top of page

हृदयस्पर्शी परिसस्पर्श | Marathi Book Review

  • 1 day ago
  • 3 min read

एखादे पुस्तक वाचायला घ्यावे आणि त्या पुस्तकाने आपल्या मनाचा ठावच घ्यावा असा सुवर्णयोग जुळून यायला फारच नशीब असावे लागते. त्यात अनुभवकथन अथवा चरित्र हा विषय तर मला फारच भावतो आणि समृद्ध करून जातो. लेखक जेव्हा हातचे काहीच न राखता आपला जीव ओतून त्यांचे अनुभव लिहितात ना तेव्हा ते लिखाण आपल्या हृदयाच्या हळव्या कोपऱ्याला अलगद स्पर्श करून नकळत आपल्या स्मृतिंना उजाळा देऊन आपल्याला कधी भाऊक करतात हेच कळत नाही. अगदी तोच अनुभव मला लेखक सयाजी शिंदे यांच्या ‌‘चपराक प्रकाशन‌’ने प्रकाशित केलेल्या ‌‘परिसस्पर्श‌’ ह्या  आत्मचरित्रात्मक कादंबरीने दिला. ‌‘परिसस्पर्श‌’ कादंबरी मला पन्नास वर्षे मागे माझ्या बालपणातच घेऊन गेली आणि तिच्या पानापानात मला अशी काय गुंतवत गेली की हे आत्मकथन थोड्या फार फरकाने माझेच आहे की काय अशी मला शंका येऊ लागली होती.


बालपणापासून ते निवृत्तीपर्यंतचे आयुष्यातले चढउतार सयाजी शिंदे यांनी अतिशय प्रांजळपणे, अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत केलेले अनुभवकथन ही ह्या कादंबरीची वाखणण्याजोगी बाब आहे.  लेखक सात वर्षाचे असताना त्यांच्या आईने त्यांच्या वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांना दगडाने घासून पुसून घातलेली आंघोळ आणि तयार करून एका झोपडीवजा शाळेत त्यांचे घातलेले नाव, पुढे त्या मुलाने शिकून सवरून स्वत:ला घडवलेल्या एका उत्तम, सुसंस्कारी, कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनाचा हा अत्यंत प्रेरणादायी प्रवास वाचतच राहावा असाच आहे.


ग्रामीण संस्कृतीचा बाज असलेली ही आत्मचरित्रात्मक कादंबरी सयाजी शिंदे यांच्या आयुष्यातील जिवंत अनुभवांनी इतकी ओतप्रोत भरलेली आहे की त्यांचा प्रत्येक अनुभव हा परिसस्पर्श होऊन बावनकशी सोन्यासारखा निखरतो आणि वाचकाला भावविभोर करतो. शिक्षणाबरोबरच बालपणात रानातले हुंदडणे, पाटाच्या पाण्यात पोहणे, कैरी, चिंचा, बोरे पाडून सवंगड्यांबरोबरची धमाल, मळ्यातल्या घराचा सहवास, लग्न कार्यात केलेली कमाल ह्या सर्व अनुभवांनी तर माझ्या पन्नास वर्षांपूर्वीच्या राहुरीतीलच गतस्मृतिंना उजाळा मिळाला.


मुळात एकत्र कुटुंब पद्धतीचे मनाला अतिशय भावणारे अनुभव आणि प्रसंग शिंदे यांनी त्यांच्या अनुभवकथनात इतके सुंदर गुंफले आहेत की काही काही प्रसंग वाचताना आपले डोळे आनंदाश्रुंनी कधी भरून येतात तेच समजत नाही. तसेच कादंबरीच्या शेवटी शेवटी त्याच एकत्र कुटुंबाला वडिलांच्या हयातीतच गेलेला तडा आणि त्यामुळे नात्यांची झालेली फरफट मन मात्र दु:खीकष्टी करून जाते. नाण्याच्या ह्या दुखऱ्या बाजूचे वास्तव दाखवण्यास लेखक अजिबात कचरत नाही हेच त्यांच्या प्रगल्भ प्रतिभेचे प्रतीक आहे असे म्हणावेसे वाटते. सयाजी शिंदे यांनी त्यांचे हे अनुभव कथन करताना कुठेही अतिशयोक्ती केलेली नाही अथवा कुठेही सहानभूतीची अपेक्षाही ठेवलेली नाही हे ह्या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे.


शिंदे यांची आपल्या आई-वडील, काका-मावशी, मित्र मंडळी, शाळेतील सहकारी आणि इतर वडिलधाऱ्यांप्रती असलेली आदराची भावना अत्यंत निस्वार्थी वाटते. मुळात पाच भावंडांत (म्हणजे तीन भाऊ आणि दोन बहीणीत) त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्यांनी कुठेही कधीही तडा जाऊ दिलेला नाही. पन्नास वर्षांपूर्वीचा तो काळ त्यात ग्रामीण संस्कृतीचा लहेजा शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केला आहे.  बालपण सरून वयाच्या जेमतेम 15-16 वर्षीच जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हाचे त्यांचे अनुभव, त्यांनी त्यांच्या आईवडिलांचे, थोरामोठ्यांचे मन न दुखवता नात्यातील त्यांना आवडत असलेल्या राधाशी केलेले लग्न आणि तिच्या बरोबर केलेला सुखी संसार, त्याचबरोबर शिक्षण पूर्ण करत करत वेगवेगळ्या परीक्षा देत केलेली शिक्षकाची नोकरी आणि त्यात होत असलेल्या बदल्यांचे अतिशय मार्मिक अनुभव भारावून टाकतात.  सयाजी शिंदे यांच्या संवाद साधण्याच्या कलेचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे, हे फार कमी लोकांना जमते हे निर्विवाद सत्य आहे.  कुठेही अनावश्यक वादविवाद अथवा भांडण तसेच आततायीपणा ह्या कादंबरीत नावालाही दिसत नाही हे तर ह्या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य आहे असेच म्हणावे लागेल.


सयाजी शिंदे यांची सहचारिणी राधा यांचे त्यांच्या सुखी, समाधानी आणि समृद्ध संसारातील योगदान शिंदे यांनी ज्या आत्मियतेने व्यक्त केले आहे ते पाहून ह्या कुटुंबाचा समाजाला नक्कीच हेवा वाटून त्यांचा आदर्श ठेवावा असे मला अगदी प्रकर्षाने जाणवले. नवरा बायकोतील योग्य वेळी, योग्य पद्धतीने साधलेला संवाद, संसारात किती सुख, समाधान आणि समृद्धी आणतो त्याचे हे पुस्तक म्हणजे अगदी ज्वलंत उदाहरण आहे. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर; आपण लग्न कधी करायचे, लग्नानंतर आपल्याला मूल कधी हवे आहे, एक झाल्यानंतर दुसरे कधी हवे आहे, दोन्ही मुलीच झाल्यावर वंशाला दिवा हवा आहे की नको! त्यावर तिसरे मूल नको हा दोघांनी एकत्रितपणे घेतलेला अतिशय भावनिक निर्णय वाचताना मन नि:संदीगद्धपणे दोघांच्या प्रेमात पडते.


वृद्धापकळात आई वडिलांची इतर भावंडांनी नाकारलेली जबाबदारी आपणहून स्वीकारणे तसेच राधाच्या आई वडिलांचीही जबाबदारी स्वीकारणे आणि त्यासाठी करावा लागलेला त्याग, तडजोड आणि संघर्ष ह्या कादंबरीत व्यक्त करताना सयाजी शिंदे यांनी कुठेही आत्मप्रौढी न करता वाचकाच्या मनात माणुसकी, चांगुलपणा, आत्मियता, कुटुंबवत्सलता, आदर आणि स्नेहाच्या भावना उदीप्त केल्या आहेत. राधाने एक सहचारिणी म्हणून सयाजी यांना दिलेली मोलाची साथ आजच्या विवाहसंस्थेसाठी तर अगदी उत्तम उदाहरणच आहे असे मला वाटते. आपल्या दोन्ही मुलींवर त्यांनी असेच उच्चकोटीचे संस्कार रुजवून त्यांनाही उत्तम सहचारिणी बनवले आहे हे अजून एक वैशिष्ट्य आहे. संसार हा दोघांचा असतो, तो दोघांनी मिळून करायचा असतो इतके साधे सोपे आणि सरळ तत्त्वज्ञान शिंदे आपल्याला सांगून त्यांच्या नकळत समाज प्रबोधनाचेच कार्य करतात असे म्हणालो तर अतिशयोक्ती ठरणार नाही.


‌‘परिसस्पर्श‌’ ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचल्यावर मला तर असे वाटते आहे की, प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचायलाच हवी आणि ज्यांचे आयुष्य नैराश्याने अथवा गृहकलहाणे ग्रासलेले आहे, त्यांना नक्कीच वाचायला द्यायला हवी. लेखक सयाजी शिंदे आणि ‌‘चपराक प्रकाशन‌’चे मनापासून अभिनंदन. कादंबरीसाठी मोबाईल क्रमांक 7057292092 वर संपर्क करावा.


- रवींद्र कामठे

94212 18528

साप्ताहिक चपराक २२ ते २८ जून २०२६


परिसस्पर्श | Parissparsh
₹250.00₹187.50
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page