top of page

पडे झडे माल वाढे

  • 7 days ago
  • 3 min read

शाळेत स्वच्छता मोहीम सुरू होती. मुलांच्या हातात झाडू, टोपल्या, गोण्या, डब्बे होते. कोणी वर्गासमोरील परिसर झाडत होते, कोणी कचरा गोळा करून एका ठिकाणी जमा करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा उत्साह होता. शाळा म्हणजे आपलीच जागा, आपलं घर ही भावना त्यांच्या कृतीतून दिसत होती.


मी प्रत्येक गटाजवळ जाऊन सूचना देत होतो. तेवढ्यात माझं लक्ष दोन बहिणीकडे गेलं. दुसरीतली प्रिया आणि पहिलीतली जयश्री. जयश्री थोडी बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. पायाला छोटासा दगड लागला होता. किरकोळ खरचटलं होतं; पण तिच्यासाठी ती वेदना मोठी होती. ती हुंदके देत होती. प्रिया तिच्या जवळ बसून तिला समजावत होती. हे लक्षात आलं. जयश्रीचा हुंदका दाटत होता. ती आपल्या अश्रूंना मोकळ्या वाटा करून देत होती. पायाला गोंजारत होती.

“आवं काही नही होस. इतलं तितलं लागी जास. रडो नही आसं,” प्रिया तिला समजावत होती.


जयश्री रडतच म्हणाली, “तुले लागाले पाहिजे होतं, मंगन तुले समजतं.”


या वाक्यात निरागस वेदना होती. दुखणं स्वतःला झालं की त्याची जाणीव होते, हे ती सहजपणे सांगत होती. प्रिया थोडी मोठी, थोडी समजूतदार. ती पुन्हा म्हणाली, “आवं बाई, काम करताना समायीसनच काम करनं पडस. लागनं तं ध्यान नही दे वा. माय सांगस ना आपले. मंगंन”


इतक्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं पण ती दचकली नाही. उलट आत्मविश्वासाने म्हणाली, “हा ना ओ सर, पडी झडी माल वाढे ना..!”


क्षणभर मी थबकलो. सहा-सात वर्षांच्या मुलीच्या तोंडून उमटलेलं हे वाक्य किती गहिरं होतं! ‌‘पडे झडे माल वाढे‌’ म्हणजे पडल्याशिवाय, झडल्याशिवाय वाढ होत नाही. शेतीत पिकं वाऱ्याने झडतात पानं गळतात; पण त्यातूनच नवं पीक उगवतं. तसंच आयुष्यातही जखमा, अपयश, अडचणी या वाढीच्या पायऱ्या असतात. मी तिला होकार दिला होता.


प्रियाने जयश्रीला फक्त शांत केलं नाही; तिने तिला जीवनाचा धडा दिला. छोट्या जखमेवर रडत बसू नये, काम थांबवू नये. ध्येय मोठं असावं. वेदना क्षणभंगुर असतात. तिच्या शब्दांत कणखरपणा नव्हता तर जिद्दीची गोड शिकवण होती. ती आलेली अडचण समजून घेऊन त्यावर उपाय करत होती.


याच प्रसंगातून अनेक जीवनकौशल्येही विकसित होताना दिसतात. सर्वप्रथम संवेदनशीलता आणि सहानुभूती. प्रिया आपल्या लहान बहिणीला धीर देते, तिच्या वेदनेला कमी लेखत नाही; उलट तिला समजावते. दुसरे म्हणजे संवादकौशल्य. दोघींच्या बोलीतील सहज संवादातून विचार मांडण्याची क्षमता, भावना व्यक्त करण्याची ताकद आणि परिस्थिती समजावून सांगण्याची कला विकसित होते.


तिसरे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे समस्या सोडविण्याची वृत्ती आणि भावनानियंत्रण. छोट्या जखमेवर रडत बसण्याऐवजी काम सुरू ठेवावे, हा दृष्टिकोन मुलांमध्ये जिद्द निर्माण करतो. ‌‘लागलं तरी चालेल; काम थांबवायचं नाही‌’ ही भावना संकटांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद वाढवते.


स्वच्छता उपक्रमातून जबाबदारीची जाणीव, सहकार्यभाव आणि श्रमाची प्रतिष्ठा या मूल्यांचीही रुजवात होते. शाळेचा परिसर आपलाच आहे, ही भावना सामाजिक बांधिलकी वाढवते. अशा छोट्या अनुभवांतून मुलं फक्त धडा शिकत नाहीत तर आयुष्य जगण्याची तयारी करतात.


त्या दिवशी स्वच्छतेत कचरा कमी झाला असेल; पण माझ्या मनात विचारांची भर पडली. शाळा मला मनापासून आवडते कारण अशा क्षणात शिक्षक म्हणून मीही शिकत असतो. मुलांच्या छोट्या संवादातून जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान उलगडतं. ‌‘पडे झडे माल वाढे‌’ हे वाक्य त्या दिवशी माझ्या मनात कोरलं गेलं.


शाळा केवळ अक्षरओळख करून देत नाही; ती जीवनाची ओळख करून देते. वर्गात शिकवले जाणारे धडे महत्त्वाचेच पण अंगणात, झाडाखाली, उपक्रमांतून आणि मुलांच्या सहज बोलण्यातून जे शिकायला मिळते, ते पुस्तकात सापडत नाही. या अशा साध्या प्रसंगाने मला जीवनाचा मोठा धडा शिकवला. घरातील समजदारीचा हा संवाद शाळेत प्रकटला होता हे विशेष होतं.


त्या छोट्याशा जखमेपेक्षा मोठा होता तो शिकण्याचा क्षण. जयश्रीचे अश्रू थांबले आणि ती पुन्हा कामात सामील झाली तेव्हा मला जाणवलं शाळा मुलांना केवळ उभं राहायला शिकवत नाही; ती पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची ताकद देते. असे हळवे क्षण आयुष्यात अनेकवेळा येतात. अशा क्षणांतूनच आत्मविश्वासाची छोटी पालवी फुटत असते, हे तितकेच खरे आहे. त्यातूनच मूल आपल्याला शिकवून जात असते.


भरत विठ्ठल पाटील

ता. मालेगाव, जि. नाशिक

9665911657


Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page