‘बोले तैसी चाले...’
- 5 hours ago
- 2 min read
‘बोले तैसा चाले’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते दाखवतात. सहकारनगरमधून निवडून आलेली आणि वयाने सर्वात लहान नगरसेविका असलेली सई थोपटे हिने मात्र आपला शब्द पाळून एक सुखद धक्का दिला आहे.
सहकारनगरमधल्या स्वामी समर्थ गल्लीचा रस्त्यालगतचा कोपरा कालपर्यंत कचऱ्याचे भांडारच होते. या परिसरातल्या अनेक महिला चोरपावलांनी येऊन आपल्या घरातल्या ओल्या कचऱ्याच्या पिशव्या या कोपऱ्यावर बिनदिक्कत फेकत असत. आजूबाजूच्या दुकानदारांनाही आपला कचरा फेकण्यास हीच जागा सापडत असे. बाजूच्या दारुच्या दुकानदाराला आणि त्याच्या गिऱ्हाइकांना तर हा कोपरा म्हणजे जणू पर्वणीच. समोर 50 मीटर अंतरावर शाळा असलेल्या या रस्त्यावर मुलामुलींची ये-जा नेहमीचीच पण तरीही या कोपऱ्यावर कायम दारुड्यांची गर्दी. तिकडे ना शासनाचं लक्ष ना पोलिसांचं. स्वामी समर्थांच्या पवित्र मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्यावरचा हा कोपरा म्हणजे उकीरडाच. इथल्या नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या पण व्यर्थ.
यावेळच्या निवडणुकीत सई निवडून आली आणि या भागातील रहिवाशांच्या मनात एक आस निर्माण झाली. काही तरी करुन दाखविण्याची उमेद असलेली, स्वच्छ प्रतिमा असलेली ही मुलगी नव्या आशा जागविणारी होती. इथल्या नागरिकांनी या कोपऱ्याची कहाणी तिच्या कानावर घातली. ‘थोडे दिवस द्या, मी नक्की काही तरी करते’ असं आश्वासन तिने दिलं. तक्रार करणारे सवयीने ते विसरुनही गेले पण सई विसरली नाही. अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तिने या कोपऱ्याच्या सुशोभिकरणाची योजना तयार केली आणि आश्चर्य म्हणजे ती प्रत्यक्षात उतरवली. तिने या कोपऱ्याचं विद्रुप चित्र पार पलटून टाकलं. तिथल्या भिंतीला आकर्षक रंग दिला. टायर आणि झाडाचे बुंधे वापरुन केलेलं आकर्षक डिझाईन तिथे उभं केलं. त्या कोपऱ्याचं रुप पालटलं.
या सुशोभिकरणाचं उद्घाटन झालं तेव्हा तिथल्या रहिवाशांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला पण सईने एकटीने त्याचं श्रेय न घेता वॉर्डाच्या अधिकाऱ्यांनाही त्यात सामावून घेतलं. यावेळी रहिवाशांवरोबरच श्री. विजय बिबवे, गौतम साळवे, पप्पु खंदारे हे वॉर्डाचे अधिकारी व पालिकेचे काही कर्मचारी उपस्थित होते. तिथं जमलेल्या सर्वांनीच टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या या कर्तव्यपूर्तीचं स्वागत केलं.
सई, तुझे आभार आणि मनापासून कौतुकही.
- भगवान दातार
साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६
.jpg)