जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य परस्कार
- 21 hours ago
- 1 min read
‘चपराक प्रकाशन’ची निर्मिती; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचा उपक्रम
पुणे - ‘बुके ऐवजी बुक’ या संकल्पनेतून ‘चपराक प्रकाशन’ने कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांच्या प्रकाशित केलेल्या ‘ऋतुरंग’ या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‘राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार 2025’ प्राप्त झाला आहे. पुरस्कारासाठी साहित्याची निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले.
‘ऋतुरंग’ या पुस्तकाला प्रस्तावना निसर्ग अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी लिहिली आहे तर पाठराखण तत्कालीन कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांनी केली आहे. ऋतुरंग या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे संपन्न झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते झाले होते. ‘कोणत्याही कार्यक्रमात बुके देण्याऐवजी ऋतुरंगसारखे कोकणातील फुलांची माहिती असलेले बुक द्यावे,’ अशी संकल्पना ‘चपराक प्रकाशन’चे संपादक घनश्याम पाटील यांनी मांडली होती.
ऋतुरंग या पुस्तकाचे मुखपृष्ठ जलरंग चित्रकार विष्णू परीट यांनी साकारले आहे. हे पुस्तक संपूर्ण रंगीत पानांचे असून यामध्ये कोकणातील फुलांची छायाचित्रे आणि माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय साताराचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, संस्थापक रवींद्र भारती यांनी ऋतुरंग या पुस्तकाला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार 2025 प्राप्त झाल्याबद्दल लेखक जे. डी. पराडकर आणि ‘चपराक’चे संपादक, प्रकाशक घनश्याम पाटील यांचे अभिनंदन केले आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ 23 ऑगस्ट 2026 रोजी सोमण सभागृह सातारा येथे सकाळी 11 वा. संपन्न होणार आहे.
.jpg)


Comments