top of page

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्याअर्थी युगपुरूष

  • Jul 9
  • 2 min read

Updated: Jul 10

पुणे - हजार वर्षांच्या गुलामगिराच्या बेड्या तोडून हिंदवी स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी काढले. रा. स्व. संघाच्या अरण्येश्वर प्रभात शाखेच्या ‌‘हिंदू साम्राज्य दिन‌’ उत्सवात ते बोलत होते. संघचालक अविनाश धोमकर व ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक सुनील माळी यावेळी उपस्थित होते.


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा संघातर्फे हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात बोलताना श्री. बलकवडे यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्रातील घटनांचा उल्लेख करत त्यामागील सूत्र सांगितले. परदेशातील लोक संस्कृती विसरले म्हणून त्या संस्कृती नष्ट झाल्या पण भारतात राज्यकर्त्यांनी व धर्मरक्षकांनी आपल्या प्राचीन  संस्कृतीची नाळ सोडली नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनात प्रभु रामचंद्रांचे चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णाची राजनीती होती. त्यामुळे ते यशस्वी झाले असे सांगून श्री. बलकवडे म्हणाले की गाढवाचा नांगर फिरवलेले पुणे माता जिजाऊ यांनी शिवरायांच्या हातून पुन्हा उभे केले. गाढवाचा नांगर फिरवलेल्या किंवा उद्ध्वस्त झालेल्या शहरातून नवे संपन्न शहर उभे राहण्याचे पुणे हे जगातले एकमेव उदाहरण आहे.


महाराजांचा स्वराज्याइतकाच सुराज्यावरही भर होता. त्यामुळे इथला शेतकरी कसा सुखी होईल याची चिंता त्यांनी केली. शेतकरी सुखी व संपन्न झाल्यामुळे बारा बलुतेदारांचे उत्पन्न वाढले, रोजगार निर्माण झाला आणि राज्याचे उत्पन्नही वाढले. रयतेवरचे कर कमी करुनही राज्याचं उत्पन्न वाढविणारा एकमेव राजा म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख करावा लागेल असे ते म्हणाले.


महाराजांनी सांस्कृतिक क्रांतीबरोबरच धर्म, कृषी, अर्थ, संरक्षण आणि राजव्यवहार या वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळेच त्यांच्या राज्याला रामराज्य म्हटले जाऊ लागले असे सांगून ते म्हणाले की, सामान्य माणसातून महाराजांनी असामान्य माणसं घडवली. सर्वस्व राष्ट्रार्पण ही भावना त्यांच्यात बिंबवल्यामुळे या सहकाऱ्यांनी अशक्यप्राय वाटणारी कामगिरी सहजपणे पार पाडली असेही श्री. बलकवडे म्हणाले.


प्रारंभी श्री. माळी यांनी बलकवडे यांचा परिचय करुन दिला. बलकवडे यांनी केलेला अभ्यास म्हणजे एक प्रकारचं तप आहे. या साधनेमुळेच त्यांच्या लिखाणाला एक प्रकारचे वजन प्राप्त झाले आहे असे ते म्हणाले.


श्री. सुहास काणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भूषण करमरकर यांनी सांघिक गीत सांगितले. जे. डी. कुलकर्णी यांनी वैयक्तिक पद्य म्हटले. शिरीष वनारसे यांनी अमृतवचनाचे व संजीव खळदकर यांनी बोधवाक्याचे वाचन केले.


साप्ताहिक चपराक ६ ते १२ जुलै २०२६


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र | Shree Chhatrapati Shivaji Maharaj Charitra
₹500.00₹375.00
Buy Now


Recent Posts

See All
 ‌‘बोले तैसी चाले...‌’

‌‘बोले तैसा चाले‌’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page