top of page

निरोगी मन अन्‌‍ सुदृढ शरीर हेच जीवनध्येय

  • Mar 8
  • 5 min read

Updated: Mar 17


हवेली पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले संतोष कुंभार हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. पौड, वेल्हा, हवेली असे तीन पोलीस ठाणे त्यांच्या कार्यालयाअंतर्गत येतात. समाज मनाने आणि शरीराने निरोगी असावा, असा त्यांचा कायम आग्रह असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला सिद्ध करतानाच त्यांनी आरोग्य राखले आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करतानाच त्यांच्या आंतर्बाह्य बदलास हातभार लावणाऱ्या कुंभार यांच्याशी प्रमोद येवले यांनी साधलेला हा संवाद.


पुरंदर किल्ल्याच्या तळाशी असलेलं काळदरी हे छोटंसं गाव. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील या गावात जेमतेत शंभर-दीडशे उंबरे असतील. तरीही या गावाला बारा वाड्या. इथलं पंढरीनाथ कुंभार आणि सुभद्राबाई कुंभार हे दाम्पत्य मुंबईत कामासाठी स्थिरावलं. गिरणी कामगारांचा संप सुरू झाला आणि सगळं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कुंभार कुटुंबियांना परत काळदरीला यावं लागलं. त्यांनी परंपरागत कुंभारकाम सुरू केलं. रोजगार हमीवर कामं केली. टेलरिंगचा व्यवसाय केला. इतकंच काय गोबरगॅस दुरूस्तीची कामंही केली. या सगळ्या वातावरणात दारिद्यावर मात करायची इच्छा मनी बाळगणाऱ्या त्यांच्या चिरंजीवाच्या मनात स्वतःला सिद्घ करण्याची ठिगणी पेटली. परिणामी त्यांनी अपार परिश्रम घेतले आणि आज पोलीस दलात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. ही संघर्षकथा आहे संतोष कुंभार यांची. प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी स्वतःचं विश्व तर घडवलं आहेच पण अनेकांच्या आयुष्यातही आशेचे, आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे नंदादीप पेरले आहेत.


संतोष कुंभार दहा-बारा वर्षाचे असताना कधीतरी एसटी बसने पुण्याला यायचे. त्यावेळी इथले टुमदार बंगले पाहून त्यांना वाटायचं, आपलंही असं  घर असावं. इथल्या रस्त्यावर बेफाम धावणाऱ्या आलिशान गाड्या पाहून त्यांना वाटायचं, आपल्याकडेही अशी गाडी असावी! बालपणी बघितलेली ही स्वप्नं पूर्ण करायची तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, हे त्यांना उमगलं होतं. वडील गायी चारायला न्यायचे. त्यावेळी त्या गायीच्या पाठिवर एखादी काठी आडवी धरून ते गोळ्या झाडल्याचा अभिनय करायचे. आपण पोलीस झालो तर गुन्हेगारांचा कर्तनकाळ होऊ, ही भावना त्यामागे असायची. सैन्यात गेलो तर देशाची सेवा करता येईल, हा विचार असायचा. वयाच्या बाराव्या वर्षी बघितलेलं हे स्वप्न एकवीशी ओलांडल्या ओलांडल्या पूर्ण झालं. राज्य राखीव दल ग्रुप 1 रामटेकडी, पुणे यांच्याकडून त्यांना बोलावणं आलं.


त्यापूर्वी गावात ते वडिलांना टेलर कामात मदत करायचे. कपडे शिवण्यात त्यांचा हातखंडा होता. ‌‘संतोष टेलर‌’ अशी ओळख गावभर निर्माण झाल्यानं लग्नाचं स्थळ चालून आलं. दरम्यान छोट्या बहिणीचंही लग्न झालं. संतोष यांना आध्यात्माची आवड असल्यानं ते कायम देवाच्या आळंदीला जायचे. घरच्यांना वाटलं, पोरगं संन्याशी व्हायला नको! त्यामुळं त्यांनी लग्नाचं मनावर घेतलं आणि ते लग्नाच्या बेडीत अडकले.

या सगळ्या धामधुमीतही त्यांचा व्यायाम नियमित सुरू होता. थेट मांढरपर्यंत म्हणजे तेरा किलोमिटर पळत जायचं आणि तितकंच अंतर पुन्हा पळत यायचं असा त्यांचा क्रम सुरू झाला. पत्नी सौ. शीतल यांचा नर्सिंगचा कोर्स सुरू होता. त्या आपल्या पतीदेवाचा अभ्यास घ्यायच्या. नित्यनेमानं व्यायाम, रोज प्यायला गायीचं नीरसं दूध, अभ्यास असं सुरू असतानाच पोलीस दलात नेमणूक झाली. राज्य राखीव दलात त्यांनी पंधरा वर्षे सेवा केली. कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरी असेल, कुठे उसळलेली दंगल असेल, पूर आलेला असेल अशा कोणत्याही संकटप्रसंगी त्यांना कर्तव्यावर जावं लागायचं. गडचिरोलीसारख्या भागात सलग सहा-सहा महिने काम करतानाचे त्यांचे अनुभव विलक्षण आहेत. राज्य राखीव दलाचे सूत्रच असते, ‌‘कमी तिथे आम्ही!‌’ जी जबाबदारी स्वीकारली होती, त्यातून जिवंत परत येऊ की नाही याचीही कसलीच शाश्वती नसायची! पण ‌‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय‌’ हे पोलीस खात्याचं ब्रिद त्यांच्या अंगात मुरलं होतं.


पंधरा वर्षे असे काम केल्यानंतर सरकारच्या धोरणानुसार राज्य राखीव दलातून त्यांची जिल्हा पोलीस दलात अंतर्गत बदली झाली आणि ते ‌‘माणसा‌’त आले. आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद केली पाहिजे. त्यांच्या घरात गावाकडील आर्थिक दुर्बल घटकातील किमान दहा-बारा तरूण कायम मुक्कामी असायचे. आपणही पोलीस दलात भरती व्हावं, ही स्पप्नं उराशी घेऊन आलेल्या या तरूणांना कुंभार दाम्पत्यानं मायेनं स्वीकारलं. त्यांची घरीच निवासाची, भोजनाची व्यवस्था केली. संतोष कुंभार स्वतः त्यांचा अभ्यास घ्यायचे. कठोर शब्दात त्यांना वेळोवेळी समज द्यायचे. त्यांचं पालकत्व स्वीकारताना त्यांनी या तरूणांना प्रेरणा देण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीची, कर्तव्याची जाणीव करून दिली. कुणाकडूनही एक रूपया न घेता कठोर सराव घेतला. म्हणूनच त्यांच्या घरी राहून शिकलेले अनेक जण आज पोलीस खात्यात अधिकारी, कर्मचारी झाले आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन जायचा त्यांचा हा गुण त्यामुळेच महत्त्वाचा ठरतो.

संतोष कुंभार म्हणतात, “राज्य राखीव दलात असताना सामान्य माणसाशी कसलाच संपर्क नव्हता. नक्षलवादी, दहशतवादी असं आव्हान असायचं. दंगली नियंत्रित कराव्या लागायच्या. ग्रामीण पोलीस दलात मात्र वेगळंच चित्र होतं. पौड पोलीस ठाण्यात बदली झाली आणि गुन्हेगारांचा मुळशी  पॅटर्न कळला. दर आठ-पंधरा दिवसाला कुणाचा तरी खून व्हायचा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं धडाडतं हृदय बघावं लागायचं.” आध्यात्माची पार्श्वभूमी असल्यानं मन आणि वृत्ती शांत होती. इथल्या गुन्हेगारीचं स्वरूप पाहता त्यांना ठरवून कठोर व्हावं लागलं. गुन्हेगारावर वचक बसवायचा तर शांत राहून चालणार नाही, हे त्यांना उमगलं. सामाजिक भान ठेवून आजवर तब्बल बत्तीस वेळा रक्तदान करणारे संतोष कुंभार म्हणतात, “एखाद्यावर वार झालेले आहेत, तो रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, पूर्ण प्रयत्न करूनही आपण त्याला वाचवू शकत नाही, आपल्या डोळ्यासमोर हा मरणार हे पाहणं खूप वेदनादायी असतं. टोळीयुद्धात अशी माणसं मारली जाणं, एकमेकांच्या जिवावर उठणं हे नक्षलवादापेक्षा कमी नाही. अनेक जण सांगतात, आम्ही आमच्या कामात इतके गुंतलोय की, मरायलाही वेळ नाही. अरे, मरायला वेळ नसेल तुमच्याकडे पण मरणाला वेळ नाही हे लक्षात घ्या. मृत्यू कधी सांगून येत नाही. त्यामुळे या सुंदर आयुष्याचा काही तरी सकारात्मक कामे करण्यासाठी उपयोग करा.”


आपल्यासमोर काही चुकीचं घडणं, राजकीय दबाव अनुभवावा लागणं,  जेवणाच्या वेळा निश्चित नसणं, पुरेशी झोप न मिळणं यामुळं तब्येत बोलायला लागली. थोडी ढेरी सुटली. आळस अंगात भिनायला लागला. पायऱ्या चढतानाही दम लागायला लागला. मग त्यांनी ठरवलं की, पोलीस असा लेचापेचा असू नये. आधी आपण आपली तब्येत पूर्ववत करायला हवी. मग पिरंगुट येथील सामाजिक कार्यकर्ते महादेवअण्णा गोळे यांनी क्रॉस फिट ही जिम सूचवली. तिथं गेल्यावर त्यांचा व्यायामाचा अहंकार गळून पडला. आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे, हे जाणवलं. मग त्यांनी तसं नियोजन सुरू केलं. जिम ट्रेनर अभिजित चौधरी यांनी त्यांचा व्यायाम घ्यायला सुरूवात केली. “आपण लग्न केलं, संसार केला, परमेश्वरानं दोन गोंडस मुलं आपल्या पदरात घातली, मनासारखं घरही उभं केलं पण आरोग्य हातून निसटतंय, याची जाणीव झाली आणि आपण खाडकन जागेवर आलो” असं ते सांगतात. मग त्यांना जणू व्यायामाचं व्यसनच जडलं. त्यांनी आहाराचं नियोजन केलं. काहीही झालं तरी रोजचा व्यायाम चुकवायचा नाही, असा दृढ संकल्प केला. अत्यंत परिश्रमपूर्वक झपाट्यानं वजन कमी केलं. म्हणूनच आज हा पन्नाशीकडे वाटचाल करणारा गडी एखाद्या कॉलेजकुमारापेक्षाही रूबाबदार आणि देखणा दिसतो. त्यांचे सहकारी, अधिकारी, कर्मचारी, मित्र अशा सगळ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत व्यायामाची सुरूवात केली आहे. ‌‘आरोग्य कसं असावं? तर संतोष कुंभार यांच्यासारखं!‌’ असं अभिमानानं सांगितलं जातं. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नकुल यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली सुरू केली आहे. ते गायनातही संगीत विशारद आहेत. धाकटा मुलगाही उत्कृष्ट तबला वाजवतो. तो आता बीबीए करत आहे.

रोजचा व्यायाम, आध्यात्मिक साधना आणि गोड पदार्थांची आहारातून केलेली कायमची सुट्टी यामुळे माझं जीवन पूर्णपणे बदललं, असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं जे तेज झळकतं! ते त्यांच्या यशस्वी कर्तबगारीवर शिक्कामोर्तब करतं. शेंगदाण्यात तेल आहे पण ते दाबून निघत नाही. त्यासाठी त्याला घाण्यातच घालावं लागतं. त्याप्रमाणंच शरीराचंही आहे. उत्तम आरोग्य हवं असेल तर नियमित व्यायाम आणि आहाराची पथ्यं पाळणं, सर्व प्रकारच्या व्यसनांपासून कोसो मैल दूर राहणं गरजेचं आहे. व्यायाम हा खूप जगण्यासाठी नाही, तर आनंदाने जगण्यासाठी करायचा असतो, असा संदेश ते प्रत्येकाला देतात.


मी गव्हाची पोळी बंद केली. माझ्या आवडीचा इंद्रायणी भातही सोडला. रोज उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य घालून नमस्कार केल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरूवात होत नाही. जो जगाला प्रकाश देतो त्याला आपण उठल्या उठल्या नमस्कार तरी करायलाच हवा. ‌‘द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का रे झाला? संगतीमुळे!‌’ असे म्हणतात. त्यानुसार चांगली संगत हीही आरोग्यावर, मनावर परिणाम करते. ड्रायफ्रूट, फळे, मध यातून मिळेल तितकीच साखर मी खातो. परमेश्वरानं दिलेलं शरीर सांभाळणं हेच आपलं पहिलं कर्तव्य असायला हवं. आज मला व्यायामाचं व्यसन लागलंय आणि ते कधीच सुटू शकत नाही.


- प्रमोद येवले, 9970048048

प्रसिद्धी : साप्ताहिक 'चपराक' ९ते १५ मार्च २०२६

Recent Posts

See All
स्वास्थ्यासाठी पाणी!

‘नन्नाचा पाढा लावू नको, निगेटिव्ह बोलू नको, वास्तूपुरुष ‘तथास्तु’ म्हणत असतो’ अशी भीती लहानपणी आई घालायची तेव्हा हसू यायचं! कारण जमिनीत पुरलेली वास्तूपुरुषाची ती एवढीशी प्रतिमा आपलं काय वाकडं करू शकणा

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page