top of page

मृत्युंजयकार शिवाजी सावंत

1 hour ago
7 min read


मराठी सारस्वताला पडलेलं एक दिव्य स्वप्न म्हणजे 'मृत्युंजयकार' शिवाजी सावंत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत शिवाजी सावंत यांचा जन्म हा केवळ दैवयोगच म्हणावा लागेल. आजऱ्याच्या लालसर मातीमध्ये एक हिरवा कोंभ अंकुरीत झाला, रुजला आणि वाढला.


हिरण्यकेशी आणि चित्रा या नद्यांच्या संगमावर वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या निसर्गसंपन्न अशा खेडेगावात मध्यमवर्गीय कुटुंबात ३१ ऑगस्ट १९४० रोजी शिवाजी सावंत यांचा जन्म झाला. आईच्या संस्कारातून इतिहासविषयक आणि पुराणविषयक वाचन घडले आणि लेखनाचे बीज शिवाजीरावांच्या मनात रुजत गेले. आजऱ्याच्या व्यंकटराव प्रशालेतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे शाळेतल्या विविध स्पर्धांमध्ये ते सहभागी होत असत आणि प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत असत.


पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूर गाठले. नोकरी करत शिकावे म्हणून त्यांनी शॉर्टहँड आणि टायपिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि कोल्हापुरात जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी मिळवली; पण मूळचा पिंडच वाचनाचा, लेखनाचा असल्याने आणि विद्यार्थ्यांशी नाते जोडले जावे, लेखक व्हावे म्हणून कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत ते शिक्षक म्हणून रुजू झाले. १९६४ ते १९७४ या कालखंडात ते राजाराम प्रशालेत कार्यरत होते. दरम्यानच्या काळात एफ.वाय.बी.ए.ची पुणे विद्यापीठाची परीक्षा त्यांनी दिली.


अस्सल कोल्हापुरी बाणा, काही वेळा अनावश्यक असलेला स्पष्टवक्तेपणा, दिलदार आणि खानदानी वागणं, अन्यायाविरुद्ध थेट भिडण्याची तयारी, करारी चेहरा, एखाद्यावर विश्वास टाकला की त्याच्याशी अभंग टिकणारे मैत्र... वडिलांसारखा असा स्वभाव मी शिवाजीकाकांमध्ये अनुभवला, अशा शब्दांत डॉ. सागर देशपांडे यांनी आपल्या लाडक्या साहित्यिकाबद्दल काढलेले उद्गार आपुलकीच दर्शवतात.


एक शिक्षक म्हणून मुलांसमोर जरी ते अल्पकाळच राहिले असले तरी एक लेखक म्हणून वाचकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवण्यातली लेखनाची उर्मी त्यांच्यात लपलेल्या शिक्षकानेच जागी केली, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. केदारनाथ मिश्र यांच्या 'कर्ण' या खंडकाव्याने ते प्रभावित झाले. इयत्ता नववीमध्ये असतानाही शि. म. परांजपे लिखित 'अंगराज कर्ण' या एकांकिकेत शिवाजीरावांनी श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली होती. कर्ण या खंडकाव्याचा आणि अंगराज कर्ण या एकांकिकेचा; एकूणच कर्ण या व्यक्तिरेखेचा शिवाजीराव सावंत यांच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यातूनच 'मृत्युंजय' या अजरामर कादंबरीचा जन्म झाला.


'मृत्युंजय' या कादंबरीसाठी शिवाजीराव सावंतांनी मनापासून चिंतन केले. यासाठी करवीर नगर वाचन मंदिर आणि गोखले कॉलेजच्या लायब्ररीत तासनतास बसून त्यांनी कर्ण या व्यक्तिरेखेचा चिंतनात्मक अभ्यास केला. त्यांच्या वाचनात, मनात आणि चिंतनात फक्त आणि फक्त कर्णच होता.


१९६३ ला शिवाजीरावांनी 'मृत्युंजय' लेखनास प्रारंभ केला. लेखक असले तरी प्रत्येक घटनेचे पृथक्करण केल्याशिवाय ते लिहित नसत. शब्दांच्या फुलोऱ्यात आणि कल्पनेच्या विश्वात न रमता कादंबरी अधिक वास्तववादी व्हावी म्हणून त्यांनी कुरुक्षेत्राचाही प्रवास करण्याचे ठरवले; पण नोकरी करताना कुरुक्षेत्रात जाण्यासाठी इतक्या दिवसांची रजा कशी मिळेल? हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. यावर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर पाथरकर यांनी उपाय काढला. त्यांनी शिवाजीरावांना अक्षरशः आजारी पाडले आणि दोन महिन्यांची रजा मंजूर केली. अशा प्रकारे कुरुक्षेत्रावर जाऊन शिवाजी सावंत यांनी 'मृत्युंजय'साठी सर्व संदर्भ तपासले. जाणकारांच्या मुलाखती घेतल्या आणि जवळजवळ पंधराशे पानांचे हस्तलिखित तीन महिन्यात लिहून पूर्ण केले. यावेळी शिवाजीरावांचे वय होते फक्त २६ वर्षांचे! ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही, हे शिवाजीरावांच्या या कामगिरीकडे बघून लक्षात येते.


शिवाजीराव सावंत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मृणालिनी सावंत यांच्या विवाहाचाही प्रसंग मजेदार आहे. 'मृत्युंजय' लेखनानंतर मृत्युंजयच्या कौतुकाची अनेक जणांनी दखल घेतली. अनेकांची कौतुकपर पत्रे शिवाजी सावंत यांना आली. त्यापैकीच एक पत्र होतं कुंदा कामतेकर यांचं! एका पत्रात कुंदा कामतेकर यांनी, "तुमच्या लेटरहेडवरील मानचिन्हावरून आम्हाला जाणवलं की आपण तेजाचे पूजक आहात," अशी तरल भावना लिहून पाठवली. पत्राला उत्तर आणि उत्तरादाखल पत्र या पत्रोत्तरातूनच एकमेकांना न भेटता हा प्रेमाचा पत्रव्यवहार सुरू झाला आणि याचंच प्रत्यंतर म्हणून ९ जून १९६९ रोजी एका भव्य समारंभात काही निवडक लोकांसमवेत शिवाजीराव सावंत विवाहबद्ध झाले आणि कुंदा कामतेकर बनल्या सौ. मृणालिनी शिवाजी सावंत.


‘मृत्युंजय’ कादंबरीचा विषय कर्णाचे जीवन, त्याचा संघर्ष, पराक्रम, मैत्री, दानशूरपणा, स्वाभिमान आणि नियतीशी झालेला संघर्ष हा आहे. मृत्युंजय कादंबरीत कर्णाच्या जीवनातील विविध टप्प्यांचा आणि त्याच्या मनातील द्वंद्वांचा सखोल वेध घेतला आहे. जन्मतःच मिळालेल्या परिस्थितीमुळे कर्णाला ओळख, मान-सन्मान आणि सामाजिक स्थानासाठी संघर्ष करावा लागला. तरीही त्याने आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण केले.


कर्णाची दुर्योधनाशी असलेली मैत्री, कुंतीशी असलेले नाते, अर्जुनाशी असलेली स्पर्धा, कवच-कुंडलांचा त्याग आणि दानशूरपणा यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आहे. कर्तव्य, मैत्री, स्वाभिमान, निष्ठा आणि नियती यांच्यातील संघर्षातून कर्णाचे व्यक्तिमत्त्व उलगडते. ‘मृत्युंजय’ ही कर्णाच्या संघर्षमय जीवनाची, त्याच्या शौर्याची, दानशूरतेची, मैत्रीनिष्ठेची आणि नियतीशी केलेल्या संघर्षाची सखोल कहाणी आहे. एका कादंबरीकाराच्या कादंबरीला लाभलेली प्रचंड लोकप्रियता ही 'मृत्युंजय'ची उंचीच दाखवते. म्हणूनच नोबेलसारख्या पुरस्कारासाठी 'मृत्युंजय'ला नामांकन लाभले, यातच तिचे श्रेष्ठत्व आहे.


मृत्युंजयानंतर 'छावा' या संभाजी महाराजांवरील लोकप्रिय कादंबरीच्या लेखनाकडे ते वळले. ‘छावा’ ही शिवाजी सावंत यांची प्रसिद्ध ऐतिहासिक मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र, त्यांचा पराक्रम आणि स्वराज्यासाठी त्यांचे बलिदान आपल्यासमोर सादर केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्यपूर्ण संघर्ष, स्वराज्याचे रक्षण आणि औरंगजेबाशी झालेला संघर्ष 'छावा'मध्ये उलगडला आहे. संभाजी महाराजांचे धैर्य, पराक्रम, स्वाभिमान, बुद्धिमत्ता आणि स्वराज्यनिष्ठा प्रभावीपणे चित्रित केली आहे. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजी महाराजांनी समर्थपणे सांभाळली. मुघल, पोर्तुगीज, सिद्दी आणि इतर शत्रूंशी त्यांनी केलेल्या संघर्षाचे चित्रण कादंबरीत आढळते.


संभाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, राजकीय अडचणी, दरबारातील विरोध आणि स्वकीयांकडून झालेला विश्वासघात यांचाही वेध घेतला आहे. अखेरीस त्यांनी स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी मृत्यू पत्करला; पण शत्रूपुढे शरणागती स्वीकारली नाही. ‘छावा’ ही संभाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्यनिष्ठा, त्याग आणि स्वाभिमानाचे प्रभावी चित्रण करणारी ऐतिहासिक कादंबरी आहे. 'छावा' कादंबरीच्या शेवटच्या प्रसंगाची आठवण मिलिंद जोशी यांनी सांगितली आहे. स्वतः शिवाजी सावंत यांच्या तोंडून त्यांच्याच खास शैलीतले ते शब्द, तो संवाद वाचताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात.


अशोक गगराणी यांनीही 'छावा'बद्दलची एक आठवण सांगितली आहे. एक धनगर संभाजी महाराजांना खवल्या मांजर आणून देतो. महाराज म्हणतात, ‘याचा मला काय उपयोग?’ तो धनगर सांगतो, ‘महाराज, हे साधं नाही. यांच्या खवल्याची अंगठी बोटात घालायची. म्हणजे तुमच्यावर कुणी काही केलं म्हणजे त्या खवल्याचा रंग बदलेल.’ पुढे महाराजांवरील विषप्रयोगाच्या वेळी त्या अंगठीतल्या खवल्यांचा रंग बदलल्याचं राजांच्या लक्षात आलं. हा प्रसंग शिवाजी सावंत यांनी बेभान होऊन सांगितला होता. शिवाजी सावंत यांच्या लेखनातल्या नावीन्याची ती एक झलक म्हणावी लागेल.


‘युगंधर’ ही शिवाजी सावंत यांची आणखी एक प्रसिद्ध मराठी कादंबरी असून भगवान श्रीकृष्णाच्या महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय त्यांनी करून दिला आहे. महाभारतातील श्रीकृष्णाचे जीवन, त्यांचे राजकारण, युद्धनीती, मैत्री, कर्तव्य आणि मानवी नातेसंबंध यावर आधारित ही कादंबरी शिवाजी सावंत यांच्या आध्यात्मिक ज्ञानाची बौद्धिक उंची दाखवते. ‘युगंधर’मध्ये श्रीकृष्णाला केवळ देव म्हणून न दाखवता एक असामान्य, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान मानव म्हणून उलगडले आहे. त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग, महाभारतातील भूमिका, पांडवांशी असलेले संबंध, कर्णाशी असलेला संवाद, द्रौपदीशी असलेले नाते आणि धर्म-अधर्म याबाबतचे श्रीकृष्णाचे विचार सारासार तर्कबुद्धीने मांडले आहेत. जीवनात परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेणे, धर्माचे रक्षण करणे, कर्तव्य पार पाडणे आणि समाजहितासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणे हा सखोल संदेश हाच या कादंबरीचा गाभा आहे. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातून बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, नेतृत्व, त्याग, प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा यांचे दर्शन घडते.


सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संघर्षावर आधारित त्यांची आणखी एक कादंबरी म्हणजे 'लढत' होय. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्रातील एक अपूर्व असे व्यक्तिमत्त्व होते. ते प्रयोगशील आणि दूरदर्शी शेतकरी होते. सहकारी तत्त्वावर साखर कारखाना त्यांनी सुरू केला. त्याबाबतीतली नवी दिशा त्यांनी दाखवली. पद्मश्री विखे पाटील यांचेही संपूर्ण आयुष्य कष्टप्रद आणि संघर्षवतच गेले. जीवनभर ते लढतच राहिले; म्हणूनच त्यांच्यावर आधारित कादंबरीला 'लढत' हे समर्पक शीर्षक शिवाजीरावांनी दिले असावे.


जिथे काही संघर्ष आहे, नाट्य आहे आणि उपेक्षा आहे, अशा व्यक्तिमत्त्वांद्दल शिवाजीरावांना कुतूहल होतं, असं याही कादंबरीबाबत म्हणता येईल. 'अशी मने असे नमुने' या व्यक्तिचित्रत्मक कथासंग्रहात शिवाजी सावंत यांनी आजरेकरांना अमर केलं आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीत आजरा आणि आजऱ्याकडची घाटोळी माणसं यांना त्यांनी विशेष स्थान दिलं आहे. या माणसांच्या अबोध आणि कोऱ्या मनाची पाटी त्यांनी वाचकांसमोर उघडी केली. "जेव्हा आपण कोणीच नसतो, तभीच आपण खरे असतो," असं शिवाजीराव सावंत यांनी 'अशी मने असे नमुने' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे आणि ते सार्थ असावं. या व्यक्तिचित्रात आजऱ्यातल्या सर्वसामान्य माणसांना त्यांनी मोलाचे स्थान दिले आहे. अठराविश्वे दारिद्र्य असणाऱ्या पण कोकणातल्या फणसांप्रमाणे वरून काटेरी आणि आतून गोड असणाऱ्या आजरेकरांना शिवाजीराव सावंत यांनी लेखणीतून साकारलं आहे. या व्यक्तिचित्रणातील माणसं अतिशय साधी-सरळ, त्यांच्या खास लकबी, दोषांसह लेखकांनी चितारली आहेत. कांता, गणपा, तुकारामबापू, खुदबू, तोतरा दत्तू, मामू, शंकरा, खडकावरची म्हातारी या सगळ्या आजरेकरांना शिवाजी सावंत यांनी आपल्या लेखणीतून अमर करून टाकलं आहे.


'अशी मने असे नमुने', 'मोरावळा' या व्यक्तिचित्रांबरोबरच 'कांचनकण', 'क्रांतीसिंहाची गावरान बोली', 'लाल माती रंगीत मने', 'शेलका साज', 'युगंधर : एक चिंतन', 'भाई मनोहर कोतवाल' यांच्या जीवनावर आधारित 'संघर्ष' ही चरितकहानी असे कितीतरी लेखसंग्रह, कथासंग्रह, चरित्रलेखन त्यांनी केले. त्यांच्या लेखनात एक सहजता आहे. भाषा सोज्वळ, मोरपिसासारखी मुलायम वाटते. वाचताना कुठेही दुर्बोधता जाणवत नाही. 'मृत्युंजय', 'युगंधर' सारख्या पौराणिक कादंबऱ्या सुद्धा सहज आणि आपलेपणा देणाऱ्या अशाच वाटतात.


कराड येथे होणाऱ्या ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका लागल्या. खरं तर साहित्य क्षेत्रात निवडणुकीसारखी मतभेदाची बाजू असू नये; पण आजकाल साहित्यातही राजकारण शिरले आहे. ७६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिवाजीराव सावंत व्हावेत, अशी अनेकांची इच्छा होती. यासाठी स्वतः शिवाजी सावंत यांनी सुद्धा अर्ज दाखल केला. हे अध्यक्षपद शिवाजीरावांनाच मिळावे, यासाठी त्यांच्या हितचिंतकांनी, स्नेह्यांनी, रसिक वाचकांनीही कंबर कसली. समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवाजीरावांच्या पाठिंबा पत्रकावर उत्स्फूर्तपणे सह्या सुद्धा केल्या होत्या. ६ सप्टेंबर २००२ ला पुण्यात पहिली पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर शिवाजीरावांसह सर्वजणच निवडणुकीसाठी कामाला लागले. १७ सप्टेंबरला गोव्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला. गोव्यात रमाकांत खलप यांच्या घरी चार-पाच तास चर्चा, वाटाघाटी झाल्यानंतर आजऱ्यातील ॲलेक्स फर्नांडिस यांच्या घरी शिवाजीराव सावंत मुक्कामासाठी उतरले; पण रात्रीच अचानक श्वसनाचा त्रास व्हायला लागला आणि त्यातच शिवाजीराव सावंत यांची प्राणज्योत मालवली.


१८ सप्टेंबरचा तो काळाकुट्ट दिवस साहित्यविश्वाला हादरा देऊन गेला. त्यांच्या पत्नी मृणालिनी सावंत यांना शिवाजी सावंत यांच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला. एक पती म्हणून, एक लेखक म्हणून शिवाजीरावांच्या सगळ्या गोष्टी मृणालिनीताईंनी अक्षरशः खपवून घेतल्या. स्वभाव लहरी होता; त्यामुळे मनात येईल ती गोष्ट ते करत. त्यांच्या बऱ्याच तऱ्हा मृणालिनीताईंनी सांभाळल्या. त्या म्हणतात की, जरी आज ते आपल्याजवळ नसले तरी त्यांचा अविनाशी आत्मा इथेच आहे, आमच्या सोबत!


सौ. कादंबिनी धारप म्हणजे शिवाजी सावंत यांच्या कन्या. 'मृत्युंजय' या त्यांच्या कादंबरीला नोबेल नामांकन जाहीर झालं होतं. आपल्या बाबांच्या आठवणी सांगताना त्या एके ठिकाणी म्हणतात की, "विविध क्षेत्रातल्या लोकांनी मृत्युंजयनं आम्हाला कसं जीवनदान दिलंय, जगण्याची प्रेरणा दिलीय, हे सांगणारी पत्रे म्हणजे बाबांनी मिळवलेली नोबेल प्रायझेसच आहेत."


आजऱ्यासारख्या गावात जन्मलेल्या आणि करवीरच्या प्रेममयी सावलीत वाढलेल्या शिवाजीरावांनी माणसे आणि सन्मानही भरपूर मिळवला. अनेकांचा स्नेह आत्मीयतेने सांभाळला. नव्या लेखकांनाही त्यांनी पाठीवरती हात फिरवून उत्तेजना दिली. शिवाजीरावांच्या शब्दांचे सामर्थ्य असे होते की, केवळ लेखकालाच नव्हे तर वाचकालाही आत्मशोधाच्या जाणिवा आतून आकारत असत. पहाडावरून कोसळणारा जलस्रोत जसा रांगडा, अवखळ आणि दूरगामी असतो, तसाच शिवाजीरावांचा प्रवास आहे.


प्रसिद्ध साहित्यिक भा. द. खेर यांनी एकदा शिवाजी सावंत यांना विचारलं की, ‘कर्ण हा विषय कादंबरीसाठी तुम्हाला का घ्यावासा वाटला?’ शिवाजीराव म्हणाले की, ‘कर्णाकडे उत्तम गुण होते.’ भा. द. खेर म्हणाले, ‘म्हणजे कर्ण सद्गुणी होता का?’ यावर शिवाजीरावांनी मार्मिक उत्तर दिलं, ‘परमेश्वर सोडला तर या जगात कोणतीही व्यक्ती संपूर्ण सद्गुनी असू शकत नाही. मी कर्णाचे गुण तेवढे घेतले. त्याचे औदार्य, त्याचे मित्रप्रेम, त्याची निष्ठा, त्याचे शौर्य असे अनेक गुण असताना त्याच्यावर झालेला अन्याय मला सतत टाचत असे. केवळ त्याच्या जन्मरहस्यामुळे त्याला सारे दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. या गोष्टींची मला प्रकर्षाने जाणीव झाली आणि म्हणूनच कर्णाची महत्ता लोकांसमोर यायला पाहिजे, यासाठी माझं मन तळमळून उठे आणि यातूनच 'मृत्युंजया'ची निर्मिती झाली.’


खरोखरच प्रचंड व्यथेतून आणि आंतरिक तळमळीतून एखादी कलाकृती जेव्हा आकार घेते, तेव्हा लेखकानं आपलं सर्वस्व तिथं पणाला लावलेलं असतं आणि मग अशी कलाकृती जनमानसात रुजते, प्रस्थापित होती. एक शिक्षक आपल्या एका आयुष्यात इतकी देदीप्यमान कामगिरी करू शकतो, लेखणीने 'मृत्युंजयकार' ठरू शकतो, ही खरं तर अशक्यप्राय वाटणारी गोष्ट! पण शिवाजी सावंत यांनी ती सार्थ करून दाखवली.


त्यांच्या अमोघ, चिरस्मरणीय लेखनकार्यास मनापासून प्रणाम. त्यांचे साहित्य प्रत्येक मनामनात अजरामर राहणारच आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!


— व्ही. जी. सुतार

(पूर्वप्रसिद्धी — मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर २०२६)


संदर्भ:


१) आठवणीतले शिवाजी — प्रा. मिलिंद जोशी

२) चर्चा आणि चौकार — डॉ. सागर देशपांडे

३) गुगल

४) समीर देशपांडे — संपादक, दै. लोकमत

५) अमित गुरव

६) आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी



साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०२६
₹400.00
Buy Now

Recent Posts

See All
किमयागार

‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारव

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page