top of page

पॉझिटिव्ह संडे -  सियाचीनवरही  योगाचा फायदा  

  • 2 days ago
  • 3 min read

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो जो आयुष्यभर आनंदाचा क्षण म्हणून लक्षात राहतो. 15 ऑगस्ट 1986  हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस होता.


‌‘ऑपरेशन मेघदूत‌’ या योजनेअंतर्गत सियाचीन ग्लेशियरवर लष्करासाठी काही स्ट्रक्चर निर्मिती करावयाची होती.  (DRDO R&D  इंजिनियर्स)  मध्ये मी सायंटिस्ट म्हणून कार्यरत असल्यामुळे असल्यामुळे त्या कामासाठी माझी निवड  करण्यात आली. अठरा हजार फुटावरील ‌‘कुमार पोस्ट‌’ वर ‌‘5 गार्ड  रेजिमेंट‌’मध्ये सुमारे दोन महिने राहण्याची व काम करण्याची संधी मला मिळाली. काम तातडीचे असल्याने जुलै 1986 च्या मध्यावर,  10 हजार फूट ते 18 हजार फूट उंच आणि 40 किलोमीटर दूर, अशा चार दिवसाच्या बर्फावरील प्रवासाऐवजी हेलिकॉप्टरने केवळ वीस मिनिटात मी कुमार कॅम्पवर पोहोचलो.


कुमारच्या हेलिपॅडवर मधून उतरून माझी हॅवर सॅक घेऊन आठ-दहा  पावलं चाललो असेन, त्या उंचीवरील विरळ हवेतील ऑक्सिजनची कमतरता मला जाणवू लागली. श्वसनाचा त्रास जाणवू लागला, प्रचंड थकवा  वाटायला लागला. मला पुढे चालवेना. माझी ही स्थिती लक्षात आल्यामुळे युनिट कमांडर लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंग यांनी एका जवानाला माझ्या मदतीसाठी पाठवले. चार दिवसाचा पायी प्रवास करून  (वातावरणाशी अनुकूलन) न झाल्यामुळे मला खूपच त्रास होत होता.


त्याच वेळी मला नियमितपणे प्राणायाम व योग करणारे माझे वडील आठवले. प्राणायाम करताना  ते ‌‘पूरक-कुंभक-रेचक‌’ करीत असत. त्यामुळे हवेतील अधिकाधिक प्राणवायू शरीरात घेतला जातो असं ते म्हणत. मी पण लगेचच दिवसभर ती क्रिया करत राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विनासायास दहा पायऱ्या चढून कमांडरच्या टेन्टमध्ये नाश्त्यासाठी जाऊ शकलो. त्या उंचीवरही योग व प्राणायामसाधना माझ्या मदतीला धावून आली ती अशी.


तिथल्या अधिकाऱ्यांना याचं खूपच आश्चर्य  वाटलं आणि त्यांनी त्यामागील  रहस्य विचारलं. मी सविस्तर माहिती दिल्यावर त्यांच्या सूचनेनुसार दुसऱ्या   दिवसापासून तिथं प्राणायाम व योगाचे प्रशिक्षण देण्यास मी सुरुवात केली. माझी निवास व्यवस्था ग्लेशियरवरीलच एका टेन्टमध्ये केली होती. झोपण्यासाठी,  तीन बाय सहा फुटाचा बर्फाच्या कट्ट्यावर प्लायवूड, वापरलेले पॅराशूट आणि स्लीपिंग बॅग टाकून बेड म्हणून तयार केला होता.


राखी पौर्णिमेच्या दिवशी मी सर्वांना राखी बांधली आणि त्याचे कारण विचारल्यावर संघाची त्यामागील भूमिका सांगितली. त्या घटनेनंतर त्यांचे माझ्या बरोबर वेगळेच नाते निर्माण झाल्याचा मी अनुभव  घेतला. युनिटमध्ये सर्व ऑफिसर्स, जेसीओज आणि जवान यांच्या संगतीत निवास आणि घेतलेले मिशन तीन आठवडे अतिशय व्यवस्थितपणे चालू होते.

अखेर 15 ऑगस्टला तिथं ध्वजवंदन होणार होतं. सर्व युनिट सज्ज झालं होतं. सगळे जमले आणि कर्नल रणजीत सिंग यांनी “काणे साब, आज  तिरंगा आप फैरायेंगे” अशी विनंती करत मला आश्चर्याचा धक्का दिला.


मी त्यांना, आपण कमांडर असल्यामुळे आपला तो अधिकार असल्याचे सांगितल्यावर, त्यावर त्यांनी “आपने मेरे जवानों के लिए इतने कष्ट और परिश्रम लिये है, आप तो हमारे मेहमान है” असं म्हणत माझ्याच हस्ते ध्वजारोहण केलं. मी भारावून गेलो.


ध्वजारोहण झाल्यावर त्या बर्फाच्या नदीवर जेथे श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होतो अशा अठरा हजार फूट उंचीवर जवानांचा व्हॉलीबॉलचा सामना झाला. त्याची बक्षीसं वाटण्याचा सन्मानही मलाच देण्यात आला. माझ्याच हस्ते ती वाटण्यात आली आणि त्यानंतर आयुष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी घटना घडली. ‌‘चलो काणे साब, आपको एक सिक्रेट चीज  दिखाते है‌’, असं म्हणत त्यांनी  सुभेदार मेजरना खुणेने काही तरी सांगितलं. त्यांच्यापाठोपाठ आम्ही चार-पाच जण निघालो. मी इथे एक महिन्यापेक्षा अधिक काळ राहतो आहे, युनिटमधल्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. हे नवीन आता काय दाखवणार? असं मला वाटत होतं.  


काही अंतर गेल्यावर आम्ही थांबलो. रणजीत सिंग साहेबांनी आज्ञा केली आणि आणि काही क्षणात मला एक आश्चर्याचा धक्का बसणारी गोष्ट घडली. आमच्यापासून दहा फुटावर एक वर्तुळाकार बर्फाचा तुकडा जमिनीपासून वर वर येऊ लागला आणि काही क्षणातच बर्फाच्या खालून एक गन वर आली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. लष्करात  एखादी वस्तु किंवा तुमचं  ठाणं लपवून ठेवण्यासाठी केमोफ्लाज करतात हे एनसीसीमध्ये अनुभवलं होतं. त्याचं प्रत्यक्ष दर्शन झालं.  


सुभेदार साहेबांनी गन सेट केली आणि सर्व ओके असल्याचा रिपोर्ट दिला. आता  दुसरा चमत्कार घडला. रणजीत सिंग साहेबांनी मला गनच्या सीटवर बसवून एकप्रकारे माझा सन्मान केला. 14  ऑगस्टला पाकिस्तानने त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कारगिलकडून आपल्या दिशेने फायर केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज जवानांनी भारताच्या शक्तीची झलक पाकिस्तानला दाखविण्यासाठी या गनने फायर केलं. या प्रसंगाची आठवण म्हणून फायर केलेल्या कार्टीजपैकी एक रिकामे कार्टीज रणजीत सिंग साहेबांनी  ‌‘5 गार्डं रेजिमेंट‌’ची प्रेमाची आठवण म्हणून मला भेट दिली. त्यासोबत ते बाळगण्याविषयीचे अधिकारपत्रही होते.


आयुष्यात मला मिळालेला तो अत्युच्च सन्मान होता. माझं मिशन पूर्ण करून सुमारे अडीच महिन्यानंतर मी त्या सर्वांचा निरोप घेऊन पुण्यात परत आलो. आश्चर्य म्हणजे  काही दिवसातच सियाचीन ग्लेशियरवर केलेला  निवास आणि पूर्ण केलेले मिशन यासाठी, सर्वसाधारणपणे तिन्ही संरक्षण दलांच्या लोकांना मिळणारे ‌‘सियाचीन मेडल‌’ आमच्या टीममधील  प्रत्येकाला  देऊन त्यांना सन्मानीत केल्याचे आर्मी हेडक्वार्टरचे पत्र मला मिळाले. त्यासोबत सियाचीन मेडलही पाठविले होते. आमचे डायरेक्टर मेजर जनरल एन. आय. के. मूर्ती यांच्या हातून एका विशेष कार्यक्रमात ते मेडल छातीवर लावून घेताना आयुष्य सार्थकी लागलेल्या भावनेनं आणि अभिमानानं उर भरून आला.


आजही 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणला जाताना ते मेडल मी अभिमानाने  छातीवर लावतो. देशसेवेचं हे ब्रीद लहानपणापासून  शाखेत झालेल्या संस्कारातच आहे हे मात्र निश्चित!


- सुहास काणे

शब्दांकन -   भगवान दातार 

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६





Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page