मूर्तीची पूजा... जिवंताची नाही!
- 1 day ago
- 3 min read
भगवान ओशो एका शहरात मुक्कामी होते. त्या गावात एक तर्कशास्त्राचे सेनानिवृत्त प्राध्यापक राहत होते. तो माणूस विचित्र आहे, असे गावातील लोक मानत होते. अर्थात तर्कशास्त्राचा प्राध्यापक म्हटल्यावर वर्तनात विचित्रपणा येणार यात शंका नाही. तर्कशास्त्राचा प्राध्यापक आणि त्यात सेवानिवृत्त त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तर्काने विचार करणे त्याच्या स्वभावात होते. त्याउलट सामान्य माणसांचे असते. त्यामुळे लोकांचे जगणे आणि या प्राध्यापकांचे वर्तन यात बरेच अंतर होते. हा फरक मोठा होता त्यामुळे लोकांचे आणि प्राध्यापक यांचे विचार जुळण्याची शक्यता अजिबात नव्हती. लोक मात्र त्यांच्या प्रत्येक वर्तनाला विचित्र वागणं असंच म्हणायचे. त्यांच्याबद्दल ओशोना लोकांनी किती तरी गोष्ट सांगितल्या होत्या. त्यामुळे ओशोंना देखील त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. आपल्याला हा माणूस एक दिवस भेटेल असे वाटले होते.
एक दिवस झालेही तसेच. ओशा त्यांच्या घरासमोरून जात होते. प्राध्यापक महाशय एका टिनच्या डब्याने समोरच्या झाडांना पाणी घालत होते. ते बराच वेळ डबा झाडांवर धरून होते मात्र त्या डब्यातून एकही थेंब पाणी बाहेर पडत नव्हते. हा माणूस असा का करतो आहे? असा प्रश्न अनेकांना पडत होता. त्याप्रमाणे ओशोना देखील पडला. पाणी पडत नव्हते आणि हा माणूस बराच वेळ डबा धरून आहे, हे पाहिल्यावर ओशो त्यांना म्हणाले की, “अहो महाशय, डब्यातून एकही थेंब पाणी पडत नाही. तुम्ही जो डबा झाडांवर धरला आहे त्याला कोणत्याच प्रकारचे छिद्र नाही.” तेव्हा ते प्राध्यापक म्हणाले, “तुम्ही जे सांगता आहात ते मला अगोदरच माहीत आहे पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नाही की, मी ज्या फुलांच्या झाडांवर या डब्यातून पाण्याची धार धरली आहे ती फुले आणि फुलांची झाडे तरी खरी कोठे आहेत? मी ज्या झांडावर पाणी मारतो आहे, ती सारी झाडे आणि फुले ही प्लॅस्टिकची आहेत. मुळात जी फुले प्लॅस्टिकची आहेत, ती कोमेजण्याचा धोका नसतो. ती फुले कधीच सुकत नाहीत, वाळत नाहीत, खराब होत नाहीत. जेव्हा पाहावे तेव्ही ही फुले सारखीच असतात. त्यामुळे इतर फुलांसारखी सकाळी फुले उमलणार आणि सांयकाळी ती मावळणार असं काही घडण्याची शक्यता नाही.
आपल्याला नेहमीच अशीच खोटी फुले हवी असतात. त्यांच्यापासून काहीच लाभ नाही. त्यांचा सुंगध येत नाही. एका अर्थाने फायदा काहीच नाही. सारेच खोटे आपल्याला हवे असते. आपल्या जीवनात देखील तसेच हवे असते. जे जिवंत आहे ते सुकण्याचा धोका असतो. ते जिवंत राहावे म्हणून पाणी घालणे आले, खत देणे आले; मात्र जिवंत नसेल तर नाटक केले तरी चालते. आपले जीवनही तसेच आहे की, सकाळी फुलायचे आणि रात्री मावळायचे. मग आपल्याला आपल्यासारख्याच जिवंत असलेल्या माणसांची पूजा करणे आवडत नाही कारण त्याच्यात आणि आपल्यात काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला देखील पूजेसाठी दगडाची मूर्ती हवी असते. ती फुलांसारखी नेहमीच जिवंत असल्याचा भास असतो. ती कधीच कोमेजत नाही. तिला जन्म नाही, त्याप्रमाणे मृत्युदेखील नाही. ती मूर्ती खोटी असते आणि आपल्याला खोट्या मूर्तीची पूजा करणे आवडत असते. आपल्याला खऱ्यापेक्षा खोट्याची पूजा करणे जास्त पसंत असते. जिवंत असलेल्या माणसाला त्याच्यासारख्याच जिवंत असलेल्या माणसाची पूजा करायला आवडत नाही कारण त्यात आपल्या अंहकाराला ठेस लागण्याची शक्यता अधिक असते.
आपल्याला जिवंत माणसाकडून धोका होऊ शकतो. एखादा जिवंत साधू आपल्याला भेटला, आपल्याला त्याला जपावे लागते मात्र त्या गुरूची मूर्ती असेल तर आपल्याला कोणताच धोका नाही कारण त्या मूर्तीला आपण म्हणू तसे वागणे भाग पाडत असतो. आपण तिला हवे तेव्हा नैवद्य दाखवणार, आपल्याला हवे तेव्हा तिची पूजा करणार. आपण हवे तेव्हा आपणाला हव्या त्या गोष्टी देवाच्या नावाखील करत असतो. देवाला काय आवडते आणि काय आवडत नाही हे आपणच ठरवत असतो. देवाला देवघरात ठेवले की झाले पण आपल्याला हवे त्या पद्धतीने वागता येते. आपण अशा मूर्तीसमोर वाकून नमस्कार करू शकतो. त्या मूर्तीसमोर वाकताना आपल्या अहंकाराला कोणताही धक्का लागत नाही मात्र तेच आपल्याला एखाद्या जिवंत व्यक्तिपुढे वाकायचे असेल तर आपल्यासमोर अडचण निर्माण होण्याचा धोका आहे कारण ती जिवंत व्यक्ती आपल्या अहंकाराला ठेच लावू शकते. त्यामुळे आपल्याला अहंकार सोडून जायचे असे वाटत असले तरी आतून मात्र सोडावा वाटत नाही म्हणून आपण मूर्तीची पूजा करत असतो. केव्हा तरी जिवंत माणसांची पूजा करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यात काय एवढे, कारण ती व्यक्ती तर आपल्याचसारखी आहे असे वाटत असते. मूर्तीची पूजा करण्यात काहीच अडचण नसते. आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या अहंकाराला कोणताच धक्का न लावता जे करता येईल, त्या सर्व गोष्टी करण्यात आपल्याला अधिक रस असतो.
- संदीप वाकचौरे
8329328470
प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक २३ ते २९ मे २०२६
.jpg)

Comments