top of page

पुस्तकापलीकडचे गुरुजी

19 minutes ago
6 min read

जो आपल्याला शाळेत अध्यापन करतो तो आपला अध्यापक अर्थात शिक्षक. साधारण हीच धारणा प्रत्येकाची असते! पण या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कधीही आपण ज्यांच्या वर्गात बसलेलो नसतो किंवा ज्यांनी आपला हात धरून आपल्याला कुठलेही अक्षर गिरवायला दिलेले नसते, असेही काही अध्यापक आपल्याला मार्ग दाखवीत असतात. त्या गुरूंचे आपल्या आयुष्यातले महत्त्व किंचितदेखील कमी नसते. कवी, लेखक, चित्रकार गुरु ठाकूर यांचा एक लेख मी ‘लोकसत्ता’ दैनिकात एकदा वाचला होता. ते पिंपळाच्या झाडाला आपला गुरु मानतात! त्यांनी पिंपळाच्या झाडाकडून चिवटपणे जगण्याची प्रेरणा घेतली; कारण एखाद्या भिंतीवर आपोआप उगवलेले पिंपळाचे झाड तुम्ही कितीही काढून टाका, ते पुन्हा पुन्हा उगवतं! ते झाड आपल्याला सांगतं, “बघ माझ्याकडे. किती घाव सोसलेत मी. किती तिरस्कार सहन केला मी. तरीही पुन्हा मी पालवी धारण केली...” आणि हेच आपण शिकायचं असतं. म्हणून कदाचित गुरु ठाकूर त्या झाडाला आपला गुरु मानत असावेत.



शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंगजी तर ‘ग्रंथ हेच गुरु’ मानतात. देहधारी गुरुपेक्षा ‘गुरु ग्रंथ साहेब’ हेच त्यांचे मार्गदर्शक आणि तेच त्यांचे गुरु. काहीही असो; पण अशा या धारणा आणि श्रद्धा आयुष्याला पलीकडे घेऊन जातात. सन्मार्ग दाखविण्याचे, आयुष्याला दिशा देण्याचे आणि वेळोवेळी आपल्याला सावरण्याचे कार्य समाजातील अशाच गुरूंनी केलेलं असतं, आपल्याला वाट दाखवलेली असते. आयुष्याच्या प्रारंभापासून मलादेखील अशा अनेक गुरूंचे आशीर्वाद लाभले; पण गुरु असे लाभले की, ज्यांनी प्रत्यक्ष मला अध्यापन केलं नव्हतं; पण ते माझ्या आयुष्याला वाट दाखविणारे वाटाडे आणि सन्मार्ग दाखविणारे मार्गदर्शक ठरले... म्हणूनच माझ्या आयुष्यात त्यांचे स्थान ध्रुव ताऱ्यासारखे अढळ आहे, ते म्हणजे कुरुंदकर गुरुजी.

प्राचार्य नरहर कुरुंदकर हे साहित्यिक, समीक्षक आणि खर्डा वक्ता असलेले प्रचंड मोठे व्यक्तिमत्त्व, अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. आजही ज्यांच्या विचारांची आणि त्यांच्या साहित्यकृतीची पारायणं महाराष्ट्रात होतात, ही खरंच अद्भुत गोष्ट म्हणावी लागेल. सांप्रत काळात कुरुंदकर गुरुजी हयात असते, तर काय झाले असते? त्यांचे विचार कोवळीक खुडून टाकणाऱ्या आणि बीन-चेहऱ्याच्या या काळाला मान्य झाले असते का? असे वाटणे स्वाभाविक आहे; पण गुरुजींचे विचार कुठल्याही काळाला ओलांडून पुढे जाणारे आणि स्पष्ट होते. ‘प्राचार्य पदावर विराजमान असलेल्या एका शिक्षकाला विद्यार्थी गुरुजी का म्हणायचे?’ असा सवाल मनात येतोच! मात्र, अनेक वर्षे एका माध्यमिक शाळेमध्ये कुरुंदकर शिक्षक होते. त्या पेशातील तानाबाने, गुरुजी होऊन केलेले अध्यापन त्यांनी कालप्रवाहात सोडून दिले नाही. उलट त्यांना त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सर’ असे न संबोधता आपल्याला ‘गुरुजी’ म्हणावं, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे समाजात ते ‘कुरुंदकर गुरुजी’ याच नावाने ओळखले जाऊ लागले आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गुरुजी म्हणूनच रुजले.


गुरुजींनी केलेली काही भाषणं युट्यूबवर उपलब्ध आहेत; विशेषतः आणीबाणीतील भाषणं ऐकता येतात, हे भाग्यच! पण गुरुजींची ग्रंथसंपदा पुस्तकात रूपात उपलब्ध असणं, ते विचार आपल्याला वाचता येणं, हे आपले परमभाग्य आहे, असे मला वाटते. ‘धार आणि काठ’, ‘जागर’, ‘आकलन’, ‘रूपवेध’, ‘रंगशाळा’ आणि ‘वाटा तुझ्या माझ्या’ अशी समृद्ध ग्रंथसंपदा वाचकासाठी गुरुजी सोडून गेले. ‘देता किती दो कराने...’ असे म्हणण्याची कुवत मराठी वाचकाकडे नाही; उलट ‘दुबळी माझी झोळी’ असेच मी म्हणेन! एखादा माणूस इतका अफाट बुद्धिमत्ता धारण करणारा असू शकतो? हा प्रश्न मला सतत पडतो; कारण समाजकारण, राजकारण, व्याकरण, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, संगीत किंवा सौंदर्यशास्त्र असू दे, असा कुठलाही विषय गुरुजींना वर्ज्य नव्हता. अलीकडेच एका प्रदर्शनात माझी नजर एका पुस्तकावर गेली. ‘रंगशाळा — कै. नरहर कुरुंदकर’ असे मुखपृष्ठावर लिहिले होते. देशमुख आणि कंपनी यांनी छापलेलं, रु. ४००/- किमतीचे ते पुस्तक, ज्यावर एक रुपयासुद्धा सूट नव्हती! तरीही ते पटकन उचलले; कारण ते अनमोल असे विचारधन होते. घरी येऊन उघडून थोडे चाळले आणि थक्क झाले!! भरतमुनी यांच्या ‘नाट्यशास्त्र’वर आधारित हे तीनशे सेहेचाळीस पानांचे अत्यंत सुंदर, आशयसंपन्न पुस्तक गुरुजींच्या निधनानंतर प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे नाशिकच्या नाट्यसंमेलनावेळी केलेली कुरुंदकरांची तीन भाषणं होती! नाट्य? आणि कधी केला असेल हा अभ्यास? पण कुरुंदकर गुरुजींना कस्तुरे गुरुजी एका ठिकाणी साहित्यसम्राट, चतुष्पथगामी, विशाल बुद्धिचा पुरुष असे संबोधित करतात. ते गुरुजींना असे का म्हणाले असतील? याचे उत्तर कदाचित त्यांच्या या ग्रंथसंपदेत सापडते. ‘वाटा तुझ्या माझ्या’ हे पुस्तक म्हणजे त्यांची प्रदीर्घ मुलाखत. कै. नरहर कुरुंदकर गुरुजींचे चौफेर आकलन होण्यासाठी मला या पुस्तकाची खूप मदत झाली; पण ‘कुरुंदकर गुरुजी’ यांना मी ग्रंथाच्या पलीकडेही ओळखत होते.


सन १९७८ ऑगस्ट महिन्यात मी नांदेडला आले. धो-धो पाऊस पडत होता. प्रत्यक्ष ओळख नव्हती; पण गुरुजींची पत्रं मला येत होती. अर्थात आमच्यात पत्रसंवाद होत असे, तेवढंच! दार ठोठावलं... त्यांच्या पत्नी म्हणजेच प्रभावती मावशींनी दार उघडलं. भारतीय बैठकीत गुरुजी लोडाला टेकून बसले होते. “आलीस, ये, ये!” आश्वस्त करणारा, आपुलकीचा वेगळा चिरका आवाज... “हिला जेवायला वाढा...”


मावशींनी दोन पानं वाढली. आंब्याचा रस, पोळी, भात, वरण, एक कोरडी भाजी आणि पापड. गुरुजींच्या पंगतीचा लाभ आणि अतिशय सुग्रास भोजन. आजही माझ्या जिभेवर चव रेंगाळते आहे. जेवताना ते अक्षरही बोलले नाहीत. मी तर भारावलेली, घाबरलेली आणि संकोचाने अधिकच शांत होते. सगळं कसं यंत्रवत! “चल, बाहेर जाऊया. बॅग असू दे इथेच.”

गुरुजींच्या पावलासोबत मागे-पुढे मी चालत होते. ते चालताना एके ठिकाणी थांबले. सहज! आणि काही मिनिटांतच पानठेलेवाल्याने एक पान त्यांना खायला दिले आणि काही पाने बांधून हातात ठेवली. बहुतेक ती बाकीची पानं दिवसभर खाण्यासाठी होती. चालताना किती लोक भेटले असतील, याचा हिशोब करणं कठीण! एकीकडे माझी विचारपूस सुरू होती. चालत-चालत आम्ही पीपल्स महाविद्यालय गाठलं.


“तू निवांत बस... मी माझं कर्तव्य बजावून येतोच,” असे सांगून ते तास घ्यायला गेले. दोन तासांनी पुन्हा आले. खांद्याला शबनम अडकवून तडक निघाले. “चला.”

कुठे, ते मलाही माहीत नव्हते. सायकल रिक्षात बसून आम्ही ‘गोदावरी टाईम्स’च्या कार्यालयात संपादिका सूर्यकांता पाटील हिला भेटायला आलो होतो. ती कार्यालयात नव्हती. गुरुजी वाट पाहत थांबले. काही वेळाने म्हणाले, “थोडं महाविद्यालयाचे सरकारदरबारी काम आहे. ते लवकर झाले तर येतोच... किंवा मी फोनवर सूर्यकांताशी बोलतो. ती काय म्हणते, त्याप्रमाणे आपण पुढे काय करायचे ते ठरवू.”

गुरुजी निघून गेले. सूर्यकांता तासाभराने आली. गुरुजींना तिने माझ्यासमोरच फोन केला. “गुरुजी, काही काळजी करू नका. तुमचा शब्द हा माझ्यासाठी शिरसावंद्य आहे...”

आणि त्या दिवशीपासून माझं आयुष्य बदललं! कोण असतात ही माणसं? जी आपल्या पदाचा, हुद्याचा, जातीचा, मातीचा विचार न करता जगावेगळं काम करतात? प्राचार्य, थोर साहित्यिक, संपादक, पत्रकार की माणूस? आणि त्या दिवशी ‘दैनिक गोदावरी टाईम्स’ या वृत्तपत्रात मी रुजू झाले!


केवळ एक पत्र आलेलं... “जयश्री खारकर, सूर्यकांता पाटील द्वया लातूरच्या युवक संमेलनात भेटल्या. तू आली असती तर भेट झाली असती. तुझ्याविषयी सविस्तर बोलणं झालं. तुझी अडचण जयश्रींनी लक्षात आणून दिली. तुला नोकरी देण्याविषयी मी सूर्यकांताकडे आग्रह धरला आहे आणि तिने ते मान्यही केले आहे. तू लवकर नांदेडला ये.”

बस्स! आता पन्नास वर्षे होतील या घटनेला. संपादकीय विभागात नोकरी सुरू झाली होती. पुढे काही महिन्यांनी सूर्यकांताताईमुळे मला निमसरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी पण मिळाली! दर शनिवारी मी आणि गुरुजी ख्यालीखुशाली समजावी म्हणून हमखास भेटत असू. काही दिवसांत माझी ती नोकरी अनपेक्षित गेली. माझी फाइल सिंचन अधिकारी बासरकर यांच्याकडे अडकली होती. त्यांची भेट घेऊन अडचण काय आहे, हे समजून घेण्यासाठी मी आणि गुरुजी त्यांना भेटायचे म्हणून एकदा त्यांच्या कार्यालयात पोहोचलो. प्रत्यक्ष कुरुंदकर आले म्हणून ते उठून उभे राहिले. त्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. गुरुजी कळकळीने मला पुन्हा नोकरी देणे कसे गरजेचे आणि नियमानुसार योग्य आहे, हा युक्तिवाद माझ्यावतीने करीत होते; पण समोरून फक्त नकारात्मक प्रतिसाद मिळत राहिला. ते अधिकारी म्हणाले, “कसे आहे ना, या एका मुलीचे काम केले, तर इतरांचे पण मला करावे लागेल. नाहीतर मला ‘ब्राह्मणाला मदत करतो,’ असे ऐकून घ्यावे लागेल.”

गुरुजी म्हणाले, “ही मुलगी नियमानुसार पात्र आहे की नाही?” ते म्हणाले, “हो!” आणि काय झालं कोणास ठाऊक, गुरुजी उठून उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही शेळीचे शेपूट आहात. ना वारायला कामाचे, ना झाकायला कामाचे...” अन् तडक बाहेर पडले.


पुलो डिअर आणि इतर कथा | Pulo Dear Ani Itar Katha
₹200.00
Buy Now


मी आवाक होऊन फक्त पाहत राहिले. ‘शेळीचे शेपूट’ ही काय भानगड असते, या विचारात मी असताना त्यांनी मला त्याचा अर्थ सांगितला. “ना ते शेळीचे लाजरक्षण करू शकते, ना ते मासे अंगावर बसल्यास त्यांना हाकलू शकते. इतकं ते खुजं असतं.” आणि ते प्रसन्न हसले. म्हणाले, “जाऊ दे, तुला नोकरी तर देणारच; नाही देऊ शकलो, तर माझी नोकरी तुला देईन. बस्स! खूश!!”

एकदा मी त्यांना भेटायला कॉलेजमध्ये गेले. प्रतीक्षालय गच्च भरलेलं होतं. त्यांनी मला पाहिलं आणि जवळ येत म्हणाले, “तू केव्हा आली? बरं, बस तू... मी लोकांना भेटतो आणि मग तुला बोलावतो.”

शेवटी मला बोलावलं. “हं, कशी आहे? नोकरी काय म्हणते? पगार होतो ना?” त्यांनी विचारलं. खूप थंडी होती... आणि पाऊसही अवेळी आला होता. म्हणाले, “चल, आज तुझा मूड छान करतो.”

त्या दिवशी त्यांना कुठलं तरी मानधन मिळालं होतं. भरपावसात त्यांनी मला ‘जनता कोल्ड्रिंक्स’मध्ये नेलं आणि आईस्क्रीम खाऊ घातलं. थंडी, पाऊस आणि वरून मँगो आईस्क्रीम! किती विलक्षण होते ना गुरुजी... माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांसाठी ते झगडायचे. कितीतरी मुलांना ते परीक्षाशुल्क देत असत. त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेवर किती लोक प्रेम करायचे, हे सांगता येणार नाही.

माझ्या हृदयात नरहर कुरुंदकर म्हणजे ‘गुरुपरमात्मा परेशु’ हाच भाव आहे. “काय वाचलं एवढ्यात?” हा प्रश्न त्यांनी विचारला की, समजायचे, पुस्तकाचे रसग्रहण केल्याशिवाय आपली सुटका नाही. पुस्तकं, नाटक, सिनेमा लेखन याविषयी ते जेव्हा चर्चा करायचे, तेव्हा वाटे, ‘गंगेने प्रवाह बदलला की काय...’ मनाचे कान करून मी फक्त ऐकायची. कुणाशी प्रतिवाद करण्याचा स्वभाव मुळातच नसलेली मी एक वीसेक वर्षांची भितरी मुलगी होते. एकदा गुरुजींनी मला पत्र पाठवलं. मला म्हणाले, “तू भीत राहिली, तर लोक तुला घाबरवत राहतील. अशी कशी गं तू घाबरट? नाव आशा आणि सूर लावते निराशेचा!”

आणि त्यांनी पुढे बाबा आमटे यांची कविता लिहून पाठवली — “शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाईन...” हा आशावाद पेरणारे गुरुजी मला त्यांच्या पुस्तकापेक्षाही अधिक श्रेष्ठ वाटतात.

— आशा पैठणे

पूर्व प्रसिद्धी - मासिक साहित्य चपराक सप्टेंबर २०२६


Dile Ghetale
₹400.00
Buy Now

Recent Posts

See All
किमयागार

‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारव

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page