शोध आणि बोध
जगणे सुंदर व्हावे यासाठी आपण सगळेच अहोरात्र धडपडत असतो. मुळात सुखी, आनंदी आणि समृद्ध जीवन प्रत्येक सजीवाच्या वाट्याला यावे, हा तर आपल्या सर्वांचा नैसर्गिक अधिकार आहे; परंतु सृष्टीतील प्रत्येक जीव सुखी, समृद्ध आणि संपन्न असेलच असे नाही. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, परंतु निसर्गाची मानवाला लाभलेली ही देण आपण कशी स्वीकारतो, यावर माणसाच्या सुखाच्या कल्पना अवलंबून असतात.

जीवन जगताना माणसाचे जगणे अव्याहतपणे सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हेलकावत असते. सुखासाठी आपण अहोरात्र धडपडतो, परंतु ते मिळेलच याची शाश्वती नाही. मिळालेच तर ते कायम टिकेल, याचाही भरोसा नाही. मुळातच आपण जगतो कशासाठी? अर्थातच सुख-समाधान आणि आनंदासाठीच ना? आपल्या मानवजन्माचे सार्थक व्हावे हे तर प्रत्येकालाच वाटते, परंतु ते होतेच असे नाही. नेमका हाच धागा पकडून श्री. हिरालाल पगडाल यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याच्या उद्देशाने काही चिंतन केले, विचार केला. अवतीभोवतीच्या अनुभवांचा संचय त्यांच्या मनी दाटला अन् त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि अनुभवांच्या संकलनातून साकार झाली, ती प्रत्येकाला आत्मचिंतनाकडे घेऊन जाणारी एक सुंदर कलाकृती. ‘शोध आणि बोध’ हे त्या ग्रंथाचे नाव.
हा चिंतन ग्रंथ ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून आकाराला आला. महाराष्ट्रातील विविध सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांकडे सूक्ष्मतेने पाहून सातत्याने आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या खास अशा व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण केली असे आमचे मित्र, संशोधक आणि धडाडीचे पत्रकार म्हणजे श्री. घनश्याम पाटील. ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील असंख्य लेखक, कलावंत, युवक यांना ज्यांनी लेखनाचे बळ दिले, प्रेरणा दिली, लेखन चळवळ निर्माण केली आणि ‘चपराक’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. घनश्याम पाटील. त्यामुळे ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यमातून जेव्हा एखादा ग्रंथ आकाराला येतो, तेव्हा त्या ग्रंथाच्या साहित्यिक मूल्यांच्या बाबत निश्चितच महाराष्ट्रातील तमाम वाचकांच्या मनात आदराची भावना तयार होते. प्रस्तुत ‘शोध आणि बोध’ या ग्रंथाचे लेखक श्री. हिरालाल पगडाल हेही त्याला अपवाद नाहीत.
त्यांच्या ‘शोध आणि बोध’ या ग्रंथामध्ये एकूण 17 चिंतनलेखांचा समावेश आहे. भेद सारे मावळू द्या इथपासून ते सत्य, विज्ञान, शेती, राष्ट्रभक्ती, अध्यात्म ते विविध धर्मसंप्रदायांचा त्यांनी घेतलेला धांडोळा इथपर्यंत. खऱ्या अर्थाने वाचकांना चिंतनप्रवृत्त करणारे हे लेख आहेत. थोड्या अधिक प्रमाणात आपल्या सर्वांच्याच अवतीभोवती ज्या ज्या घटना, घडामोडी घडत राहतात, अशा प्रत्येक गोष्टींचे प्रतिबिंब प्रस्तुत ग्रंथांमध्ये पडत असल्याने वाचक, रसिक म्हणून श्री. हिरालाल पगडाल लिखित हा ग्रंथ आपल्याला आपला वाटतो. प्रस्तुत ग्रंथातील प्रत्येक लेखातील चिंतन आपल्याला अंतर्मुख केल्यावाचून राहत नाही. मुळात कोणत्याही साहित्याकडे पाहताना आपण समाजमनाचा विचार करत असतो. साहित्य हे समाजाचा आरसा आहे असे बोलले जाते. त्यामुळे समाजाचे प्रतिबिंब ज्या साहित्यामध्ये पडते, ते साहित्य वाचक, रसिकांना अंतर्मुख करते आणि ही अंतर्मुख करण्याची किमया लेखक हिरालाल पगडाल यांनी प्रस्तुत ग्रंथामधून साधलेली आहे.
देशाच्या राजधानीमध्ये युवकांनी नुकतेच मोठे आंदोलन केले. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर इतिहास घडवणाऱ्या जेन झी पिढीने व्यवस्थेला हलवले. अहिंसा आणि संविधानाची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या या तरुण पिढीला या ग्रंथाच्या प्रारंभीच लेखकाने ‘शोध आणि बोध’ हा ग्रंथ अर्पण केला आहे. यावरून प्रस्तुत ग्रंथाच्या लेखकाची अहिंसा आणि संविधानाप्रती असलेली ओढ अधोरेखित होते. याच भूमिकेचे प्रतिबिंब देखील ‘शोध आणि बोध’ या ग्रंथामध्ये पडलेले जाणवते. येथे लेखकाच्या संवेदनशील आणि तरल मनाचा प्रत्यय येतो.
सुखाच्या कल्पना आपल्याला नेहमीच आनंद देत राहतात, परंतु प्रत्येक सुखाच्या पलीकडे लपलेले दुःख आपल्याला झेलावेच लागते. दुःखाशिवाय सुखाची प्राप्ती नाही. आज संपूर्ण जगच दुःखमूळ होऊन बसलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने योगदान देण्याची भूमिका म्हणजे हिरालाल पगडाल यांचा ‘शोध आणि बोध’ हा चिंतन ग्रंथ होय. आपापल्या कुवतीनुसार जग दुःखमुक्त करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले, तर जगण्याचा खरा आनंद आपल्या प्रत्येकाला घेता येईल हा आशावाद लेखक प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून जेव्हा व्यक्त करतात, तेव्हा निश्चितच साहित्य आणि समाजाचे परस्परावलंबित्व येथे अधोरेखित होते. हिरालाल पगडाल आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा संदेश देण्यामध्ये येथे यशस्वी होतात. ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले.
“दुरीतांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात!”
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील वरील पंक्तीमध्येच विश्वाचे कल्याण सामावले आहे. नेमके हेच सूत्र ‘शोध आणि बोध’ या ग्रंथामधील चिंतनशील लेखनामधून लेखक हिरालाल पगडाल आपल्यासमोर मांडताना दिसतात. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्रभूमी किती समृद्ध आहे, समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी संत विचारच किती श्रेष्ठ आहे, याचे दर्शन प्रस्तुत ग्रंथ अभ्यासताना वाचक म्हणून आपल्याला झाल्यापासून राहत नाही. आत्ममग्नतेपासून आत्मचिंतनाचा शोध घेण्यासाठी या ग्रंथाच्या प्रत्येक लेखातील विचार आपल्याला प्रवृत्त करतात. वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. त्यामुळे समाज हिताचा विचार करून लेखकाने व्यक्त केलेले चिंतन खऱ्या अर्थाने मानवाच्या उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरते.
अलीकडेच कोरोना काळ आपण सर्वांनी अनुभवला. सबंध मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न या काळात निर्माण झाला. आपल्या जीवाभावाचे अनेक लोक आपल्याला सोडून गेले. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलेला असताना लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण सगळे निवांत घरी बसून होतो. याच वेळेचा हिरालाल पगडाल यांनी सदुपयोग केला. विविध विषयांवर चिंतन केले आणि खऱ्या अर्थाने ‘शोध आणि बोध’ या प्रस्तुत ग्रंथाचा लेखनप्रपंच सुरू झाला. त्यांच्या चिंतनाची प्रक्रिया सुरू झाली. खरे तर विशाल आणि अनंत ब्रह्मांडाचा विचार केला, तर त्याच्या तुलनेत मानवी अस्तित्व किती नगण्य आहे, याचे प्रत्यंतर लेखकाला आले. सत्ता, पद, पैसा या सगळ्याच गोष्टी नश्वर आहेत. माणसा-माणसात भेदभाव करणे चूक आहे. अमानवीय आहे. हाच धागा पकडून हिरालाल पगडाल व्यक्त झाले. त्यांची लेखणी सज्ज झाली आणि सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी ‘भेद सारे मावळू द्या’ या शीर्षकाखाली चिंतन लेखमालेतील पहिला लेख लिहिला. तिथपासून ते प्रस्तुत ग्रंथातील सगळेच लेख लिहून होईपर्यंत ते थांबले नाहीत. अभ्यासपूर्ण आणि संशोधन वृत्तीचे दर्शन घडविणारे आणि त्याहीपलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा शोध घेणारे या ग्रंथातील लेख खऱ्या अर्थाने प्रत्येक वाचकाला चिंतन करण्यासाठी भाग पाडतात, ही या ग्रंथाची महत्त्वाची उपलब्ध म्हणावी लागेल.
‘सत्याचा शोध’ या लेखातून लेखक विश्वाच्या विराट आणि अनंत रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या ब्रह्मांडाचा शोध कोणी लावला? ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली? असे एक ना अनेक प्रश्न मानवी मनाला सतत पडत असतात. किंबहुना कुतूहल हे आपल्या सर्वांमध्येच असते. त्यामुळे चिकित्सक दृष्टिकोन असलेला माणूस विविध रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न कसा करतो, याचे प्रत्यंतर वरील लेखातून आपल्याला येते.
पृथ्वीतलावरील बुद्धिवान प्राणी म्हणून माणसाची गणना होते. त्याने चंद्रावर पाऊल ठेवले. समुद्राचा तळ धुंडाळला. विविध तंत्रे आत्मसात केली. गती आणि ऊर्जा यामध्ये मानवाने प्रचंड प्रगती केली. औषधांचा शोध लावला. अशा विविध गोष्टींकडे आपले लक्ष वेधून ‘जीवो, जीवस्य, जीवनम’ या चिंतन लेखातून हिरालाल पगडाल आपले लक्ष वेधतात. प्रस्तुत लेखातून जीव आणि जीवनाची महती लेखक आपल्याला सांगतातच. याशिवाय मानवाच्या ठायी असलेले अफाट कौशल्य देखील ते या ठिकाणी उद्धृत करतात. यावरून लेखकाच्या जवळ असलेल्या संवेदनशीलतेचे उत्तम दर्शन याठिकाणी घडते.
‘विकास मानवाचा’ हा चिंतन लेख मानवी उत्क्रांती आणि प्रगत होत गेलेली मानवी अवस्था याचे सखोल दर्शन आपल्याला घडवतो. येथे लेखकाच्या चिंतनशीलतेला सलाम करावासा वाटतो. अत्यंत सखोल आणि वेगळा विचार हिरालाल पगडाल या ठिकाणी व्यक्त करतात. लेखकाच्या मते जीवसृष्टी आणि मानवी उत्पत्तीबद्दल धर्म आणि विज्ञान यांच्यात मोठी मतभिन्नता आहे. बहुसंख्य धर्मग्रंथात जीवसृष्टी आणि मानवी उत्पत्ती ही देवाची निर्मिती मानलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत चिंतन लेखातील विचार खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनाच दिशादर्शक ठरतात, असे म्हणावेसे वाटते.
शेतीचा शोध ते जोर्वे संस्कृतीचे अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण दर्शन लेखकाने ग्रंथाच्या पाचव्या चिंतन पुष्पामध्ये घडविले आहे. बुद्धी आणि युक्तिच्या जोरावरच माणूस पृथ्वीतलावर टिकून आहे. शेतीचा शोध हा मानवी जीवनाच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि शेतीमुळे माणसांची भटकंती थांबली. एका ठिकाणी वस्ती करून माणूस राहू लागला, स्थिर झाला. झोपडीवजा घर बांधून शेतीजवळ राहू लागला. घर या संकल्पनेची ही सुरुवात होती. हाच धागा पकडून लेखकाने प्रस्तुत लेखामधून शेती संस्कृतीच्या वाटचालीचा सुरेख आढावा येथे घेतलेला आहे.
अग्निवर नियंत्रण मिळवणारा पृथ्वीतलावरील माणूस हा एकमेव प्राणी आहे. अग्नी निर्माण करून त्या अग्निचा हवा तसा वापर करण्याचे शास्त्र माणसाने टप्प्याटप्प्याने अवगत केले. तेव्हापासून माणूस शिजवलेले अन्न खात असल्याने त्याचे आयुर्मान देखील वाढले. या विषयाचा शास्त्रशुद्ध आढावा श्री. पगडाल यांनी ‘अग्निचा शोध आणि बोध’ या चिंतनपुष्पामध्ये घेतला आहे, तर इतिहास आपल्याला प्रेरणा देत असतो. इतिहास हा माणसाचा तसा आवडीचा विषय. माणसे इतिहासात रमतात. त्यात आपली अस्मिता शोधतात. इतिहासातील विविध पात्रांना आपण पुन्हा पुन्हा उजाळा देत असतो. अशा परिस्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणा लक्षात ठेवून आपल्याला वर्तमानात जगायचे असते. या अनुषंगाने शोध आणि बोध मधील ‘मानव तितुका एकची आहे’ या मथळ्याचे सातवे चिंतनपुष्प लेखकाने गुंफलेले आहे. सामाजिक न्यायाच्या चळवळीमुळे आपल्याकडील अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले. त्याला ज्ञान विज्ञानातील प्रगतीसह संतांनी, समाज सुधारकांनी आणि भारतीय संविधानाने देखील मोठा हातभार लावला. तथापि व्यवहारातील अस्पृश्यतेबरोबर मनातील अस्पृश्यता देखील कमी होण्याचा आशावाद प्रस्तुत चिंतन पुष्पातून लेखक व्यक्त करतात.
‘बलसागर भारत होवो’ या मथळ्याखालील पुष्प आपल्याला भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची आठवण करून देते. यावरून लेखकाच्या ठायी असलेली देशभक्ती, देशप्रेम, आत्मीयता इथे पदोपदी जाणवते.
श्री. हिरालाल पगडाल लिखित ‘शोध आणि बोध’ या ग्रंथातील नववे पुष्प लेखकाने स्त्रियांसाठी वाहिले आहे. स्त्री ही देवी नाही आणि दासीही नाही. ती फक्त आणि फक्त माणूसच आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. ती खूपच विदारक आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे लेखकाने वेधलेले लक्ष समाजव्यवस्थेला आत्मचिंतनाच्या प्रक्रियेकडे घेऊन जाते.
प्राचीन, बहुआयामी आणि गुंतागुंतीची संकल्पना म्हणजे धर्म. शोध आणि बोधमधील एक चिंतनपुष्प लेखकाने याच विषयाला वाहिलेले आहे. धर्म ही संकल्पना मानवाच्या उत्क्रांतीशी निगडित आहे. माणसाला संयम, करुणा आणि सहकार्य शिकवणारा धर्मच असतो. लेखक हिरालाल पगडाल यांचे धर्माविषयीचे हे मत सबंध समाजव्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालते, असे म्हटले तर मुळीच वावगे ठरणार नाही.
एकूणच प्रस्तुत ग्रंथातील सतरा चिंतन पुष्पांमध्ये आपल्याला सबंध मानव जातीच्या जन्माचे सार एकवटल्याचा प्रत्यय येतो. लेखक हिरालाल पगडाल यांच्या या लेखनप्रपंचाला सलाम करावा तेवढा थोडाच आहे... काय नाही या ग्रंथामध्ये? जीवन, वैराग्य, त्याग, संस्कृती, समाज, शेती, रुढी परंपरा, सण उत्सव, धर्म संस्कृती, देशभक्ती, वैज्ञानिक शोध, भारतीय ज्ञान परंपरा इत्यादी गोष्टींचा सुरेख संगम म्हणजे हिरालाल पगडाल यांचा ‘शोध आणि बोध’ हा ग्रंथ होय. श्री. पगडाल यांची सिद्धहस्त लेखणी आणि विचार चिंतन यापुढील काळात असेच सातत्याने बहरत राहो, मराठी वाङ्मयाच्या देदीप्यमान वाटचालीमध्ये लेखकाच्या लेखनाद्वारे मौलिक भर पडो आणि खऱ्या अर्थाने समाजहिताचा विचार करून समाजाला दिशा देणारे साहित्य निर्माण होवो हीच सद्भावना! श्री. हिरालाल पगडाल यांच्या पुढील वाङ्मयीन वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
-प्रा. डॉ. संदीप सांगळे
अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
.jpg)



Comments