आम्ही का लिहितो? : "स्वतःला खोदत राहणं, म्हणजे लिहिणं!" - दासू वैद्य
- 2 days ago
- 5 min read
मी का लिहितो?
प्रश्न तसा साधा आहे. त्याचं तेवढंच साधं उत्तरही देता येईल. माझ्याजवळ कागद-पेन आहे म्हणून लिहितो. मला वाचन-संभाषणासारखं लेखन कौशल्य अवगत आहे म्हणून लिहितो! पण ह्या प्रश्नाचा जेव्हा सर्जनशील लेखक-कवी म्हणून विचार करतो तेव्हा स्वतःला खोदल्याशिवाय पर्याय उरत नाही.
मी छोट्या गावात वाढलो. शेती-मातीचे संस्कार आपसुकच होत गेले. शाळा मला आवडत नव्हती. चौथीपर्यंत शाळेत जाण्यासाठी मी उत्सुक नसे. जबरदस्तीने मला शाळेत पोहोचवलं जाई.
खेड्यातली जिल्हा परिषदेची टुमदार शाळा! पण वर्गात मला कोंडल्यासारखं वाटे. वर्गातल्या प्रशस्त मोठ्या खिडक्यांना ग्रील नव्हते. त्यामुळे खिडकीची एक मोठ्ठी खुली चौकट तयार होई. त्या खिडकीतून बाहेरचं मोकळं आकाश दिसे. चार भतींच्या कोंडलेल्या वर्गात ही खुली खिडकी हा माझ्यासाठी विरंगुळा होता. बरेचदा तर ही खिडकी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्गही झाली आहे. एकदा खिडकीतून उडी मारली की रेल्वेलाईन, शेतमळे, नदी वाटच पाहत असे. पेरू, बोरं, कैऱ्या, जांभळं, फिरंगी चचा, आंबट चचा, मोसंबी, संत्री, असा मोसमानुसार रानमेवा मनसोक्त खायला मिळायचा. नदीवरचा धगाणा तर थकवत असे. नदीकाठची चिकणमाती अंगाला फासून उन्हात अंग वाळवण्याची मजा औरच होती. कोळ्याच्या पोरांबरोबर मासे धरण्याचं प्रशिक्षण मिळे. खेकडे धरण्याची मात्र भीती वाटे. नदीत डुंबून फार भूक लागली तर शेजारच्या मळ्यात तुरीच्या, मुगाच्या, भुईमुगाच्या शेंगा मोसमानुसार खायला मिळत. शाळेत सकाळीच हजेरी लागलेली असे. शिवाय दप्तर वर्गातच असे. चार-पाच घंटे आनंदात हुंदडल्यावर पुन्हा शाळेत जावं लागे; कारण शाळा सुटली की सगळ्या मुलांबरोबर साळसूदपणे घरी जाता येई. चौथीला गणितात नापास झाल्यावर माझी स्वच्छंदी शाळा योजना सगळ्यांना कळली. म्हणजे वर्गातल्या शाळेपेक्षा वर्गाबाहेरची शाळा मला जास्त आकर्षित करीत असे. नाही म्हणायला मराठीचं पुस्तक मला प्रचंड आवडायचं. सातवीपर्यंतच्या मुलांची फक्त मराठीची पुस्तकं मी मिळवून वाचायचो. कविता तर जीव की प्राण होत्या. या बालांनो या रे या, शगे रंगविली-बाशगे बांधिली, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चधड्या, वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ, घाल घाल पगा वाऱ्या माझ्या परसात, माझ्या मामाची रंगीत गाडी हो, फुलपाखरू छान किती दिसते, देवा तुझे किती सुंदर आकाश, गवतफुला रे गवतफुला, या झोपडीत माझ्या... अशा कितीतरी कविता न पाठ करता पाठ होत्या. लिखित कवितेचा झालेला हा पहिला संस्कार.
या लिखित कवितेच्या आधी झालेला श्राव्य संस्कार महत्त्वाचा होता. गोंधळी, मसणजोगी, वासुदेव, भजन, कीर्तन, आरती अशी श्रवणभक्ती घडल्यामुळे कान तयार झाला असावा. सकाळी झोपेतून उठवायला घड्याळाचा अलार्म नव्हता तर भल्या सकाळी गोंधळ्याची संबळ ऐकून जाग यायची. आठ-आठ दिवस विठ्ठल मंदिरात वेगवेगळ्या आख्यानावर कीर्तन सुरू असे. भागवत, रामायण, महाभारत ऐकायला गर्दी असे. आज सांगायला हरकत नाही तेव्हा जत्रेत चोरून तमाशेही पाहिले...
‘गणास वंदन करू नि आम्ही बारा गावं फिरू
अन् चला चला गवळण झाली सुरू ’
अशा शब्दांवर ढोलकी घुमायची, घुंगरं जिवंत व्हायचे. तो क्षण तंबूला भारून टाकणारा असे. राजस्थानवरून दरवर्षी रामलीलावाले येत. रामजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत दहा दिवस सादरीकरण होत असे. टीव्ही नसल्यामुळे या जिवंत सादरीकरणाचा मोठाच प्रभाव होता. मी तर आवडीने कीर्तने ऐकायलाही जायचो. कीर्तनकार दोन तास खिळवून ठेवत. एकटे कीर्तनकार कथा सांगत, पेटी वाजवत, सुरेल पदं म्हणत, मधेच विनोद करत, ज्ञानाचा डोस देत, नैतिकता शिकवत. अगदी सहज सोप्या भाषेत. बायका, पुरुष, वृद्ध, तरूण, शिक्षित, अशिक्षित अशा लोकांना एकाचवेळी खिळवून ठेवण्याची कीर्तनकाराची एकपात्री कला थोर वाटे. कालेजी देवीच्या मंदिरात संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांचं प्रवचन मी लहानपणी ऐकलं होतं. वडिलांनी मला प्रवचन ऐकायला नेलं होतं. प्रवचनातलं काय कळलं यापेक्षा एक मुस्लिम माणूस संतसाहित्यावर बोलतो याचंच गावभर कौतुक होतं. पुढं विद्यापीठात एम. ए. च्या वर्गात पठाण सरांनी मला शिकवलं. असं एक श्रवणभक्तीचं समृद्ध बालपण मी जगत होतो.
रुढ अर्थाने हे गाव छोटं असलं तरी इथे मला मनसोक्त हुंदडता आलं. वेड लागल्यासारख्या विहिरी पोहून काढल्या. विहिरीवरच्या बाभळीवरून पाण्यात उड्या मारल्या. वीस-पंचेवीस फूट पाण्यात तळाशी फेकलेले दहा पैसे शोधून आणले. तरीही अरमान झालीच नाही. कुठला तरी अनामिक तळ हाका मारत होता. पाण्यात बुडून मेलेला मित्र गण्या अजूनही स्वप्नात येत असतो. भजनी मंडळात जाऊन भजनं म्हणली. टाळ वाजवले. पावल्या खेळल्या. सातवीत असताना आईच्या गुरुवार भजनी मंडळासाठी भजन लिहून दिलं. आरत्या म्हणताना आवाज टिपेला गेला. ग्रामीण नाटकाच्या तालमी-प्रयोग आवडीने बघितले. मनसोक्त क्रिकेट खेळलो. लंगोट बांधून कुस्तीच्या तालमीत शड्डू ठोकले. चित्र काढायचा नाद होताच. वडील शिक्षक. त्यांच्या नेहरू शर्टाच्या खिशातले खडूचे तुकडे हक्काचे. सारवलेल्या भतीवर-ओसरीवर खडूने चित्र काढायचो. धप्पाकुट्टी, लपाछपी, शिवणापाणी, सूरपारंब्या, कबड्डी, लिगोरच्या, गोट्या असे खेळ सुरुच असत. यात बरेचदा भांडणं व्हायची. शिवीगाळ-मारामाऱ्यामुळे तर घरचे वैतागून जात. याउलट विधायक उपक्रम म्हणजे, खंडोबाच्या माळावर जाऊन लाल माती आणणे. त्या मातीचे पोळ्यासाठी बैल बनवणे, गणपती बनवणे हा आवडता वार्षिक कार्यक्रम. शिवीगाळ-मारामाऱ्या करणे संदर्भात विजय तेंडुलकरांनी एकदा बोलताना नवाच दृष्टिकोन सांगितला. त्यांच्या मते शिवीगाळ-मारामाऱ्या हीसुद्धा अभिव्यक्तीच आहे. ओव्या आणि शिव्यातून आपण अभिव्यक्तच होत असतो. थोडक्यात काय तर कशातून तरी व्यक्त होणं ही माझी गरज होती. पुढे शब्द सापडले आणि मी शब्दातून व्यक्त होऊ लागलो.
गावात घडणाऱ्या अनेक घटनांबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं. छोटं गाव. पटकन बातमी पसरे. कुणाच्या घरी मृत्यू झाला की तिथे जाऊन दाखल होणे. तिथली रडापड, (गवरण्यातली लय वेगळीच असे) नातेवाईकांची वाट पाहणे, तिरडी बांधणे, मृत व्यक्तीबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टी... हे सारं मी बघत बसे. दरवर्षी गावात अस्वलवाले येत. दारोदार फिरून लोकांना दुवा देत. अस्वलाच्या केसांचं ताईत देत. लहान मुलांना अस्वलावर बसवत. काही मुलं भोकाड पसरत. लोक अस्वलवाल्याला धान्य, पैसे देत. दारोदार अस्वलवाले फिरत. त्यांच्याबरोबर गावभर फिरण्यात मौज वाटे. चौकातील भांडणं असू देत नाही तर विठ्ठल मंदिरातील गीतरामायण, ऐकताना मजा यायची.
आठवी- नववीत असताना आमच्या गावात दंगल झाली.
मारामाऱ्या माहीत होत्या पण दंगल माहीत नव्हती.
दगडफेक, जाळपोळ, चाकूने भोसकणे अशा वातावरणात पोलिसांची गस्त. गाव सुनसान. घाबरून लोक घरात बसलेले. अशा परिस्थितीत मी दंगल पाहायला गुजरीत (बाजार) गेलो होतो. पोलिसांनी घरी आणून सोडलं.
गौस नावाच्या खाटीक मित्राच्या मागे लागून मी बैल कापताना पाहिला. (पुढे डॉक्टर मित्रांमुळे अनेकदा ऑपरेशनस, डिलिव्हरी पाहिल्या) मुद्दाम नाही पण एकदा, बाजाराच्या दिवशी शाळेतल्या वर्गात बॉल आणायला गेलो तेव्हा स्त्री-पुरुष संगही दिसला. कुत्र्यांचा संग सुरू असताना आम्ही पोरं क्रुरपणे दगड मारायचो; पण न कळत्या वयात स्त्री-पुरुषांना एकत्र पाहून विचित्र वाटलं होतं. स्त्रियांचं शोषण असं काही कळायचं नाही पण चुलीजवळच्या धुरात स्वयंपाक करणाऱ्या धुरकट बायका लक्ष वेधून घ्यायच्या. माणसाचा माणसाला विटाळ होतो हे पटायचं नाही. शिवू नको, लागू नको अशा सोवळ्याचा राग यायचा. मी कुण्याही मित्राच्या घरी बिनधास्त जेवायचो. कुणाच्याही शेतावर पेरणी पाहायला, खळ्यावर जागलीला जायचो. भंडाऱ्याचं जेवण तर आवडीचं. ‘गावाला सोडलेला कठाळ्या’ अशी उपाधी मला मिळालेली होती. धार्मिक कर्मकांड कधीच आवडलं नाही. आरत्या म्हणताना भक्तीपेक्षा म्हणण्याच्या चालीने अधिक भुरळ पाडली. देवी मंदिरात होणाऱ्या लग्नाच्या पंगतीत पाणी वाढण्याचं काम आम्ही काही मित्र न चुकता करीत असू. अशा अनेक गोष्टी तपशीलवार सांगता येतील. या वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख करणे गरजेचे होते; कारण यातूनच आपला पड घडलेला असतो.
बघितलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं प्रचंड साठत गेलं. कुतूहल तर वाढतच होतं. भोवतालातल्या अनेक गोष्टी खटकू लागल्या. वडिलांचे विद्वान मित्र-पेरू आणणारे काका खूप आवडायचे पण हे काका काकूला मारतात हे कळल्यावर माझ्यासाठी पेरूची चवच बदलली. मनात रुतून बसलेल्या खेडूत माणसांबद्दल आस्था निर्माण झाली. भोवतालाचा शोध घेताना स्वतःचा शोध लागू लागला. लहानपणी पुस्तकी वाचनाचा संबंध नव्हता तर भोवतालाचं जिवंत पुस्तक वाचत होतो. पुढे पुस्तकांशी दोस्ती झाली. मन:पूर्वक वाचू लागलो. अंबाजोगाईच्या साहित्य निकेतन ग्रंथालयात पुस्तकांचा खजिना सापडला. अधाश्यासारखा वाचू लागलो. वाचनामुळे आतले झरे जिवंत झाले. काहीतरी सांगावं वाटू लागलं. आपण सांगितलेलं ऐकणारा हक्काचा मित्र म्हणजे कोरा कागद! घरावरची पाण्याची टाकी भरली की उलथणारच. तसं मनात रूतलेलं, डोक्यात साचलेलं स्वस्थ बसू देईना. मग मी लिहायला लागलो.
जी गोष्ट केल्यावर आपल्याला आनंद मिळतो, समाधान मिळतं. ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी लिहिणं आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवतीही फिरत असते तसं आपण भोवताल खोदतो तेव्हा स्वतःलाही खोदत असतो. मानसशास्त्र सांगतं तसं बालपणीच आपला पड तयार झालेला असतो. त्यानुसार आपण कवी-लेखक होतो आणि लेखनाचा स्वभावही घडत जातो. कुसुमाग्रज समुद्राला ‘अमर्याद मित्रा’ म्हणतात; तर मर्ढेकरांच्या लेखी समुद्र म्हणजे ‘आतली घाण किनाऱ्यावर आणून टाकणारा भंगी’ असतो. पाडगावकरांना ‘या जन्मावर शतदा प्रेम करावे’ वाटते तर आरती प्रभूंना ‘इथे पृथ्वीतलावर येऊन कशासाठी तंबू ठोकायचा?’ असा गहन प्रश्न पडतो. पदवीसाठी असतो तसा जगण्यासाठीही एक अभ्यासक्रम आवश्यक असतो. मला जगताना लिहिण्याचा अभ्यासक्रम तुलनेने सोपा आणि आनंददायी वाटतो. जगण्याला काहीतरी अभ्यासक्रम (नाद) असणे अनिवार्य आहे. नाही तर जगणं ही कंटाळवाणी गोष्ट आहे. लिहिण्यामुळे माझी अस्वस्थता कमी होते. माणसं शोधता येतात. घटना धुंडाळता येतात आणि हो, आता लिहिण्याशिवाय मला दुसरं काही नीट करता येत नाही. माणसांबद्दलचं, भोवतालाबद्दलचं माझं कुतूहल अजून जागं आहे म्हणून मी लिहितो...
शतकांच्या खोदकामात
सापडलेली कविता
मी आजही घेऊ शकतो ओंजळीत
नितळ-निर्मळ पाण्यासारखी,
काळाच्या आवरणातली कवितेची गोगलगाय
उमटवत जाते चांदेरी वाट,
अंधारात लिहिणाऱ्या
कवीचा अंतर्यामी प्रकाश
काजवा होऊन फिरत राहतो
काळ्याकभिन्न आभाळात,
कवी खोदत जातो खोल खोल
तेव्हा त्याला सापडते चिमूटभर ओल.
.jpg)
Comments