीकडे पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने 1498 ला भारताचा शोध लावल्यामुळे दक्षिण भारतात पोर्तुगीज आणि इतर युरोपीय शक्ती दक्षिण भारतात आपल्या सुसज्ज आरमारासह येत होत्या. परिणामी, विजयनगरच्या चारही सीमा सुक्षरेच्या दृष्टीने संवेदनशील बनल्या. आपल्याला एकाच वेळी सर्वांशी चारही सीमांवर लढणे शक्य नसल्यामुळे सम्राट कृष्णदेवराय ह्यांनी पोर्तुगीजांशी युद्धाचा मार्ग अवलंबण्याच्या जागी कुटनितीचा मार्ग निवडला. पोर्तुगीजांशी त्यांनी व्यापारी संबंध प्रस्थापित करून युरोपीय धर्तीवर आपले आरमार उभे केले. आपल्या साम्राज्यात व्यापार करण्याची पोर्तुगीजांना त्यांनी मुभा दिली पण ती देत असताना ते आपले लष्करी साम्राज्य वाढविणार नाहीत याची संपूर्ण काळजी त्यांनी घेतली.
दुसरीकडे उत्तरेला असलेल्या ओडिसाचे गजपती आणि दख्खनच्या सुलतानांविरोधात आक्रमक लष्करी मोहिमा उघडून त्याना नामोहरम केले. अशा प्रकारे सम्राट कृष्णदेवराय ह्यांच्या काळात विजयनगर साम्राज्य एक लष्करी ताकद म्हणून उभे होते.
राज्याच्या प्रशासनावर सम्राट कृष्णदेवराय ह्यांचे जबरदस्त नियंत्रण होते. प्रशासनात सुसुत्रता आणण्यासाठी त्यांनी केंद्र-राज्य संबंध पद्धतीचा अवलंब केला. आपल्या साम्राज्याचे छोटे विभाग बनवून त्याची जबाबदारी त्यांनी स्थानिक नेतृत्वाकडे दिली. परिणामी, राज्यात अराजकता कवा नेतृत्वहीनता नावाची समस्या निर्माण झाली नाही. केंद्र-राज्य संबंधांवर प्रकाश टाकणारे अनेक लेख आज अस्तित्वात आहेत पण आदर्श केंद्र-राज्य संबंध कसे असावेत हे सम्राट कृष्णदेवराय ह्यांनी सोळाव्या शतकातच सांगून ठेवले आहे.
विजयनगरचे सर्व सम्राट हे विष्णूभक्त म्हणून ओळखले जातात. भगवान श्रीहरी विष्णूंना जीवसृष्टीचे पालनहार म्हणून पाहिले जाते. विजयनगरचे साम्राट हे भगवान विष्णू आणि त्यांच्या अवजारांचे पूजन असल्याने आपल्या नावानंतर ते ‘राया’ हा शब्द लावत असत. राया ह्या शब्दाचा अर्थ ‘जनतेची काळजी घेणारा’ असा होतो.
सम्राट कृष्णदेवरा हे खऱ्या अर्थाने जनतेचे राया होते. ते हदू धर्माचे उपासक असले तरी त्यांनी सर्व धर्मांना सन्मान देण्याचे तत्व अंगिकारले होते. उत्तरेला आणि दख्खनमध्ये सुलतानांच्या राज्यात धर्मांतराच्या घटना आणि हदूंना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असताना विजयनगरमध्ये सर्व धर्म आनंदाने वाढत आणि फुलत होते.
सम्राट कृष्णदेवराय हे ज्याप्रमाणे धर्माच्या बाबतीत सहिष्णु होते त्याचप्रमाणे ते भाषेच्या बाबतीत सुद्धा सहिष्णु होते. विद्वानांना त्यांच्या दरबारात मानाचे स्थान होते. महान तत्त्ववेत्ता तेनालीरामन हे त्याचेच उदाहरण आहे. सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळात संस्कृत, तेलुगु आणि तमिळ भाषेत विपूल ग्रंथसंपदा निर्माण झाली. ही ग्रंथसंपदा द्रविड साहित्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आजही ओळखली जाते.
अशाप्रकारे सर्वगुणसंपन्न असलेल्या महान सम्राट कृष्णदेवरायांचे 6 ऑक्टोबर 1529 ला वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले आणि एका युगाचा अंत झाला.
- स्वप्निल श्रोत्री
पूर्वप्रसिद्धी : 'साहित्य चपराक' दिवाळी अंक २०२५
.jpg)
Comments