top of page

आमच्या या ‌‘सुंदर‌’ मूर्खपणाचे रहस्य काय?

  • 3 days ago
  • 4 min read

भारतातील एक न्यायाधीश देशातील तरुणांना झुरळ आणि बांडगुळ म्हणतो आणि त्यावर उपहास म्हणून अमेरिकेतील एक तरुण आभासी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करतो. देशातील तरुण या बेहद्द उपहासी कल्पनेला कोट्यवधीच्या संख्येने पाठिंबा देतात. जंतर-मंतरवर काही हजार तरुण एकत्र येत आंदोलन करतात. पुण्यातही त्याची एक आवृत्ती होते. मंच हरपून बसलेले तथाकथित विचारवंत कोणताच पक्ष विचारत नाही म्हणून या आंदोलनाकडे धाव घेतात. हेच लोक एकेकाळी अण्णा हजारेंच्या आंदोलनातही सामील असतात आणि भ्रमनिरास होऊन बाहेरही पडलेले असतात. खरे तर अण्णा हजारे आणि आता अभिजित दीपके हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‌‘मै भी अण्णा‌’ म्हणणारे हेच लोक गेल्या बारा वर्षात सातत्याने पुरोगामी चेहरा म्हणून मिरवत आहेत.


जिकडे लोकमत धावेल त्याच्या बाजूला ओसंडून धावायची हौस असणारे या देशात कमी नाहीत. खरे तर यांचा जन्मजात मूर्खपणाच अनेकदा देशाला गंभीर वैचारिक खाईत कोसळवायला भाग पाडत असतो आणि त्याची जाणीव नसलेले हेच “देशात प्रश्न उसळत आहेत आणि ते सोडवायची फक्त आमचीच प्रामाणिक इच्छा आहे” असल्या मानसिकतेत दंग राहून स्वत:ची आणि लोकांचीही फसगत करत असतात. आधीच मूर्ख असलेल्यांना अधिक मूर्ख बनवत आहेत याचे हे विदारक लक्षण आहे, कारण ही बाब फक्त विचारवंतांपुरती मर्यादित नाही तर ती सर्व क्षेत्रात घुसली आहे. भारताचे खरे सौंदर्य या विराट मुर्खपणामुळे झाकोळले गेले आहे.


भारतात सर्वत्र अशा मूर्खपणाचा उद्रेक जो आज दिसतोय तो प्राचीन काळापासून आहे हेही एक विशेष. आम्ही आमच्या सुंदर वाटणाऱ्या पण कुरूप मूर्खपणामुळे किती वैज्ञानिक प्रगतीच्या आणि जगाचे गुरु बनण्याच्या संधी सोडल्या याची आम्हाला जाणीव नाही. मग हे वर्तमानातले राजकीय, सामाजिक आणि वैचारिक मूर्खपणा उद्रेकत असतील तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; पण आपले मेंदू कोणत्याही विचारव्यूहासमोर गहाण टाकू नयेत एवढे सामान्य ज्ञान नसणारे केवढ्या सुंदर मूर्खपणाच्या नंदनवनात जगत असतील तर आम्ही आमच्या अवस्थेवर कीव केली पाहिजे.


इतिहासात आम्ही काय केले? वेद-उपनिषदे, रामायण महाभारत... पुराणे यातील मोहमयी, सुंदर पण भ्रामक कल्पनाविश्वात जे अडकून पडलो ते पडलोच. चौथ्या शतकात पृथ्वी सपाट नसुन ती गोल आहे व स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडणारा आर्यभट नावाचा महान शास्त्रज्ञ भारतात झाला होता पण पुढे ब्रह्मगुप्त, परमादीश्वरादि खगोलज्ञांनी त्याचा सिद्धांत साफ फेटाळून लावला. तोवरच काय, पार कोपर्निकस (सतरावे शतक) येईपर्यंत ‌‘पृथ्वी सपाट आहे‌’ याच भ्रमात अवघे जग राहिले. ज्ञानेश्वरांपर्यंत आर्यभटाची ही कृती पोहोचली ती शंकराचार्यांच्या मार्गे! पण जवळपास 900 वर्षांनी आणि ज्ञानेश्वरांनीही आर्यभटाचाच हात धरत (ज्ञानेश्वरी 4:97-99) एका गणिती सिद्धांताचे आध्यात्मिक रुपकात रुपांतर केले आणि गणिताची... खगोलशास्त्राची हत्या केली गेली. खरे तर पायची पाच डिजिटपर्यंतची किंमत काढणारा पहिला गणितज्ज्ञ आर्यभटच आणि या गणिती संज्ञा निर्माण करणाराही आर्यभटच! खरे तर आर्यभटाचा अभिनव विचार न हेटाळता अथवा आध्यात्मात घुसवत त्याला परलोकवादी आध्यात्मिक सिद्धांतात न बदलवता त्याची शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध प्रगती करण्याचा विविधांगी प्रयत्न झाला असता तर कदाचित भारत हाच विज्ञानातील एक महासत्ता बनला असता पण या झाल्या जर-तरच्या गोष्टी!


गतकाळाची एवढी चर्चा का? इतिहासाकडे डोळे उघडून पाहिले नाही तर आपल्याला आपल्या आजच्या चुका कदापि कळणार नाहीत. वर्तमानाचे आकलनही असेच धुसर होत जाईल. मग भविष्य काय असणार? आपण इतिहासाकडे जातीय व धार्मिक अहंकारांच्या भावनातून पाहतो. वर्तमानाकडे भूतकाळाचे चष्मे लावून पाहतो. पूर्वीही रामकथा जैन व बौद्ध धर्मियांनी आपापल्या सोयीने पुन्हा लिहुन काढली. वैदिकांनीही बालकांड आणि उत्तरकांड घुसवत आणि मूळ कथेत सोयीस्कर घालघुसड करत मूळ रामकथेची वाट लावून टाकली. महाभारताचे तर विचारुच नका! आम्ही सत्याचे बुरुज अंधविश्वासाच्या गहन धुक्यात गडप करुन टाकले. आमची बुद्धी आजही तशीच चालत आहे हे अजून एक दुर्दैव. आज जवळपास प्रत्येक जात आपल्या प्राचीनत्त्वाच्या नव्या मिथककथा निर्माण करत नवी पुराणे लिहित आहेत. कोणाचीही चिकित्सा कोणालाही नको आहे. अशा स्थितीत वर्तमानात जे घडते आहे त्यातील मूर्खपणा आम्हाला कसा कळणार?


आम्ही भारतीय पुराणपंथीय होतो आणि आहोत. मूर्ख होतो आणि आहोत. आम्ही कधीच पुरोगामी नव्हतो. आम्ही धर्माशिवायही जीवन असू शकते हा चार्वाक, कपिल मुनींचा विचार पुरातन काळातच अव्हेरला. आम्ही विश्वाचे निर्मितीकरण हे इश्वरी तत्त्वात नसून विभिन्न भौतिक मूलतत्त्वात आहे हा सांख्य आणि वैशेषिक विचारही कधीच फेटाळला. आमच्या पूर्वजांनी, त्यात सगळ्याच जाती-जमाती व भारतात जन्मलेल्या धर्मांचे आले, धर्म, त्यांची कर्मकांडे, त्याला समर्थन देण्यात हवे तसे गोंडस तत्त्वज्ञान बनवत बसवण्यात आपली प्रतिभा खर्च केली. त्यावरच युक्तिवाद झडत राहिले. आम्हाला धर्ममार्तंडांनी नव्हे तर आमच्याच धर्मलालसेने धर्म-जातीगुलामीच्या वैचारिक बेड्यात जखडले. त्यातच आमची सुरक्षितता होती कारण वैचारिक बंड करत समाजाला पुढे नेण्याची आमची मानसिक शक्तीच नव्हती. आजही राजकारणासाठीच निर्माण होणाऱ्या सामाजिक चळवळी फसव्या असतात हे सिद्ध होऊनही स्वत:ला विचारवंत म्हणवणारे महाभाग संधी मिळेल या आशेने इकडे तिकडे उड्या घेत केवळ स्वत:ची नव्हे तर अखिल समाजाची दिशाभूल करतात हे दुर्दैव आहे. भारतात आता सामाजिक क्रांती नव्हे तर विचारांची क्रांती हवी. विचार-परिपक्व समाजाखेरीज सामाजिक क्रांती कधीही होऊ शकत नाही.


पण आम्हाला साहस करत भविष्य बनवायचे नाही तर आमच्या गतानुगतिकतेचे पातक आम्हाला कोणावर तरी फोडायचे आहे. त्यासाठी कोणी मुस्लिमांना जबाबदार धरतो तर कोणी ख्रिस्त्यांना. कोणी ब्राह्मणांना तर कोणी बौद्धांना! पण मुळात हे सर्वच भारतीयांच्या दांभिक आणि पराजित फसवेपणाच्या मानसिकतेचे एकूणातील फलित आहे आणि यालाच सुंदर वाटला तरी असलेला सामूदायिक मूर्खपणा म्हणतात यावर आम्ही कधी विचार करणार? आम्ही ‌‘आम्हाला याने फसवले... लुटले...‌’ असे गळे आजही काढत असू तर त्याचा एकमेव अर्थ असा होतो की हा समाजच षंढांचा आहे.


इतिहासाचे आणि वर्तमानाचे प्रामाणिक अन्वेषन करत भविष्याची महाद्वारे खोलल्याशिवाय आम्हाला आमच्या मूर्खपणाचे रहस्य समजणार नाही. ते रहस्य जोवर समजणार नाही तोवर आमच्या उज्ज्वल भविष्याचे मार्गही उघडणार नाहीत. शेवटी ज्यांना गटार-विचार-व्यूहात कसलेही तत्त्वज्ञान नसताना रमायचे आहे त्यांना कोण आवाज देणार? सामाजिक मागासपणा एक वेळ दूर होईल पण या बौद्धिक मागासपणाचे आपण काय करणार?


या ‌‘सुंदर‌’ मूर्खपणातील कुरूपता आम्ही कधी पाहणार?


संजय सोनवणी

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १५ ते २१ जून २०२६

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page