पॉझिटिव्ह संडे - हरवलेलं सौभाग्यलेणं परत मिळालं
- 3 days ago
- 2 min read
(सहकारनगरमधील अरण्येश्वर प्रभात संघशाखेत ‘पॉझिटिव्ह संडे’ हा उपक्रम सुरु आहे. यात दर रविवारी एक स्वयंसेवक त्याचा एक सकारात्मक, आनंददायी अनुभव सांगतो. एखाद्याला जग कितीही वाईट वाटत असलं तरी हवेच्या झुळूकीचा अनुभव देणारी एखादीतरी आनंदाची गोष्ट त्याच्या बाबतीत घडलेली असते. मनातली निराशा आणि नकारात्मकता पळवून लावणारी. त्याने आयुष्यभर मनात जपलेली एखादी प्रसन्न आठवण असते. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले श्री. रमेश बकरे यांनी दि. 14 जून 2026 रोजी सांगितलेल्या एका आठवणीने असाच एक सुखद अनुभव सगळ्यांना दिला. )
श्री. रमेश बकरे यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. ते 78 वर्षांचे आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव श्री. बाबुराव बकरे आणि आईचं नाव लीलावती. ते लहान असताना नारायण पेठेत राहत होते. पानशेतचा पूर आला तेव्हा रमेश यांचं वय 10-11 वर्षांचं असेल. ते जिथं राहत होते त्या वाड्यासमोर वडाचं एक मोठ्ठं झाड होतं. पानशेतचा पूर येण्याच्या अगदी 10-15 दिवस आधी घडलेली ही गोष्ट.
त्यावेळच्या वटपोर्णिमेला रमेश यांची आई व वहिनी यांनी घरासमोरच्याच वडाची पूजा केली. त्यावेळी त्यांनी चांदीची कुंकवाची कुयरी पूजेसाठी नेली होती. त्या कुयरीवर लीलावती यांचं नाव कोरलेलं होतं. पूजा आटोपली पण लीलावतीबाई गडबडीत कुयरी तिथंच विसरुन घरात आल्या. थोड्या वेळाने कुयरी विसरल्याचं लक्षात आलं. त्यांनी शोधाशोध केली पण काही उपयोग झाला नाही. कुयरी गहाळ झाली होती.
बकरे कुटुंबीय निराश झाले. कुंकवाचा करंडा किंवा कुयरी ही स्त्रियांच्या दृष्टिने सौभाग्य अलंकार असल्याने रमेश यांच्या आईच्या मनाला ही गोष्ट फारच लागली. दहा-बारा दिवसात पानशेतचा प्रलय कोसळला. 12 जुलै 1961 रोजी आलेल्या या पुराने पुण्यात हाहाःकार उडाला. शनिवार पेठ, नारायण पेठ, कसब्याचा काही भाग पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेला होता. बकरे कुटुंबीय अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडले. दोन दिवसांनी पूर ओसरला पण त्यात त्यांच्या घराची पुरती वाताहात झाली होती. आज इथं, उद्या तिथं असं करत ते शेवटी सोमवार पेठेतल्या एका घरात स्थिर झाले.
घर उद्ध्वस्त झाल्याचं दुःख तर होतंच पण कुंकवाची कुयरी हरवल्याची बोच त्या माउलीच्या मनातून जात नव्हती. रमेश यांच्या वडिलांचा टॅक्सी चालविण्याचा व्यवसाय होता. नियतीला टक्कर देत आयुष्याचा डाव पुन्हा मांडायचा निर्धार त्यांनी केला.
आणि तो प्रसंग घडला. अगदी एखाद्या सिनेमातल्यासारखा.
एके दिवशी रमेश यांचे वडील बाबुराव आपली टॅक्सी घेऊन नारायण पेठेतल्या त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याने जात होते. त्यावेळी त्यांच्या जुन्या वाड्यासमोर काही लोक कोंडाळं करुन बोलत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी कुतूहल म्हणून गाडी तिथं थाबवली. तर ‘हेच ते बकरे’ असं गर्दीतला एक जण म्हणाला आणि कोंडाळ्याच्या मध्ये उभा असलेला माणूस त्यांच्याकडे आला. ‘तुम्हीच बकरे का?’ अशी त्याने चौकशी केली आणि खातरी पटल्यावर चांदीची एक कुयरी खिशातून काढून त्यांना दिली. त्या कुयरीवर रमेश यांच्या आईचं नाव कोरलेलं होतं!
त्या देवमाणसाने ती कुयरी रमेश यांच्या वडिलांना परत दिली आणि त्या देवमाणसाचे आभार मानत त्यांनी ती घरी आणली.
हरवलेलं सौभाग्यलेणं परत आल्याचं पाहून त्या माउलीच्या डोळ्यात आनंदाश्रुंचा पूर आला. विठ्ठलावर श्रद्धा असलेल्या बकरे कुटुंबाला जणू त्यांच्या प्रामाणिकपणाचंच बक्षीस मिळालं होतं. हरवल्यानंतर चक्क 2-3 वर्षांनी!
ही आठवण सांगतांना रमेश बकरे यांचे डोळे पाणावले होते आणि ऐकणारे आम्ही सर्व जण निःशब्द झालो होतो. विशेषतः पानशेतच्या संकटाचा दुःस्मृतीदिन अवघ्या महिन्यावर म्हणजे 12 जुलैला आलेला असताना ही आठवण अधिकच हृदयस्पर्शी वाटली.
(सोबतचे छायाचित्र कै. बाबुराव बकरे आणि कै. लीलावती बकरे यांचे. सुमारे 50 वर्षापूर्वी काढलेले. दुसरे छायाचित्र श्री. रमेश बकरे यांचे.)
शब्दांकन - भगवान दातार
हे असे काही सकारात्मक, रसरशीत अनुभव आपल्यालाही आले असतील. ते थोडक्यात शब्दबद्ध करून आपल्या छायाचित्रासह आमच्याकडे पाठवा. निवडक अनुभवांना साप्ताहिक ‘चपराक’मध्ये यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल. आपले अनुभव आमच्या 7057292092 या क्रमांकावर व्हाटसॲप करा.
.jpg)



Comments