top of page

शांततेच्या दिशेने... मनःशांती आणि सुखी आयुष्याची गुरुकिल्ली | Sandeep Wakchaure

  • 3 days ago
  • 3 min read

शांततेच्या दिशेने...


माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही दिसते आहे, त्या संदर्भाने स्वतःला अधिक चिकित्सकपणे पाहता येण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यातील सुख, दुःख, आनंद, राग, लोभ, मत्सर, अहंकार यासारख्या अनेक गोष्टींचा जो स्पर्श होतो. तो स्पर्श केवळ आपण त्या संदर्भाने चिंतन मनाच्या पातळीवर न जाता, वरवर विचार करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला विविध प्रकारच्या ताणतणावाला  सामोरे जावे लागत असते. मुळात आपल्या आयुष्यात जे काही दुःखदायक आहे त्या गोष्टीकडे पाहण्याची नजर बदलली की माणसाच्या आयुष्यातील दुःख आपोआप कमी होते. आपण कसा विचार करतो? एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो त्यावर आपल्या मनामध्ये विचार निर्माण होत असतात.


एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही, असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या व्यक्तिकडे खरंच कोणतेही चांगले गुण नसतात का? अनेक चांगले गुण त्या व्यक्तिकडे असतात. कदाचित आपला संपर्क जेव्हा झाला असेल तेव्हा त्या व्यक्तिची असलेली परिस्थिती, सामाजिक अनुभव याचा परिणाम म्हणून ती व्यक्ती आपल्याशी तशी वागली असेल. त्या क्षणी तो जो विचार करत असेल त्याचाही परिपाक त्याच्या वर्तनावर प्रतिबिंबीत झालेला असेल पण याचा अर्थ व्यक्ती वाईट आहे असे कधीच घडत नाही. जगातील कोणतीही व्यक्ती कधीच वाईट नसते आणि पूर्णतः वाईट असलेली व्यक्ती शोधूनही सापडत नाही मात्र आपण आपली दृष्टी चांगुलपणाची न ठेवता केवळ नकारात्मकतेने एखाद्या व्यक्तिकडे पाहत गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगली माणसं शोधून सापडणे देखील अवघड आहे. आपल्याला माणसांचा विचार आपल्या दृष्टीने करण्याबरोबर त्याच्या दृष्टीने देखील त्याच्याकडे पाहता यायला हवे. असं घडत गेलं तर माणसांमधील संघर्ष आपोआप कमी होईल. आपल्या व्यतिरिक्त जीवनातील दुःखाचा आवेग देखील कमी होईल. ओशो एक छानशी गोष्ट आपल्या सांगताहेत..


एका गावामध्ये एक नदी होती. नदी ही पवित्रच मानली जाते. गावचे लोकही पवित्रच मानायचे. त्या नदीच्या काठावर एक साधु पुरुष राहत होता. तो अत्यंत बुद्धिवान, आत्मज्ञानी आहे असे लोक म्हणायचे. तो नदीवर रोज यायचा. तो आत्मज्ञानी साधक दररोज ध्यान करण्यासाठी नावेत बसून नदीच्या मध्यभागी जात असे. तिथे शांत वातावरणात तो तासन्‌‍तास ध्यान करत असे. एके दिवशी तो डोळे मिटून ध्यानात मग्न होता. नदी शांत होती, वारा मंद वाहत होता. अचानक त्याच्या नावेला जोराचा धक्का बसला. त्याचा ध्यानभंग झाला. त्याला खूप राग आला. संतापाने तो लालेलाल झाला. आपली साधना खंडित झाली याचे त्याला दुःख झाले होते. त्यामुळे संताप अनावर झालेला होता.


तो मनात म्हणाला, “कोण हा मूर्ख? मी इतक्या शांतपणे ध्यान करत आहे आणि याने माझ्या नावेला धक्का मारला!”


रागाने भरून तो त्या व्यक्तिला ओरडण्यासाठी तयार झाला. त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले पण तेथे कोणीही नव्हते. त्याच्या नावेला धडकलेली नाव रिकामीच होती. ती प्रवाहाबरोबर वाहत आली होती.


क्षणभर तो स्तब्ध झाला. तो विचार करू लागला, “जर नाव रिकामी असेल तर मी कोणावर रागावणार? राग तर माझ्या आतच निर्माण झाला होता.”


त्या दिवसापासून त्याला एक मोठा जीवनबोध मिळाला. त्या एका घटनेने त्याला जीवनाचे तत्त्वज्ञान सापडले. एका घटनेने अधिक गंभीर विचार करायला सुरुवात केली. आपल्या आयुष्यात देखील अशा अनेक घटना घडत असतात पण आयुष्याशी नाते सांगणाऱ्या दृष्टीने आपण त्याकडे पाहत नाही. एखादी घटना आणि त्यातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर बरंच काही हाती लागण्याची शक्यता असते, हे साधू पुरुषालाही लक्षात आले होते. काही दिवसांनी तो गावात परतला. गावामधील अनेक माणसं या साधूचा जाणीवपूर्वक अपमान करायचे. अपमान केला की हा चिडतो हे अनेकांना माहीत होते. त्यामुळे लोक मजा करायचे. गावातील लोक त्याचा अपमान करायचे, कोणी रागवायचे, कोणी अडथळे निर्माण करायचे पण आता तो लगेच प्रतिक्रिया देत नव्हता. आता त्याने रागावर नियंत्रण ठेवले होते. नावेच्या एका घटनेने त्यांना जीवनाच्या नावाचाही विचार करायला सुरुवात केली होती. आता तो स्वतःला विचारायचा, “ही नावही कदाचित रिकामीच आहे. समोरचा माणूस माझ्या रागाचे कारण नाही. राग माझ्याच आतून येतो.”


हळूहळू त्याचा स्वभाव बदलला. तो शांत, संयमी आणि प्रसन्न झाला. जगातील बहुतांश दुःख हे इतर लोकांमुळे नसते; ते आपल्या प्रतिक्रियांमुळे असते. जेव्हा कोणी आपल्याला दुखावते तेव्हा आपण समजतो की दुःखाचे कारण समोरची व्यक्ती आहे. प्रत्यक्षात ती व्यक्ती फक्त एक निमित्त असते. राग, अहंकार, मत्सर आणि दुःख आधीपासूनच आपल्या आत दडलेले असते. ज्या दिवशी माणसाला  हे समजते, त्या दिवशी तो स्वतःचा स्वामी बनतो.


खरं तर दुसरे लोक आपल्या रागाचे कारण कधीच नसतात; राग आपल्या आत असतो. कोणत्याही घटनेवर, प्रसंगावर अथवा इतर कोणत्याही गोष्टींच्या संदर्भाने प्रतिक्रिया देण्यापूर्वी स्वतःकडे पाहणे महत्त्वाचे असते. जीवनाला हवी असलेली शांतता, बाहेरून कधीच मिळत नसते; ती आतून निर्माण करावी लागते. जीवनातील अनेक ‌‘धक्के‌’ आपल्याला मिळतात ते स्वतःला ओळखण्यासाठी असतात. त्यामुळे माणसाने जगाला बदलण्याचा प्रयत्न करू नये. स्वतःच्या प्रतिक्रियांना समजून घ्यायला शिकणे हाच मुक्तिचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी स्वतःत डोकवण्याचा विचार करायला हवा. बाह्य डोकवण्याचा विचार आपल्याला अशांत करतो आणि स्वतःमध्ये डोकवण्याचा विचार माणसाला शांततेच्या दिशेने घेऊन जात असतो. आपण अशांत असतो तेव्हा समजावे आपण बाह्य विचारात गुंतलेले आहोत आणि जेव्हा आपल्याला शांतता लाभते तेव्हा आपण आत डोकवला सुरुवात केलेली असते. आपल्याला काय हवे याचा विचार करायला हवा.


संदीप वाकचौरे

+91 94054 04500

साप्ताहिक चपराक १५ ते २१ जून २०२६


शिक्षणावर बोलू काही | Shikshanavar Bolu Kahi
₹300.00₹225.00
Buy Now

2 Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
Guest
2 days ago

ओशो यांची गोष्ट खूपच भावली.

Like

नागेश शेवाळकर
2 days ago
Rated 5 out of 5 stars.

खूप छान!

Like
bottom of page