खड्ड्याच्या मागेही खड्डा अन् खड्ड्याच्या पुढेही खड्डा... !
पात्रे व घटना काल्पनिक असून ती कुणाच्या व्यक्तिमत्त्वाशी वा घटनांशी जुळून आल्यास तो निखळ योगायोग समजावा.
(सकाळी सकाळी महाराज विविध वर्तमानपत्रे वाचत बाल्कनीत आरामखुर्चीत बसले आहेत, तेवढ्यात सेवक व प्रधानजी एका आम माणसाला धरून महाराजांपुढे आणतात.)
सेवक/प्रधानजी :- जय हो! विजय हो! महाराजांचा विजय असो!
महाराज :- हं बोला प्रधानजी! आणि हे काय? कुणाला पकडून आणलंय हे सकाळी, सकाळी..!
सेवक :- महाराज, हा आहे आपल्या प्रांतातील आम आदमी रस्त्याने राजीनामा! राजीनामा! असे ओरडत चालला होता! विचारल तर म्हणतो कसा? आज आनंदाचा दिवस! एक-एक विकेट अशीच जाणार!
प्रधानजी :- पुढे विचारलं तर म्हणतो की, खड्डे सम्राटांचा अंत जवळ आलाय! न्यायाचाच विजय होईल! आणि एक गाणं का कविता काय म्हणतात तेही गात होता महाराज! सेवका कोणतं गाणं होतं रे ते?
सेवक (उत्साहाने) :-
खड्ड्याच्या मागेही खड्डा
अन् खड्ड्याच्या पुढेही खड्डा
खड्ड्यांनी गिळले रस्त्याला
अपेक्षांना पडला मोठ्ठा खड्डा!
महाराज :- म्हणजे काय? का रे बाबा कशाबद्दल एवढा आनंद व्यक्त करीत फिरतोयेस नगरात?
(आम आदमी जोरात हसतो बोलत मात्र काही नाही.)
प्रधानजी :- अरे बोल ना! बाहेर तर वाट्टेल ते बोलत होतास आणि आता काय वाचा बसलीय होय!
(प्रधानजी, महाराजांच्या जवळ जात त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजतात, महाराज दचकून उभे राहतात.)
महाराज :- काय? दिल्लीकरांची टिंगल उडवीत होतास? शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचं सेलिब्रेशन साजरं करीत होतास? अरे वेड्या, दिल्लीकर जाऊ दे आपल्या शहरातल्या त्यांच्या एखाद्या गुप्तहेरास ही गोष्ट कळली तर फार भयंकर परिणाम होतील; याची जाणीव आहे की नाही तुला? अरे बाबा, अशाने सगळी ग्रॅण्ड बंद व्हायची आपल्या संस्थानाची! आधीच आपला जीडीपी जागचा हलेना.
(आम आदमी मात्र शांतपण्ो हसतोय.)
सेवक :- अरे हसतोस काय आणखी वरून, बोल ना आता बोल! नौटंकी म्हणतोस होय राज्यकारभाराला...! जिथे खातो तिथेच ओकतो. अरे सत्ताधाऱ्यांबद्दल आदर नाही तर नाही, वरून आनंद साजरा करतोस?
(अचानक राणीसाहेब प्रवेशतात.)
राणीसाहेब :- अहो, कसा राहील आदर! सगळं खाऊन झाल्यावर जगाला जेवायला बोलावता होय! लोक काय वेडे वाटतात का तुम्हाला या देशातले?
(आता मात्र आम आदमी हसत हसत मोठ्याने ओरडू लागतो.)
आम आदमी :- भरला, भरला, पापाचा घडा भरला, शंभर पापे पूर्ण झालीत की... खेळ खल्लास! सत्तेतून आलेली मुजोरी संपणार! नेत्यांची बोलबच्चनगिरी आणि खड्डेगिरी संपणार! जिंदाबाद! जिंदाबाद! आम आदमी जिंदाबाद! कमिशनखोरी मुर्दाबाद!
(महाराज वरमतात.)
महाराज :- जाऊ द्या रे याला, हा मनोरुग्ण दिसतोय! उचला याला अन् जाऊ द्या गावाबाहेर, आणखी कुठे बोंबा मारायच्या आत याचा बंदोबस्त करा! उचला लवकर.
(चार सैनिक मिळून आम आदमीला उचलतात)
राणीसाहेब :- काय बंदोबस्त करताय त्याचा! महागाईने आधीच त्याला अर्धमेला करून टाकलाय, रस्त्यावरच्या खड्ड्यांनी त्याची पार हाडं खिळखिळी झालीत, भ्रष्टाचाराने त्याचा कणाच मोडून टाकलाय म्हण्ो बंदोबस्त करा! दिल्लीकरांचं एवढं लांगूलचालन बरं नव्हे!
महाराज :- राणीसाहेब! गप्प बसा क्षणभर! यातलं काय कळतंय तुम्हाला? जाऊ द्या रे उचला त्याला...! एखाद्या वेड्यांच्या दवाखान्यात ॲडमिट करा याला! जा घेऊन!
(सैनिक आम आदमीला उचलून बाहेर नेतात. आम आदमी फक्त मुठी आवळून संताप व्यक्त करतोय, बोलत मात्र काहीच नाही.)
राणीसाहेब :- हे योग्य नाही महाराज, सामान्य माणसाचा आवाज किती दिवस दाबणार तुम्ही! अन्यायाची परिसिमा झाली की क्रांती होतेच, हा सिद्धांतही विसरलात तुम्ही.
(सेवक आणि प्रधानजींकडे पाहत महाराज म्हणतात.)
महाराज :- जा प्रधानजी जा तुम्हीही! सेवका जा तू ही जा आता; आम्हाला राणीसाहेबांशी काही खाजगीत बोलायचंय, या तुम्ही!
(दोघेही नाराज होत बाहेर जातात.)
राणीसाहेब :- अहो, आता खाजगीत बोलायला काय उरलंय? सगळं जगजाहीर झालंय! कुणाकुणाला मनोरुग्ण ठरवणार नेत्यांचे चमचे आणि चमच्यांचे चेले! गावोगावी हेच चाललंय.
महाराज :- राणीसाहेब हळू बोला! अहो या मागे काही राजकीय कारणं असतात. काही गणित असतात.
राणीसाहेब :- कसली कारणं? मोठ्या मंडळीला अडचणीत आणून आपली कमिशन खोरीयुक्त दादागिरी चालवायची. काय अर्थ आहे याला? सारं कळतंय जनतेला आता! आधी आपखूशीने राजीनामा द्यायचा आणि मग चौकश्या, एफआयआरचा मारा. साऱ्या राज्यात खड्डेच खड्डे! एका शहरात तर खड्ड्यातल्या पाण्यात मासे! व्वा! त्या नाशकात तर काय कुंभमेळा आहे म्हणून सारं शहरच खणून ठेवलंय! हे असं असतं का प्रशासन? म्हण्ो संकटमोचकाहाती नाशिक? खड्डेग्रस्त झालंय अख्ख शहर. काल तर तिकडे खड्डे कवीसंमेलन झालं म्हण्ो? सारा गोंधळच गोंधळ! आणि....
महाराज :- आणि काय आणखी? हळू बोला, अहो भिंतीलाही कान असतात...! आणि कवींना काय संधीच हवी! दिसला खड्डा की फेकली कविता.
राणीसाहेब :- असतात ना भिंतीलाही कान; मग राज्यातल्या जनतेला काय कान नसतात होय? कवी तर सकल विश्वाचे मुक्त पाखरू! आणि एक सांगू का, यामुळे होतं काय की, भ्रष्टाचाराचा मूळ मुद्दाच बाजूला पडतो... कर भरणाऱ्या जनतेच्या खिशातले दहा-वीस हजार कोटी लंपास करायचे; आपापल्या पित्त्यांना कत्रांटं द्यायची, वीस-वीस टक्के कमिशन ओरबाडून विकासकामांचा बोजवारा उडवायचा, मग पुन्हा नवी कामं आणि पुन्हा पैसे ढापायचे,त्यातून पुन्हा मतं विकत घ्यायची. अहो चाललाय काय?
महाराज :- राणीसरकार अहो चिडू नका.एवढा मोठा विकास साधायचा तर ही लहानमोठी टीप द्यावी/ घ्यावी लागणारच.
राणीसाहेब :- यामुळेच तर, सारी महानगरपालिका क्षेत्रे बरबटली होतीच कमिशनच्या गटारीत आता नगरपालिकाही या कंत्राटांच्या गटारात मुक्त संचार करू लागल्यात. प्रत्येक नगरसेवक कसला ना कसला ठेकेदार आहेच. खेड्यापाड्यातल्या ग्रामपंचायतीही पार लयास चालल्यात या भकासीकरण उद्योगात.
महाराज :- अहो आपलं स्वप्न आता महासत्त्तेचं आहे. तेव्हा...
राणीसरकार :- वाह रे महासत्ता! वाटा मुरमुऱ्याचा भत्ता! सारं आकलनापलीकडचं आहे महाराज, भ्रष्टाचाराच्या विषयांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आहेतच नेत्यांचे मानापमानाचे, थोरपणाचे डेली लाईव्ह एपिसोड, तोंड आहे म्हणून काहीतरी बकायचं, वाद वाढवायचे आणि टिव्हीवरच्या पुचाट बाष्कळ चर्चात रंग उधळायचे! एक एक मंत्री शेकडो कोटींचा धनी, खासदार, आमदार पन्नासेक कोटींच्या खाली नाहीत, नगरसेवक किमान दहा कोटीत खेळणार आणि वरून शहाजोगपण्ो चौकशी करा म्हणायचे!
महाराज :- राणीसाहेब, पटतंय आम्हाला तुमचं म्हणणं पण सत्तेपुढे शहाणपण नाही चालत...
राणीसाहेब :- म्हणून तर हे वेडे उदयास येतात आणि नाकी नऊ आणतात. शेवटी माफीनामा द्यायचा अन् नवा दिवस नवा वाद उकरायचा!
महाराज :- अहो पण यामागची भूमिका नको का आपण समजून घ्यायला?
राणीसाहेब :- सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता हे गणित चांगलं जमतं हो तुमच्या राजकारण्यांना! बरे हीच लागण आता गावोगावी झालीय, सारे सत्तेतून दादागिरी गाजवू पाहतात, अधिकाऱ्यांना भिववितात, कर्मचाऱ्यांना छळतात. कार्यकर्त्यांच्या भाडोत्री फौजा दिल्लीतही तैनात ठेवतात. हे राज्य म्हणजे ठेकेदारांच्या जाळ्यात अडकलेले राज्य झालंय. प्रत्येकाला हवे कमिशन आणि सत्तेची गुर्मी! थांबवा हे, थांबवा हे आताच, नाही तर फार उशीर होईल! हा विकास नाही खड्डे-सम्राटांचा जनतेस त्रास आहे. लोकशाहीचा डोळ्यांदेखत चाललेला ऱ्हास आहे! थांबवा हे सारं...!
महाराज :- पण यासाठी आपण तरी काय करणार? आपले हात बांधलेले. जनतेने नको का काही करायला? जनतेलाही सारं मोफत हवं, धान्य द्या, प्रवासात सवलत द्या, भाऊबीज द्या, सवलती द्या, आरक्षणासाठी उत्पन्न मर्यादा वाढवा, मोफत दप्तर द्या, खिचडी द्या, वीजबीलात सूट द्या. असे एक ना अनेक मोफत वाटू-उद्योग केल्याशिवाय लोक मत नाही देत अलीकडे.
शिवाय निवडणुकीच्या वेळी कोरडा / ओला शिधा मतदारांना हवाच! लोकांच्या आतल्या या भ्रष्ट वृत्तीचं काय करणार? सर्वांनाच शार्टकट्स हवेत.
राणीसरकार :- मी तर म्हणते आता हे फुटकचे फुटाण्ो वाटप बंद करून फालतू कुटाण्ो टाळा..! फक्त आरोग्य आणि बालवाडी ते पदवीपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण सर्वांना द्या! टोल फ्री चांगले रस्ते द्या. म्हणजे मिळवले. शेतीमालाला सरकारला शोभतील असे भाव द्या! बस्स! येते मी!
महाराज :- अहो पण, थांबा की जरा! हे मसाला पान तर घ्या!
राणीसाहेब :- तुम्हीच बसा चघळत तुमचं मसाला पान! येते मी...!
(राणीसाहेब तणफणत पदर खांद्यावर घेत निघून जाताच पडदा पडतो.)
वेलची :- देशातील प्रत्येक माणसाला ज्या दिवशी स्वतःमधील असलेल्या भ्रष्ट वृत्तीची जाणीव होईल, त्या दिवशी हा देश खरंच जगज्जेता असेल.
-जनार्दन देवरे,मनमाड.
9011694885
.jpg)



Comments