top of page

क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket and Life Management Marathi

  • Apr 28
  • 3 min read

45 वर्षे मी नोकरी करत होतो. त्यातली शेवटची 20-25 वर्षे व्यवस्थापन म्हणजे अर्थातच मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होतो. त्यामुळेच की काय मॅनेजमेंट या विषयाची मला जरा जास्तच आस्था आहे. त्यात कुठल्याही गोष्टीचे मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन जर का नीटनेटके आणि नियोजनबद्ध असेल तर त्याची फलश्रुती ही कायम चांगलीच असते हा माझा तरी अनुभव आहे.  मला तर दर पाच वर्षांचे नियोजन करून त्यानुसार योजनाबद्ध पद्धतीने वागायला फार आवडते. आयुष्य कसे विनासायास जायला मदत होते आणि ते जगायलाही मज्जा येते. ‌‘जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे, कर्म तू करीत राहा, फळ ज्याचे त्यातच आहे,‌’ असेच म्हणावेसे वाटते.  



जन्माला आल्यावर जगणे हे ओघाने आलेच. ‌‘रडत कुढत जगायचे की हसत हसत जगायचे‌’ हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचे काय आहे, किडे-मुंग्याही जगतातच की! इथेच आपण गल्लत करतो. जगणे ही एक कला आहे.  हे मात्र या छोट्याशा जीव जंतुकडून शिकण्यासारखे आहे.  व्यवस्थितपणे नियोजन करून, शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगले तर आपले तर आयुष्य सुखकर जातेच जाते पण आपल्याशी निगडित असलेल्या इतरांचेही आयुष्य विनासायास जाण्यास मदत होते.  अर्थात त्यासाठी आयुष्यात योग्य त्या मॅनेजमेंटची म्हणजेच व्यवस्थानाची गरज असते, जी की हे छोटेसे जीव जंतूही नैसर्गिक पद्धतीने करत असतात. माणसांना मात्र हे मॅनेजमेंट/व्यवस्थापन शिकवावे लागते.


त्याचीच प्रचिती मला सातारा येथे आयोजित 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नाशिकच्या डॉ. गिरीश पाटील यांच्या ‌‘क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट‌’ ह्या व्यक्तिमत्त्व विकास विषयावरील पुस्तकाच्या प्रकाशनाने आली. ‌‘चपराक प्रकाशन‌’ने प्रकाशित केलेले हे अजून एक अत्यंत वेगळ्याच धाटणीचे पुस्तक माझ्या हातात पडले. मी ते वाचले आणि मला या पुस्तकाचा विषय खूपच आवडला म्हणून थोडेसे त्याबद्दल व्यक्त व्हावेसे वाटले.  


मॅनेजमेंट ह्या एका अत्यंत अवघड विषयाची, क्रिकेट ह्या सगळ्यांच्या आवडत्या खेळाशी सांगड घालून प्रा. डॉ. गिरीश पाटील यांनी आयुष्याच्या व्यवस्थपनाचे अत्यंत थोडक्यात विवेचन केले आहे. थोडासा क्लिष्ट वाटणारा पण तितकाच महत्त्वाचा विषय गिरीश पाटील यांनी इतक्या सहजपणे उलगडून सांगितला आहे की हे पुस्तक हातात घेतल्यावर ते वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवावेसेच वाटत नाही.


आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की क्रिकेटची मॅच सुरू होते ती टॉस करून म्हणजेच ‌‘छापा आणि काटा‌’ करून होते. सामना सुरू होतो, एक संघ टॉस जिंकतो तर दुसरा हरतो. अगदी इतकी साधी सोपी वाटणारी क्रिया जेव्हा लेखक तिला आपल्या आयुष्याशी जोडून आपण आयुष्यात निर्णय घेताना संधीचे कसे सोने करायचे हे अतिशय सोप्या भाषेत सांगून वाचकांशी संवाद साधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.


क्रिकेटच्या सामन्यातील कर्णधाराची तुलना लेखक एकदम आपल्या सामान्य आयुष्यातील नेतृत्व कौशल्यावर विवेचन करून वाचकाला थोडासा सकारात्मक उपदेश देतात. तसेच आपल्याला क्रिकेटमधील तिसरा पंच व त्याची सामन्यातील भूमिका समजावता समजावता आपल्या आयुष्यातील नियती आणि नशीब ह्या जीवनातील तिसऱ्या पंचांची आठवण करून देतात. लेखक सचिन तेंडुलकरची बॅट बोलते हे उदाहरण देऊन आपल्या कर्तृत्वाने निंदकांचे तोंड बंद करण्याचा सल्लाही देतात.


क्रिकेटच काय कुठल्याही खेळात सराव हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. अगदी तो धागा धरून लेखक वाचकाला त्याच्या आयुष्यात कठोर परिश्रम, सातत्य, सचोटी आणि नीतीमत्ता याचे महत्त्व अधोरेखित करून आयुष्यात ह्या मूल्यांचा सराव करण्याचा मूलमंत्र देऊन जातात. क्रिकेट ह्या खेळातील प्रत्येक घटनेवर सूक्ष्म निरीक्षण करून गिरीश पाटील यांनी व्यवस्थापकीय कौशल्याची आपल्या वैयक्तिक आयुष्याशी सांगड घालून वाचकांना मोजक्या शब्दांत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.


क्रिकेट खेळाच्या अतपासून इतिपर्यंतच्या प्रत्येक घटनेवर आपल्या आयुष्याच्या व्यवस्थापनेचा परामर्श घेताना पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ‌‘कोठे थांबावे?‌’ हा प्रश्न उपस्थित करून वाचकाला गंभीर होऊन विचार करायला भाग पाडले आहे. आपले कार्य बहरत असताना अथवा त्याला उतरती कळा लागण्याच्या आत वेळेवर निवृत्त होणे हे कधीही फायद्याचे असते हा त्यांचा उपदेश नक्कीच भावणारा आहे. धकाधकीच्या आयुष्यात करण्यासारख्या खूप गोष्टी असतात, त्या योग्य वेळी घेतलेल्या निवृत्तीनंतरही करता येतातच हे मात्र मनाला एकदम पटतेच.


‌‘लाईफ मॅनेजमेंट‌’ अर्थात आयुष्याचे व्यवस्थापन हे दिसते तितके काही सोपे आणि सरळ नसते. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणूनच मला प्रा. डॉ. गिरीश पाटील यांना एक विनंती करायची आहे की त्यांचा व्यवस्थापन विषयातील दांडगा अभ्यास असून त्यांनी ह्या विषयावर अजून थोडे विस्तृत लेखन केल्यास वाचकांना नक्कीच फायदा होईल.


- रवींद्र कामठे

94212 18528

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६


क्रिकेट आणि लाईफ मॅनेजमेंट | Cricket aani life management
₹175.00₹131.25
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page