गुढीचे महत्त्व...
- 3 days ago
- 3 min read
वसंताची चाहूल लागताच संस्कृतीच्या सुवर्णपानावर साडेतीन मुहूर्तांची मोहोर घेऊन येतो आपला मराठमोळा सण ‘गुढीपाडवा’. चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस म्हणजे हिंदू नववर्षाचा आरंभ.
रानीवनी वसंताने झुलणारे नवलाईचे स्वरूप न्याहाळताना, चैत्र महिन्यात निसर्गात झालेले बदल पाहता असे जाणवते की, निसर्ग जणू म्हणतो आहे... “झाले गेले विसरून नव्या उमेदीने पुन्हा श्रीगणेशा करा...” म्हणूनच पानगळीचा शिशिर ओसंडून गेल्यावर चैत्रात झाडांना नवी पालवी फुटते. अशीच नवी सुरुवात करून देण्यासाठी गुढीपाडवा साजरा केला जातो.
गुढीचे महत्त्व...
गुढीचे पौराणिक महत्त्व असे सांगितले जाते की प्रभू श्रीरामांनी चौदा वर्षांचा वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून ज्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला, त्या दिवशी तेथील प्रजेनं आनंदाने घरोघरी विजयाची गुढी उभारली. तोच हा गुढीपाडव्याचा दिवस मानला जातो.
गुढीपाडव्यापासून शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ‘शालिवाहन शक’ सुरू होते तसेच ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, असेही मानले जाते.
पुरातन काळात मानवाने दैवी शक्तिची कल्पना करताना आदिशक्ती, आदिमाया पार्वतीच्या रूपाचे पूजन केले. म्हणून पाडव्याच्या दिवशी स्त्रीशक्तिच्या रूपाचे मनोमन पूजन केले जाते. हीच ती चैत्र नवरात्र. याच दिवशी देवाधिदेव शंकर आणि पार्वती देवीचे लग्न ठरले, असेही सांगितले जाते.
माझ्या माहेरी दरवर्षी गुढी उभारली जाते. गावचे अंगण स्वच्छ करून घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. उंबरठ्याचे पूजन करून दरवाज्याला झेंडूच्या फुलांच्या माळा तसेच आंब्याच्या डहाळ्या लावतात. बांबूच्या उंच काठीला रेशमी वस्त्र नेसवून त्यावर कडुलिंबाची डहाळी बांधतात. तिला सजवताना झेंडूच्या फुलांचा हार, साखरेच्या गाठींची सुरेख माळ घालतात आणि त्यावर तांब्याचा कलश उलटा ठेवतात. ही गुढी दारासमोर पाटावर उभारली जाते.
उंच काठीवर उभारलेली ही गुढी म्हणजे आपल्या आयुष्यातील यशाचे शिखर दर्शवते. या दिवशी स्नान उरकल्यावर सर्वांत आधी कडूनिंबाचे पान खाण्याची प्रथा आहे. त्यानंतर तोंडात गोड पदार्थ टाकला जातो. असे का? हे मी एकदा आईला विचारले असता ती म्हणाली, “नववर्षाच्या सुरुवातीला आयुष्यात घडून गेलेल्या कडवट आठवणी चावून संपवायच्या आणि गोड पदार्थाचा आस्वाद घेत येणाऱ्या नववर्षात तो गोडवा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायचे.”
तिचा हा विचार खूप काही सांगून गेला.
भक्तिभावाने पूजा-अर्चना झाल्यानंतर दुपारी श्रीखंड-पुरी व इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तिन्हीसांजेला गुढी उतरवली जाते. या दिवशी आप्तेष्ट, मित्रपरिवारातील स्त्री-पुरुष आणि लहान मुले पारंपरिक वेशभूषेत एकत्र येतात. स्त्रिया नऊवारी लुगड नेसून, नाकात नथ आणि गळ्यात ठुशी घालून सजतात तर पुरुष सदरा, लेंगा व टोपी परिधान करतात. सर्व जण एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. ठिकठिकाणी शोभायात्राही काढली जाते आणि त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण उत्साहाने सहभागी होतात.
या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या शुभदिनी नवीन वाहन, घरातील महत्त्वाच्या वस्तू किंवा दागिने खरेदी केले जातात. गुढीपाडवा हे हिंदूंचे नववर्ष आहे. या दिवशी प्रत्येक जण काही ना काही संकल्प मनाशी करतो. ते पूर्ण होतात किंवा नाही हा वेगळा भाग; परंतु संकल्प करण्यातही एक आगळीच आनंदाची अनुभूती असते.
चैत्र गौरीचे व्रत...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून ‘चैत्र गौरीचे’ व्रत सुहासिनी करतात. व्रताचा सोहळा साजरा करताना हळदी-कुंकू समारंभ केला जातो. या दिवशी शेजारच्या बायका-मुलींना घरी बोलावून त्यांचे आदरातिथ्य केले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कैरीचे पन्हे, थंडगार व सुगंधी वाळा सरबत, कैरी घालून केलेली हरभऱ्याची वाटली डाळ, कलिंगड इत्यादी पदार्थ देवीच्या नैवेद्याचा प्रसाद म्हणून महिलांना दिले जातात.
या व्रतात देवी पार्वतीला माहेरवाशीण मानून देव्हाऱ्यात गौराईची स्थापना करतात. अक्षयतृतियेला देवी सासरी परत जाते अशी धारणा मनी ठेवून व्रताचे उद्यापन केले जाते. आध्यात्माचा धागा पकडून वर्षानुवर्षे केली जाणारी ही पारंपरिक व्रत-वैकल्ये म्हणजे ऋतुचक्रातील बदलांना सामोरे जाताना शारीरिक बल टिकून राहण्यासाठी केलेली उपाययोजना असते. हीच आपल्या पूर्वजांची किमया आणि देणगी आहे. म्हणून असे महत्त्वपूर्ण रीतिरिवाज त्यांच्या मागील भूमिकेसह समजून घेऊन पाळायला काय हरकत आहे!
गुढी उभारा चैतन्याची...
आपल्या मराठी संस्कृतीत जी गुढी दारासमोर उभारली जाते ती आपल्या सुख-समृद्धीचे व कीर्तीचे प्रतीक असते. अशीच दुसरी गुढी प्रत्येकाने मनात उभारली पाहिजे. चांगल्या विचारांची, समाजसेवेची, समानतेची, एकोप्याची आणि स्त्रीसन्मानाची.
उत्तम कर्मामुळे आयुष्यात येणाऱ्या चैतन्याची गुढी उभारली तर चैत्राची सोनेरी किरणे अंतर्बाह्य आपल्यात सामावतील, जीवन उजळून टाकतील आणि यशाचा ध्वज उंच आकाशात फडकवतील. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देताना ही काव्यसुमन भेट.
आली चैत्राची पहाट
नववधूचा शृंगार थाट
चहूदिशांना चैतन्याची लाट
हास्यरत्ने घरादारात..
गुढी उभारता मांगल्याची
नवं पर्वाची सुरुवात
नव्या पालवीचे तोरण
बांधले काव्य उंबरठ्यात..
आरस्पानी शब्द रेखीले
हृदयाच्या धुंद ध्यासात
स्वप्नमैफिल रंगते
कस्तुरगंध दरवळतो श्वासात..
वर्षाच्या प्रथम दिनी
रसिकहो तुमची साथ
सौख्य लाभो कुटुंबाला
मागणे जोडुनी हात..
-कस्तुरी देवरुखकर (मुंबई)
8291149992
प्रसिद्धी साप्ताहिक चपराक १६ ते २२ मार्च २०२६
.jpg)



Comments