top of page

बचतीचं धन : बचतीचं महत्त्व मराठी

  • Apr 27
  • 3 min read

सकाळी साडे नऊ वाजले होते. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पंखा लवकर सुरू केला होता. तो भरभर फिरत होता. सर्व विद्यार्थी फळ्यावर लिहिलेले वहीत रेखाटून काढत होते. ते कामात गढून गेले होते. अचानक, वीज गेली. वर्गात अंधार झाला.



“अय, लाईट गयी भो?” कोपऱ्यात बसलेल्या भूषणने सूर लावला.


“ना रं भुष्या, दिसं बी ना वहीमाधलं. काय करानं आता?” शेजारच्या चेतनने त्याला प्रतिसाद दिला.


सर्व वर्ग काहीच वेळात विस्कळीत झाला. पहिल्या बेंचवर बसलेला गणेश उठून उभा राहिला. लाईट बोर्डकडे गेला. त्याला मी पाहतच राहिलो. त्याने बोर्डावर सुरू असलेली सर्व बटणं बंद केली आणि म्हणाला, “आपण लाईटपण वाचवायची सर.”


प्रसंग छोटा होता पण एक महत्त्वाचा धडा समोर येऊन उभा राहिला होता, परिसर अभ्यासाचा. काही दिवसांपूर्वी बचतीचा धडा आज प्रत्यक्षात कृतीत उतरला होता. आपण दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी बचत करू शकतो. विजेची बचत करण्यासाठी घरातील आणि शाळेतील अनावश्यक लाईट, पंखे किंवा उपकरणे बंद ठेवता येतात. पाण्याची बचत करण्यासाठी झडप नीट बंद ठेवणे, पाणी वाया न जाणे याकडे लक्ष देता येते. खाण्यापिण्याची बचत करण्यासाठी जेवण गरजेप्रमाणे घेणे, अन्न वाया न जाणे महत्त्वाचे आहे. पैशाची बचत म्हणजे अनावश्यक खर्च टाळणे, पैसा योग्य रीतीने वापरणे आणि भविष्यासाठी थोडा निधी बाजूला ठेवणे. कपडे, पुस्तकं, साहित्य किंवा इतर वस्तू काळजीपूर्वक वापरल्यासही बचत होते. दैनंदिन जीवनात ह्या छोट्या प्रयत्नांमुळे आपण जबाबदार, संवेदनशील आणि नियोजनक्षम बनतो. यामुळे आपल्या सभोवतालच्या लोकांनाही प्रेरणा मिळते. हे सारे आम्ही चर्चेतून समजून घेतले होते. वाया घालवू नये, बचत करावी हा धडा प्रेरक ठरला होता.


आज गणेशची कृती महत्त्वाची वाटत होती. या छोट्याशा प्रसंगातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये आणि मूल्यशिक्षण कसे रुजते, हे स्पष्टपणे दिसून येते. गणेशने दाखवलेली कृती ही केवळ वीज बचतीपुरती मर्यादित नसून ती जबाबदारीची जाणीव, सजगता आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता यांचे उदाहरण आहे. अशा प्रसंगांमधून मुलांमध्ये स्वअनुशासन, सामाजिक भान आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याची सवय निर्माण होते. पुस्तकातील धडे प्रत्यक्ष कृतीत उतरले की ते अधिक प्रभावी ठरतात. याच प्रक्रियेतून मूल्य शिक्षण सहजपणे आत्मसात होते आणि विद्यार्थी केवळ ज्ञान मिळवणारे न राहता संवेदनशील, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनू लागतात.


 वीज बचत का महत्त्वाची? आजच्या जगात विजेची मागणी वाढली आहे परंतु संसाधने मर्यादित आहेत. एका छोट्या बटण बंद केल्यानेही आपण वीज वाचवू शकतो. गणेशची ही कृती दाखवते की, आपल्या रोजच्या जीवनात साध्या प्रयत्नांनी आपण मोठा फरक निर्माण करू शकतो. लहान लहान निर्णय आपल्या जीवनात मोठा बदल घडवू शकतात.


सारे घडले ते अचानक होते. गणेशचे कौतुक वाटले. त्याला म्हणालो,


“भारी रे गणा ! तुला माहिती आहे का, तू फक्त बटण बंद केले नाही तर आम्हा सर्वांना एक महत्त्वाचा धडा दिला आहे बचतीचा.”


गणेश हसत म्हणाला, “आपण लाईट वाचवायची सर, वाचलेली लाईट नंतर कामात पडती.”


गणाचं निरागस उत्तर जीवनात बचतीचे महत्त्व सांगून गेलं. पैशाची, वेळेची, विजेची किंवा साधनांची बचत ही आपल्या स्वतःच्या भविष्याची तयारी आहे. गणेशने दाखवले की, लहान पण नीट केलेले कार्य आपल्या आयुष्यात मोठा परिणाम घडवू शकतो.


इतर विद्यार्थ्यांनीही त्याच्या कृतीकडे लक्ष दिले. यावेळी पुन्हा मुलांना दैनंदिन जीवनात आपण काय बचत करू शकतो हे सांगता आले.


शाळा ही केवळ गणित, विज्ञान किंवा भाषा शिकवणारी जागा नसून, जीवनाच्या प्रत्येक पैलूवर धडे देणारी जागा आहे. गणेशसारख्या विद्यार्थ्यांच्या कृतीमुळे इतर मुलांनाही प्रेरणा मिळते. साध्या कृतीतून मिळणारा संदेश इतका स्पष्ट आहे की, ‌‘थोडे प्रयत्न करणे, छोटे निर्णय घेणे पण नीट आणि जबाबदारीने करणे हेच खरे मूल्य आहे.‌’


शाळेतल्या या छोट्या प्रसंगातून मला एक गोष्ट लक्षात आली. लहान पण नीट केलेली कृतीही मोठा बदल घडवू शकते. गणेशने फक्त बटण बंद केले पण त्याचा संदेश खूप मोठा होता. त्याची कृती सांगून गेली होती, ‌‘बचत करा, जबाबदारी घ्या आणि आपल्या छोट्या प्रयत्नांनीही इतरांना प्रेरणा द्या!‌’ आणि हाच एक सुंदर भाग आहे शाळेचा येथे आपण फक्त शिकत नाही तर जीवन जगण्याची कला, जबाबदारीची जाणीव आणि नीतीची शिकवण मिळते. गणेशची ही साधी कृती माझ्या शाळेच्या आठवणींचा एक सुंदर टप्पा आहे आणि हाच संदेश मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. जर आपण आपल्याभोवतीची साधने, उपकरणे आणि ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली तर आपण फक्त शाळेतील वातावरण सुसंगत ठेवत नाही तर भविष्यासाठी जबाबदार नागरिकही तयार करतो. वर्गाच्या साध्या गोष्टींकडे लक्ष देणे, पंखा, लाईट किंवा उपकरणे योग्य पद्धतीने वापरणे या आपल्या जीवनातील साध्या पण महत्त्वाच्या सवयी आहेत.


शेवटी सांगायचं तर लहान गोष्टी करायला विसरू नका, त्यातच खरा मोठेपणा आहे. प्रत्येक छोट्या प्रयत्नातून आपल्याला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना फायदा होतो. हे बचतीचं धन मोलाचं आहे. लहान गोष्टी दुर्लक्ष करू नका कारण त्यातच मोठेपण दडलेले असते आणि हाच खरा जीवनाचा विजय आहे.


- भरत पाटील

9665911657

साप्ताहिक चपराक २७ ते ३ एप्रिल २०२६


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page