top of page

एक सुरेल प्रवास

  • 15 hours ago
  • 3 min read

महाराष्ट्राच्या मातीतून आपल्या सुरेल प्रवासाचा श्रीगणेशा करणाऱ्या आणि संगीतालाच आपले सर्वस्व मानणाऱ्या ज्योती भांडे हिचा प्रेरणादायी प्रवास स्वप्नवेड्या तरुणाईसाठी एक दीपस्तंभ आहे. आय.टी. क्षेत्रातील सुखासीन आणि खातरीशीर नोकरीची वाट बाजूला सारून केवळ संगीताच्या अथांग आणि अनिश्चित सागरात स्वतःला झोकून देण्याचे धाडस तिने दाखवले. आज ती एक प्रतिभावान गायिकाच नव्हे तर एक संगीतकार म्हणूनही आपली नवी ओळख निर्माण करत आहे.



महाराष्ट्रातील अकोल्यात जन्मलेल्या ज्योती भांडे हिच्या घरात जन्मापासूनच संगीताचे संस्कार रुजले होते. तिचे वडील एक संगीत शिक्षक असल्यामुळे तिला घरचीच पहिली पाठशाळा लाभली. तिचा भाऊसुद्धा संगीतकार आहे. घरात वडील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि जुनी सदाबहार गाणी शिकवायचे तर ज्योती आणि तिच्या भावाला पॉप आणि वेस्टर्न संगीताची विशेष आवड होती. या विविध संगीतप्रकारांच्या अनोख्या संगमातूनच तिच्यातील कलाकाराची खरी जडणघडण झाली.


तिच्या बालपणीच्या आठवणी सांगताना ज्योती सांगते की, एकदा वडिलांसोबत रियाज करताना ते दोघे इतके तल्लीन झाले की, तब्बल आठ तास कसे निघून गेले, याचे त्यांना भानच उरले नाही! तसेच रात्री भाऊ आणि ज्योती नवीन गाण्यांचा सराव करताना मध्यरात्रीचे दोन-तीन कधी वाजायचे, हे त्यांना समजतच नसे. वेळेचे भान हरपून केवळ सुरांच्या दुनियेत रममाण होणे हा तिघांचाही स्थायीभाव होता. वडिलांना गाणी कंपोज करताना पाहणे, हा त्यांच्यासाठी एक सहजसुंदर अनुभव होता. वडिलांचा हा परंपरागत वारसा पुढे चालवत आज ती स्वतः सुरेल गाणी संगीतबद्ध करत आहे. तिला संगीताची देणगी उपजतच लाभली असून, कोणत्याही गाण्याचा मूड किंवा भावना समजली की चाल मनात अगदी सहज निर्माण होते. 'धाव विठ्ठला', 'जागी जागी रैन' या गाण्याच्या चालींवरून तिची प्रतिभा श्रोत्यांना नक्की कळेल.


मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक मुलाप्रमाणेच स्थिर भविष्यासाठी ज्योतीने सुरुवातीला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि एका नामांकित आय.टी. कंपनीत तीन वर्षे नोकरी केली. महिनाभराचे भरभक्कम वेतन हातात येत असतानाही तिचे मन संगीताशिवाय कुठेच लागत नव्हते. अखेर तिने जे मनापासून आवडते आणि जे तिच्या स्वभावात सहज उतरले आहे, तेच पुढे नेण्याचा निर्णय घेतला. तिने पुन्हा एकदा आपल्या रियाजाला सुरुवात केली. पुणे आणि मुंबई दरम्यान वारंवार प्रवास करत स्क्रॅच ट्रॅक, ओरिजिनल गाणी आणि जिंगल्स गाण्यास सुरुवात केली. आय.टी.ची नोकरी सांभाळून हे सर्व करणे अतिशय कठीण आणि तारेवरची कसरत ठरत होती; त्यामुळे तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट मुंबई गाठली. कुटुंबातील इतर सदस्यांचा विरोध पत्करून वडिलांनी तिच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला.



चित्रपटसृष्टीत कोणतीही पार्श्वभूमी किंवा ओळखीचे पाठबळ नसताना मुंबईसारख्या मायानगरीत पाय ठेवणे, हे तिच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला.

स्वतःचे गायक, वादकांचे वर्तुळ बनवले, त्याला जपले, वाढवले. त्याद्वारे अनेक गीत गायनाचे कार्यक्रम केले आणि अनेक स्क्रॅच ट्रॅक गाताना अनेक आश्वासने हवेतच विरली आणि अनेक संधी ऐनवेळी हुकल्या; परंतु तिच्या प्रामाणिक स्वभावाने आणि कष्टाळू वृत्तीने तिला योग्य संगीतकार मिळवून दिले, ज्यांनी तिच्या गायकीची खरी पारख केली. तिचा या क्षेत्रात येण्याचा निर्णय ती योग्य ठरवत गेली आणि हळूहळू सर्वांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन तिला मिळत गेले. तिच्या प्रयत्नातून तिला २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कन्नी' या मराठी चित्रपटातून पहिली प्लेबॅक सिंगिंगची सुवर्णसंधी मिळाली. त्याच वर्षी 'दंगा' या मराठी चित्रपटासाठीही तिने दोन गाणी गाऊन आपल्या सुमधुर आवाजाची जादू रसिकांच्या मनावर पसरवली.


ज्योतीने 'सारेगामा म्युझिक' या युट्यूब चॅनेलवर हिंदी आणि मराठी भाषेतील तब्बल १५ ते २० रिक्रिएटेड गाण्यांना आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. यासोबतच अनेक स्वतंत्र आणि मूळ गाण्यांचे नव्याने संगीत संयोजनही तिने केले आहे.


तिने विजय मारापल्ली यांच्या साथीने संगीत दिग्दर्शन केलेले 'धाव विठ्ठला' हे भक्तिगीत श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेत आहे. विठ्ठलभक्तिचा निखळ अनुभव देणारे हे गाणे तिच्या युट्यूब चॅनेलवर ऐकता येईल. 'माझ्या माहेरची वाट' या गाण्यात तिने दोन आवाजात/प्रकारात गाणे म्हटले आहे. सुरुवातीला हिंदी ओळींची राजस्थानी गायन पद्धत आणि त्यानुसार केलेला आवाजात बदल, शिवाय त्यानंतर मराठी बोलांसाठी भावपूर्ण मधाळ आवाज. ऐकणाऱ्याला हे दोन्ही आवाज एकाच व्यक्तीचे आहेत, हे कळूनही येत नाही.



'धाव विठ्ठला' या भक्तिगीतासोबतच तिच्या इतर गाजलेल्या प्रकल्पांमध्ये चित्रपट 'कन्नी'मधील 'नवरोबा', झी म्युझिकवरील 'हे गणराया', सारेगामा मराठी चॅनेलवरील गाणी आणि सारेगामा हिंदी चॅनेलवरील गाणी यांचा समावेश आहे. तसेच 'धुंद एकांत हा', 'मोरा सैंया' आणि 'माझ्या माहेरची वाट' ही तिने गायलेली गाणी अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत.


तिने गायलेल्या बालगीतांमध्ये सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनी लिहिलेले 'लाडोबा' मासिकाचे प्रचारगीत 'भेटायला आला पाहा लाड लाडोबा' हे बालचमूंच्या ओठावर रूळले आहे. ज्योती भांडे उदयोन्मुख कलाकारांना एक अत्यंत मोलाचा संदेश देते. तिच्या मते, सतत शिकत राहणे आणि कामामध्ये सातत्य ठेवणे हे यशाचे सर्वात मोठे गुपित आहे. स्त्री कलाकारांनी आपल्या कलेवर आणि प्रतिभेवर ठाम विश्वास ठेवावा, असे ती आवर्जून सांगते.

जेव्हा एखादा श्रोता ज्योतीची गाणी ऐकतो, तेव्हा त्याला त्या प्रत्येक सुरात प्रामाणिकपणा आणि जिवंत संवेदना जाणवते. विदर्भातील अकोल्याच्या एका संगीतप्रेमी घरातून सुरू झालेला हा सुरेल प्रवास आज महाराष्ट्राच्या घराघरांपर्यंत पोहोचला आहे, ज्याने संगीतसृष्टीला एक अत्यंत गुणी आणि प्रतिभावान तारा दिला आहे! श्रोत्यांनी त्यांच्या प्रतिसादातून तिच्या स्वरांना आणि संगीत दिग्दर्शनाच्या प्रतिभेला योग्य न्याय द्यावा, हीच अपेक्षा!


ज्योती घनश्याम

9901164468

मासिक साहित्य चपराक ऑगस्ट २०२६




विसाकी ओकिनावा | Visaki Okinawa
₹200.00₹150.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page