top of page

दाभोलकर तुमची आठवण येते

  • Apr 27
  • 3 min read

अंधश्रद्धा ही मानसिक गुलामगिरी आहे, असे सांगणारे दाभोलकर आज तुमची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्याचबरोबर गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांची देखील आठवण येत आहे. कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे.  सध्या आपल्या देशात बाबा, बुवांचे पेव फुटलेले आहे. अशिक्षितच काय पण सुशिक्षित देखील या बाबा-बुवांच्या नादी लागलेले आहेत. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी, परंपरांचे युग केव्हाच संपले. वैज्ञानिक युग सुरु झाले तरी मनात रुजलेल्या अंधश्रद्धा मात्र काही केल्या जात नाहीत.


नाशिकसारख्या धर्मक्षेत्री राहणाऱ्या एका बाबाने केवळ तुमच्या विचारांची हत्याच केली नाही तर भारताच्या इतिहासात लिहून न ठेवण्यासारखा एक अध्याय, वासनेचा नंगा नाच, महिलांचे शोषण अशी कृत्ये करून ठेवली आहेत. आज आम्ही मेल्यानंतरही अस्थी विसर्जनासाठी पवित्र गोदामाईच्या जलात अर्पण करण्याची इच्छा ठेवतो त्याच गोदामाईच्या कुशीत एक नराधम पैदा होतो. गोदेच्या पाण्यावर त्याचे शरीर पोसले जाते आणि भक्तांना गोदामाईचे पवित्र जल पाजण्याऐवजी तो चक्क स्वतःचे मूत्र, वीर्य आणि व्हिएग्रा देण्याचे पातक करतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. असे वाटते की, आमची गोदामाई अटली होती का? जिच्या जलात आम्हाला मेल्यानंतरही समाधी घ्यावीशी वाटते, ज्या पाण्याने आम्हाला स्नान करावेसे वाटते, त्याच गोदामाईच्या पवित्र जलाचा अव्हेर करून ह्या नराधमाने भक्तांना आपलेच तीर्थ प्यायला द्यावे आणि अंधभक्तांनी ते श्रद्धेने प्यावे! ह्यासारखे दुर्दैव नाही.


हे सर्व ऐकताना, पाहताना आपण नक्कीच पुरोगामी असलेल्या महाराष्ट्रात राहतो का अश्मयुगात वावरतोय? ह्याची शंका येते. एकापाठोपाठ अनेक अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचताना शरमेने मान खाली जाते. आता दोष कोणाला देणार? त्या नराधमाला? का त्याला स्वेच्छेने स्वाधीन होणाऱ्या त्या बायकांना? का जगात अशा घटना घडत आहेत, हे माहीत असून सुद्धा त्या महिलांना मनात कोणताही किंतु न आणता त्या बाबाच्या खोलीत पाठवणाऱ्या त्या नवऱ्यांना? एखादा पुरुष आपल्या बायकोशी काय वर्तन करू शकतो? याची त्या पुरुषाला जाणीव नसेल का हो? नक्कीच असणार! तसेच एखादा बाबा शेवटी एक पुरुष असतो, हे माहीत असताना सुद्धा त्याच्या खोलीत बिनधास्तपणे जाणाऱ्या त्या महिलांना याची जाणीव असू नये? यावर तर विश्वासच बसत नाही अन्‌‍ तो नराधम तर बघा, किती पोहोचलेला असतो? राजरोसपणे तो त्या महिलेचे शील भंग करतो, हिच बातमी लिक झाली तर आपल्यावर आपत्ती ओढवू शकते, याची जाणीव त्याला असत नाही, हे तर शक्यच नाही पण एकप्रकारचा उन्माद यांना अशी कृत्ये करण्यास भाग पाडतो आणि त्याचे परिणाम पुढे दिसून येतात.


आमच्या तुकोबा महाराजांनी चक्क लिहून ठेवले आहे की, अशा अंगाऱ्या- धुपाऱ्याने किंवा कोणा बाबाच्या कृपेने अशी पोरे निर्माण होत असतील तर मग नवऱ्याची, विवाहाची गरजच कशाला? विवाहाविना किंवा कुमारीकांना सुद्धा मातृत्व मिळू शकते पण ह्या जगात सर्वांनाच माहीत आहे की, असे कधीच होत नाही. मग आमचे लोक या भाकडकथांवर विश्वास ठेवून असे कसे बळी पडू शकतात? इतक्या वर्षांपासून तुकोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आमचे प्रबोधन करत आलेय, तरीही आम्ही असे कसे वागू शकतो? अन्‌‍ ते ही या एकविसाव्या शतकात? खरंच विश्वास बसत नाही. त्याच आमच्या महान संतांचा वारसा अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश पुढे चालवला आहे पण पुढे त्यांचे काय झाले? त्यांचे खून करायला आमच्या समाजाने कमी केले नाही. अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही. अशीच जर आमची समाजव्यवस्था राहिली तर मात्र कठीणच आहे, यात शंका नाही.


अशावेळी खरंच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जे तुकोबांचे, ज्ञानेश्वरांचे झाले तेच तुमचे देखील झाले. फरक फक्त एवढाच आहे की, तुकोबा आविष्कार झालेला नसताना सुद्धा काल्पनिक पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला पोहोचले, ज्ञानेश्वराने जिवंत समाधी घेतली, या गोंडस नावाखाली त्यांचे खून पचविण्यात सनातन्यांना यश मिळाले मात्र तुमचे खून हे खूनच ग्राह्य धरले गेले पण तुम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही. हे कोणी केले? ते खरंच गुन्हेगार होते का? याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. कालांतराने हा विषय असाच दडपला जाईल आणि पुढे वर्षानुवर्षे बाबा, बुवांना अभय मिळत जाईल. ते उजळ माथ्याने असेच समाजात वावरत राहतील. काही दिवसांनी हे उठेलेले वादळ आपोआप शमून जाईल. सर्व जण झाले, गेले ते विसरून जातील. परत एखादा बाबा, बुवा जन्माला येईल, तोही असेच वर्तन करेल आणि पुन्हा त्याच गोष्टी, तोच विषय चघळला जाईल आणि करमणुकीनंतर तो विषय बाजूला पडत जाईल. जेष्ठ विचारवंत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतील अन्‌‍ शेवटी कंटाळून तेही गप्प बसतील. जर त्यांचे कोणी ऐकायलाच तयार नसतील, त्यातील धोके लक्षात येऊन सुद्धा सुधारायला तयार नसतील तर कोण काय करू शकतो? शेवटी प्रत्येकाने आपले जीवन कसे जगायचे तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन असतो. त्याच्या इच्छेपुढे सर्व व्यर्थ आहे.


- सौ. चंद्रलेखा जगताप  बेलसरे

9850895051

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक २७ एप्रिल ते ३ मे २०२६



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page