top of page

महाराष्ट्र साहित्य परिषद: एक ऐतिहासिक परिवर्तन

  • Jan 23
  • 4 min read

Updated: Feb 1

साहित्य परिषद आणि तिचा महत्त्व


ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही, मात्र ते दिल्लीचे स्वप्न बघतात, असे अनेक उमेदवार आपण बघतो. जो साधा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यही नाही, तो थेट पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरूद्ध निवडणुकीत अर्ज भरतो. प्रत्येक लोकसभेत, विधानसभेत ते बड्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून निवडणूक लढवतात. दरवेळी तोंडावर आपटतात. स्वतःचे हसे करून घेतात. तरीही त्यांची प्रसिद्धीची नशा, धुंदी उतरत नाही. एव्हाना वाचकांच्या डोळ्यासमोर असे काही चेहरे आले असतीलच. हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे यंदा होत असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक.


साहित्य परिषद ही साहित्यातील शिखर संस्था आहे. या संस्थेने साहित्याला दिशा देण्याचे काम केले आहे. काही वर्षांपूर्वी एका विदुषीच्या अतिरेकी आणि दुराग्रही भूमिकांमुळे एकाधिकारशाही वाढली होती. पुण्यातील ठरावीक टाळकी एकत्र येऊन महाराष्ट्रातील साहित्याबाबतचे निर्णय घ्यायची. या असंतोषाचा भडका झाला आणि लेखणी आणि वाणीवर जबरदस्त प्रभुत्व असलेला प्रा. मिलिंद जोशी यांच्यासारखा खमक्या नेता पुढे आला. जोशी हे मराठवाड्यातील परंडा तालुक्यातल्या माणकेश्वरचे आहेत. शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झालं. मृत्युंजयकार शिवाजी सावंत, प्राचार्य शिवाजीराव भोसले अशा दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्याच मुशीत ते तयार झाले आणि मजल दरमजल करत थेट अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष झाले.


परिवर्तनाची गरज


स्वामी विवेकानंदांनी हास्य, विरोध आणि स्वीकृती या परिवर्तनाच्या तीन प्रमुख पातळ्या सांगितल्या आहेत. जोशी या तिन्ही अवस्थांतून गेले आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. प्रा. मिलिंद जोशी हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावेत, अशी अपेक्षा साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष आणि जागतिक व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केली होती. त्याबाबतची त्यांची सविस्तर मुलाखत मी 'चपराक'मध्ये पहिल्या पानावर प्रकाशित केली होती.


प्रा. मिलिंद जोशी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष झाले आणि या संस्थेचं रूपडंच पालटलं. त्यांच्या कारकिर्दीत संमेलनाध्यक्षांची घटनाबदल झाली. शिवाजी सावंत, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, डॉ. न. म. जोशी असे अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक निवडणूक प्रक्रियेतील दोषामुळे संमेलनाध्यक्ष होऊ शकले नाहीत. त्यामुळे हा घटनाबदल दखलपात्र आहे. साहित्य परिषदेच्या इमारतीत एखादी आई तिच्या बाळाला घेऊन आली तर बाळ रात्री झोपेतून घाबरून उठेल, अशी अवस्था होती. या वास्तुचं सर्वांगसुंदर नुतनीकरण झालं. चार समदुःखी टाळकी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे दिवस असताना ग्रामीण भागात परिषदेचा मोठा विस्तार झाला. खेड्यापाड्यातील अनेक शाखा आज उत्तम काम करत आहेत. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या गेल्या शंभर वर्षातील अंकाचं संकलनही याच कालावधीत झालं. त्यांचं डिझीटलायझेशन झालं.


साहित्य संमेलन: एक नवा अध्याय


नुकतंच सातारा येथे 99 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्तमरित्या पार पडलं. या संमेलनामुळे मांडवापासून दूर गेलेले साहित्यरसिक मांडवाकडं पुन्हा फिरकले. प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांची उत्तम सोय, पुस्तकांच्या दालनातूनच मुख्य मंडपाकडे प्रवेश हे सगळं केवळ कल्पकच नाही तर प्रकाशकांना बळ देणारं होतं. साहित्य संमेलनातील प्रकाशन कट्ट्याचा मुख्य समन्वयक म्हणून यंदा मला काम पाहता आलं. कट्ट्याचे प्रमुख शिरीष चिटणीस आणि टीम सोबत होतीच. तब्बल 135 पुस्तकांचं प्रकाशन यंदा संमेलनात झालं. यातील बहुतांश लेखक ग्रामीण भागातील होते. विद्यमान संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस, डॉ. रवींद्र शोभणे, अच्युत गोडबोले, अमेरिकेचे एकमेव मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार, डॉ. राजा दीक्षित, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, नाट्य-सिने अभिनेते आणि लेखक अभिराम भडकमकर, प्राचार्य यशवंत पाटणे अशा कितीतरी मान्यवरांनी प्रकाशन कट्ट्यावर हजेरी लावून साहित्य क्षेत्रातील उमलत्या अंकुरांचे बळ वाढवले. त्यामुळेच विद्यमान कार्यकारिणीने साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


कार्यकारिणीची भूमिका


प्रा. मिलिंद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून विनोद कुलकर्णी यांनीही कामांचा डोंगर उभा केला आहे. कवी बा. सी. मर्ढेकरांचे स्मारक असो अथवा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधानांना एक लाख पत्रे लिहिणे, त्यासाठी थेट दिल्लीत जाऊन आंदोलन करणे असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. सुनीताराजे पवार या दीर्घकाळ साहित्य संस्था आणि प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. रानात खुरपं ते प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून शेकडो लेखकांची पुस्तके प्रकाशित करणे असा त्यांचा दखलपात्र प्रवास आहे. प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी आणि सुनीताराजे पवार यांचे गेल्या निवडणुकीतील परिवर्तन पॅनेलचे प्रचारपत्रक बघितले तर त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जे मांडले होते, ती कामे तर पूर्ण झालीच, पण इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पही मार्गी लागले. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणी बिनविरोध आली असती तर अनेकांचं होणारं हसं टळलं असतं.


असंतोषाची लाट


सध्या संस्थात्मक काम नसलेल्या साहित्यबाह्य संस्थेतील व्यक्तिंचे संस्था ताब्यात घेण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. साहित्य परिषदेच्या विरूद्ध पत्रकं काढणार्‍यांना महाराष्ट्रभरात उमेदवार सुद्धा शोधता आले नाहीत. 31 पैकी फक्त दहा लोकांचं पॅनल झालंय. पुण्याच्या बाहेर या लोकांना काहीच किंमत नाही. उर्वरित महाराष्ट्र माहीत नसणार्‍या असंतुष्टांची जमात या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलीय.


अभिनेते योगेश सोमण यांनी प्रा. मिलिंद जोशी यांच्या विरूद्ध दंड थोपटले आहेत. मागच्या निवडणुकीतही त्यांचा दणकून पराभव झाला होता. या माणसाला साहित्य परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे काम करण्यासाठी चित्रीकरणातून वेळ मिळणार आहे का? हा साधा प्रश्न आहे. एवढी मोठी संस्था चालवणे म्हणजे गंमत नाही. ‘प्रसिद्धीची घाई, सिद्धी संपवत जाई’ असे म्हणतात ते उगीच नाही. कवी प्रदीप निफाडकर हे आजवर कधी साधे कार्यवाहही नव्हते. स्वाती महाळंक या पत्रकार आहेत. विश्वास वसेकरांना धोरणात्मक निर्णय कळत नाहीत. सगळे जण आपापल्या कोशात! मग अशी विळ्या-भोपळ्याची मोट बांधून काय साध्य होणार? त्या उलट विद्यमान कार्यकारिणीतील कार्यवाह असलेले शिरीष चिटणीस, प्रमोद आडकर यांच्यासारखे लोक सतत कार्यरत आहेत. नवनवीन कल्पक उपक्रम राबवत आहेत. माणसे जोडत साहित्यधर्म पार पाडत आहेत. 'चपराक' दिवाळी अंकाचे लेखक डॉ. आशुतोष जावडेकर सातत्याने सर्जनशील लेखन करतात. विविध लेखकांना बोलते करत वाचक, श्रोते आणि प्रेक्षकांसमोर आणतात. समोरच्याची भूमिका समजून घेणे, योग्य तेथे कौतुकाची थाप देणे आणि लेखकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा डॉ. आशुतोष जावडेकरांचा स्थायीभाव आहे.


भविष्याची दिशा


जाता जाता एक नोंदवावेसे वाटते. महाराष्ट्र साहित्य परिषदेलाही काळानुरूप आता आणखी बदलावं लागणार आहे. आता पोस्टल मतदान बंद करावं. अगदी लंडनमध्ये शिकून आलेले लोकही टपालाने आलेल्या मतपत्रिका चोरताना सापडले होतेच की! त्यामुळे शिक्षणाचा आणि वर्तणुकीचा काहीही संबंध नसतो. परिषदेच्या मतदारांना टपालाने मतपत्रिका पाठवल्या जातात. त्या पुन्हा उलटटपाली परिषदेकडे पाठवल्या जातात. म्हणून अशा कालबाह्य पद्धती बंद करून थेट मतदान घ्यावं किंवा ऑनलाईन मतदान व्हावं. ते अधिक पारदर्शक, कालसुसंगत आणि वेळ-पैसा वाचवणारं असेल. विद्यमान कार्यकारिणीच्या विरूद्ध केवळ पुण्यातल्या चार असंतुष्टांची जी जत्रा-यात्रा भरलीय, त्यामुळे साहित्य क्षेत्राची थोडीफार करमणूक होणार आहे. प्रा. मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले साहित्यिक नेतृत्व मात्र पूर्ण आत्मविश्वासाने आणि सामर्थ्याने ऐतिहासिक होणार्‍या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या तयारीला लागले आहेत.


- घनश्याम पाटील


7057292092

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page