top of page

पुस्तकमित्र : वाचनातून घडणारी समृद्ध आणि संवेदनशील पिढी | Children Reading Initiative

  • 23 hours ago
  • 2 min read

आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत चालली आहे. मोबाईल आणि स्क्रीनच्या आकर्षणात पुस्तकांपासून दूर जात असलेल्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवण्याचा एक सुंदर आणि प्रेरणादायी प्रयत्न म्हणजे ‌‘पुस्तकमित्र‌’ हा उपक्रम होय.


या उपक्रमामागे आहे, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व चि. तनय मगर. केवळ वयाच्या 12व्या वर्षी वाचनाचे शतक पूर्ण करणाऱ्या तनयने अनेक मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे अवांतर वाचन केले आहे. त्याच्या या वाचनप्रेमातूनच इतरांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्याने ‌‘पुस्तकमित्र‌’ ग्रुपची सुरुवात केली. तो ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे इयत्ता सातवीमध्ये घरकुल विभागात शिक्षण घेत आहे. चि. तनय मगर आणि कु. रमैनी डिंगोरे, महात्मा गांधी विद्यालय, मंचर, इयत्ता सहावी ही वाचनप्रेमी विद्यार्थिनी यांच्या पुढाकारातून आज त्यांच्याच वयोगटातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ‌‘गुगल मिट‌’च्या माध्यमातून एकत्र आणले गेले आहे. दररोज संध्याकाळी 8.30 ते 9.00 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात 25 मिनिटे वाचन आणि 5 मिनिटे चिंतन/विश्लेषण केले जाते. या साध्या पण परिणामकारक पद्धतीमुळे वाचन केवळ सवय न राहता मुलांना एक रोमांचकारी अनुभव बनतो.


पुस्तकमित्रचा मुख्य उद्देश म्हणजे वाचनाची गोडी निर्माण करणे, भाषाशैली व शुद्धलेखन सुधारणे तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास आणि संवादकौशल्य वाढवणे असा आहे. या उपक्रमातून सहभागींची एकाग्रता वाढते, कल्पनाशक्ती फुलते, तणाव कमी होतो आणि नवे ज्ञान तसेच नवे दृष्टिकोन मिळतात. गटामध्ये बोलण्याचे धाडसही यामुळे विकसित होते. या उपक्रमात तनय व रमैनी बरोबरच आरोही खुडे, सार्थक हराळ, क्रिशला पवार, सौम्या पोखरकर, दिविज शिंदे, आराध्य कारले, निशिता कारले हे विद्यार्थी सुद्धा सक्रियपणे रोज सहभागी आहेत. तसेच मोठ्या गटामध्ये पर्णिका सावंत, निसर्ग मगर, अध्यापिका वैशाली हराळ, डॉ. मेघना पोखरकर, प्रिया कारले, दीपाली शिंदे, लेखिका अस्मिता डिंगोरे, प्रियांका सावंत यासारखे वाचनप्रेमीही रोजच्या सत्रात सहभागी होतात.


संपूर्ण महाराष्ट्रातून मुलांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे दर रविवारी ही सर्व मुले एकत्र येऊन ऑनलाईन खेळ खेळतात. या उपक्रमांमुळे त्यांची बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि एकमेकांना समजून घेण्याची व सामावून घेण्याची क्षमता अधिक दृढ झाली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा उपक्रम मुलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, त्यांचा वेळ अधिक सर्जनशील आणि अर्थपूर्ण बनवत आहेत. यामध्ये विविध लेखकांनीही आपली उपस्थिती दर्शवून मुलांना मार्गदर्शन केले आहे, ज्यामुळे वाचनाचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. पुस्तकमित्र हा केवळ एक वाचन ग्रुप नसून, वाचन, ज्ञान, आत्मविश्वास आणि आनंद यांचा एक सुंदर सहप्रवास आहे. पुढील पिढी ज्ञानसमृद्ध, सर्जनशील आणि संवेदनशील घडवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी चि. तनयने आपल्या घरातील ग्रंथालय शाळेतील तसेच आजबाजूच्या परिसरातील मुलांना उपलब्ध करून दिले आहे. या ग्रंथालयात 300 हून अधिक वाचनाची पुस्तके आहेत.


तसेच पुस्तकमित्र हा ग्रुप फक्त वाचनसत्रासाठी मर्यादित न राहता पुस्तकमित्रने एक पाऊल पुढे टाकत 1 डिसेंबर 2025  रोजी प्रकाशन क्षेत्रात ‌‘पुस्तकमित्र प्रकाशन‌’ या नावाने पदार्पण केले असून पुस्तकमित्र प्रकाशनतर्फे 8 डिसेंबर रोजी माझा ‌‘चांदण्यांच्या ओंजळीत‌’ हा काव्यसंग्रह श्री. जगदाळे यांच्या सहकार्याने विश्वास पाटील आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रकाशित केला तसेच ‌‘अभी अनू, गोष्ट तिची अन्‌‍ त्याची‌’ ही कादंबरी 4 जानेवारी 2026  रोजी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे प्रकाशित केली आहे.  


हा उपक्रम संपूर्णतः विनामूल्य आहे, याची विशेष नोंद घ्यावी. तसेच नियमित विद्यार्थ्यांसाठी पुस्तकमित्र तर्फे बक्षीसाच्या स्वरुपात विविध विषयांची पुस्तके तसेच रोजनिशी भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला जातो. थोडक्यात, पुस्तकमित्र = वाचन + ज्ञान + आत्मविश्वास + मैत्री + आनंदी सहप्रवास.


- सौ. संजना मगर

9890722867  

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६


मोहीम मैत्री | Mohim Maitri
₹200.00₹150.00
Buy Now

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page