top of page

तुमचं पुस्तक

Aug 12
2 min read

शाळा भरली. शाळेत आज मराठीचा राहिलेला 'आभाळातील फरकांड्या' हा धडा शिकवायचा होता. धड्याची तयारी करण्यासाठी पुस्तक हातात असावे, म्हणून मी दुर्वाकडे पुस्तक मागितले. रोजच्याप्रमाणे ती आपले पुस्तक पुढे करेल, अशी मला अपेक्षा होती; पण ती सहजपणे म्हणाली, “सर, तुम्हाला नाही देत का पुस्तक? दररोज माझंच पुस्तक घेता. मला पण लागतं ना पुस्तक... तुम्ही सांगितलेलं लिहायला, खुणा करायला.”



क्षणभर मी स्तब्ध झालो. पहिल्या बेंचवर बसणारी दुर्वा हसत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तक्रार नव्हती; पण तिचा प्रश्न एक मोठा होता. ती तिच्या जागी अगदी बरोबर होती. तिच्या अभ्यासासाठी मिळालेले पुस्तक तिला जपावे लागणारच होते. त्यावर खुणा करणे, अवघड शब्द लिहिणे, धड्याचा अभ्यास करणे, हा तिचा अधिकार होता; पण मग मी कुठे आहे, हे कळण्यास वेगळा अनुभव घ्यायची गरजच नव्हती. हे असे होणार कधी तरी, हे जाणवत होतेच आणि ते आज समोर होते.


शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतात, ही अत्यंत चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलापर्यंत पोहोचावा, यासाठी ही योजना महत्त्वाची आहे; पण या व्यवस्थेत एक प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे—विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या हातात अध्यापनासाठी आवश्यक साधने कोण देणार? गेल्या काही वर्षांपासून इयत्तेचा एक सेट शिक्षकासाठी असावा, याचा विसरच पडलेला आहे.

शिक्षकाला नेहमीच गृहीत धरले जाते. ‘शिक्षक आहे म्हणजे तो सर्व काही करेल’ अशी एक मानसिकता तयार झाली आहे. शिक्षकाकडे पुस्तक असेलच, नियोजन असेलच, साधने तो स्वतःच तयार करेल, अतिरिक्त खर्च तो स्वतःच करेल, अशा अपेक्षा सहज केल्या जातात; पण वर्ग पातळीवर येणाऱ्या समस्या लक्षात कोण घेते? शिक्षकही माणूस आहे. त्यालाही अध्यापनासाठी योग्य साधने, वेळ आणि सुविधा आवश्यक आहेत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.


विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचा संच दिला जातो, पण त्याच पुस्तकांचा एक अतिरिक्त संच शाळेतील शिक्षकांसाठी दिला तर काय बिघडेल? उलट त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल. शिक्षकाला धडा आधी वाचता येईल, महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करता येतील, प्रश्न तयार करता येतील, कृतींचे नियोजन करता येईल, शैक्षणिक साहित्य तयार करता येईल आणि अध्यापन अधिक प्रभावी होईल. ज्या हातात ज्ञान देण्याची जबाबदारी आहे, त्या हातात पुस्तकच नसेल, तर अपेक्षित गुणवत्तेचे शिक्षण कसे घडेल?

आज शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा केली जाते. नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिली जाते. विविध उपक्रम, नोंदी, अहवाल, प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर याची अपेक्षा केली जाते; पण त्याच वेळी शिक्षकाला मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागतो, ही वास्तवातील विसंगती आहे. शिक्षकाच्या हातात पुस्तक नसताना त्याच्याकडून उत्तम अध्यापनाची अपेक्षा करणे, म्हणजे शेतकऱ्याला बियाणे न देता भरघोस पीक मागण्यासारखे आहे. मुलांना मिळणाऱ्या सुविधांइतक्याच शिक्षकांच्या गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे; कारण शिक्षक सक्षम असेल, तरच विद्यार्थी सक्षम होतील.

पाठ्यपुस्तक हे शिक्षण प्रक्रियेचे मूलभूत आणि सर्वात विश्वासार्ह साधन आहे. विद्यार्थ्यांसाठी ते ज्ञानाचा मार्गदर्शक असते, तर शिक्षकांसाठी प्रभावी अध्यापनाचा पाया असते. प्रत्येक धड्याची उद्दिष्टे, संकल्पना, उदाहरणे आणि कृती यांचा क्रमबद्ध आलेख पाठ्यपुस्तकातून मिळतो. शिक्षकाला अध्यापनाचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांच्या आकलनानुसार शिकवणे, आवश्यक खुणा करणे, पूरक माहिती जोडणे आणि मूल्यमापनाची तयारी करणे यासाठी पाठ्यपुस्तक सतत सोबत असणे आवश्यक असते. पुस्तक नसल्यास अध्यापनाची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. ज्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात पुस्तक असते, तो वर्ग शिकतो; पण ज्या शिक्षकाच्या हातातही पुस्तक असते, तो वर्ग अधिक चांगल्या पद्धतीने घडतो. म्हणूनच पाठ्यपुस्तक हे केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर शिक्षकाचेही अत्यावश्यक शैक्षणिक साधन आहे. कधी कधी विद्यार्थ्यांचे साधे प्रश्नही व्यवस्थेतील मोठ्या उणिवांकडे बोट दाखवतात; तरी याकडे दुर्लक्ष करून शिक्षक मध्य मार्ग काढत असतात.

नंतर दुर्वाचं पुस्तक घेतलं नाही, पण तेच पुस्तक उलटे वाचत शिकवत होतो. विद्यार्थ्यांसाठी विविध संबोध स्पष्ट करताना, ज्ञानाच्या आभाळात फरकांड्या उडवताना, माझ्याच फरकांड्या मी अध्यापन करताना जुळवत होतो.


-भरत पाटील

+91 9665911657

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page