अमेरिकेतील भारत : सातासमुद्रापल्याड मायमराठी
- Jyoti Ghanshyam
- Jun 28, 2025
- 6 min read
अमेरिकेत राहायला येण्यापूर्वी नवरा आणि लेकीने मला अनेकदा अगदी बजावून सांगितलं होतं की, अमेरिकेत तरी तुला तुझं ‘मी मराठी’ वगैरे बाजूला ठेवून इंग्रजीतूनच बोलावं लागेल. मी पण प्रत्येक वेळी वादविवाद आणि दोघांचे तत्त्वज्ञानी सल्ले टाळण्यासाठी माझं मराठीचं घोडं पुढे न दामटता एखाद्या शहाण्या मुलीसारखं हो हो करत पुढच्या चर्चेवर पडदा टाकत होते. अर्थात मी इंग्रजीचा सराव वगैरे केला नाहीच पण वेळ पडेल तेव्हा इंग्रजी बोलायचं अशी मनाची तयारी करून ठेवली होती. योगायोग म्हणजे आम्ही अमेरिकेत पाऊल ठेवलं आणि त्या दिवसापासूनच मला जाणवलं की, इथे सातासमुद्रापल्याडही माझी मायमराठी माझ्या सोबत आहेच.पहिल्या दिवसीच महाराष्ट्र मंडळाच्या व्हॉट्सॲप समूहावर झालेलं आमचं स्वागत, दुसऱ्या दिवसी मंडळातल्या सोहोनी दाम्पत्याचं आपुलकीनं आम्हाला भेटायला घरी येणं, अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांनी केलेली हृद्य मदत, किराणा आणण्यासाठी इथल्या भारतीय दुकानात गेल्यानंतर प्रत्येक वेळी आमचं एकमेकांशी मराठीतलं बोलणं ऐकून स्वतःहून बोलायला आलेले आणि त्यातूनच जोडले गेलेले बरेच मित्रमैत्रिणी, सण-उत्सवाला महाराष्ट्र मंडळाचे मराठीमय कार्यक्रम, इथल्या सुहृदांसोबतच्या मायभाषेतल्या मायाळू गप्पा, माझं लेखन, अभिवाचन, गायन... खरं सांगायचं तर अगदी सुरुवातीपासून कोणत्याही व्यत्ययाविना अमेरिकेतला माझा मराठमोळा प्रवास आणि दैनंदिनी सुरु झाली आणि मग वेगवेगळ्या निमित्ताने इथल्या मित्रमैत्रिणींना भेटल्यानंतर जाणवत गेलं की, आपल्या देशापासून कित्येक योजनं पार करून आलेली ही मंडळी इथली संस्कृती स्वीकारूनही आपल्या मायमराठीला प्रेमानं आणि अभिमानानं अंगाखांद्यावर घेत तिच्याविषयीचं प्रेम पुढच्या पिढीत रुजवण्यासाठी मनापासून तिचा सांभाळ करत आहेत. तसं पाहिलं तर अमेरिका हे एक भलं मोठं जग आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या विश्वातल्या सगळ्या घडामोडी माहिती होणं अशक्य आहे पण मराठी भाषा आणि त्या अनुशंगानं इथे चालणाऱ्या उपक्रमांबाबत जी माहिती मिळाली ती ऐकून मात्र ऊर अभिमानानं भरून आला.

मुळात अमेरिकेत मराठी भाषा सन्मानाने रुजवण्यात, जोपासण्यात बृहन महाराष्ट्र मंडळाचं अनमोल असं योगदान आहे. मंडळाच्या या वटवृक्षाविषयी मी नंतर सविस्तर लिहिनच पण नुकताच आपल्या या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यानिमित्ताने सातासमुद्रापल्याड मायमराठीचा झेंडा अभिमानाने फडकता ठेवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, त्यासाठी राबवत असलेले उपक्रम आणि ते चालवणाऱ्या संस्था आणि घटकांबद्दल सांगायला मला खूप आवडेल. अमेरिकेमध्ये मराठीचा प्रसार मुख्यत्वे होतो तो इथल्या मराठी शाळांमधून. अमेरिकेमध्ये मराठी शाळा सुरु झाल्या यामागची पार्श्वभूमी खूप सुरस आहे. साधारण सत्तरीच्या शतकात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने भारतातून अमेरिकेत मराठी लोक यायला सुरुवात झाली. अमेरिकन शिक्षणाबरोबरच मुलांची मराठी भाषेशी जोडलेली नाळ तशीच घट्ट राहण्यासाठी आसपासच्या महाराष्ट्रीयन मुलांना आपल्या घराच्या तळघरात, मंदिरांमध्ये एकत्र करत काहींनी मराठी शिकवायला सुरुवात केली. हळूहळू जगभरात संगणक क्षेत्रासकट अनेक स्थित्यंतरं झाली आणि मग अमेरिकेत येणारा मराठी वर्ग वाढत गेला. त्यांच्यासोबत ओघानं मराठी संस्कृतीही आली आणि मग ती तशीच टिकवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. ज्याची परिणीती बृहनमहाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेत झाली. कालांतराने मंडळातल्या गुणिजनांनी जगण्यावागण्यात, बोलण्यात, श्वासात असलेल्या मायमराठीला हळूहळू साहित्य, कला, संस्कृती आणि शिक्षणाच्या माध्यमातून फुलवत नेलं. अपार मेहनतीने वेळ, ऊर्जा आणि पैशांची गुंतवणूक, नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन करत अमेरिकेतल्या जास्त मराठी लोक राहत असलेल्या शहरात अधिकृतरीत्या मराठी शाळा सुरु केल्या. सुरुवातीला तिथे स्वतःचा अभ्यासक्रम ठरवून शिक्षण दिलं जात होतं. हळूहळू अनेकांच्या प्रयत्नांमधून शाळांची संख्या वाढत गेली आणि मग या शाळांमधून भारती विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागला. आता तर महाराष्ट्र शासनाच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमास अमेरिकेत परवानगी मिळाली असून काही ठिकाणी या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. अभिमानाची बाब म्हणजे सध्या उत्तर अमेरिकेत 60 बृहन्महाराष्ट्र मंडळांतर्गत 100 मराठी शाळा उत्तम रीतीने चालवल्या जात आहेत. मराठी भाषेच्या बाबतीत मराठी लोकानी अमेरिकेत अजून एक मानाचा तुरा खोचला आहे. तो म्हणजे अमेरिकेतल्या परदेशी भाषांमध्ये आता मराठी भाषेचा समावेश झाला असून चांगल्या महाविद्यालयात कवा विद्यापीठात प्रवेश घेताना मराठी भाषा शिकल्याचं प्रमाणपत्र दिल्यास मुलांना क्रेडिट पॉईंट्स मिळतात. अमेरिकेसारख्या देशात मराठी भाषेला हे सन्मानाचं स्थान मिळवून देणं हे खूप महत्प्रयासाचं काम होतं. परदेशात मायदेशीची भाषा रुजवणं हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आपापले पोटापाण्याचे उद्योग सांभाळून इथल्या मराठी सुहृदांनी त्यासाठी अफाट काम केलंय. करत आहेत.

अमेरिकेतल्या मराठी मुलांच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळा समितीचे सध्याचे संचालक पिट्सबर्गचे राहुल देशमुख म्हणाले की, आता नवीन पिढीची मुलं भारतात आल्यानंतर आजीआजोबांशी प्रयत्नपूर्वक मराठी बोलतात. त्यांच्यासोबत मराठी नाटक, सिनेमा बघतात, हॉटेलमध्ये गेल्यानंतर मराठी मेनूकार्ड वाचतात, रस्त्यावरचे फलक वाचतात. हे सगळं अनुभवत असताना आम्ही करत असलेले प्रयत्न योग्य दिशेने चालू असल्याचं समाधान मिळतंय. शार्लेट, नॉर्थ कॅरोलिना इथल्या मराठी शाळेत आजीआजोबांना मराठीतून पत्र, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविता सादरीकरण, शिवजयंतीदिनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या प्रसंगावर गोष्ट रचून सांगणं, त्या प्रसंगाची चित्रं काढणं, मुलांचा दिवाळी अंक, मराठी स्नेहसंमेलन असे वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा आपटे यांनी सांगितलं. https://shop.chaprak.com/product/phultana/ अमेरिकेत शाळेसोबतच मराठी पॉडकास्ट हा एक थोरामोठ्यांच्या आवडीचा उपक्रम यशस्वीपणे सुरु आहे. एका वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करताना 31 जानेवारी ते 19 फेब्रुवारी या काळात रोज रात्री जवळजवळ पाऊण तास शिवचरित्र, श्रीमानयोगी या पुस्तकांचं ऑनलाईन अभिवाचन करण्यात आलं. अतिशय अभिनव अशा या उपक्रमाला अमेरिकेत उदंड प्रतिसाद मिळाला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या या गोष्टी, माहिती हे सगळं संचित कायमस्वरूपी सगळ्यांना ऐकायला मिळावं यातूनच पॉडकास्टची संकल्पना विचारात आली. त्यावेळचे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित, राहुल देशमुख आणि त्यांच्या मराठीप्रेमी संघाने अथक परिश्रम आणि सुयोग्य नियोजन करून मोठ्यांसाठी साहित्यमित्र इचच तर लहानांसाठी कथा इचच असे पॉडकास्ट सुरु केले आहेत. यामधून अनेक उत्तमोत्तम कथा आणि पुस्तकांचं वाचन तर होतंच पण मुलांना समजेल अशा काळाशी सुसंगत सणांच्या, सोळा संस्काराच्या, संतांच्या अशा अनेक गोष्टी स्वतः लिहून त्यांचंही अभिवाचन केलं जातं असं ग्रीन विल, साऊथ कॅरोलिना इथली मराठी शाळा यशस्वीपणे चालवणाऱ्या शर्मिष्ठा गाडगीळ यांनी सांगितलं. अमेरिकेतल्या जास्तीत जास्त मराठीजनांपर्यंत हा साहित्य खजिना पोहोचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं शर्मिष्ठा यांनी सांगितलं. मला सांगायला खूप आनंद होतो की, अमेरिकेसारख्या परमुलुखात देखील मराठी अंकांची समृद्ध परंपरा आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘एकता’ हे अमेरिकेतलं पहिलं त्रैमासिक. ते जवळजवळ 35 वर्षे चाललं. त्यानंतर एकता बंद होऊन तिथल्या संपादकीय मंडळातील सुषमा येरवडेकर आता काही काळापासून ‘एकोपा’ नावाचं मासिक चालवत आहेत. एकोपा हा अंक श्रवण आणि छापील अशा दोन्ही स्वरूपात प्रसिद्ध होतो.पिट्सबर्ग इथे राहणाऱ्या प्रियदर्शन मनोहर यांनी 2017 ला ‘मामबो’ म्हणजे ‘माझा मराठीचा बोल’ हा जगभरातल्या मराठीप्रेमी लेखक वाचकांसाठी फेसबुक समूह सुरु केला. मराठी लेखनकला आणि लेखनगुण विकसित करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या समूहाला मनोहर ‘लेखनाची प्रयोगशाळा’ म्हणतात. जगभरातून जवळजवळ 350 लेखक वाचक सदस्य या समूहात सहभागी आहेत. मामबो समूहाचा दिवाळी अंक पण दरवर्षी प्रसिद्ध होत असतो.

अमेरिकेतील ऍरिझोना इथे डॉक्टर भाग्यश्री बारलगे या मराठी भाषा जतन करण्याच्या उद्देशाने ‘अक्षयभाषा’ नावाची एक संस्था चालवतात. या संस्थेद्वारा अनेक उत्तमोत्तम साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. मराठी विश्व, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्क महाराष्ट्र मंडळातर्फे ‘रंगदीप’ नावाचा दर्जेदार दिवाळी अंक जवळजवळ 20 वर्षांपासून प्रकाशित होत आहे. मिनेसोटा येथील मराठी असोसिएशन तर्फे गेल्या 30 वर्षांपासून ‘हितगुज’ नावाचा नैमित्तिक अंक गुढीपाडवा, गणपती, दिवाळी अशा प्रसंगी काढत आहेत. टॅम्पा, फ्लोरिडा इथून ‘अभिरुची’ नावाचा वार्षिकांक प्रकाशित केला जातो.सिनसिनाटीला राहणाऱ्या निवेदिता बक्षी यांनी तिथे चालणाऱ्या ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध यांच्या आठवडी ऑनलाईन शिकवणी वर्गाबद्दल सांगितलं. वर्गात भग्वद्गीतेमधल्या श्लोकांचं वाचन, त्यानंतर त्याच्याशी निगडित ओव्या, अभंग, संतांनी लिहिलेले विचार हे सगळं सादर करून त्यावर चर्चा होते. एक अध्याय पूर्ण झाला की, सगळ्या जणी प्रत्यक्ष भेटतात. तो पूर्ण दिवस चर्चा, निरूपण, नवीन मराठी शब्द, अर्थ, गाणी आणि खऱ्याखुऱ्या आध्यात्मिक आनंदाचा असतो असं निवेदिता म्हणाली. दासबोध, ज्ञानेश्वरीच्या शिकवणी वर्गात तर कॅलिफोर्निया, अटलांटा, न्यूजर्सी, शिकागो अशा अनेक ठिकाणाहून अनेक महिला ऑनलाईन गोळा होतात आणि निरूपण करतात. त्यापैकी काही जणी दासबोध, ज्ञानेश्वरी हस्तलिखित स्वरूपात लिहितातही. सिनसिनाटीचं त्रिवेणी हे महाराष्ट्र मंडळ ‘संवाद’ नावाचं त्रैमासिक चालवतं. आयुर्वेद, भगवद्गीता, अमेरिकेतील यशस्वी भारतीयांच्या मुलाखती असे वैविध्यपूर्ण विषय त्यांच्या संवाद या त्रैमासिकात असतात. ‘निनाद’ हा मिशिगनमधून प्रसिद्ध होणारा एक दर्जेदार दिवाळी अंक. मिशिगन इथे सक्रिय असणारा साहित्यप्रेमी समूह वेगवेगळ्या विषयांवरच्या स्मरणिका काढत असे. समूहातील निनाद जोशी या मित्राच्या मृत्युनंतर त्याची ईच्छा पूर्ण करण्यासाठी तिथल्या मंडळींनी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. गेल्या 6 वर्षांपासून यशस्वीपणे सुरु असलेल्या या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे अंकातर्फे दर वर्षी घेतली जाणारी कथा स्पर्धा आणि त्यांच्या संपादकीय मंडळातल्या सदस्यांनीच स्वतः काढलेली मुखपृष्ठे आणि मलपृष्ठे असं संपादकीय मंडळातील सुशांत खोपकर यांनी सांगितलं. https://shop.chaprak.com/product/mantarlele-divas/ मंडळी, ही आहे मला कळलेली सातासमुद्रापल्याडची मराठमोळी समृद्धी. याव्यतिरिक्तही अमेरिकेत जिथे जिथे आपले मराठी गुणी जन आहेत, तिथेही ही श्रीमंती असणारच. हे सगळं खूप सुखावणारं आहे. खरं तर इथली ही मराठी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उन्नत असं यश मिळवून आपापलं आयुष्य छान जगत आहेत पण चौकटीतलं आयुष्य जगत असतानाही त्यांना साद घालतेय ती आपली मायमराठी आणि म्हणूनच तिच्यावरच्या प्रेमापोटी आपली ही मराठी माणसं स्वयंस्फूर्तीने, कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना आनंदाने आपापले पोटापाण्याचे उद्योग सांभाळून, वेगळा वेळ काढून त्यासाठी एका विलक्षण ऊर्जेने अफाट काम करत आहेत. आपल्या मराठीला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतलं हे मराठी जग जाणून घेताना, अनुभवताना माझी कवयित्री मैत्रीण आरती देवगांवकर हिच्या ओळी नेहमी मनात येतात...मराठीचे अधिराज्य मनामनावरडौले फडकतो झेंडा साता समुद्रापार दूरदेशी जाते कोणी भाकरीच्या पाठीमागे माय मराठीस नेई आठवाने स्वतःसंगे परक्या या मुलुखात धागा चिवट मायेचा जोडतसे एकमेका पूल मायमराठीचा...- मंजिरी तिक्काग्रीन विल, साऊथ कॅरोलिना manjiri.tikka@gmail.com
.jpg)






Comments