top of page

गुढीपाडवा

  • Mar 16
  • 4 min read

Updated: Mar 17


आठवीत शिकणारी जानकी आज पहिल्यांदाच तिच्या आईसोबत मुंबईला आली होती. तिचा बा एका मोठ्ठ्या इमारतीच्या बांधकामासाठी गेली दोन वर्षे मुंबईतच होता आणि ह्या मायलेकी गावाकडे लोकांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. खुरपणी, नांगरणी, पिकांची कापणी अशी कामे करत करत, रिकाम्या दिवशी गोधडी शिवून देण्याचे कामही अगदी कलाकुसरीने करायच्या.

शेतातल्या कामापेक्षा हे गोधडी शिवण्याचे कामच जानकी जास्त मनापासून करायची. वेगवेगळे टाके घालून साध्याशा कापडाचं रुप खुलवून टाकायची. आताशा तर गावातील बायका लग्नाच्या रुखवतात ठेवण्यासाठीही बऱ्याच गोष्टी तिच्याकडून बनवून घ्यायच्या आणि ती सुद्धा अगदी मन लाऊन ही कामं करायची! पण मागच्याच आठवड्यात मुंबईत इमारतीचे काम करताना तिचा बा चक्कर येऊन पडला आणि ह्या मायलेकींना काही इथे स्वस्थ बसवेना. असेल त्या परिस्थितीत राहण्याचे मनाशी ठरवून आज ह्या दोघी मुंबईत हजर झाल्या होत्या.

आजी आजोबांच्या गोष्टी | Aaji Ajobanchya Goshti
₹200.00₹150.00
Buy Now

दहा-बारा इमारती असलेली एक मोठी सोसायटी तयार होणार होती. रघुनंदन सोसायटी. त्यातील चार इमारतींचे काम सध्या पूर्ण झाले होते. एक विश्वासू कामगार म्हणून जानकीच्या बा ला तिथेच वॉचमॅनचे काम मिळाले होते. दिवसभर बांधकामावर जायचे आणि रात्री पुन्हा वॉचमनचे काम करायचे. ह्या धावपळीमुळेच त्याची तब्येत बिघडली होती पण आता जानकी आणि तिच्या आईच्या येण्याने त्याला आधार मिळणार होता. एका छोट्याशा खोलीत अगदी काही वेळातच सामानाची मांडामांड करुन त्यांचा इथला संसार सुरु झाला.


नवीन ठिकाणी अजून शाळेत नाव भरती करायचे बाकी होते त्यामुळे जानकीकडे सध्या भरपूर रिकामा वेळ होता. तयार झालेल्या चार इमारतींमध्ये लोकं राहायला आली होती. उच्चभ्रू लोकांचा थाटमाट, त्यांच्या मोठाल्या गाड्या, झकपक कपडे हा सगळा तिच्या कुतुहुलाचा विषय बनला होता. तिच्या गावापेक्षा सगळंच कसं वेगळं होतं तिच्यासाठी! पण एकदा का शाळा, कॉलेज, ऑफिसची घाई संपली की, दुपारी अगदी शांतता असायची सगळीकडे.


ना खेळायला मैत्रिणी, ना शाळेचा अभ्यास, ना शेतीची कामं...! त्यामुळे हा दुपारचा वेळ कसा घालवायचा म्हणून तिची रोज आईच्या मागे भुणभुण असायची. शेवटी आईने तिला एक सुती साडी आणि सुई-दोरा दिला. भरतकाम तिच्या आवडीचे असल्याने आता दुपारी काय करायचे हा प्रश्नच मिटला.


रोज शांत दिसणाऱ्या सोसायटीत आज जरा वेगळंच वातावरण होतं. सोसायटीच्या बोर्डवरची सूचना वाचुन प्रत्येक जण उत्साही दिसत होतं. जानकीनेही येऊन आईला सांगितले, “इथे गुढीपाडव्यानिमित्त स्पर्धा ठेवलीये. ज्यांची गुढी सर्वात सुंदर, त्यांना बक्षीस मिळणारे.”


ह्यावर्षी आपल्याला वेगवेगळ्या गुढी पाहायला मिळणार म्हणून जानकी खूश होती. नाही तर तिच्या छोट्याशा गावात अगदी मोजक्याच घरी गुढी उभारली जायची. एकदा लहान असताना तिने आईला विचारलेही होते, “आपण का गं नाही उभारत गुढी?” तेव्हा आई म्हणाली होती, “अंगावर नेसायलाच साडी मिळणं कठीण झालंय, गुढी उभारायला कुठून आणु नवीन साडी?” त्यानंतर मात्र जानकीने कधीच आईजवळ तो विषय पुन्हा काढला नाही.


मधले पंधरा दिवस असेच गेले आणि मग गुढीपाडव्याचा दिवस उजाडला. सकाळी अगदी लवकर आवरुन, सडा रांगोळी करुन , दाराला तोरण बांधून गुढी पाहण्यासाठी जानकी बाहेर निघाली. प्रत्येकाच्या बालकनीमध्ये अगदी सुंदर सुंदर काठा पदराच्या साड्या नेसवून, छान डेकोरेशन करुन, फ़ुलांची आरास करुन गुढी उभारली होती. प्रत्येक जण नटून थटून परीक्षकांची वाट पाहत उभे होते. जानकीचा तर सोसायटीत 3-4 वेळा फेरफटका मारुन झाला होता. अखेर एका मोठ्या गाडीतून परीक्षक आले. बक्षीस कोणाला मिळणार ह्याची उत्सुकता असल्याने जानकीही घराबाहेरच बसून होती पण मोठ्या लोकांना अशी लुडबुड केलेली आवडत नाही म्हणून आईने तिला बळेच आत बोलावून घेतले.

आई | Aai
₹130.00₹97.50
Buy Now

आई म्हणाली म्हणून ती आत येऊन बसली खरी पण तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच होतं. तिचा पडलेला चेहरा पाहून आईलाही वाईट वाटलं पण काय करणार... लेकीला अजून जगाचा अनुभव नव्हता. उगाच कोणी बोलून अपमान केला असता तर तिला अजूनच वाईट वाटले असते. त्यापेक्षा हे बरे असा विचार आईने केला.


“बाळा, त्या बाजूच्या बिल्डींगमधल्या दुसऱ्या माळ्यावरच्या बर्वे आजींनी तुला बोलावलंय. म्हणाल्या आज पुरणपोळ्या करणारे. तुमच्या जानकीला पाठवा हो दुपारी. जाशील ना तू?”


त्यानिमित्ताने बाहेर जायला मिळेल म्हणून ती लगेच उठली आणि आजींकडे निघाली सुद्धा. आईला मात्र लेकीला नाराज केल्यामुळे खूपच वाईट वाटत होतं. तिला खूश करण्यासाठी आईला एक कल्पना सुचली आणि बा ला हाताशी धरुन तिने लगेच कामाला सुरुवात केली. तिथे मात्र आजींच्या गप्पांमधून जानकीची काही सुटका होत नव्हती. तासाभरानंतर माईकवर सूचना ऐकू आली की, स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे, त्यासाठी सर्वांनी खाली एकत्र जमायचे आहे. त्यावेळी मात्र जानकी पटकन उठली आणि आजींना नमस्कार करुन खाली आली.


उंची साड्या नेसून दागिन्यांनी मढलेल्या बायका, कुर्ता घालून मिरवणारी माणसं... सगळं काही तिच्यासाठी खूप नवीन होतं पण आईने सांगितल्यामुळे तिथे न रेंगाळता ती पुरणपोळीचं ताट घेऊन सरळ घरी आली. बघते तर काय, आज पहिल्यांदाच तिच्या घरी गुढी उभारली होती. तिचा तर आनंदच गगनात मावत नव्हता. ती आईला काही विचारणार, इतक्यात माईकवरून आवाज आला - प्रथम पारितोषिक विजेती आहे, जानकी देसाई! आपल्या इथे काम करणाऱ्या वॉचमन काकांची मुलगी. सगळेच जण आश्चर्याने एकदा तिच्याकडे आणि एकदा त्यांच्या त्या एका खोलीच्या घरासमोर उभारलेल्या गुढीकडे पाहतच राहिले. एवढ्या साध्याशा गुढीला प्रथम पारितोषिक?

सगळ्यांची कुजबुज ऐकून परीक्षकांनीच सांगायला सुरुवात केली -  दिसायला जरी ही गुढी साधी असेल तरी खूप विशेष आहे. जानकीने स्वतःच्या हाताने ह्या साडीवरती भरतकाम करुन रामाच्या वनवासातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण आणि वनवास संपवून अयोध्येत परतणारे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता ह्यांचे दर्शन घडविले आहे. पैठणी, कांजीवरम किंवा अजून कुठल्याही भारी साड्यांपेक्षा ही साडी नेसवून उभारलेली गुढी आजच्या दिवसाचे महत्त्व दर्शविते. म्हणून आजच्या बक्षिसाची मानकरी ही छोटीशी जानकी देसाई.


टाळ्यांच्या कडकडाटासोबत परीक्षक अजूनही पुढे बोलतच होते - योग्य तो मोबदला देऊन ही साडी मला जानकीकडून विकत घ्यायची आहे. अर्थात तिची ईच्छा असेल तरच. आता मी जानकीला बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करतो.


जानकीचा तर विश्वासच बसत नव्हता ह्या सगळ्या गोष्टींवर. बक्षीस स्वीकारुन, सर्वांचे आभार मानून ती पळतच आईजवळ गेली आणि आईला मिठी मारुन म्हणाली,  “आई, हे सगळं तुझ्यामुळेच झालं.”

काळीज गोंदण | Kalij Gondan
₹200.00₹150.00
Buy Now

तिच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवत आई म्हणाली, “माझ्यामुळे नाही बाळा, सगळ्याचा करता करविता तो रामच असतो. जे काही होत असतं ते फक्त रामाच्या इच्छेने.” हे ऐकताच जमलेल्या लोकांमधून एकाने जोरात घोषणा दिली, ‌‘जय श्री राम!‌’ आणि त्यापाठोपाठ प्रत्येकाने त्याला साथ दिली. सारा परिसर रामनामाने दुमदुमला. नव्यानेच निर्माण झालेल्या रघुनंदन सोसायटीतील पहिला गुढीपाडवा अशा पद्धतीने अगदी जल्लोषात साजरा झाला.


- तृप्ती वाकोडकर-देशपांडे

डोंबिवली

9970629142*

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page