top of page

बालकुमारांसाठी गुरू ठाकूर यांच्या खास चित्रकथा

  • Jul 9
  • 2 min read

‌‘लाडोबा‌’तर्फे मराठी आणि इंग्रजी आवृत्ती उपलब्ध


पुणे - तू बुद्धी दे, तू तेज दे..., असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर अशा एकाहून एक सरस आणि प्रेरणादायी कवितांचे कवी, प्रतिभावान गीतकार, पटकथा-संवादलेखक आणि प्रसिद्ध अभिनेते गुरु ठाकूर आता एका नव्या भूमिकेतून बालवाचकांच्या भेटीस आले आहेत. तब्बल 25-30 वर्षांनंतर गुरु ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या कार्टुनिस्ट (व्यंगचित्रकार) भूमिकेची आठवण जागी करत बालचमूंसाठी चित्रकथांचे एक विशेष पुस्तक साकारले असल्याची माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.


‌‘लाडोबा प्रकाशन‌’तर्फे हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये एकाच वेळी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील मराठी पुस्तकाचे शीर्षक ‌‘गोष्ट छोटी, शिकवण मोठी‌’ असे असून इंग्रजी पुस्तक ‌‘टायनी टेल, वाईज ट्रेल‌’ या नावाने बालवाचकांच्या भेटीस आले आहे.


आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकेकाळी ‌‘नवा काळ‌’सारख्या ख्यातनाम दैनिकातून व्यंगचित्रकार म्हणून करणारे गुरु ठाकूर मधल्या काळात चित्रपट, नाट्य आणि संगीत विश्वात पूर्णपणे व्यग्र झाले होते; मात्र काही दिवसांपूर्वी एकदा सहज गप्पांच्या ओघात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला होता की, “जसा काळ बदलतो, तशा मुलांसाठीच्या गोष्टी, बोधकथा आणि त्यातील संदर्भही बदलायला हवेत. आजच्या डिजिटल युगातील मुलांच्या भावविश्वाशी आणि अनुभवांशी नाते सांगणाऱ्या कथा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.” हाच विचार लाडोबा प्रकाशनने अत्यंत गांभीर्याने आणि मनापासून उचलून धरला. प्रकाशकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे गुरु ठाकूर यांनी दैनंदिन कामाच्या धावपळीतून वेळ काढत या कल्पनेवर काम केले आणि बघता-बघता या नव्या कॉमिकचा जन्म झाला.


बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या गुरु ठाकूर यांचे मुलांसाठीचे हे पहिलेच स्वतंत्र पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व कथा, त्यातील चित्रांची संकल्पना, रेखाटने आणि संपूर्ण मांडणी खुद्द गुरु ठाकूर यांनीच साकारली आहे. त्यामुळे कवी आणि लेखकासोबतच त्यांच्यातील जुना संवेदनशील चित्रकार या निमित्ताने पुन्हा एकदा रसिकांसमोर येणार आहे. “मुलांसाठी काम करताना त्यांच्या वयाचे होऊन, त्यांच्या भावविश्वात शिरण्याचा जो आनंद मिळतो, तो खरोखर दैवी असतो,” अशा भावना गुरु ठाकूर यांनी या प्रवासाबाबत बोलताना व्यक्त केल्या.


या पुस्तकाच्या निमित्ताने गुरु ठाकूर यांनी आजच्या बालमित्रांशी थेट संवाद साधत यशाची एक नवीन आणि सोपी व्याख्या मांडली आहे. “आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की यश म्हणजे फक्त परीक्षेतले चांगले गुण, गडगंज पैसा किंवा मोठमोठी पदकं! पण खरं यश यापेक्षा वेगळं आणि सहज आहे. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारणे, भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील क्षणात जगता येणे आणि दैनंदिन जीवनात जे योग्य आहे तेच करणे, हेच खरे यश आहे. कौतुकसोहळे आणि बक्षिसे तात्पुरता आनंद देतात पण एक चांगली व्यक्ती म्हणून जगल्यामुळे मिळणारी शांतता आयुष्यभर सोबत राहते,” असा कानमंत्र गुरु ठाकूर यांनी दिला आहे. तसेच मुलांनी गोष्टी वाचताना मनात प्रश्न निर्माण होऊ द्यावेत आणि ते विचार एका डायरीत लिहून ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


कवी गुरु ठाकूर यांचे बालसाहित्यातील हे पहिलेच पाऊल ‌‘लाडोबा प्रकाशन‌’च्या माध्यमातून पडले असल्यामुळे, साहित्य वर्तुळातून या उपक्रमाचे मोठे स्वागत होत आहे. मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी, त्यांना चांगल्या गोष्टींची निवड करायला शिकवण्यासाठी आणि कोणत्याही आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल.


हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी


गोष्ट छोटी शिकवण मोठी | Gosht Chhoti Shikwan Mothi
₹150.00₹112.50
Buy Now
Tiny Tale, Wise Trail
₹150.00₹112.50
Buy Now

Recent Posts

See All
 ‌‘बोले तैसी चाले...‌’

‌‘बोले तैसा चाले‌’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page