top of page

संत ज्ञानेश्वर - डॉ. राजेंद्र थोरात

24 hours ago
6 min read

आता विश्वात्मके देवें

येणे वागयज्ञे तोषावें

तोषोनि मज द्यावें

पसायदान हैं


सातशे वर्षापूर्वी ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वरांनी विश्वशांतीसाठी पसायदान मागितले. आपल्या 21 वर्षांच्या जीवनकाळात समाजाकडून छळ, अपमान सहन करूनही विश्वाच्या भल्यासाठी पसायदान मागणारा जगाच्या पाठीवरील एकमेव कवी म्हणजे संत ज्ञानेश्वर! विविध जातीधर्माच्या लोकांना चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठलनामाच्या गजरात व भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र आणून वैष्णवभक्त संत ज्ञानेश्वरांनी आपल्या विचारांतून व ग्रंथांमधून समाजात प्रबोधन घडवून आणले.


ज्ञानदेवे रचिला पाया असे संत बहिणाबाई म्हणतात. संस्कृतमधील गीता ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये आणून समाजास भक्तीची वाट मोकळी करून दिली. विविध साहित्य परंपरांचा त्याचप्रमाणे साहित्यातील तत्त्वज्ञानाचा पाया वैष्णव कवी ज्ञानेश्वरांनी घातला. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राला विषमतेविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य दिले. सातशे वर्षानंतर आजही घराघरातून माउलींच्या ज्ञानेश्वरीचे वाचन भाविक करत आहेत. आजच्या आधुनिक काळात सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी! लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत भाविक हरिपाठाचा आस्वाद घेत आहेत. कोणतेही निमंत्रण नसताना पंढरपूरच्या वाळवंटात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी व आळंदीत माउलींना डोळे भरून पाहण्यासाठी लाखो वारकरी येत आहेत. वारीमध्ये ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात भोळेभाबडे भाविक भान हरपून डोलत आहेत.


ज्ञानेश्वरांनी अज्ञानात, अंधारात, नवस-सायास आदी कर्मकांडात गुरफटलेल्या तसेच विविध जातीपातींत विभागलेल्या समाजास भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ‌‘संन्याशाचे पोर‌’ म्हणून समाजाने ज्ञानेश्वरांचा छळ केला. त्यांना वाळीत टाकले. ब्राह्मण म्हणून समाज त्यांना धर्मात घेत नव्हता, त्यावेळी संत ज्ञानेवरांनी जन्मसिद्ध वर्णव्यवस्येला गौण ठरवून अठरापगड जातीतील समाजास एकत्र आणून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हा त्यांनी  महाराष्ट्रात घडवून आणलेला चमत्कारच होता. संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी भक्ती साहित्याची चळवळ पुढे नेली.


संत नामदेवांपासून ज्ञानेश्वरांविषयी व ज्ञानेश्वरीविषयी लिहिले जात आहे. आपल्या देशातील तसेच परदेशातील संशोधकांनी ज्ञानेश्वरीवर संशोधन केले आहे व आजही करत आहेत. महाराष्ट्र शारदेच्या सुडौल तनूवरचा देखणा अलंकार असणाऱ्या ज्ञानेश्वरीवर मोठ्या प्रभाणात संशोधन झाले आहे. कैवल्याचा पुतळा असणाऱ्या ज्ञानेश्वरांवर व ज्ञानेश्वरीवर लिहावे असे लेखकाला वाटते. कुणी ज्ञानेश्वरांचे चरित्र आपल्या लेखणीतून मांडतात तर कुणी ज्ञानेश्वरी आपल्या प्रवचनामधून समाजापुढे विशद करतात.


विश्वकवी, संत, तत्त्वज्ञ, प्रबोधनकार अशा वेगवेगळ्या अंगांनी ज्ञानेश्वरांचे दर्शन आपणास ज्ञानेश्वरांवरील लेखनातून होते. विज्ञानयुगाच्या प्रगतीमुळे माणूस आज गतिमान झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये, यंत्रांमध्ये तो आपले सर्वस्व हरवून बसला आहे. अगतिक, हतबल झालेला माणूस अलांछित चंद्रम्याच्या शिकवणुकीने हातात टाळ घेऊन व मुखाने विठ्ठलनामाचा गजर करीत माउलींचे दर्शन घेण्यासाठी आळंदीला येत आहे. लाखो लोक देहभान हरपून पंढरीच्या वारीमध्ये सामील होत आहेत. हा आजच्या युगातील चमत्कारच मानला पाहिजे.


संत ज्ञानेश्वरांवर संत नामदेवांनी लिहिलेले आदि, समाधी, तीर्थावळीचे अभंग हे आद्य चरित्र मानले जाते. संत नामदेवांच्या अभंगाखेरीज संत चोखोबा, संत जनाबाई, संत विसोबा खेचर यांच्या अभंगातून ज्ञानेश्वर चरित्र आढळते. ज्ञानेश्वरांविषयीच्या भक्तीभावातून मोठ्या प्रमाणात चरित्रलेखन झाले आहे. महिपतीबुवा ताहाराबादकर, निरंजन माधव, ल. रा. पांगारकर, शं. वा. दांडेकर अशी चरित्रलेखकांची नावे आपणास सांगता येतील.



ज्ञानेश्वरांचा जीवनसंघर्ष


ज्ञानेश्वरांना 21 वर्षाच्या जीवनकाळात कर्मठ धार्मिकतेच्या छळाला, अपमानाला सामोरे जावे लागले. ज्ञानेश्वरांचे पिता विठ्ठलपंत यांना संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे आळंदीकरांनी वाळीत टाकले. त्यांचा छळ केला. निवृत्तीनाथांच्या उपनयन संस्कारांसाठी विठ्ठलपंत आळंदीच्या धर्मसभेपुढे उभे राहिले. धर्मसभेने दिलेली देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा पत्नीसह त्यांनी स्वीकारली. विठ्ठलपंतांप्रमाणेच चारी भावंडांचा छळ आळंदीकर करत होते. माता-पित्याचे छत्र नाहीसे झाल्यावर निवृत्तीनाथ व ज्ञानदेव माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले. बालपणीच चारी भावंडांना विठ्ठलपंतांनी वेदाचे, पुराणाचे, गीतेचे ज्ञान दिले. ज्ञानदेवांनी अल्पवयात ज्ञानेश्वरी लिहिली. या कार्यात त्यांच्या पित्याच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. चारी भावंडांना नाथ संप्रदायाचा उपदेश झाल्यावर समाजप्रबोधनाचे कार्य त्यांनी केले. ज्ञानेश्वरांनी काव्यरचना केली, अभंग, गायन, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून समाजात जागृती घडवून आणली. समाजातील जातीभेद, कर्मकांड दूर करण्यासाठी पददलित, पतित, स्त्री-शूद्रांच्या आत्मोन्नतीचा मार्ग ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करून व भागवत धर्माची स्थापना करून मोकळा केला. ज्ञानेश्वरांचे नवयुगप्रवर्तन या लेखात स. रा. गाडगीळ म्हणतात की, “ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची स्थापना करून महाराष्ट्राच्या जीवनात एका नव्या युगाला प्रारंभ केला. एवढेच नव्हे तर मध्ययुगीन भारतीय धर्मसाधनेला नवा मार्ग दाखविला. धर्मसाधना ही कोठे तरी समाजाबाहेर जाऊन आचरावयाची लोकविलक्षण साधना आहे हा अपसमज दूर करून लौकिक जीवनच धर्ममय बनविण्याची अतिशय उदात्त प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली. वर्णव्यवस्थेविरूद्ध बंड न करता ब्राह्मण धर्माची पोथीनिष्ठ चौकट त्यांनी खिळखिळी करून सोडली. ज्ञानेश्वरांनंतर जी संतमंडळी उदयाला आली त्यांची नुसती जातवारी विचारात घेतली तरी या घटनेचे महत्त्व ध्यानात यावयास हरकत नाही. स. रा. गाडगीळांच्या मतावरून असे म्हणता येईल की ज्ञानेश्वरांनी समाजाला भक्तीचा नवा मार्ग दाखविला. 13 व्या शतकात संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावता माळी एकत्र येतात, हा भारतीय संस्कृतीत एक चमत्कार आहे.



ज्ञानेश्वरांची काव्यरचना


संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ तसेच अभंगरचना, भारूडरचना, विरहिणी व गौळण हे काव्य प्रसिद्ध आहे. याशिवाय इतरही अनेक ग्रंथ ज्ञानेश्वरांचे म्हणून सांगितले जातात.


ज्ञानेश्वरांनी सामान्य जनतेमध्ये प्रबोधन घडवून आणण्यासाठी गीतेच्या सातशे श्लोकांवर 9000 ओव्यांचे रसाळ निरूपण केले आहे. महाराष्ट्रातील जनता अमृताची खाण असणाऱ्या ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेत आहे. मराठी साहित्यात ज्ञानेश्वरीइतका लोकप्रिय ग्रंथ अजून झालेला नाही. विनोबा भावे ज्ञानेश्वरीविषयी म्हणतात, “ज्ञानेश्वरांचा शब्द वाचल्याशिवाय महाराष्ट्राला गती नाही, अशी आज स्थिती आहे. मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी वजा केली तर मराठी साहित्य उणे ज्ञानेश्वरी बरोबर शून्य असेच लिहावे लागेल. बाकीचे सगळे जे काही आहे ते ज्ञानेश्वरीच्या बाहेर काहीच नाही.” विनोबा भावे यांनी मराठी साहित्यातील ज्ञानेश्वरीचे महत्त्व विशद केले आहे.


संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यु.म. पठाण ज्ञानेश्वरीविषयी म्हणतात की, “ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्र शारदेच्या सुडौल तनूवरचा देखणा अलंकार आहे नि म्हणावं तर हे मराठी मातीत, महाराष्ट्राच्या काळ्या कुळकुळीत पाषाणात कोरलेलं आध्यात्माचं कैलासलेणं आहे.” डॉ. यु.म. पठाण यांनी मराठी शारदेच्या प्रांगणातील ज्ञानेश्वरीचे महत्त्व सांगितले आहे.


पैठणमधील वास्तव्यात ज्ञानेश्वरांनी अध्यात्म ग्रंथांचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, गीता, भागवत, शांकरभाष्ये, योगवसिष्ठ इ. अध्यात्म ग्रंथांचे संस्कार ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयावर झालेले आहेत. ज्ञानेश्वरीचे श्रेष्ठत्व सांगताना रा. द. रानडे म्हणतात की, “ज्ञानेश्वरांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर आहे. तो एका दृष्टीने आचार्याच्या वेदान्तपर अर्थाच्या पलीकडचा, वरचा आहे. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील केवळ संतश्रेष्ठच होते असे नव्हे तर ते गीतेवरील एक श्रेष्ठ भाष्यकार होते. त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम झाला होता व हेच त्यांच्या भाष्याचे महनीय वैशिष्ट्यच होय. त्यांचे तत्त्वज्ञान निःसंशय उच्च दर्जाचे आहे पण त्यांची काव्यप्रतिभा त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तत्त्वज्ञानाचे मर्म जाणणारी त्यांची सखोल बुद्धी व काव्याची प्रतिभा यांना आत्मानुभूतीच्या वैभवाची जोड मिळाली असा अद्भुत त्रिवेणीसंगम झाल्यामुळे त्यांच्या गीतेवरील भाष्याला परमश्रेष्ठ स्थान मिळाले आहे.”


ज्ञानेश्वरीमध्ये विनयशील ज्ञानेश्वर गुरू निवृत्तीनाथ तसेच श्रोत्यांचा आदर करतात. विनम्र ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीविषयी सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात की, “ज्या यादवांच्या राज्यछत्राखाली हा ग्रंथ रचिला गेला ते राज्यछत्रही लयास गेले; परंतु या ग्रंथाचे छत्र महाराष्ट्रावर अक्षय्य आहे.”


ज्ञानेश्वरांनी गीताभाष्य करताना शेवटी विश्वशांतीसाठी पसायदान मागितले आहे. पसायदानाविषयी वि. वा. शिरवाडकर म्हणतात की, “ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे.”


‌‘अमृतानुभव‌’ हा ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र ग्रंथ आहे. मंगलाचरणात सुरूवातीचे पाच श्लोक संस्कृत आहेत. अमृतानुभवची दहा प्रकरणे असून ओवीसंख्या 806 आहे. अमृतानुभव हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ मानला जातो.


‌‘चांगदेव पासष्टी‌’मध्ये ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेश केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी अभंगरचनाही केली आहे. अभंगकर्ते ज्ञानदेव व ज्ञानेश्वरीकर्ते ज्ञानेश्वर असा दोन ज्ञानदेवांचा वाद भारद्वाज यांनी मांडला या वादास प्रतिउत्तरही इतर विद्वानांनी दिले आहे. ज्ञानेश्वरांचे अभंग आजही कीर्तनामध्ये म्हटले जातात. अभंगाची भाषा अलीकडची वाटते कारण अभंग हे मुखोद्गत परंपरेने आलेले आहेत. त्यामुळे अभंगातील शब्दांमध्ये बदल होत गेले.



ज्ञानदेवें रचिला पाया


संत बहिणाबाई वारकरी संप्रदायाचे महत्त्व विशद करताना ‌‘ज्ञानदेवें रचियेला पाया‌’ असे म्हणतात. ज्ञानदेवांपूर्वीपासून वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक पूर्वीपासून जात होते. नाथसंप्रदायी ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाकडे का वळले? असा प्रश्न निर्माण होतो. ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारीची परंपरा सुरू होती. ज्ञानेश्वरांनी समाजातील रूढी, परंपरा, कर्मठवाद, जातीभेद, दूर करण्यासाठी स्त्रीशुद्रांना भक्तीचा सोपा मार्ग दाखविण्यासाठी गीतेवर भाष्य करून ते सामान्यजनांपर्यंत पोहोचवले. हिंदू धर्माच्या परंपरेप्रमाणे भगवद्गीता हा भागवतधर्माचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधील गीता प्राकृतमध्ये आणली. योगसामर्थाने आत्मउद्धार करण्यापेक्षा भक्तीच्या सामर्थ्याने विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी नाथसंप्रदाय व वारकरी संप्रदाय एकत्र केले. पंढरपूरच्या वाळवंटात विठ्ठलनामाचा गजर करण्यासाठी वारकरी येत होते. त्यांच्या हाती ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी देऊन भागवत धर्माचा पाया रचला. डॉ. वि.रा. करंदीकर ज्ञानेश्वरांच्या कार्याविषयी म्हणतात की, “पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे ज्ञानेश्वरांच्या आधीच्या काळातच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनून गेलेले होते. तेथे वारीला जाण्याची प्रथाही आधीपासूनच होती. वारकऱ्यांच्या खांद्यावरील भगव्या पताका, त्यांच्या गळ्यातील तुळशीची माला, कपाळावरील गोपीचंदनाचा टिळा, चंद्रभागेतील स्नान हे ज्ञानदेवांनी या पंथाला दिले नाहीत. संप्रदायाचे काही एक रूप आधीच होते. मग ज्ञानदेवांनी या वारकरी पंथाला काय दिले? त्यांनी त्याला ज्ञानेश्वरीसारखा एक प्रमाण ग्रंथ दिला. या ग्रंथाच्या द्वारा त्या संप्रदायातील भक्तीचा धागा प्राचीन काळातील भगवद्गीतेशी जोडला आणि त्या गीतेच्या आधारे बहुजन समाजाला अगम्य राहिलेला प्रवाह मराठी भाषेत आणून सोडला. त्याद्वारा तो तमाम जनतेला खुला केला.” प्राकृतात गीतेचे भाष्य करून संत ज्ञानेश्वरांनी बहुजन समाजात प्रबोधन पडवून आणले, असे प्रतिपादन करंदीकर यांनी केले आहे.


ज्ञानेश्वरांनी अभंग, भारूड, गवळण, विरहिणी अशा विविध वाङ्मय प्रकारांचा पाया रचला. ज्ञानेश्वरांनी अभंग रचनेचा पाया रचला. वारकरी साहित्यात पहिली अभंगरचना ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानेश्वरांचे अभंग आजही वारकऱ्यांच्या मुखामध्ये तरळत आहेत. वारकरी आजही भक्तीभावाने आनंदाने हरिपाठाचे वाचन करत आहेत. वारकरी साहित्यात भारूड या वाङ्मय प्रकाराचाही पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आहे. रामचंद्र देखणे ज्ञानेश्वरांच्या भारूड रचनेविषयी म्हणतात की, “ज्ञानेश्वरांनी परमार्थासाठी या भारूडांचा उपयोग करून लोकवाङ्मयाच्या माध्यमातून तत्त्वज्ञानाला सुलभ केले आहे. ज्ञानदेवांची भारूड रचना ही संख्येने जरी कमी असली तरी वाङ्मय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ती अतिशय महत्त्वाची आणि पायाभूत अशी आहे. ज्ञानेश्वरांनी गौळण तसेच विरहिणी रचनेचा पाया देखील वारकरी साहित्यात घातला.”


ज्ञानेश्वर कवी होते, संत होते, विनयशील शिष्य होते, समतेचा पुरस्कार करणारे प्रबोधनकार होते; तसेच ज्ञानेश्वर तत्त्वज्ञही होते. आपल्या साहित्यातून ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाच्या तसेच वारकरी साहित्याच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा पाया घातला आहे. पंढरपूरच्या वाळवंटात सर्व जातीधर्माच्या संतांना, भक्तांना भागवत धर्माच्या झेंड्याखाली एकत्र जमवून सामाजिक प्रबोधनाचा, सामाजिक समतेचा पाया वैष्णव संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे.


संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदाय व वारकरी संप्रदाय एकत्र करून ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराष्ट्राला भागवत धर्माचे अधिष्ठान देऊन वारकरी संप्रदायाचा पाया रचला. वारकरी साहित्यातील अभंग, भारूड, विरहिणी, गौळण या वाङ्मय प्रकारांचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. तसेच विविध जातीधर्माच्या समाजास एकत्र करून सामाजिक प्रबोधनाचा पाया ज्ञानेश्वरांनी रचला आहे.



संदर्भ ग्रंथ


पांगारकर ल. रा - श्री ज्ञानेश्वर चरित्र आणि विवेचन, सुमंगल पब्लिकेशन, मुंबई

संत नामदेव - नामदेव गाथा, मुंबई

करंदीकर वि. रा. - सांस्कृतिक संचित, मॅजेस्टिक प्रकाशन

देखणे रामचंद्र - ज्ञानदेवे रचिला पाया, श्रीविद्या परिषद

इनामदार हे. वि. - श्री ज्ञानदेव विशेषांक

थोरात राजेंद्र - वारकरी संत दर्शन, संस्कृती प्रकाशन

थोरात राजेंद्र - वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी, संस्कृती प्रकाशन.

Recent Posts

See All
देह निरांजन झाला - माधव गिर

तापी दुथडी भरून वाहत नसली तरी दोन्ही किनाऱ्याच्या मधोमध एक मोठी धार वाहत झेपावत पुढे निघाली होती. आज तिच्या काठावर अभंगाचे सूर उमटले. टाळ-मृदुंगाचा नाद घुमला. हरिनामाचा गजर झाला. हिरव्या कंच वनराईत भ

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page