शोकांतिका : भारताच्या युद्ध विरामांची आणि नंतरच्या करारांची
- 2 days ago
- 11 min read
फील्डमार्शल सॅम माणेकशा, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, परमवीर गाथा, शौर्यगाथा, टू द लास्ट बुलेट आणि शेवट नसलेलं युद्ध या युद्ध आणि दहशतवादाची पार्श्वभूमी असलेल्या पुस्तकांचा अनुवाद करताना देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांच्या तेजाची आरती पुनःपुन्हा गायला मिळणं हा माझ्या दृष्टिने अपरिमित आनंदाचा क्षण. त्या कहाण्या सांगताना दरवेळी ऊर अभिमानाने भरुन यायचा! पण त्याचवेळी त्या युद्धातल्या अकारण झालेल्या अनपेक्षित युद्धविरामांनी मात्र मन निराश व्हायचं. युद्धात जकायचं आणि तहात हरायचं अशी आपली ऐतिहासिक परंपरा. इतिहासात ती अनेकवेळा आपण पाहिली पण स्वातंत्र्यानंतरही आपले पहिले पाढे पंचावन्न चुकले नाहीत. वाटाघाटी म्हणजे ‘वाटा शत्रूला आणि घाटा आपल्याला’ असाच अनुभव आपल्याला प्रत्येक युद्धात आला. यामुळेच ‘पाकिस्तानने या करारात तुमचं माकड बनवलं आहे’ असे जळजळीत उद्गार फील्डमार्शल माणेकशा यांनी 1971 च्या सिमला करारानंतर काढले होते.

अगदी परवाचं ऑपरेशन सदूर हे युद्ध नसलं तरी ते अकाली थांबलं अशीच बहुसंख्य भारतीयांची भावना आहे. त्या कारवाईवर पूर्णतः आपलं वर्चस्व असताना आपण युद्धबंदी स्वीकारण्याची घाई केली. खरंतर आपण आपण पाकिस्तानचं कंबरडं पुरतं मोडायला हवं होतं. युद्ध का सुरु होतं हे जरी अभ्यासकांना समजत असलं तरी ते अचानकपणे का थांबतं हे मात्र फारसं कुणाला सांगता येणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात भारताला 4 युद्धांना सामोरं जावं लागलं. या चारही युद्धात भारतीय जवानांनी प्रत्येकवेळी दाखवलेलं अतुलनीय शौर्य कोणत्याही भारतीयाची छाती अभिमानाने भरुन आणणारं आहे. प्रतिकूल परिस्थितीत, शत्रूची बाजू लष्करी व तांत्रिकदृष्ट्या सरस असतानाही केवळ उत्तुंग देशभक्ती, मातृभूमीवरील अविचल निष्ठा आणि कुशल लष्करी डावपेच यामुळे भारताने या युद्धांत विजय मिळवला. अपवाद फक्त 1962 च्या चीनबरोबर झालेल्या युद्धाचा. ‘हदी - चिनी भाई भाई’च्या मोहजालात भारताला फसवून चीनने त्याचं खरं रुप दाखवलं आणि पुरेशी संरक्षणसिद्धता नसलेल्या भारताला पराभव पत्करावा लागला. फाळणीच्या काळात नेहरुंच्या मखमली मोज्याच्या आत सरदार पटेलांचा पोलादी पंजा असल्याने पाकिस्तानचे अध्यक्ष महमदअली जीना यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला आळा बसला होता. पाकिस्तानच्या पहिल्या आक्रमणावेळी पटेलांना विश्वासात न घेताच नेहरुंनी शस्त्रबंदी जाहीर केली आणि घुसखोरांविरुद्धची कारवाई थांबवली.
धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला आलं. भारतद्वेषाने पछाडलेल्या पाकिस्तानने भारतावर चार युद्धं लादली. पहिल्याच आक्रमणात पाकिस्तानने काश्मीरमधील मोठा भूभाग ताब्यात घेतला. तो ‘पाकव्याप्त काश्मीर’ अजूनही आपण परत घेऊ शकलो नाही मात्र प्रत्येक युद्धात पराभव होऊनही पाकिस्तानची खोड काही जिरली नाही. दहशतवादी कारवायांनी भारताला त्रस्त करत असतानाच पाकिस्तानने प्रत्येक करारात स्वतःचं हित साधलं.
असं म्हटलं जातं की परमेश्वर आणि सैनिकांची केवळ संकटकाळातच आठवण होते. संकट टळलं आणि संघर्ष मिटला की देव विस्मृतीत जातो आणि सैनिक अडगळीत. भारतातही अगदी असंच झालं. युद्ध संपलं की नंतरच्या वाटाघाटीत सैन्याच्या म्हणण्याला फारसं महत्त्व मिळत नाही. युद्धात शत्रूला नुसतं धडा शिकवून चालत नाही तर त्याने पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी त्याचा पुरता बीमोड करायला हवा हे चाणक्य नीतीतलं मुख्य सूत्र भारत वेळोवेळी विसरला.
सज्जनतेच्या निकषांवर भारताचं नेतृत्व वादातीतपणे श्रेष्ठ असलं तरी कूटनीतीच्या निकषावर ते कसोटीला उतरलं नाही असंच म्हणावं लागेल. शास्त्रीजी, इंदिराजी यांच्यापासून अगदी कारगील युद्धात विमानदलाचा वापर न करणाऱ्या व मर्यादित शक्ती वापरून आक्रमणाला उत्तर देणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्याबाबतही असंच म्हणता येईल.
ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले यांच्या ‘युद्धनेतृत्व’ या गाजलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत निवृत्त मेजर जनरल य. श्री. परांजपे यांनी म्हटलं आहे की, युद्धामागील राजकीय उद्दिष्ट हे शत्रूचा सर्वनाश करणं हे नसून अखेर संवाद करून शांतता प्रस्तापित करणं हे असतं. युद्ध करायचं ते शत्रूच्या प्रतिकाराचा निग्रह खिळखिळा करण्यासाठी. तो खिळखिळा झाला म्हणजे युद्धाची गरज संपते. काही अंशी हे खरं असलं तरी विद्वेषाने भरलेल्या, अत्यंत क्रूर अशा शत्रूच्या बाबतीत ते लागू पडणार नाही. अशा शत्रूच्या बाबतीतले मापदंड वेगळेच असायला हवेत.
ऑपरेशन गुलमर्ग
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात आणि अगदी नेमकं बोलायचं तर 68 दिवसांनी पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या मोहिमेला पाकिस्तानने नाव दिलं होतं ‘ऑपरेशन गुलमर्ग’. 22 ऑक्टोबर 1947 ला पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला सुरु झाला. टोळीवाल्यांच्या वेशात पाकिस्तानी सैन्य भारतात घुसवायचं व थेट श्रीनगर जकून काश्मीर ताब्यात घ्यायचं असा पाकिस्तानचा इरादा होता. पहिल्याच दिवशी भारताने डोमेल ही लष्करी चौकी गमावली. पाक सैनिकांनी मुझफ्फराबाद जकलं आणि ते बारामुल्लाच्या दिशेने वेगाने यायला लागले. पाकिस्तानच्या एका तुकडीने गिलगीटवर हल्ला केला. अचानक आणि अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे भारताला फारसा प्रतिकार करता आला नाही. नोव्हेंबरच्या सुरुवातीला संपूर्ण गिलगिट पाकिस्तानच्या ताब्यात गेलं. कारगिल, द्रास, उरी, जांगेर, किशनगंगा, नौशेरा या भागातही पाकिस्तानने जोरदार हल्ले चढवले. भारताने स्कार्दू हे महत्त्वाचं लष्करी ठाणंही गमावलं. आज आपण ज्याला पाकिस्तान व्याप्त काश्मीर म्हणतो तो सर्व भाग पाकिस्तानने जकून घेतला. पाकिस्तानी सैन्याने श्रीनगरच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली.
सरदार पटेलांना या धोक्याची पूर्ण कल्पना आली होती. त्यावेळचे एक केंद्रीय मंत्री न. वि. गाडगीळ यांनी एक छान आठवण लिहिली आहे. सरदारांनी एके दिवशी त्यांना बोलवून घेतलं. जम्मू ते पठाणकोट भागातल्या अतिशय दुर्गम प्रदेशातला 65 किलो मीटर लांबीचा रस्ता तातडीने बांधण्याची सूचना त्यांनी गाडगीळांना दिली. जुलै 1948 पूर्वी हा रस्ता बांधून झाला पाहिजे असं सरदार निक्षून सांगत होते. ‘हे काम संरक्षण मंत्रालयाचं आहे’ असं न.वि. म्हणाले पण ‘तुम्हीच तो बांधा, हवी ती मदत ताबडतोब मिळेल’ असं सरदार म्हणाले. त्यानंतर अवघ्या 15 दिवसात त्या रस्त्यावरील पुलांसाठी लागणारं स्टील पठाणकोटला आलं. देशाच्या वेगवेगळ्या भागातून 10 हजार कामगार पठाणकोटला पोहोचले. सगळे मिळून 40 हजारांपेक्षा जास्त लोक या कामावर लावले गेले. पाहता पाहता 54 मैलांचा हा रस्ता व 11 मैलांचे पूल बांधून पूर्ण झाले. दुर्दैवाने सरदारांसारखी तत्परता व दूर दृष्टी अन्य नेत्यांकडे नव्हती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे भारतीय लष्कराची कुमक योग्य वेळी काश्मीरमध्ये पोहोचली व भारताच्या शूर जवानांनी प्राणांची बाजी लावून प्रतिहल्ला केला. भारतीय सैन्याने जोरदार मुसंडी मारत शत्रूला मागे रेटले. भारतीय सैन्य डोमेलपर्यंत पोहोचले. पाकिस्तानने जकलेला सगळा भूभाग भारत मुक्त करु शकला असता पण त्याचवेळी भारताने युद्धबंदी स्वीकारली. हाच तो भारतासाठी नामुष्कीचा ठरलेला कराची करार.
या करारानुसार दोन्ही देश 31 - डिसेंबर - 1 जानेवारीच्या रात्रीपासून युद्धबंदी मान्य करतील, असं ठरलं. कोणताही देश कोणत्याही बाजुला लष्कराची जमवाजमव करणार नाही, दोन्ही देश आपापलं सैन्य मागे घेतील आणि संयुक्त राष्ट्रांचं पथक युद्धबंदीवर लक्ष ठेवील अशी कलमं त्या करारात होती. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी सैन्य सर्व आघाड्यांवर मार खात असताना भारताने ही युद्धबंदी स्वीकारण्याची गरजच नव्हती. पाकिस्तानने जकलेला काश्मीरचा भाग भारताला सहजपणे मुक्त करता आला असता पण तो खंबीरपणा भारतीय नेतृत्वाला दाखवता आला नाही.
नेहरुंची घोडचूक
याच सुमारास पंडित नेहरुंनी 28 ऑक्टोबर रोजी आकाशवाणीवरुन केलेल्या भाषणात ती घोडचूक केली. ‘भारत काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली जनमत घेण्यास तयार आहे’ असं जाहीर केलं. ‘प्लेबिसिट’ हा शब्द नेहरुंनी वापरला. तोच शब्द भारताला आजपर्यंत छळत आहे. पाकिस्तानने या युद्धबंदीचा फायदा घेऊन जकलेला भाग स्वतःच्या ताब्यात ठेवला. भारत तो आजपर्यंत परत घेऊ शकला नाही.
पण ही कहाणी इथं संपली नाही!
या आपगमावू युद्धबंदीचं 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाइतकं विदारक उदाहरण दुसरं सापडणार नाही.
Wars may be fought with weapons, but they are won by men. It is the spirit of the men who follow and the man who leads that gains the victory.
दुसऱ्या महायुद्धात आपल्या वादातीत शौर्याने तळपणाऱ्या जनरल जॉर्ज पॅटन या अमेरिकन सेनाधिकाऱ्याचं वरील वाक्य युद्धनेतृत्व म्हणजे काय हे नेमकेपणाने सांगणारं आहे.
जनरल जॉर्ज पॅटन यांना फील्डमार्शल असा किताब नव्हता पण ते त्या दर्जापर्यंत पोहोचलेले सेनानी होते. पहिल्या महायुद्धातही त्यांनी भाग घेतला होता. दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकेच्या रणगाडादलाचे कमांडर होते. त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि रणगाडा लढाईतील नैपुण्यामुळे अमेरिकेच्या एम 46 या रणगाड्याला त्यांचंच नाव देण्यात आलं होतं. हा पॅटन रणगाडा त्या काळात अभेद्य आणि अजक्य मानला जाई. अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध वापरण्यासाठी हेच पॅटन रणगाडे दिले होते. 1965 च्या युद्धात भारतीय जवानांनी या रणगाड्यांचा धुव्वा उडवला.
जनरल पॅटन यांचं आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे. सैनिकांविषयी बोलताना ते नेहमी म्हणत, Don't tell people how to do. Only tell them what to do and let them surprise you with their results.
1965 च्या युद्धात नेमकं असंच घडलं. अत्याधुनिक शस्त्रांपेक्षा जवानांचं शौर्य आणि अधिकाऱ्यांचे कल्पक डावपेच वरचढ ठरले. त्यामुळेच अमेरिकेच्या सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या पॅटन रणगाड्यांना भारताच्या आधीच्या जनरेशनच्या रणगाड्यांनी पाणी पाजलं.
रणगाडा युद्धाचा थरार
इंग्लंडने प्रथम रणगाडे बनवले पण त्यांचा कल्पक वापर जर्मनीने प्रभावीपणे केला. दुसऱ्या महायुद्धानंतरचं रणगाड्याचं तुंबळ युद्ध म्हणजे 1965 चं भारत-पाकिस्तान युद्ध होय. या युद्धात दोन्ही देशांनी युद्धभूमीवर आपले रणगाडे अक्षरशः ओतले होते. पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचे पॅटन हे सुसज्ज व अद्ययावत रणगाडे मोठ्या संख्येने होते पण कल्पक डावपेच आणि जवानांच्या निर्धाराचा अभाव यामुळे पाकिस्तानी रणगाड्यांची ही अभेद्य फळी तुलनेने तेवढे सरस नसलेल्या भारतीय रणगाड्यांपुढे फारसा टिकाव धरू शकली नाही.
या युद्धात भारताची सरशी होत होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची सुवर्णसंधी भारतासमोर उभी होती पण युद्ध भारताच्या बाजूने झुकत असतानाच भारताने अनपेक्षितपणे युद्धबंदी मान्य केली. भारताकडे शूर योद्धे होते पण तहात जकणारे चिवट मुत्सद्दी नव्हते असंच म्हणावं लागेल.
दुसऱ्या महायुद्धात सर्वांनाच अचंबित करणाऱ्या डंकर्कच्या माघारीच्या घटनेची यासंदर्भात आठवण होणं स्वाभाविक आहे. एक चमत्कार म्हणून ज्या घटनेकडे पाहिलं जातं ती डंकर्क येथून ब्रिटिशांनी घेतलेल्या माघारीची घटना अशीच अनाकलनीयच मानली जाते.
तो दिवस होता 24 मे, 1940.
जर्मनीच्या वेगवान हल्ल्यांपुढे दोस्तांच्या सेनेची पुरती वाताहत झाली होती. त्यांची संपर्क यंत्रणाही पार कोलमडली होती. जर्मन फौजांशी लढा द्यायचा की माघार घ्यायची याबाबतचा निर्णय त्यांना घेता येत नव्हता. लढायचं असेल तर कुठलं शहर लढवायचं, त्याची योजना काय असेल याचा कुणालाच थांगपत्ता नव्हता. या काळात जर्मन सेनानी गुडेरियनने कॅले शहराला वेढा घालून ब्रिटिशांची पुरती कोंडी केली होती. याचवेळी जर्मन सैन्याने बेल्जियमच्या बाजूने रेटा देत डंकर्कपासून 30 मैलांपर्यंत धडक मारली. सुमारे साडेतीन लाख ब्रिटीश सैन्य त्या भागात कोंडीत सापडले होते. फार तर एक-दोन दिवसांचा प्रश्न होता.
ब्रिटीश फौजांना जर्मन फौजांनी पुरते घेरले होते. फ्लँडर्स आणि कॅले या दोन्ही शहरांच्या दरम्यान ब्रिटीश सैन्य अडकून पडलं होतं पण त्या सैन्यात जर्मन सैन्यावर प्रतिहल्ला करण्याचं त्राणच उरलेलं नव्हतं. जर्मन सैन्याने मधली एक नदी ओलांडली असती तर तिथं असलेल्या सुमारे 3 लाख 50 हजार ब्रिटीश सैन्यामधला एकही सैनिक परत जाऊ शकला नसता पण जर्मन सैन्य त्या ‘आ’ नदीच्या तीरावर येऊन पोहोचलं असताना ‘जिथं आहेत तिथंच थांबा’ असा आदेश त्या सैन्याला देण्यात आला. हा सख्त हुकूम थेट हिटलरकडून आला होता.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरकडून झालेली ही पहिली लष्करी चूक होती. डंकर्कच्या दिशेने झेपावणाऱ्या जनरल गुडेरियनच्या पँझर फौजा तीन ते चार दिवस तिथेच पुढच्या आदेशाची वाट पाहत, हात चोळत उभ्या राहिल्या. या काळात डंकर्क बंदरातून सुमारे तीन लाख ब्रिटीश सैन्य सुखरुपपणे बाहेर पडलं.
अनाकलनीय
जर्मन सेनापती जनरल क्लाईस्ट म्हणाला, की या आदेशात काही तरी चूक असेल म्हणून मी माझे सैन्य नदीच्या पलीकडे नेण्याची तयारी केली पण मागे फिरण्याचा आणखी एक कडक हुकूम मला मिळाला. माझे रणगाडे तब्बल तीन दिवस नदीच्या अलीकडच्या तीरावर माशा मारीत बसले होते. हिटलरने हा आदेश दिला नसता तर युद्धाचं संपूर्ण चित्रच बदललं असतं.
या अनाकलनीय निर्णयामागे काहीही कारणं असोत पण त्याचा दुसऱ्या महायुद्धावर परिणाम झाला हे नक्की.
पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारताने स्वीकारलेल्या युद्धबंदीविषयीही असंच म्हणता येईल. ती का स्वीकारली हेही एक कोडंच आहे. आणखी देन दिवस जरी सरकारने लष्कराला मोकळीक दिली असती तर कदाचित वाटाघाटीत भारताची बाजू खूपच वरचढ ठरली असती आणि त्यामुळे सगळा इतिहासच बदलला असता.
20 सप्टेंबर 1965 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस ऊं थाट यांचा युद्धबंदी विषयीचा संदेश भारताला मिळाला. भारताने एकतर्फी युद्धबंदी स्वीकारावी हा त्यांचा आग्रह भारताने धुडकावला पण पाकिस्ताननेही युद्धबंदीला मान्यता दिल्यानंतर 23 सप्टेंबर 1965 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ही युद्धबंदी अंमलात आली.
भारताने युद्धबंदी थोडी उशीरा स्वीकारली असती तरी भारतीय लष्कराने पाकिस्तानला पुरती अद्दल घडवली असती. त्यावेळी भारतीय जवानांची विजयी घोडदौड सुरु होती आणि पाकिस्तानी सैन्य शस्त्रास्त्रं टाकून माघारी पळत होतं. भारतीय सैन्य लाहोरच्या वेशीवर धडका मारत होतं. त्यावेळी लाहोर ताब्यात घेतलं असतं तर पाकिस्तान अर्धमेलं झालं असतं.
डंकर्कमध्ये गुडेरियनच्या फौजांना थांबविण्यामागे हर्मन गोअरिगचा हात होता हे नंतर उघड झालं.
1965 च्या युद्धात असं काही झालं होतं का याचा अभ्यास व्हायला हवा.
संरक्षण मंत्रालयाने 1992 मध्ये प्रसिद्ध केलेल्या Official war history, 1965 या गोपनीय कागदपत्रात एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून भारतावर युद्धबंदी स्वीकारण्याबाबत सातत्याने दबाव येत होता. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी लष्कर प्रमुख जनरल जे. एन. चौधरी यांना त्याबाबत सल्ला मागीतला होता. शास्त्रीजींनी विचारलं होतं की ‘जर भारतीय सैन्य युद्ध आघाडीवर जकत असेल तर युद्धबंदीची घोषणा मी थोडी लांबवू का?’
त्यावर जनरल चौधरींनी त्यांना सांगितलं की, सीमेवरचा आपला दारुगोळा बहुतांश संपत आला आहे. फार थोडा दारुगोळा शिल्लक आहे. त्याबरोबरच आपले खूप रणगाडे नष्ट कवा निकामी झाले आहेत. युद्ध लांबण्यानं आपलं नुकसान होऊ शकतं.
खुद्द लष्कर प्रमुखांकडूनच असं उत्तर मिळाल्यामुळे शास्त्रीजींचा कदाचित नाईलाज झाला असावा पण त्यावेळेपर्यंत भारतीय लष्कराने फक्त 14 टक्के दारुगोळाच वापरला होता आणि रणगाड्यांच्या बाबतीतही पाकिस्तानचं झालेलं नुकसान भारताच्या दुप्पट होतं असं युद्धानंतर प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून स्पष्ट झालं. भारतीय जवानांनी या युद्धात इतके पाकिस्तानी रणगाडे नष्ट केले की खेमकरण भाग पाकिस्तानी रणगाड्यांचं कबरस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला.
या युद्धात भारताने पाकिस्तानचा 1920 चौ. कि.मी. भूप्रदेश जकला होता. त्याउलट पाकिस्तानने मात्र भारताचा 550 चौ. कि.मी. भूप्रदेश जकला होता.
यावरुन युद्धबंदीची खरी गरज पाकिस्तानला होती हे स्पष्ट होतं.
आणखी एक मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून ताब्यात घेतलेला पाकव्याप्त काश्मीरचा भाग तेव्हाही पाककडेच होता. हा भूभाग आणि एकूणच काश्मीर प्रश्न हा भारताची कायमची डोकेदुखी बनला आहे.
1965 च्या युद्धात भारतीय सैन्य निर्विवादपणे विजयी ठरत असताना अचानक युद्धबंदी स्वीकारण्याचं भारताला काहीच कारण नव्हतं. किमान नंतरच्या वाटाघाटीत तरी भारताने ‘पाकव्याप्त काश्मीर’चा प्रश्न सोडवून घ्यायला हवा होते.
‘न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार अरिफ जमाल यांनी म्हटलं होतं की ‘India's victory was nearly total. Still India accepted the ceasefire.'
Davin Hagerty यांनी South Asia या त्यांच्या पुस्तकात म्हटलंय, The invading forces outfought their counterparts and halted their attack on outskirts of Lahor. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने युद्धबंदी स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
हाजी पीरही गमावली
10 जानेवारी 1966 ला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल आयुबखान यांच्यात ताश्कंद इथं करार झाला. हाच तो प्रसिद्ध ‘ताश्कंद करार’! त्याच दिवशी रात्री शास्त्रीजींचं ताश्कंदमध्येच हृदयविकाराने निधन झालं पण एकूणच हा करार भारताच्या दृष्टीने फारसा आशादायक नव्हता. निदान भारत विजेता असल्याचं त्यात कुठेही दिसत नव्हतं.
पाकिस्तान नैसर्गिकदृष्ट्या उंचावर असल्याने 1965 च्या युद्धात भारताचं खूप नुकसान झालं. हाजी पीर खड भारतीय जवानांनी प्राणपणाने जकली. ती जकताना भारतीय जवान फार मोठ्या संख्येने धारातीर्थी पडले. लष्करीदृष्ट्या ही खड भारताच्या ताब्यात असणं अतिशय आवश्यक होतं. त्या खडीवर ताबा मिळवण्यासाठी भारताने फार मोठी कमत मोजली होती. नंतरच्या वाटाघाटीत निदान ही खड तरी भारताने आपल्या ताब्यात ठेवायला हवी होती पण भारताला लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या खडीवरचा ताबा सोडावा लागला.
कारगीलचा उंचीवरचा भागही पाकिस्तानच्या ताब्यात होता. त्याचाच गैरफायदा घेऊन पाकिस्तानने पुढे भारतावर कारगीलचं युद्ध लादलं. पाकिस्तानच्या या युद्धखोर वृत्तीला पायबंद घालण्याची एक चांगली संधी 1965 च्या युद्धाच्या वेळी भारताला मिळाली होती.
भारताच्या अति चांगुलपणाच्या दोन गोष्टींचा उल्लेख ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी त्यांच्या लालबहादूर शास्त्री यांच्याविषयीच्या पुस्तकात केला आहे. सी. पी. श्रीवास्तव यांच्या पुस्तकाच्या अशोक जैन यांनी केलेल्या अनुवादात हे उल्लेख आहेत.
सधु करारानुसार भारताने पाकिस्तानला 80 कोटी रुपये समभागात द्यायचे होते. त्यापैकी पाच भाग देऊन झाले होते. सहावा भाग देण्याची वेळ या युद्धाच्या काळात आली. भारताने ती रक्कम देऊ नये असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं मात्र ‘आपण ती रक्कम प्रामाणिकपणे पाकिस्तानला दिली पाहिजे’ अशी भूमिका पंतप्रधान शास्त्रींनी घेतली. ‘दिलेली वचनं पाळायलाच हवीत’ असं शास्त्रीजी त्यासंदर्भात म्हणाले होते. (संदर्भ - लालबहादूर शास्त्री - राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम, पृष्ठ क्र. 241)
आपण एवढं चांगलं वागलो. पाकिस्तानने किती वचनं पाळली?
हाजीपीरचा विषय चर्चेत निघाला तेव्हा ‘हाजीपीर खडीच्यापायी शांततेचा बळी देणं योग्य होणार नाही. हाजीपीरचा विषय फार ताणू नये’ असा सल्ला त्यावेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिला. (संदर्भ - लालबहादूर शास्त्री - राजकारणातील मर्यादा पुरुषेत्तम, पृष्ठ क्र. 284)
आपण हाजीपीर खड सोडून दिली. शांतता प्रस्थापित झाली?
आणखी एक मुद्दा इथं उद्धृत करावासा वाटतो. संदर्भ अशोक जैन यांच्या पुस्तकातलाच.
गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता 19 सप्टेंबर 1965 रोजी, म्हणजे युद्धबंदी स्वीकारण्याआधी अवघे दोन दिवस आधी एका खासगी विमानाने कच्छच्या सीमेकडे गेले होते. ते टेहळणी विमान आहे असं समजून पाकिस्तानी हवाईदलाने ते पाडले. त्यात मेहता, त्यांची पत्नी, वैमानिक (हवाईदलाचा निवृत्त वैमानिक) आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. देशाचा एक मुख्यमंत्री शत्रूराष्ट्राकडून मारला जातो आणि आपण अगदी सहजतेने युद्धबंदी स्वीकारतो. आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही?
माघार कशासाठी?
शास्त्रीजींनी युद्धबंदीची माहिती जेव्हा संसदेत दिली त्यावेळी अनेक सदस्यांनी युद्धबंदी रेषा बदलावी असी मागणी केली. 5 ऑगस्ट 1949 रोजी ही युद्धबंदी रेषा आखली होती व नव्या योजनेनुसार भारतीय सैन्य तिथपर्यंत माघार घेणार होतं.
यावर आचार्य जे. बी. कृपलानी म्हणाले, ज्यांना भूगोल ठाऊक नाही अशा माणसांनी ही रेषा आखली आहे. त्यांना भूगोलाचं ज्ञान असतं तर हाजी पीर खड त्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात ठेवू दिली नसती. ही रेषा लष्कराच्या दृष्टिकोनातून व शास्त्रशुद्ध रीतीने आखलेली नाही. जागतिक मताची समजूत घालण्यासाठी ती घाईघाईने आखण्यात आली आहे. हाजी पीर खडीसारखी युद्धबंदी रेषेच्या पलीकडची ठाणी भारताने आपल्या ताब्यात ठेवली पाहिजेत. (संदर्भ - लालबहादूर शास्त्री - राजकारणातील मर्यादा पुरुषोत्तम, पान क्र. 230)
युद्धबंदी मान्य करायला लष्कराचे अधिकारी व बहुतांश जवान तयार नव्हते. एअर मार्शल अर्जन सग यांनी या संदर्भात म्हटलं आहे की, आणखी काही काळ युद्ध चालू राहिलं असतं तर पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला असता. Had the war continued for a few more days, we would have gained a decisive victory. I advised then Prime Minister not to agree the ceasefire. But i think, he was pressured by the UN and some countries.
मात्र इतिहासापासून काही शिकायचंच नाही असंच भारतीय नेतृत्वाने ठरवलं असावं. 1971च्या युद्धात पाकिस्तानचा निर्णायक पराभव झाला. बांगलादेश निर्माण झाला पण 2 जुलै 1972 ला झालेल्या सिमला करारात आपल्या पदरी काहीच पडलं नाही. या युद्धात पाकिस्तानचे 93 हजार सैनिक युद्धकैदी म्हणून आपल्या ताब्यात आले होते पण पाकव्याप्त काश्मीर तर सोडाच, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले आपले 51 युद्धबंदीही आपण सोडवून घेतले नाहीत.
‘काश्मीर प्रश्नात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नको’ हा या करारातला सर्वात महत्त्वाचा व गवगवा झालेला मुद्दा! पण पाकिस्तानने तो कधीच मानला नाही. पाकिस्तानने तो प्रश्न सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. वास्तविक काश्मीर हा प्रश्नच नाही अशी भूमिका भारताने घ्यायला हवी होती व पाकिस्तानकडून तसे वदवून घ्यायला हवे होते.
निष्फळ वाटाघाटी
कारगील युद्धात आपला विजय झाला खरा पण त्या युद्धात आपलं फार जास्त नुकसान झालं. आपण हवाईदलाचा प्रभावी वापर केला असता तर ते टळलं असतं. वाजपेयींचे शांतीचे प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी कारगील युद्ध घडवून आणलं. भारताने त्यांना युद्दात पाणी पाजलं पण नंतर 14 ते 16 जुलै 2001 रोजी झालेल्या आग्रा इथल्या वाटाघाटीत मुशर्रफ हे जेत्याच्या आविर्भावात आले होते. दहशतवादाच्या मुद्यावरुन ही बोलणी फिसकटली.
पाकिस्तानसारख्या शत्रूशी लढताना आपण या गोष्टींचा विचार करायलाच हवा.
अकरा वेळा हल्ले करणाऱ्या मोहम्मद घोरीला माफ करून अभय देणाऱ्या पृथ्वीराज चौहानची परंपरा आपल्या इतिहासात अनेकदा दिसली आहे. दुर्दैवाने 1949, 1965, 1971 आणि कारगील युद्धापर्यंत ती कायम राहावी हे दुर्दैव.
ऑपरेशन सदूरनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची आणखी एक संधी भारताला मिळाली होती. पाकिस्तान गुढग्यावर शरण आलं होतं पण बिनशर्त युद्धबंदी स्वीकारून भारताने ती संधी गमावली. किमान पाकिस्तानी कैदेत खितपत पडलेल्या कुलभूषण जाधव यांना भारताने सोडवून घ्यायला हवं होतं.
शौर्य, पराक्रम, बलिदान याबाबत भारत कधीच कमी पडत नाही. मग नेमक्या वाटाघाटीतच तो का कमी पडतो? अगदी नरेंद्र मोदींसारखं कणखर नेतृत्व असतानाही?
युद्धवीरांचे पोवाडे गाताना अशा गोष्टींचाही गंभीरपणे अभ्यास व्हायला हवा.
- भगवान दातार
ज्येष्ठ संपादक
.jpg)




