top of page

शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  • Mar 5
  • 3 min read

शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. कधी नकळत घडणारे प्रसंग मनाला स्पर्शून जातात आणि शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अधिक जाणवून देतात.


आस्ते कदम..


आस्ते कदम...


यश पाठांतर केलेली शिवगर्जना म्हणत होता नि योगायोगाने शाळेच्या मागील बाजूने त्याची आजी घरी जात होती. आपला नातवाचा आवाज ऐकून आजीची पावले आवाजाच्या दिशेने पडली. आजी नातवाचे बोल ऐकत होती. तो छत्रपतींना मानवंदना देत होता. कॅमेरा चालू असल्यानं मला काही बोलता येईना; पण आजीच्या चेहऱ्यावर नातवाच्या प्रत्येक शब्दागणिक आपल्या राजाविषयीचं प्रेम खुलत होतं. ती आपल्या देहबोलीतून व्यक्त होत होती हे जाणवत होतं.


छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो स्वराज्याचा ध्यास घेतलेला, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला, रयतेचा खरा राजा. जनमानसात महाराजांची प्रतिमा केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची नाही; ती आत्मसन्मानाची, धैर्याची आणि स्वाभिमानाची आहे. घराघरात त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, अंगाईगीतात त्यांची शौर्यकथा झिरपत राहते आणि प्रत्येक पिढीच्या मनात ‌‘आपले राजे‌’ अशी जिव्हाळ्याची भावना रुजते. कदाचित म्हणूनच आजीच्या डोळ्यात त्या क्षणी नव्या उर्मीची चमक होती.


नातू जेव्हा शेवटाला येतो तेव्हा आजीचे दोन्ही हात आपसूक वर जातात नि... “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” हा जयघोष आजींनी अक्षरशः काळजातून काढला होता. दोन्ही हात वर जाऊन तिच्याकडूनही महाराजांना मानवंदना दिली जात होती. तो फक्त उच्चार नव्हता; तो परंपरेचा, अभिमानाचा आणि संस्कारांचा निनाद होता. या क्षणाचा साक्षीदार माझ्यासकट वर्गातील मुलं होती.


शिवगर्जना पूर्ण झाल्यावर आजींनी यशला खिडकीत बोलावत मस्तपैकी पप्पी घेतली. त्या क्षणी आजीच्या चेहऱ्यावर अपार प्रेम ओसंडून वाहत होतं. मी विचारलं, “आजी, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या. यशनं म्हटलेलं आवडलं का?”


आजी क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, “मंग न, काहून नाही आवडणार? राजे आपले होते. तो माणूसच खास होता. बरं झालं मी इकडं आली. हे गाणं ऐकता आलं.”


यश हळूच आजीकडे पाहत म्हणाला, “आजी, मी बरोबर म्हटलं ना?”


आजी हसत म्हणाली, “अगदी मनापासून म्हटलंस. आवाजात जोश होता. असंच म्हणत जा. राजांची गोष्ट ऐकून मोठा हो.”


मीही त्याला विचारलं, “यश, तुला शिवाजी महाराज का आवडतात?”


तो म्हणाला, “सर, ते धाडसी होते. त्यांनी किल्ले जिंकले. आईसाठी, स्वराज्यासाठी लढले.”


आजी लगेच म्हणाली, “होय रे! आणि रयतेसाठी जगले. राजा असा असावा. आयकेल हाय मी पण त्यांच्याविषयी...!”


त्या काही शब्दांत आजीचं संपूर्ण शिवप्रेम दडलेलं होतं. इतक्या वयातही तिच्या मनातला अभिमान ताजा होता.


खरं तर शाळेत साजरी होणारी शिवजयंती हा केवळ एक कार्यक्रम नसतो. ती विद्यार्थ्यांच्या मनात इतिहास जागवणारी आणि मूल्यांची पेरणी करणारी पर्वणी असते. भाषणं, पोवाडे, शिवगर्जना, वेशभूषा यामधून मुलांना आत्मविश्वास लाभतो. ‌‘राजे कसे होते?‌’ हा प्रश्न विचारताना धैर्य, शिस्त, न्याय आणि स्वाभिमान या गुणांची ओळख त्यांना होते. शाळा त्या दिवशी संस्कारांची भूमी बनते.


दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती पण आज घडलेला हा छोटासा प्रसंग खऱ्या अर्थाने प्रेरणा देऊन गेला. यशची शिवगर्जना आणि आजीचा जयघोष या दोन पिढ्यांना जोडणारा तो क्षण म्हणजेच शिवजयंतीचा जिवंत उत्सव होता.


फुलताना | Phultana
₹250.00₹187.50
Buy Now

‌‘शिवगर्जना‌’ ही केवळ घोषणा नाही; ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जिवंत साक्ष आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य, संकटातही न डगमगणारा आत्मविश्वास, स्वराज्याची दूरदृष्टी, संघटनशक्ती आणि स्त्रीसन्मानाची मूल्यव्यवस्था हे सारे गुण शिवगर्जनेतून प्रत्ययास येतात. ही गर्जना आपल्याला शिकवते की शौर्य म्हणजे केवळ तलवार उगारणे नव्हे तर योग्यतेसाठी ठामपणे उभे राहणे होय. सांस्कृतिक अभिमान जपत, सर्वांना सोबत घेऊन न्याय्य समाज उभारण्याची प्रेरणा शिवगर्जना देते. म्हणूनच, ती प्रत्येक पिढीला जागृत करणारी आणि उत्तम नागरिकत्वाकडे नेणारी प्रेरणागर्जना आहे. म्हणूनच ती मुलांकडून पाठ करून घेणे आवश्यक वाटले.


शिक्षक म्हणून अशा क्षणात मला नेहमी जाणवतं, आपण शिकवतो ते केवळ पाठ नसतात; आपण पेरतो ते संस्कार असतात. एका छोट्याशा शिवगर्जनेनं दोन पिढ्या जोडल्या जातात, इतिहास वर्तमानात येतो आणि अभिमान डोळ्यात दाटतो. वर्गात उच्चारलेले शब्द कधी घराघरात घुमतात तर कधी आजीच्या हृदयातून जयघोष बनून बाहेर पडतात.


अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ ऐतिहासिक ज्ञान वाढत नाही तर व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. पाठांतर करताना स्मरणशक्ती बळकट होते, सादरीकरणातून आत्मविश्वास वाढतो आणि सार्वजनिक बोलण्याची भीती कमी होते. शिवगर्जनेसारख्या कृतिंमधून मुलांना मूल्यशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून समजते. इतिहास केवळ पुस्तकात न राहता त्यांच्या भावविश्वात प्रवेश करतो. कुटुंब आणि शाळा यांच्यातील दुवा अधिक दृढ होतो. शिक्षणाची हीच तर खरी फलश्रुती आहे, ज्ञानासोबत संस्कारांची जोपासना करणे. अशा क्षणांसाठीच तर आपण शिक्षक आहोत आणि म्हणूनच मन पुन्हा एकदा म्हणतं, शिवगर्जना ही दोन पिढ्यांचा सेतू अबाधित ठेवणारी ऊर्जादायी उज्ज्वल परंपरा आहे...!


शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात..!


भरत विठ्ठल पाटील

नाशिक, 9665911657

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरधे

ता. मालेगाव, जि. नाशिक


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र | Shree Chhatrapati Shivaji Maharaj Charitra
₹500.00₹375.00
Buy Now

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page