top of page

गुढीपाडवा - परंपरा, संतविचार आणि नव्या पिढीची दिशा

  • 3 days ago
  • 2 min read

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे मराठी संस्कृतीत नव्या वर्षाची पहाट घेऊन येणारा दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रातील प्रत्येक घरासमोर उभारली जाणारी गुढी ही केवळ सणाची परंपरा नसून विजय, मंगलता आणि नवचैतन्याचा उंचावलेला ध्वज आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभी आशा, उत्साह आणि सकारात्मकतेने जीवनाची नवी सुरुवात करण्याचा संदेश हा सण देतो.

भारतीय कालगणनेत चैत्र शुद्ध प्रतिपदेला विशेष महत्त्व आहे. पुराणपरंपरेनुसार या दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू झाली, अशी मान्यता आहे. तसेच भारतीय शक संवत्सराची गणना देखील याच दिवसापासून सुरू होते, असे मानले जाते. त्यामुळे गुढीपाडवा हा केवळ सांस्कृतिक सण नसून कालगणनेच्या दृष्टीनेही नव्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो.

घरासमोर उभारली जाणारी गुढी ही विजय आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. बांबूवर रेशमी कापड, साखरेची माळ, कडुनिंबाची पाने आणि उलटा ठेवलेला कलश यांचा समावेश असलेली ही गुढी म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागताचा मंगलध्वजच. घरासमोर उभारलेली गुढी जणू सांगते, अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक शेवटानंतर नवा प्रारंभ घडतो.

मराठी संतपरंपरेनेही जीवनात आनंद, समता आणि सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी जीवनातील आनंदाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करतात.

‌‘आनंदाचे डोही आनंद तरंग‌’

नव्या वर्षाच्या प्रारंभी मनात आनंद आणि समाधान जागृत ठेवण्याचा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. तसेच संत ज्ञानेश्वर माउलींच्या विचारांमध्ये विश्वातील एकात्मतेचा भाव व्यक्त होतो.


‌‘अवघा रंग एक झाला‌’


समाजातील भेदभाव विसरून एकात्मतेने जगण्याचा हा विचार सण-उत्सवांच्या माध्यमातून अधिक दृढ होत असतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. जीवनात गोड आणि कडू अनुभव येत असतात परंतु त्यांना समभावाने स्वीकारणे हेच जीवनाचे खरे तत्त्व आहे, हा संदेश या परंपरेतून मिळतो. नव्या वर्षाची सुरुवात करताना सकारात्मक विचार, नवे संकल्प आणि नवे ध्येय यांची आठवण हा सण करून देतो.

आजच्या बदलत्या आणि वेगवान जगात एक प्रश्न मात्र प्रकर्षाने समोर येतो की नव्या पिढीने हे सण का साजरे करावेत? आधुनिकतेच्या प्रवाहात अनेक परंपरा मागे पडत असताना आपल्या सांस्कृतिक ओळखीचे जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून समाजाला एकत्र आणणारे सांस्कृतिक धागे आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणे, परंपरा पुढील पिढीकडे पोहोचणे आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होणे ही सणांची खरी ताकद आहे.

गुढीपाडवा साजरा करणे म्हणजे केवळ नववर्षाचे स्वागत नाही; तर आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि मूल्यांची जाणीव जपणे होय. नव्या पिढीने सणांचे केवळ स्वरूप न पाहता त्यामागील अर्थ समजून घेणे आवश्यक आहे; कारण संस्कृती ही केवळ परंपरेत नाही तर विचारांत आणि आचरणातही जिवंत राहते.

म्हणूनच गुढीपाडवा हा केवळ नव्या वर्षाचा प्रारंभ नसून आशा, ऐक्य आणि संस्कृतीचा उंचावलेला ध्वज आहे. खरे सांगायचे झाले तर सण साजरे करणे चुकीचे की बरोबर यावर या नव्या पिढीने न अडकता ते आपल्याला आनंद देतात व त्यामुळे आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो याचा विचार करून सण साजरे करावेत कारण या धावपळीच्या जगात थोडीशी शांततापूर्वक सकाळ प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतेच ना! नव्या वर्षाच्या या मंगल प्रारंभी प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि नवचैतन्य नांदो हीच अपेक्षा.


सचिन माथेफोड

8975329797

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६



Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page