top of page

गुढीपाडव्याची महती

  • Mar 16
  • 3 min read

हिंदू संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्वाचे स्थान आहे. संक्रांत, होळी, दसरा, दिवाळी इत्यादी अनेक सण आपण मोठ्या प्रमाणात साजरे करतो. ‌‘दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा‌’ याप्रमाणे मोठा आनंद मिळतो. एक आगळेवेगळे समाधान, अनोखी स्फूर्ती, चेतना मिळते. काही नवीन संकल्प करून ते तडीस नेण्याची ऊर्जा मिळते. नवनिर्मितीची आस निर्माण होते. असाच एक अत्यंत प्रेरणादायी, उत्साहवर्धक, आनंददायी सण म्हणजे गुढीपाडवा! चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण घरोघरी साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर या सणाची महती वर्णन करताना लिहितात...


अधर्माचि अवधी तोडी।

दोषांची लिहलीं फाडीं।

सज्जनांकरवी गुढी।

सुखाची उभवी॥


विष्णूदास यांच्या अभंगातही गुढीपाडवा आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचे चौदा वर्षांच्या वनवासानंतर आगमन झाले याचा संदर्भ येतो. विष्णूदास लिहितात,


अजिंक्य जिंकोनी आले कौसल्या नंदन।

धन्य आजि दिन सोनियाचा॥

कनक चवऱ्या ढळताती रामा।

विष्णूदास नामा गुढीयेसी॥


चैतन्य पालवी | Chaitanya Palvi
₹350.00₹262.50
Buy Now

श्रीरामचंद्र ज्या दिवशी वनातून अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्येत सर्वत्र आनंदाचे झरे वाहत होते. अयोध्येच्या नागरिकांना पराकोटीचा आनंद झाला होता. गृहिणींनी सकाळी उठून सडासंमार्जन करुन आकर्षक, रेखीव, मनमोहक अशा रांगोळ्या काढल्या होत्या. घरेदारे फुलांच्या माळांनी सजविले होते. आबालवृद्धांनी नवीन कपडे परिधान केले होते. घरोघरी सुशोभित गुढ्या उभारल्या होत्या. पशुपक्षी, लतावेली हर्षोल्लोसित होऊन डोलत होत्या. नगारे, ढोलताशे, सनई यांचे सूर मंगलमय वातावरण निर्माण करीत होते. श्रीरामाची सीतामाई आणि लक्ष्मणासह उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक निघाली होती. वातावरणाने भारावलेल्या लक्ष्मणाचे लक्ष एका गुढीवर गेले. गुढीला अत्यंत साधे आणि जुने वस्त्र नेसवलेले पाहून लक्ष्मणाने श्रीरामाला विचारले, “प्रभो, सर्व घरांवर उभारलेल्या गुढ्या आणि या घरावरील गुढी यात फरक दिसत आहे. असे का ?”


“लक्ष्मणा, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चल. जाऊन पाहूया...” असे म्हणत प्रभू रथातून उतरले. ते त्या घरात गेले. श्रीराम अचानक आलेले पाहून यजमानाची तारांबळ उडाली. श्रीरामाचे यथोचित स्वागत झाल्यानंतर श्रीरामाने विचारले, “आपल्या घरावर साधी गुढी उभारली असे दिसले. का बरे असे? काही अडचण आहे का?”


“प्रभो, आपण येणार हे समजताच आमचाही आनंद गगनात मावत नव्हता! परंतु आमच्या घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती मृत झाली असल्याने घरात दुःखाचे वातावरण आहे. आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करीत होतो की, आपले दर्शन होईपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेऊ नये. ती व्यक्ती आपली परमभक्त होती. त्यांनी स्वतःचा अखेरचा क्षण ओळखला होता. त्यांनी आम्हाला सांगितले, माझ्या भाग्यात  श्रीरामाचे दर्शन होणे नाही. मी प्राण सोडल्यानंतर दुःख करीत बसू नका. प्रभू श्रीरामाचे स्वागत आनंदाने करा. आपल्या दारी गुढी उभारा आणि त्या गुढीला हे वस्त्र अर्पण करा. ज्यावेळी प्रभू वनवासात जात होते, तेव्हा त्यांची पाऊले जिथे-जिथे पडत होती, तिथली धूळ मी जमा करुन प्रभूचा आशीर्वाद म्हणून या वस्त्रात ठेवली होती...” ते ऐकताच श्रीराम त्या गुढीजवळ गेले. स्वतःच्या कंबरेला गुंडाळलेला शेला त्यांनी गुढीला अर्पण केला आणि तो जुना कपडा काढून स्वतःच्या कंबरेला बांधला. त्या घरात आनंदाचे वातावरण पसरले...


पवनपुत्र हनुमान | Pavanputra Hanuman
₹250.00₹187.50
Buy Now

आजही दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गृहिणी सकाळी लवकर उठून अंगणाची स्वच्छता करून सडा टाकतात. सुबक, मनमोहक रांगोळ्या काढतात. पुरुष मंडळी बाहेर जाऊन कडुनिंबाची मोहर आलेली फांदी, आंब्याची डहाळी आणतात. कडुनिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करतात. कडुनिंबाच्या पानासोबत ओवा, मीठ, हिंग, मिरे आणि साखर यांचे मिश्रण करुन खातात. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, पित्त नाश होतो, त्वचारोग बरा होतो. गुढीपाडव्याला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर आरोग्याचीही जोड आहे. सामाजिक एकतेचा संदेशही दिला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा, मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. या शोभायात्रांमध्ये श्रीमंत, गरीब यासोबत विविध जातीचे आणि धर्माचे लोक भाग घेतात.


चैत्र प्रतिपदेपासून नवीन संवत्सर, शालिवाहन शक सुरु होते. यामागेही एक कथा आहे... शालिवाहन यांचा जन्म कुंभार कुटुंबात झाला होता. एकदा एक प्रबळ शत्रू राज्यावर चाल करून आला त्यावेळी पराभव समोर दिसत असताना शालिवाहन राजाने सहा हजार मातीचे सैनिक तयार करुन त्यांच्या शरीरात प्राण फुंकले. त्या सैनिकांनी प्रबळ शत्रूचा पराभव केला. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा! या विजयामुळे शालिवाहन शक ही कालगणना सुरु झाली. शिव-पार्वतीच्या विवाहाचा दिवसही चैत्र शुद्ध प्रतिपदा! पार्वतीमाता लग्नानंतर महिनाभर माहेरी राहायला आली तोही चैत्र महिना! त्या प्रित्यर्थ चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्रा गौरीचे अनेक घरांमधून आगमन होते. महिला हळदीकुंकवाचे आयोजन करतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! या मुहूर्ताचे औचित्य साधून हिंदू समाज नवीन खरेदी, व्यवसाय, नवोपक्रमांचा, शुभ कार्यांचा प्रारंभ मोठ्या भक्तिभावाने करतात. याच दिवसांपासून शेतकरी वर्ग शेतीची कामे मोठ्या आशेने, जिद्दीने सुरु करतो.


गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात होते. नऊ दिवस महोत्सवाचे ठिकठिकाणी आयोजन होते. नवव्या दिवशी श्रीराम नवमीला अत्यंत उत्साहाच्या वातावरणात श्रीराम जन्माने या महोत्सवाची सांगता होते. पुराणातील माहितीनुसार ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा!


रामायणाप्रमाणे महाभारतातही या दिनाला विशेष महत्त्व आहे. महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर नावाचा राजा होता. त्याला इंद्र राजाने कळकाची काठी दिली होती. या काठीचे महत्त्व लक्षात घेऊन राजाने ती काठी इंद्र राजाच्या आदरापोटी जमिनीत रोवली. दुसऱ्या दिवशी नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिची षोडशोपचारे पूजा केली. नंतरच्या राजांनी ही प्रथा पाळली. गुढीपाडवा हा सण स्नेहाचा, मांगल्याचा, उत्साहाचा आणि विजयाचे प्रतीक मानला जातो.


संत चोखामेळा म्हणतात,

टाळी वाजवावी गुढी उभारावी,

वाट ती चालावी पंढरीची।

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर लिहितात,

एकें संन्यासी तोचि योगी।

ऐसी एकवाक्यतेची जगीं।

गुढी उभविली अनेगीं। शास्त्रांतरी॥


संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगात असलेले वर्णन...


पुढे पाठविले गोविंदे गोपाळा। चपळा हाती गुढी॥


प्राचीन काळापासून चालत आलेल्या सणाचे महत्त्व सर्वांना माहीत आहेच. चला तर मग, या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपणही गुढी उभारुन सामाजिक एकतेचा, निरामय आरोग्याचा संकल्प करुया!


- नागेश सू. शेवाळकर, 9423139071  

प्रसिद्धी : साप्ताहिक चपराक १६ते२२ मार्च २०२६

अक्षरयात्रा | Aksharyatra
₹400.00₹300.00
Buy Now

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

नमस्कार.

माझा लेख प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद!

आपले मसाप निवडणुकीच्या संदर्भातील संपादकीय भाष्य चिंतनशील असून चिंता उत्पन्न करणारे आहे.

Like
bottom of page