top of page

अव्यक्त प्रेम (दीर्घकथा)

लग्नानंतर बरीच वर्षे मूल होत नाही म्हणून रामराव पाटलांनी आपल्या ज्येष्ठ मुलाचं दुसरं लग्न करण्याचा घाट घातला. खरं पाहता निशिगंध आणि त्याची बायको निशा यांना हा विचारच मान्य व पटणारा नव्हता. रामरावांच्या पश्चात त्यांनी तज्ज्ञ डॉक्टराकडून सर्व शारीरिक तपासण्या करून घेतल्या होत्या. तपासण्याच्या निष्कर्षात त्या दोघांमध्ये कोणताच दोष आढळून आला नाही. योग्य वेळी कदाचित मूल होऊ शकेल असे डॉक्टरांचे मत होते. त्यामुळे निशा आणि निशिगंध याबाबत अगदीच तणावविरहित होते. शिवाय मूल होणं म्हणजे जीवनातील सर्वोच्च आनंद किंवा फार मोठी उपलब्धी थोडीच आहे? असे त्या दोघांनाही मनोमन वाटत होते. कायद्याने दुसरा विवाह करता येत नाही, हे निशा अणि निशिगंध जाणून होते. रामराव मात्र पक्के वस्ताद होते. गावात दोन-दोन बायका असणारे अनेक नमुने त्यांनी पाहिले होते. मूल होत नाही की, करून टाका मुलाचं दुसरं लग्न. मग दोष कुणात आहे, याचा विचारच केला जात नव्हता. म्हणूनच रामरावांनी आपल्या मुलाने मूल होत नाही म्हणून, दुसरे लग्न करावे असा लकडा लावला होता. आणि एके दिवशी रामराव पाटलांनी निशा आणि निशिगंध यांना सुट्टी घेऊन ताबडतोब गावाकडे येण्याचे फर्मान सोडले. निशा अणि निशिगंध दोघेही संगणक शास्त्राचे पदवीधर होते. हैद्राबादमधील एका मोठ्या आयटी कंपनीत दोघेही मोठ्या हुद्यावर नोकरी करीत होते. दोघांनाही भरपूर पगार मिळत असल्यामुळे ते एकदम आनंदी जीवन जगत होते. मागील वर्षीच त्यांनी तिथे स्वतःचा फ्लॅट खरेदी केला होता. आधुनिक विचारशैलीनुसार जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन असल्यामुळे आपल्या गावाकडील मंडळींचे विचार त्यांना फारसे रुचत नव्हते पण जेव्हा केव्हा ते सुट्टी घेऊन आपल्या गावाकडे जायचे तेव्हा तेथील वातावरणाशी ते समरस होत असत. निशाचे आणि त्याचे लग्न म्हणजे अगदीच मजेशीर किस्सा म्हणता येईल. त्यांच्या लग्नास ना प्रेमविवाह म्हणता येईल, ना ठरवून केलेले लग्न म्हणता येईल.  योगायोग म्हणतात तो त्यांनी खऱ्या अर्थाने अनुभवला असंच काहीसं म्हणता येईल. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांना गुणवत्तेनुसर प्रवेश मिळाला होता. दोघेही गावाकडून शहरात आल्यामुळे अगदीच नवखे होते. शहरी संस्कृती अणि तेथील वातावरणाशी जुळवून घेताना त्यांना कमालीची कसरत करावी लागली होती. वर्गात विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे एकमेकांचा परिचय होण्यासाठी बराच कालावधी लागला. निशा मुलींच्या वसतिगृहामध्ये तर निशिगंध मुलांच्या वसतिगृहामध्ये राहत होते. त्यावेळेस मुले-मुली एकमेकांशी फार कमी संपर्कात असायचे. शहरातील मुले-मुली मात्र विनासंकोच एकमेकांशी संपर्क साधून असायचे, याउलट ग्रामीण भागातून शहरात आलेल्या मुलामुलीमध्ये तर खूपच मागासलेपण जाणवायचे. पहिले वर्ष संपले तरी पण निशा अणि निशिगंध एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत. त्यांनी फक्त एकमेकांना पाहिले होते, एवढीच काय ती त्यांची ओळख. निशाची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती तर निशिगंधच्या घरचा थाट अगदीच श्रीमंतीचा. निशा साधारण दोन अडीच वर्षांची असतानाच काळाने तिचं मातृछत्र तिच्यापासून हिरावून घेतलं होतं. घरात एक मोठी बहीण व तिच्या पाठचा एक भाऊ. निशा ही भास्कररावांचं तिसरं अपत्य. मोठी बहीण लग्न होऊन आपल्या सासरी नांदत होती. भाऊ जेमतेम सातवीपर्यंत शिकला. शाळेत तो काही रमला नाही. गावातच तो शिंपी काम करून वडिलांना हातभार लावीत होता. तो पंधरा  वर्षाचा झाला आणि भास्कररावांनी लगेच त्याचे लग्न उरकून टाकले. त्याच्या विविध गुणांची उधळण पाहून खरं तर त्यांना तो निर्णय घेणं भाग पडलं अन्यथा अजून चार-पाच वर्षे तरी त्याचं लग्न करण्याचा त्यांचा विचार नव्हता. लग्नानंतर वर्षाला एक याप्रमाणे चिरंजीवाने चार वर्षात चार आपत्ये जन्माला घातली. भास्कररावांना हे बिलकूल पटलेलं नव्हतं. एका पाठोपाठ चार मुलांचा जन्म आणि त्यांचं संगोपन यामुळे अल्पावधीतच त्या तरुण मुलीला असाध्य आजाराने आपला जीव गमवावा लागला. घरावर तसं मोठं संकटच कोसळलं होतं. खिन्न अवस्थेत भास्करराव अबोल झाले. आता घर-प्रपंच कसा करावा, ह्या विचाराने त्यांना काहीच सूचत नव्हते आणि त्याच कालावधीत, म्हणजे भावजयीच्या मृत्युसमयी निशाचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. निशा मुळातच खूप हुशार मुलगी होती. अगदी एकपाठीच म्हणा ना. घरातील वातावरणाचा नाही म्हटलं तरी तिच्या मनावर नकळत परिणाम होत असे. घरात कोणी बाई माणूस नसल्यामुळे घराला घरपण राहिलेच नव्हते. मुलांच्या भविष्याचा विचार करून भास्कररावांनी दुसऱ्या बायकोचा विचार देखील केला नाही. मुलाच्या बायकोच्या अकाली निधनामुळे मात्र भास्कररावांची मनःस्थिती विचित्रच झाली. ते काहीसे अबोल झाले. चार छोटी नातवंडं, मुलगी निशा अणि तरुण विधुर मुलगा, घर प्रपंच कसा चालवायचा, या विचाराने ते खूप अस्वस्थ व्हायचे. घरातील अशा परिस्थितीमुळे निशा पण अबोल झाली. स्वयंपाकासाठी मजुरीने एक विधवा बाई सकाळ संध्याकाळ त्यांच्या घरी येत असे. शाळेच्या वेळा व्यतिरिक्त घरामधे छोट्या निशाला बारीकसारीक कामे करावी लागत होती. त्यामुळे तिला अभ्यास करायला वेळच मिळत नव्हता. छोट्या निशाची दररोजची ओढाताण भास्कररावांच्या नजरेतून मात्र सुटली नाही. सारासार विचार करून त्यांनी साध्या पद्धतीने, एका गरीब, असाह्य मुलीबरोबर मुलाचे दुसरे लग्न लावून दिले. आणि त्याच कालावधीत निशाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. पुढच्या आठवड्यातच रविवारी निशाला अणि तिच्या वडिलांना शाळेत बोलावल्याचा निरोप मिळाला. शाळेत कशासाठी बोलावले, हे दोघांनाही त्यावेळी समजले नाही. मैदानात प्रवेश केल्यावर दोघेही भांबावून गेले. भल्या मोठ्या मैदानावर भव्य मंडप घातलेला होता. मंडपासमोर सुशोभित व्यासपीठ व बऱ्याच खुर्च्या मांडलेल्या होत्या. मंडपात माणसांची खूपच गर्दी झाली होती. व्यासपीठावर दहा-बारा माणसे दिसत होती. काही सुटा-बुटात तर काही पुढारी वेशात, काही आपली साधी माणसं हलक्या आवाजात बोलत होती. स्पिकरवरून स्फूर्तिगीतांचा छान आवाज येत होता. निशा अणि तिचे वडील एका कोपऱ्यात उभे राहिले होते. आपल्याला नेमके कशासाठी बोलावले आहे, हे त्यांना कळतच नव्हते. कोणी मंत्री येणार आहे का, एखाद्या सभेचं आयोजन आहे की काय? हे उपस्थित असलेल्या बऱ्याच लोकांना उमगत नव्हते आणि थोड्याच वेळेत निवेदकाने माईकचा ताबा घेतला. उगीचच हॅलो हॅलो, माईक टेस्टिंगसारखे शब्द लोकांच्या कानावर पडू लागले. बराच वेळ निवेदकाचा हाच एककलमी कार्यक्रम चालू होता आणि एकदाचे निवेदकाच्या तोंडातून अर्थपूर्ण शब्द बाहेर पडले, ‌‘थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होत आहे. सर्वांनी मंडपात बसून घ्यावे. आपल्या सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.‌’ तेवढ्यात व्यासपीठाच्या दिशेने दोन कार आल्या. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावचे सरपंच लगबगीने कारच्या दिशेने चालत गेले. पाहुण्यांना बरोबर घेऊन मुख्याध्यापक व्यासपीठावर आले. निशा अणि भास्करराव दुरवर एका कोपऱ्यात बसलेले होते आणि लगेचच निवेदकाचं सूत्रसंचालन सुरू झालं. मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, हे आता उपस्थितांना समजले. कार्यक्रमाचे प्रयोजन व स्वरूप सूत्रसंचालकाने स्पष्ट करताच निशा आणि भास्कररावांना आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. निशाला व्यासपीठावर बोलावण्यात आलं. घाबरलेल्या अणि काहीसे गोंधळलेल्या अवस्थेत निशा व्यासपीठावर उपस्थित झाली. पाहुण्यांच्या हस्ते हार, गुच्छ, सन्मानपत्र आणि एक पाकीट देऊन निशाचा गौरव करण्यात आला. गावातील सरपंचांनी निशाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले. वास्तविक सरपंचांचे शिक्षण तसे अगदीच बेताचे. स्वतःची मुलं फारसी शिकली नाहीत, ही खंत त्यांना सारखी बोचत होती. म्हणूनच आपले मनोगत व्यक्त करताना ते कळकळीने म्हणाले, “निशाने मिळवलेले यश म्हणजे आमच्या गावचा गौरवच आहे. तिने खूप शिकावं आणि गावाचा नावलौकिक वाढवावा. पंचायतीच्या माध्यमातून तिला शक्य होईल तेवढी मदत आम्ही जरूर करू. तिच्या वडिलांनी म्हणजे भास्कररावांनी, याबाबत मागे राहू नये. तिला प्रोत्साहन द्यावे आणि सहकार्यासाठी विनासंकोच पंचायतीची मदत घ्यावी!” निशाला शुभेच्छा देऊन सरपंच आपल्या जागेवर जाऊन बसले. “आजच्या प्रमुख पाहुण्यांना, आपल्या जिल्ह्याच्या माननीय शिक्षणाधिकाऱ्यांना, मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी नम्र विनंती करतो,” सूत्रसंचालकाने जाहीर केले. “या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित, विद्यार्थी, शिक्षक आणि बंधू भगिनींनो. प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मी कुमारी निशाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. तिच्या यशामध्ये तिचे कुटुंब आणि तिला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. यशाची अशीच परंपरा या विद्यालयाने कायम ठेवावी. निशाचा भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल आहे. भविष्यात असेच यश तिने मिळवीत राहावं अशी अपेक्षा करून मी तिला हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या शिक्षण विभागामार्फत तिला नेहमी सहकार्य मिळेल असे आश्वासन मी देतो आणि इथे थांबतो,” आपले छोटेसेच पण प्रेरणादायी भाषण संपवून शिक्षणाधिकरी स्थानापन्न झाले. शेवटी आभारप्रदर्शन होऊन कार्यक्रम संपल्याचे सूत्रसंचालकाने जाहीर केले. भास्करराव निशाला घेऊन घराकडे निघाले. रस्त्याने हरतऱ्हेचे विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालीत होते. आता पुढे निशाचे काय करायचे? घरातील वातावण बघता त्यांना नकळत निशाची काळजी वाटू लागली. ह्या वातावरणापासून निशाला दूर ठेवले तरच तिचे शिक्षण पूर्ण होईल. गुणवान मुलीचं पुढील आयुष्य अतिशय आनंदात जायला हवं. विचार करीत असतानाच ते आपल्या घरी पोहोचले. निशाच्या नव्या वहिनीने सायंकाळीच स्वयंपाक करुन ठेवला होता. तिची वहिनी  घरात तशी अजून रुळली नव्हती. स्वभावाने मात्र अतिशय फटकळ होती. निशाला तर जरा जास्तच त्रास द्यायची. घरकामात तिला चांगलीच राबवून घ्यायची. नवऱ्याला सुद्धा फाडफाड बोलायची. “मी काही मोलकरीण नाही तुमच्या घरातली. चांगली लग्न करुन आलेय या घरात. चार चार पोरं सांभाळते, घरातलं सगळं करते. ही पोरगी आता चांगली मोठी झाली, घ्या हिला शाळेतून काढून. माझ्याकडे कुणाचं तरी लक्ष आहे का? माझ्या पण काही ईच्छा आहेतच ना! तुम्ही असता दिवसभर बाहेर. कधीकधी येता दारू ढोसून. मला काय हे सगळं कळत नाही का? सुख म्हणतात ते कधी येणारे का माझ्या वाट्याला? निशाला शिकून तरी काय करणार आहेत मोठे? एक दिवस लग्न लावून दिलं की, ती पण जाईल सासरी. मग मी आहेच की राबराब राबायला...” त्या रात्री बायकोने नवऱ्याला चांगलेच सुनावले होते. योगायोगाने निशाने वहिनीचा हा कांगावा ऐकला. आता तर तिला पण वाटायला लागलं की शाळा सोडून द्यावी. निशा खूपच अबोल झाली. कुणाबरोबरही ती कामाव्यतिरीक्त काहीच बोलत नसे. आज मात्र ती मनातून खूप खूश होती. जणू काही तिला तिच्यातील क्षमतांचा साक्षात्कार झाला होता. सर्वांनी एकत्र जेवण केलं. सर्व जण झोपेच्या अधीन झाले पण भास्करराव मात्र जागे होते. काही केल्या त्यांना झोप येत नव्हती आणि लगेचच एका सकारात्मक विचाराने त्यांच्या मनात प्रवेश केला. निशाच्या पुढील भवितव्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी मुख्याध्यापकांचा सल्ला घ्यावा का? आणि काय आश्चर्य, भास्कररावांचं विचारचक्र थांबलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच मुख्याध्यापकांना भेटायचा निर्धार करुन ते शांतपणे झोपले. सकाळी चहा घेऊन भास्करराव तातडीने मुख्याध्यापकांच्या घरी पोहोचले. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुख्याध्यापक आराम खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचीत होते. भास्कररावांना पाहताच उठून त्यांनी त्यांच्या समोर एक खुर्ची ठेवून बसायला सांगितले. “गुरुजी मी तुमचा सल्ला घ्यायला आलोय,” भास्करराव. “बोला की मग. संकोच कशाला हवाय?” मुख्याध्यापक. “नाही म्हणजे, निशाचं आता काय करावं? घरची परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहेच. घर, प्रपंच कसा चाललाय माझं मलाच माहीत आहे. पोरगं असून काही कामाचं नाहीये. पदरी चार पोरं अन्‌‍ दुसरी करुन आणलेली त्याची बायको. कामधंद्यातून फारसी बरकत नाही. निशाला घरकामात पण गुंतवून ठेवलं जातं. मला तर कुणालाही काही बोलायची सोय नाही. निशाकडे पाहून अगदी गलबलायला होतंय. तिचं चांगलं व्हावं असंच वाटतंय हो मला. माझी तिच्यावर खूप माया आहे बघा. परवा निशाचं झालेलं कौतुक बघून तर डोक्यात गोंधळच सुरू झाला. त्यामुळे मला काहीच सुचेनासं झालंय. म्हणून तुमचा सल्ला घ्यायला आलो. ह्या परिस्थितीतून मला तिला बाहेर काढायचंय पण मला काही मार्गच सापडत नाही,” भास्कररावांनी आपलं मन मोकळं केलं. गंभीर चेहऱ्याने, हताश होऊन भास्करराव जमिनीकडे एकटक पाहू लागले. भास्कररावांची मनःस्थिती अणि हतबलता मुख्याध्यापकांच्या लक्षात आली. बायकोने पुढ्यात ठेवलेला चहा दोघांनी घेतला. स्वतःला सावरत मुख्याध्यापकांनी बोलायला सुरूवात केली. “भास्करराव, एवढं हताश होण्याची काही गरज नाही. तीव्र इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो. तुमच्या घरातली सर्व परिस्थिती मला ठाऊक आहे. तुम्हाला, मनापासून निशानं शिकावं, असं वाटतंय ना?” भास्कररावाकडे एक कटाक्ष टाकीत गुरुजींनी त्यांना प्रश्न विचारला. “नाही म्हणजे कसं आहे गुरुजी. एक तर आर्थिक परिस्थिती बेताची शिवाय निशा अतिशय शांत आणि कमी बोलणारी. सध्या तर तिचं वागणं थोडंसं विचित्रच वाटू लागलंय. भाऊ-भावजयी तिच्याशी नीट वागत नाहीत. मला तर ती काहीच सांगत नाही. आपल्या गावात हायस्कूल कॉलेज नाही. पुढं तिला कुठं ठेवायचं आणि कसं शिकवायचं? अजून ती घर सोडून बाहेर एकटी राहीलेली नाही. आई लवकरच गेल्यामुळे तिच्यावर काहीसा परिणाम झालेला आहेच. तेव्हा बाहेरगावी शिकायला तिचं मन रमेल का? मला तर मनापासून खूप वाटतंय की, तिनं खूप शिकून मोठं व्हावं म्हणून पण परिस्थिती पाहता हे कसं शक्य आहे हो?” दीर्घ श्वास घेत भास्कररावांनी आपली व्यथा मांडली. “भास्करराव मनःस्थिती बदलली की, परिस्थितीवर सहज मात करता येते. वेगवेगळे पर्याय समोर येतात व मार्ग सापडतो. काही काळजी करू नका. मी सर्वतोपरी मदत करीन. तुम्ही उद्या संध्याकाळी निशाला घेऊन घरी या. मला तिच्याबरोबर बोललं पाहिजे. तिच्या मनात नेमकं काय आहे, तिची कितपत तयारी आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. मग बघू या काय करायचे ते!” असे म्हणत त्यांनी भास्कररावांना निरोप दिला. “अगं निशा, जरा तुझं आवर बरं पटकन. संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं आहे,” भास्करराव म्हणाले. निशाने मान डोलवत होकार दिला व स्वतःचे आवरण्यासाठी ती मागच्या खोलीत गेली. शरीराच्या बोलक्या हावभावातूनच सध्या निशा संवाद साधत असायची. नक्की कुठं जायचं आहे, हे तिला ठाऊक नव्हतं आणि त्याबाबत बाबांना काही विचारावं ही आवश्यकता तिला वाटली नाही. तिचे बाबा म्हणजे तिचे सर्वस्व होते. त्यांच्यावर तिचा खूप विश्वास होता. बाबा आपल्यासाठी जे काही करतील अथवा ठरवतील ते योग्यच, असे त्या निष्पाप मुलीला वाटत होते. आईनंतर बाबाच तिचे सर्वेसर्वा होते. खूप प्रेम होते तिचे तिच्या बाबावर पण तिला ते कधी ना दाखवता आले, ना कधी व्यक्त करता आले. तिच्या बाबांचे प्रेम सुद्धा अगदी अशाच प्रकारचे होते. निशा स्वतःचे आवरता आवरता सहजच विचार करू लागली. आज बाबासोबत कुठे जायचे असेल? कशासाठी जायचे असेल बरे? तिला काही कळेनासे झाले. मनाला शांत करीत ती स्वतःशीच पुटपुटली. काही एवढा विचार करायला नकोय. जाऊ की बाबा नेतील तिकडे. घराबाहेर पडलं की, कसं छान वाटतंय. “निशा, आटोपलं की नाही अजून? उगीच उशीर नकोय व्हायला. अंधार पडायच्या आत परत यायचं आहे आपल्याला,” धारदार पहाड्या आवाजात  भास्कररावांनी निशाला विचारणा केली. वेळ न घालवता लगबगीने निशा बाहेर आली. तिचे केस तसेच विस्कटलेले होते पण ती त्याकडे दुर्लक्ष करून आज्ञाधारकपणे बाबांच्या पुढे हजर झाली आणि दोघेही लगेचच इच्छित स्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी बरोबर पाच वाजता निशा अणि भास्करराव मुख्य गुरुजींच्या घरी पोहोचले. कुठलंसं तरी पुस्तक घेऊन गुरुजी बाहेर ओट्यावर वाचीत बसले होते. त्या दोघांना पाहताच गुरुजींनी पुस्तक खाली ठेवले व आदरयुक्त भावनेने त्यांचे स्वागत केले. निशाला कळून चुकले की, आपल्या स्वतःच्या पुढील शिक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी गुरुजींनी इथे बोलावले आहे म्हणून. “गावापासून दहा-वीस किलोमीटर अंतरावर कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्थेची माध्यमिक शाळा आहे,” गुरुजींनी सविस्तर माहिती सांगायला सुरुवात केली. “शाळेला लगतच मुलांसाठी अणि मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत. राहण्याबरोबरच जेवणाची पण तेथेच व्यवस्था आहे. शिवाय आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांसाठी व मुलींसाठी ‌‘कमवा व शिका‌’ योजना आहे. होतकरू मुलांना स्वावलंबनाने शिकता यावे हा मुख्य हेतू ह्या योजनेमागचा आहे. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. पालकांचा बराच आर्थिक भार ह्या योजनेमुळे कमी होतो व विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळते,” गुरुजी ही सविस्तर माहिती सांगत असताना अधूनमधून निशाकडे पाहत होते. भास्करराव गंभीरपणे बारीकसारीक गोष्टी काळजीपूर्वक ऐकत होते. निशाच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव गुरुजींच्या सराईत नजरेतून काही सुटले नाहीत. मनोमन त्यांना आनंद होत होता. निशाचे वय पाहता तिच्याबरोबर याबाबत फारसे बोलून उपयोग नाही, हे त्यांना ठावूक होते. प्रशिक्षण घेताना गुरुजींनी मानसशास्त्र विषयात विशेष प्रावीण्य मिळविले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्यांच्या मनातील विचार बऱ्याच अंशी ते समजू शकत होते. निशाची पुढील शिक्षण घेण्याची मनाची तीव्र इच्छा आहे, हे त्यांनी बरोबर ओळखले. निशासारख्या हुशार अणि गुणवान मुलीनं खूप शिकावं असे त्यांना पण वाटत होतेच. “काय निशा, आहे ना मग  तुझी तयारी?” हसत हसत गुरुजींनी निशाला विचारले. गुरुजींच्या ह्या अचानक प्रश्नाने निशा चांगलीच गोंधळून गेली. तिने बाबाकडे पाहिले. जणू काय तिला बाबांनीच ह्या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे सुचवायचे होते. ही बाब पण चाणाक्ष गुरुजींच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. “काय भास्करराव, ठरलंय ना तर मग? तुम्ही काही काळजी करू नका. सर्व व्यवस्था मी करून देईन,” गुरुजी भास्कररावाकडे पाहत म्हणाले. “गुरुजी तुम्ही म्हणाल तसे,” एवढेच भास्करराव बोलले. अंधार पडायला सुरुवात झाली. गुरुजींचा कृतज्ञभावाने निरोप घेत दोघेही सकारात्मक विचार करीत आपल्या घराकडे निघाले. रस्त्याने जाताना ती तिच्या बाबाबरोबर काहीच बोलली नाही. तिचं मन गुरूजी आणि तिच्या बाबाबद्दल कृतज्ञतेने भरून आलं होतं. तिला त्यांच्याबद्दल काय बोलावे हेच समजत नव्हते. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेच्या अश्रुंनी गर्दी केली होती. त्या अश्रुंना मोकळीक द्यावी असे तिला वाटत असतानाच ते आपोआप वाहते झाले. रस्त्याने ती शांतच होती. बाबांबरोबर काय बोलावे, कसं व्यक्त व्हावं हे तिला कळतच नव्हतं, नव्हे जमतच नव्हतं. “निशा जेवणाची वेळ झाली, खूप भूक लागली असेल ना बाळा तुला?” भास्करराव शांततेचा भंग करीत तिला विचारते झाले. “नाही बाबा,” एवढंच काय ते निशा म्हणाली. आपल्याला पुढील शिक्षणाची संधी मिळतेय या विचाराने तशी ती प्रफुल्लीत झाली होती पण आता आपल्याला थोड्याच दिवसात घरापासून दूर जावं लागणार आहे, बाबापासून दूर राहावं लागणार आहे या विचाराने तिची अस्वस्थता वाढली. अचानक  येणाऱ्या दुःखाश्रुंना ती आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली पण ते काही तिला साथ देण्यास तयार नव्हते. संमिश्र विचारांच्या संघर्षात ते घरी कधी पोहोचले हे निशाला कळलेच नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यातच शाळा सुरू होणार होत्या. गुरुजींनी भास्कररावांना बरोबर घेऊन निशाचा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्याबरोबरच वसतिगृहातील प्रवेशासंबंधीची सर्व पूर्तता करून प्रवेश निश्चित केला. हायस्कूलच्या मुख्याध्यापकांबरोबर शाळेची सर्व माहिती, जसे कमवा अणि शिका, वार्षिक फी, सवलतीचे निकष, विविध शालेय व शासकीय परीक्षा, विविध शिष्यवृत्त्या, अभ्यासेतर उपक्रम त्यांनी घेतले. शाळेतील मुख्याध्यापकांना निशासारख्या गुणवान व हुशार मुलीला प्रवेश देताना आनंद झाल्याचे काही लपून राहिले नाही. “गुरूजी, निशाबाबत आता तुम्ही कोणतीच काळजी करू नका. माझं स्वतःचं तिच्यावर वैयक्तिक लक्ष राहीन. निशाचा आमच्या शाळेतील प्रवेश आमच्यासाठी गौरवास्पदच राहील. शाळेत जेवढ्या काही फायदेशीर योजना असतील त्या सर्वांचा निशाला लाभ होईल याबाबत मी काळजी घेईन. निशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडेल याची मला पूर्ण खातरी आहे. शाळेने तिचे पालकत्व स्वीकारले आहे, असे तुम्ही समजून घ्या,” भास्कररावाकडे व गुरुजीकडे आश्वासीत नजरेने पाहत मुख्याध्यापक म्हणाले. “खूप खूप धन्यवाद सर,” म्हणत त्या दोघांनी कृतज्ञता व्यक्त करीत मुख्याध्यापकांचा निरोप घेतला. दोन दिवसांनी निशाला शाळेत दाखल व्हायचे होते, तेव्हा भास्कररावांनी आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मुलाला व सुनेला खोलीत बोलावून घेतले. निशासह ते एकत्र बसले. भास्करराव म्हणाले, “निशाच्या पुढील शिक्षणाची सोय करून आलोय. हायस्कूलमध्ये शिक्षणाची व वसतिगृहामध्ये राहण्या-जेवणाची सोय आहे. शिक्षणासाठी आपल्याला फारसा खर्च येणार नाहीये. उद्या तिला  सोडवून यायचे आहे.” मुलाला व सुनेला वडिलांचा निर्णय फारसा आवडला नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. सून काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. आता आपले कसे होणार? घरातील सर्व कामे आपल्याला एकटीलाच करावी लागणार तर! ही पोरगी शिकून काय करणार आहे? शिकली तरी लग्न करून सासरीच जाणार आहे ना? निशाची वहिनी आपल्या बुद्धिच्या कुवतीनुसार नको ते विचार करू लागली. अर्थातच तिच्या विचारांना शून्य किंमत होती. मजबुरीने नुकतेच लग्न करून ती या घरात सून म्हणून आली होती. नवऱ्याापुढे व सासऱ्यासमोर ती काही बोलू शकत नव्हती. तिच्या मनात मात्र विचारांची सारखी घालमेल चालली होती. निशा मात्र कुणाबरोबरही काहीही बोलली नाही. मनातून मात्र ती खूप खूश होती. पुढील शिक्षणाची स्वप्नं पाहत, तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच भास्करराव निशाला घेऊन शाळेच्या वसतिगृहात पोहोचले. वसतीगृहातील व्यवस्था छान होती. येताना निशाने बॅगेत अंथरूण, पांघरूण, कपडे व शालेय साहित्य बरोबर घेतले होते. वसतीगृहात नुकत्याच बाहेर गावाहून दोन मुली दाखल झाल्या होत्या. निशाच्या सोबतीला कुणी मुली येतात की नाही, याची भास्कररावांना चिंता होतीच. त्या दोन मुलींना पाहून त्यांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी अतिशय आपुलकीने त्यांची विचारपूस केली. वसतीगृहात कसं गुण्या-गोविंदानं राहायचं, एकमेकींना कशी मदत करायची इ. सूचना त्यांनी त्यांना दिल्या. “निशा तू आता बाहेर शिकण्यासाठी आलेली आहेस. तुझा खूप अबोल स्वभाव आहे, हे मला चांगलंच ठाऊक आहे. इथे मात्र तुला बोलतं व्हावं लागेल. अडीअडचणी एकमेकींना सांगाव्या लागतील. शिक्षकांच्या संपर्कात राहावं लागेल. बाळा शिकून खूप मोठी हो, तब्येतीची काळजी घे,” आपल्या भावनांना आवर घालीत भास्कररावांनी लेकीला महत्त्वाच्या सूचना दिल्या. काय करणार ते तरी, पत्नीच्या अकाली मृत्युनंतर ते खूपच हळवे झाले होते. निशा हे त्यांचं सर्वस्व होती. तिचा भविष्यकाळ उज्ज्वल व्हावा हीच तर त्यांची तळमळ होती. जड अंतःकरणाने त्यांनी निशाचा निरोप घेतला. अश्रू अनावर झाले होते पण निशाला वाईट वाटेल, ती अस्वस्थ राहील म्हणून त्यांनी ते थोपवून धरले होते. बसमधून घरी जाताना मात्र ते उपरण्याने तोंड झाकून धायमोकलून रडत होते. निशा व्यतिरीक्त त्यांच्या मनात कोणताच दुसरा विचार येत नव्हता. सुरुवातीचे काही दिवस निशाला खूपच कठीण गेले. रात्री झोपताना तोंड झाकून ती कित्येक रात्री रडली होती. हळूहळू वर्गातील मुलीबरोबर तिने बोलायला सुरूवात केली. तिच्यात आता बऱ्यापैकी धीटपणा येत होता. सुट्टीच्या दिवशी ती ‌‘कमवा आणि शिका‌’ योजने अंतर्गत काम करीत होती. तिने मात्र एक निर्धार केला होता की, यातून मिळणाऱ्या पैशातून काटकसर करून बचत करायची. भविष्यात कदाचित बचतीचे पैसे उपयोगी पडतील. तिने तिच्या हुशारीने, नियमितपणाने आणि शांत स्वभावाने सर्व शिक्षकांची मने अल्पावधीतच जिंकून घेतली. शिकविलेल्या कोणत्याही विषय भागावर शिक्षकाने प्रश्न विचारला की, निशाचे उत्तर तयार असायचे. प्रत्येक परीक्षेत ती पहिला क्रमांक पटकावित असे. मिळालेल्या उत्तरपत्रिकेत शिक्षकाकडून अनावधानाने जर एखादे उत्तर बरोबर असून चुकीचे अथवा गुण दिलेला नसेल तर ती बाब अतिशय नम्रपणे संबंधित शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्यायची. शिक्षक सुद्धा अतिशय खिलाडू वृत्तीने तिचे समाधान करायचे. जसजशी वर्षे संपत होती तसतसे निशाचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता आणि शेवटी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. निशाच्या दृष्टीने ही परीक्षा अतिशय महत्त्वाची होती. उत्तम गुण मिळाले तर जीवनाला वेगळीच कलाटणी मिळणार होती, हे तिच्या शिक्षकांनी तिला आवर्जून सांगितले होते. यामागे त्यांचाही उदात्त हेतू होताच की. निशाच्या उज्ज्वल यशाने त्यांच्या शाळेच्या नावलौकीकात भर पडणार होती. आणि निशाने कंबर कसून अभ्यासास सुरुवात केली. बोर्डाच्या परीक्षेसाठी निशाची पूर्ण तयारी झाली. जात्याच बुद्धिमान आणि एकपाठी असल्यामुळे इतर मुलांप्रमाणे तिला रात्रंदिवस घोकंपट्टी करावी लागली नाही. नियमितपणा अंगी मुरल्यामुळे तिची तब्येत छान होती. तिच्यात कमालीचा उत्साह काठोकाठ भरलेला होता. परीक्षेचा दिवस अखेर उजाडला. नेहमीप्रमाणे ती सकाळचे सर्व कार्यक्रम उरकून तयार झाली. परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान दोन तास तरी संबंधित विषयाचा अभ्यास करायचा नाही, हे तिने ठरविलेलेच होते. काही वेळ कुणाबरोबरही काहीच बोलायचे नाही. मन कसे अगदी शांत ठेवायचे. नंतर वेळेपूर्वी किमान अर्धा तास आपल्या परीक्षा हॉलकडे जाऊन थांबायचे. जाण्यापूर्वी प्रवेशिका, ओळखपत्र आणि लेखनसाहित्य तपासून घ्यायचे. ज्या विषयाचा पेपर असेल त्या संबंधी कुठलंही इतर साहित्य बरोबर ठेवायचं नाही याची काळजी ती घेत होती. परीक्षा कालावधीत फक्त उत्तरपत्रिका लिहायची, या व्यतिरीक्त वेळेचा अपव्यय होऊ द्यायचा नाही. अशी काही बंधनं तिने स्वतःवर घालून घेतली होती. आणि निशा पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेसाठी अर्धा तास अगोदर आपल्या हॉलकडे जाऊन पोहोचली. परीक्षेचा शेवटचा पेपर दिला आणि निशाला अगदी मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटलं. सर्व पेपर्स तिने उत्तम रीतीने व आत्मविश्वासाने लिहिले. निशा खूपच आनंदात होती. वसतीगृहात आपल्या खोलीत ती आली. नुकत्याच रुममध्ये तिच्या वर्गमैत्रिणी येऊन दाखल झाल्या होत्या. काहींच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर नैराश्य स्पष्ट दिसत होते. भास्करराव आपल्या लेकीला घरी नेण्यासाठी, दुसऱ्या दिवशीच येणार होते. तसा निरोप चार दिवसांपूर्वीच त्यांना मिळाला होता. रात्रीची जेवणं आटोपून काही मुली शांत झोपल्या होत्या तर काहींचा आपापसात चिवचिवाट चालला होता. निशाला मात्र काही केल्या झोप येतच नव्हती. वास्तविक तिला शांत झोप यायला हवी होती पण तसे काही होत नव्हते. आता पुढे काय? हा विचार तिला चांगलाच सतावू लागला होता. पुढे खूप शिकावे ही तर तिची प्रबळ इच्छा होती पण कसे आणि कोठे शिकायचे? काय शिकायचे? परिस्थितीमुळे हे कितपत शक्य होईल? की बाबा आपले लग्न उरकतील? ह्या प्रश्नांनी तसं तिला घायाळ व्हायला झालं. म्हणून तर निद्रादेवी तिला प्रसन्न होत नव्हती. निशाने आता आपल्या वयाची सोळा वर्षे पूर्ण केली होती. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट या गोष्टींचा विचार करण्याइतकी ती सक्षम झाली होती. या अवखळ वयात खरं तर भरकटणारे विचार थैमान मांडीत असतात. मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. स्वकेंद्रित व्हायला होतं. निशा मात्र याला अपवाद होती. देवाची प्रार्थना करीत असतानाच तिला केव्हा झोप लागली कळलेच नाही. रात्री उशिरा झोपल्यामुळे निशाला सकाळी काही लवकर जाग आली नाही. नेहमी मात्र ती पहाटे चार वाजताच अभ्यासासाठी उठायची. ‌‘लवकर निजे लवकर उठे‌’ हा मंत्र तिने काटेकोरपणे अंमलात आणला होता, म्हणून तर तिची तब्येत छान होती. वातावरण बदलामुळे सर्दी सोडली तर तिला कोणताही आजार झाला नाही. नियमितपणा तिच्या अंगी चांगलाच मुरला होता. निशा अजून झोपलेली आहे, हे पाहून तिच्या मैत्रिणीने तिला जोरदार हलवून जागे केले. “काय गं हे निशा? सकाळी लवकर उठणारी निशा, आठ वाजलेत तरी अजून झोपलेली आहे. बरं वाटत नाही की काय तुला?” मैत्रिणीने आपली शंका व्यक्त केली. “नाही गं, तसं काही नाही. रात्री जरा उशिराच झोपले म्हणून जाग आली नाही,” निशाने खुलासा केला. बाबा येणार म्हणून तिने भराभर आवरायला सुरूवात केली. राहून राहून, आता पुढे काय? हा प्रश्न तिला खूप सतावीत होता. बऱ्याच दिवसात तिला अंघोळ करायला निवांत असा वेळ मिळतच नव्हता त्यामुळे त्या दिवशी मनसोक्तपणे बराच वेळ तिने बाथरूममध्ये घालवला. कधी नव्हे त्या दिवशी आपले सुंदर लांबसडक केस साबणाने स्वच्छ धुतले. नकळतपणे आपल्या सर्वांगावरून तिने नजर फिरवली. खूपसे बदल झाल्याचे तिला जाणवले पण निसर्गधर्माप्रमाणे हे होणारच याची तिला जाणीव झाली. क्षणात आपल्या विचारांना दूर सारून, आपल्या मोकळ्या केसांना उन्हात सुकविण्यासाठी, रूमपासून दूर अंतरावर एका मोठ्या दगडावर जाऊन ती बसली. तिचे बाबा येण्याची ती वाट पाहत  होती. तेवढ्यात मैत्रिणीने “निशा, अगं तुझे बाबा आलेत,” म्हणून हाक दिली. निशा लगबगीने आहे तशीच धावतच रुमकडे गेली. बाबांना पाहून तिला कमालीचा आनंद झाला होता. झालेला आनंद आणि बाबावरचे अतीव प्रेम मात्र तिला ना दाखवता आले, ना व्यक्त करता आले. “बाबा किती वेळ झाला तुम्हाला येऊन? तब्येत कशी आहे?” जसे सुचेल तसे निशा बोलू लागली. “मी बरा आहे. काय अवतार घेतलास पोरी?” तिच्या मोकळ्या केसांकडे पाहत भास्करराव विचारते झाले. बाबांना काय सांगावं हे निशाला कळेनासे झाले. गोंधळलेल्या मनःस्थितीत ती काहीतरी बोलणार हे भास्कररावांनी ओळखले आणि ते तिलाच विचारते झाले, “निशा परीक्षेत पेपर नीट लिहिलेस ना? चांगले मार्क्स मिळायला पाहिजेत बरं.” क्षणाचाही विलंब न लावता निशा म्हणाली, “होय बाबा, सर्व पेपर्स छान लिहिलेत आणि मार्क्स ही चांगलेच मिळतील.” आता पुढे काय करायचंय? बाबांच्या मनात नेमकं काय आहे? गावाकडे मुलीचे लग्न तर लवकर करतात. माझे पण लग्न आता उरकून टाकण्याचा तर त्यांचा विचार नसेल ना? माझी तर पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे! पण कसे? बाबाबरोबर याबाबत मी कसे बोलू? भराभर एक ना अनेक विचार तिच्या मनात क्षणात येऊन गेले. तेवढ्यात शाळेतील शिपाई वसतिगृहाकडे येताना निशाला दिसला. तिथे येताच, “निशा तुला हेड सरांनी लगेच भेटायला बोलावले आहे,” सांगून तो शाळेकडे निघून गेला. निशाने आपले केस आवरले. शाळेचा गणवेश घालून ती शाळेकडे निघाली. खरं तर तो सुट्टीचा दिवस होता. गणवेश घालून शाळेत जाण्याची तशी आवश्यकता नव्हती पण सकाळपासून निशाला काही सूचतच नव्हते. त्यातच तिचे बाबा तिला घरी नेण्यासाठी आल्यामुळे तिच्या डोक्यात अनेक प्रश्न आणि वेगवेगळ्या विचारांनी थैमान घातले होते. मुख्याध्यापक आपल्याला आज लगेचच शाळेत बोलवतील, हे तिच्या मनीध्यानी सुद्धा नव्हते. शाळेकडे जाताना तिच्या मनात पुन्हा विचारचक्र सुरू झाले. सरांनी आज लगेचच का बरे बोलावले असेल? पुढच्या शिक्षणाविषयी विचारणार आहेत का? एखाद्या त्यांच्या माहितीतील मुलाबरोबर लग्नासंबंधी माझं मत विचारणार आहेत का? की सुट्टीमध्ये एखाद्या मार्गदर्शन वर्गात सहभागी होण्याबद्दल विचारणा करणार आहेत? निशाचं डोकं खऱ्या अर्थाने आता बधिरावस्थेकडे चाललं होतं आणि निशा मुख्याध्यापकांच्या केबीनसमोर येऊन उभी राहिली. केबीनमध्ये गणित व शास्त्र आणि इंग्रजी विषय शिकविणारे शिक्षक अगोदरच येऊन बसलेले होते. शिपायाने आत जाऊन मुख्याध्यापकांना निशा आल्याचे सांगितले. साधारण दहा मिनिटांनी निशाला केबीनमध्ये बोलावण्यात आले. आत आल्याबरोबर मुख्याध्यापकांनी निशाला आडव्या बाकावर बसण्याचे सुचविले. निशाला कमालीचा संकोच वाटत होता. “नाही सर, मी ठीक आहे,” अडखळत निशा म्हणाली. इतर शिक्षक अणि मुख्याध्यापक यांच्या समोर केबीनमध्ये कसं बसावं? तिच्यातील नम्र भाव, संयम, विनयशीलता आणि आज्ञाधारकपणा तिला सरांच्या समोर बसण्यास विरोध करीत होता. “निशा, तुला बसायला सांगतो ना? विनासंकोच बाकावर बस बरं,” मुख्याध्यापकांनी आदेश दिला. निशाला काय करावं ते सुचेना. अवघडलेल्या स्थितीत सरांच्या आज्ञेचे पालन करायचे म्हणून ती अवघडतच बाकावर बसली. “तुझ्या बाबा बरोबर बोलायचं होतं. तुला घ्यायला कधी येणार आहेत ते?” निशाकडे पाहत मुख्याध्यापकांनी निशाला विचारले. “सर, बाबा इतक्यातच आलेले आहेत,” निशा उत्तरली. सरांनी शिपायाला आत बोलावलं. “अरे बापू, वसतीगृहाकडे जा. तिथे निशाचे वडील आलेले आहेत, त्यांना इकडे घेऊन ये,” मुख्याध्यापकांनी शिपायाला सांगितले. बापू शिपाई लगबगीने वसतीगृहाकडे सरांचा निरोप घेऊन गेला. निरोप मिळताच भास्करराव तात्काळ मुख्याध्यापकांकडे आले. सरांनी कशाला बोलावले हे काही केल्या त्यांना कळेना. नाना प्रश्न आणि विचार त्यांच्या मनात निर्माण झाले. निशाबद्दल काही तक्रार तर नाही ना? हा प्रश्न खरे पाहता उगीचच त्यांच्या मनात आला. निशाचा स्वभाव, तिचं वागणं याबाबत त्यांना कमालीचा आत्मविश्वास होता. तिच्याकडून काही गंभीर चूक तर झाली नसेल ना? परीक्षेत कॉपी वगैरे काही गैरमार्गाचा अवलंब तर तिने केला नसेल ना? शिक्षकांशी उद्धटपणे तर वागली नसेल ना? अशा कितीतरी नको त्या प्रश्नांनी त्यांना भंडावून टाकलं. बापाचं मन आहे ना? काळजी वाटणारच. शिवाय निशावर तर त्याचं जीवापाड प्रेम. आपल्याला बोलवायचे तसे काही खास कारण नक्कीच असले पाहिजे. भेटून तर येऊ. बघू या सर काय म्हणतात ते. विचार करीत असतानाच ते मुख्याध्यापक कार्यालयाजवळ येऊन पोहोचले. शिपायाने भास्करराव आल्याची वर्दी लगेच मुख्याध्यापकांना दिली. “या भास्करराव,” आदरयुक्त भावनेने मुख्याध्यापकांनी त्यांना आत बोलावलं. बराच वेळ ते सरांच्या समोरच काहीही न बोलता उभे राहिले. गणिताचे सर आपल्या खुर्चीवरून उठले व भास्कररावांचा हात पकडून त्यांना आग्रहाने शेजारच्या खुर्चीवर बसवले. भास्करराव जरा अवघडतच खुर्चीवर बसले. “काय भास्करराव बरे आहात ना? निशाला घेण्यासाठी आलात तर!” मुख्याध्यापकांनी आपुलकीने चौकशी केली. “हो सर. मी बरा आहे. कालच परीक्षा संपल्याचे निशाने कळवले आणि आज लगेचच आलो तिला घ्यायला,” भास्कररावांनी खुलासा केला. “मग आता पुढे निशाचे काय करायचे ठरविले? लग्न की पुढे शिकवायचे?  निशा आता मोठी झालीय म्हणून सहजच विचारतोय,” भास्कररावांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा सरांचा मानस होता. निशा गंभीरपणे वडिलांची आणि सरांची प्रश्नोत्तरे ऐकत होती. बाबा काय उत्तर देतात, त्यांची काय इच्छा आहे? हे ती स्वतः विचारू शकत नव्हती. सरांच्या प्रश्नांनी, वडिलांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घेण्याची संधी आपसूकच तिला मिळाली. बाबांचे मत जाणून घेण्यास ती कमालीची उत्सुक झाली होती. “सर, मला तर मनापासून वाटतंय की, निशाने भरपूर शिकावं म्हणून. आताशा आमची आर्थिक परिस्थिती पण बरी आहे. शिक्षणासाठी जर तिला शहरात जावं लागलं तर तिचा खर्च मी भागवू शकेन! पण सर, याबाबत मला तर काहीच कळत नाही. तिने काय शिकावे, कुठे शिकावे, याबाबत निशाच्या मनात काय आहे, हे तुम्हीच विचारले तर बरे होईल. पोरगी मला स्पष्ट असं काही सांगणार नाही आणि तिच्याबाबत सर तुम्हीच काय ते ठरवा. तुम्ही सांगाल त्यासाठी माझी तयारी आहे,” भास्कररावांनी आपलं मन मोकळं केलं आणि ते एकटक मुख्याध्यापकांकडे पाहत राहीले. मुख्याध्यापक काही बोलण्याच्या अगोदरच गणित विषय शिकविणारे सर म्हणाले, “सर, तुम्हाला माहीत आहेच, आत्ता पर्यंतच्या सर्व परीक्षांत निशाने गणितात पैकीच्या पैकी गुण मिळविले आहेत. इतर विषयांच्या तुलनेत गणितामध्ये तिला विशेष रस आहे असे मला वाटते. तेव्हा अभियांत्रिकीकडे तिने प्रवेश घ्यायला हरकत नाही. गणित, भौतिक आणि रसायनशास्त्रात तिची खूप चांगली प्रगती आहे. अभियांत्रिकीसाठी ती पूर्णतः पात्र आहे. गुणवत्तेनुसार तिला विनाअडथळा शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल. शिवाय बऱ्याच शैक्षणिक सवलतींचा तिला लाभ घेता येईल. संगणकशास्त्राची शाखा निवडली तर भविष्यात तिला उत्तम करियर करण्याची संधी मिळेल. निशासारख्या मुलीने संगणकशास्त्राची पदवी घेतली तर तिचं आयुष्यच बदलून जाईल.” अभियांत्रिकी शिक्षणा विषयीचे सर्व बारकावे ऐकून निशा आणि तिचे बाबा आश्चर्यचकित झाले. मुख्याध्यापक निशा आणि तिच्या बाबाकडे आळीपाळीने पाहत  म्हणाले, “सरांनी आत्ता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली. शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला की आर्थिक भार पण कमी राहील. शिवाय काळाच्या गरजेनुसार पदवी घेतल्यामुळे निशाचा भविष्यकाळ पण उज्ज्वल राहील. काय भास्करराव, ठीक आहे ना? निशा तुला काय वाटते?” भास्करराव म्हणाले, “सर, तुम्ही सर्व जण जे ठरवाल ते मला मान्य आहे. तिच्या शिक्षणासाठी मी पैसे कमी पडू देणार नाही.” निशाकडे पाहत ते म्हणाले, “काय निशा,बोल ना. सरांना सांग, तुझ्या मनात काय आहे ते?” क्षणभर निशाला काय बोलावं ते सुचेनाच. प्रथम तिने आपल्या बाबांकडे पाहिले. पुढील शिक्षणाबाबत अजून ती तिच्या बाबाबरोबर बोललीच नव्हती. बाबांच्या चेहऱ्यावरील हावभाव तिने पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद काही लपून राहिलेला नव्हता, हे तिने लगेच ओळखले. बाबाविषयीचे प्रेम आणि कृतज्ञताभाव तिच्या मनात ओतप्रोत दाटून आला. तिला व्यक्त होण्यासाठी शब्दच सापडेनात पण तिचं हे अव्यक्त प्रेम तिच्या बाबांना चांगलच ठाऊक होतं. शेवटी न राहवून तिचे बाबा म्हणाले, “अगं निशा, सर तुला काय विचारताहेत? सांग की त्यांना, तुला काय वाटतंय ते? पुढे शिकायची इच्छा आहे की नाही?” मुख्याध्यापकांकडे पाहत निशा अडखळत म्हणाली, “बाबांची तयारी असेल तर मला पण शिकण्याची इच्छा आहे. तुमचं मार्गदर्शन असेल तर तुम्ही सांगाल त्या शाखेकडे शिकण्याची माझी तयारी आहे. पुढे काय शिकावं हे मला कुठे ठाऊक आहे? सर, बाबा आणि तुम्ही जे काही ठरवाल ते करण्याची माझी तयारी आहे. शिक्षणासाठी माझी कुठेही जाण्याची तयारी आहे.” “वा! छानच! भास्करराव, निशाचा निग्रह आणि उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे बरं का! तुम्ही दोघांनीही आता कसलीच काळजी करायची नाही. बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला की तुम्हाला कळवू. पुढची जबाबदारी आमची. काय निशा खूश ना?” निशाकडे पाहत मुख्याध्यापक म्हणाले. सरांचे मनःपूर्वक आभार मानून भास्करराव आणि निशाने त्यांचा निरोप घेतला. निशा अणि भास्करराव लगबगीने वसतीगृहाकडे आले. निशाने आपल्या सामानाची बांधाबांध केली. दोघेही वेळ न घालवता लगेच बसस्थानकाकडे गेले. गावाकडे जाणाऱ्या बसला अर्धा तास वेळ होता. दोघांनी तेथीलच हॉटेलमधे काहीसे खाऊन घेतले. सायंकाळी सहा वाजता त्यांची बस गावात पोहोचली. निशा खूप आनंदात होती. तिच्या वहिनीने स्वयंपाकास सुरूवात केली होतीच. “सूनबाई, आज जेवणात गोड शिरा बनवा,” भास्करराव सुनेकडे पाहत म्हणाले. सुनबाई सासऱ्याकडे अणि निशाकडे आळीपाळीने साशंकतेने पाहत होती. सासऱ्यांची सूचना तिला बिलकूल आवडली नाही पण सासऱ्याने सांगितले म्हटल्यावर तिला ऐकणे भागच होते. पोरी साठी काय नखरे चाललेत म्हणायचे? काय एवढा पराक्रम करून आली ही बया कुणास ठाऊक. ह्या पोरीसाठी बाप काय काय करणार आहे देवालाच ठाऊक, मनाशीच सूनबाई पुटपुटत होती. निशाला कोणाबरोबर काय बोलावे हे सुचतच नव्हते. ती प्रत्येकाशी काहीतरी बोलायचं म्हणून काहीबाही बोलत होती. रात्रीच्या आठ वाजता सगळ्यांची जेवणं आटोपली. वहिनीने निशाला चांगलेच कामाला जुंपले. सगळी आवराआवर होता होता रात्रीचे दहा वाजले. घर कसं शांत झालं होतं पण निशाला मात्र काही केल्या झोप येतच नव्हती. दोन महिन्यात बोर्डाचे रिझल्ट जाहीर होतील. नंतर कुठे जावे लागेल काही सांगता येत नाही. आपण नेमकं कोणतं शिक्षण घेणार आहोत? सर म्हणाले की, संगणकशास्त्र. संगणकाविषयी तर आपण फक्त ऐकलं आहे. ते शिकायचं म्हणजे नेमकं काय? काहीच समजत नाही. जाऊ दे, बघू जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. बाबांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी तयारी दाखवली हेच आपल्यासाठी खूप काही आहे. शिवाय शाळेतील सर तर सर्व प्रकारची मदत करायला तयार झालेत. नशीब आणि सुख म्हणतात ते यापेक्षा काय वेगळे असते? एका अनोख्या शहरात आपल्याला जावे लागेल. सर्वच काही नवीन. जमेल का आपल्याला जुळवून घ्यायला? ना कोणी नातेवाईक, ना मित्र मैत्रिणी, ना कोणी ओळखीचे. बाप रे! खरंच कसं होणार आपलं?  निशा मनातील असंख्य प्रश्नांशी झगडत होती, संभ्रमित होत होती. कोणत्याच प्रश्नाचे हमखास उत्तर तिला मिळत नव्हते. क्षणभर, थैमान घालणाऱ्या विचारांना आणि प्रश्नांना निशाने थोपविले. वीज चमकून जावी तसा एक होकारात्मक विचार तिच्या डोक्यात चमकून गेला. अगं निशा, अशी संभ्रमित नको होऊस! तू नशीबवान आहेस. तुला चांगली संधी मिळतेय तुझं आयुष्य घडविण्याची. शांत हो. येणाऱ्या संधीची वाट पाहा. आणि आश्चर्य म्हणजे निशाला कधी झोप लागली ते कळलेच नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बोर्डाचा निकाल जाहीर झाला. शाळेतच नव्हे तर जिल्ह्यामधे तिने पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात तिचा फोटो छापून आला. सगळीकडे निशाचे कौतुक झाले. तिच्या बाबांना तर कमालीचा आनंद झाला. सगळीकडून निशावर कौतुकाचा वर्षाव झाला. जवळच्याच दहा-वीस किलो मीटर अंतरावर असणाऱ्या गावातील रामरावांच्या कानावर निशाच्या उत्तुंग यशाची बातमी पोहोचली. रामरावांनी उत्सुकतेने वर्तमानपत्रात निशाच्या यशाची बातमी वाचली. त्यांचा मुलगा निशिगंध पण उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता पण निशाचे यश त्याच्यापेक्षा जरा सरसच होते. घरात निशाच्या यशाबद्दल चर्चा चालू होती. त्यावेळेस निशिगंध पण हजर होता पण त्याने गांभीर्याने याबद्दल काही विचार केलाच नाही. निशा नावाची कुणीतरी मुलगी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली, येवढाच काय तो विचार क्षणभर त्याला स्पर्शून गेला. गुणवत्तेनुसार निशाला पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. जवळच मुलींच्या हॉस्टेलवर तिच्या जेवणा-राहण्याची सोय झाली. शाळेतील उत्साही गणित शिक्षकांनी निशाच्या पुढील शिक्षणाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. योगायोगाने त्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्तेनुसार निशिगंधला पण प्रवेश मिळाला. दोघे, निशा आणि निशिगंध ग्रामीण भागातून पुण्यासारख्या आधुनिक विचारांच्या शहरात आले. निशा कमालीची शांत आणि अबोल तर याउलट निशिगंध कमालीचा बोलका व धाडसी स्वभावाचा! पण या शहरात मात्र सुरुवातीच्या काळात जुळवून घ्यायला निशाला बराच त्रास झाला. कॉलेजचे पहिले वर्ष संपले आणि निशा सुट्टीमध्ये आपल्या गावी आली. गावापासून थोड्याच अंतरावर श्रीरामाचे मंदिर होते. रामनवमी निमित्ताने तेथे मोठा यात्रोत्सव होता. राम जन्मानंतर गावकऱ्यांनी तरुणांसाठी कथा स्पर्धांचे आयोजन केले होते. पहिल्या तीन स्पर्धकांना मोठ्या रकमांची बक्षिसे ठेवली होती. यात्रेत कुस्त्यासाठी जसे लांब लांबून पहिलवान आपलं कौशल्य आजमावण्यासाठी येतात अगदी तसेच तरुण-तरुणी आपले भाषणकौशल्य सिद्ध करण्यासठी यात्रेत आनंदाने हजेरी लावतात. निशा आणि तिचे बाबा मुद्दामच त्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी गेले होते. मंदिराच्या समोरच सभामंडप घातलेला होता. मंडपात अबालवृद्ध जागा मिळेल तिथे बसले होते. कथा स्पर्धा हे त्या यात्रेचे खास आकर्षण होते. गीतरामायणाच्या मधूर गीतांनी वातावरण अतिशय प्रफुल्लित झाले होते आणि लगेचच स्पर्धेला सुरूवात झाली. व्यासपीठापासून थोड्याच अंतरावर निशा आणि तिचे बाबा बसलेले होते. प्रत्येक स्पर्धकाला अगदीच जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी निशाला मिळणार होती. त्या दिवशी निशा फारच सुंदर दिसत होती. पुण्याहून घरी सुट्टीला येताना तिने स्वतःसाठी खास आवडीचा ड्रेस घेतला होता. निळा रंग तिची आवड असल्यामुळे, त्या रंगाचा ड्रेस घेण्याचा मोह तिला काही आवरता आला नाही. गोऱ्या रंगावर तर त्या ड्रेसचं सौंदर्य अधिकच खुलले होते. तिने मुद्दामच त्या दिवशी आपले लांबसडक काळेभोर केस मोकळे सोडलेले होते. तिला पाहताक्षणी कुणालाही पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता. आपल्याकडे आजूबाजूचे तरुण-तरुणी पुन्हा पुन्हा पाहतात, हे तिच्या लक्षात आल्यावाचून राहीले नाही. त्या विचाराने तर ती चांगलीच सुखावत होती. निसर्ग धर्मानुसार तिच्या भावभावना तरुण सुलभपणाला आव्हान देत होत्या पण स्वतःच्या करियर व्यतिरीक्त निशा इतर कोणत्याही गोष्टींना अधिक महत्त्व देत नव्हती. आत्तापर्यंत तिच्या मनात कुणाहीबद्दल ना प्रेम, ना आकर्षण वाटले होते. स्वतःच्या भावनांना कसा आवर घालायचा हे तिला चांगलेच ठाऊक होते. बरीच भाषणं ऐकल्यानंतर भास्करराव निशाला म्हणाले, “निशा, मला वाटतं आपण आता प्रभूंचे दर्शन घेऊन निघावे.” निशाने मान हलवून त्यांना संमती दर्शवली आणि ते निघणार, एवढ्यात, “आता निशिगंध रामराव पाटील आपली कथा सादर करतील,” असे सूत्रसंचालकाने जाहीर केले. निशिगंधचे नाव ऐकल्याबरोबर निशा एकदम दचकली. आपल्या कॉलेजमधील तर हा निशिगंध आहे की दुसरा कुणी आहे? हा प्रश्न तिच्या समोर दत्त म्हणून हजर झाला. उत्सुकतेने ती त्याच्याकडे पाहत होती. निळी पँट अणि त्यावर स्वच्छ पांढरा शर्ट त्याने घातला होता. भारदस्त शरीर यष्टी आणि किंचितशी वाढलेली दाढी यामुळे तर त्याचं व्यक्तिमत्त्व चांगलच खुलून दिसत होतं. व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रहो,  भारदस्त आवाजात त्याने आपली कथा सादर करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रभावशाली आवाजाने सभामंडपात एकदम शांतता पसरली. निशिगंध कोणती कथा सादर करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अरे हा तर आपल्या कॉलेजमध्ये आणि आपल्याच वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे. निशा मनातच पुटपुटली. आपली तर नुकतीच त्याच्याशी तोंडओळख झालेली आहे. किती छान आणि भारदस्त दिसतोय हा. पांढरा शर्ट, निळ्या पँटवर तो किती छान दिसतोय आणि त्याच्या आवाजाला तर कमालीची धार आहे. त्याचं उभं राहणं, त्याचे हावभाव तर कुणालाही आकर्षित करणारे असेच आहेत. आपल्याला त्याच्याकडे इतके बारकाईने पाहण्यास कधी जमलेच नाही. आपण  तसा कधी विचारच केला नाही. एवढा स्मार्ट, देखणा तरूण आपला क्लासमेट आहे, हे वर्षभरात कधी कळलेच नाही. आज माझ्या मनात हे असले विचार का बरे येतात? काय झालंय मला? मन आणि शरीर असं का मोहरुन जातंय? त्याच्याकडेच सारखं पाहायला का होतंय? त्याच्या आवाजात विलक्षण जादू दिसतेय! निशा मनातल्या मनात निशिगंधविषयी पहिल्यांदा एवढा विचार करु लागली होती. आत्तापर्यंत कुणाही तरूण मुलाबद्दल तिच्या मनात अशाप्रकारचे विचार कधीच आले नव्हते. क्षणार्धात तिने स्वतःला सावरले. निशिगंध कोणती कथा सादर करतोय हे ऐकण्यास ती कमालीची उत्सुक झाली. निशिगंधने यात्रोत्सवाला (श्रीराम जन्मोत्सव) अनुरूप अशी रामायणातील सीतेचे हरण आणि तिचे पतीप्रेम ही कथा सांगितली. कथा सांगताना प्रसंगाचं गांभीर्य, आवाजातील चढउतार यांनी श्रोत्यांची मने जिंकली. प्रसंगाचं वर्णन करताता तो प्रसंग हुबेहुब श्रोत्यांच्या पुढे उभा करण्याचं त्याचं कौशल्य खरोखरच वाखाणण्यासारखं होतं. त्यावेळी काहींचे चेहरे अगदी गंभीर झालेले होते. काहींच्या डोळ्यातून तर अश्रू वाहते झाले होते. निशिगंधाच्या भाषा कौशल्याने सर्व श्रोत्यांना अगदीच प्रभावित केले होते. कथा सुरू असताना निशाला पण आपले अश्रू आवरता आले नाहीत. आतापर्यंत तिने अशाप्रकारचे कथाकथन कधी ऐकलेलेच नव्हते. निशिगंधाच्या प्रभावी सादरीकरणाने ती कमालीची प्रभावित झाली होती. ‌‘माझी कथा पूर्ण करून मी इथे थांबतो,‌’ असे जाहीर करून निशिगंध आपल्या जागेवर जाऊन बसला. निवेदकाने, ‌‘थोड्याच वेळात परीक्षक, कथा स्पर्धेचा निकाल जाहीर करतील. कृपया सर्व श्रोत्यांनी शांतता पाळावी,‌’ अशी सूचना श्रोत्यांना दिली. थोड्याच वेळात मुख्य परीक्षक हातात पेपर्स घेऊन माईक समोर येऊन उभे राहीले. ‌‘आजच्या कथा स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत निशिगंध रामराव पाटील!‌’ परीक्षकाने जाहीर केले. टाळ्यांचा प्रचंड आवाज सगळीकडे दुमदुमला. किती तरी वेळ श्रोते टाळ्या वाजवित होते. निशिगंध खरोखरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता. इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याचं सादरीकरण खूपच उत्कृष्ठ होतं. सर्वांच्या टाळ्या वाजवणे थांबले होते. निशा तर स्वतःला अगदी हरवून बसली होती. आपण काय करतोय हे ती पूर्णपणे विसरली होती. हळू आवाजात तिचं टाळ्या वाजवणे चालूच होते. शेजारी आपले बाबा बसले आहेत हे तिला विसरायला झालं. यापूर्वी तिला असा अनुभव कधीच आलेला नव्हता. तिच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त निशिगंधच दिसत होता. त्याचं माईकसमोर उभं राहणं, त्याचे हावभाव, शब्दफेक, आवाजातील चढउतार, मध्येच चेहऱ्यावरील बदलते हावभाव आणि त्याचं रुबाबदार दिसणं ह्या सर्वांनी जणू काय तिला वेडच लावलं होतं. “अगं निशा, कार्यक्रम संपलाय. निघायचंय ना आता? एवढी कावरीबावरी झालेली का दिसतेय तू? तुला कथा फारच आवडलेली दिसते. खरंच रामायणातील ती कथा मला पण खूप आवडली बरं का. चल आता उशीर होतोय आपल्याला,” भास्करराव निशाला उठवत म्हणाले. निशिगंध ला भेटावे का? त्याचे अभिनंदन करायला हवे ना? पण एवढ्या गर्दीत ते कसे शक्य आहे? शिवाय बाबा? नाही नकोच. कॉलेज सुरू झाले की, आवर्जून त्याचे अभिनंदन करु. माझ्या उपस्थितीचा त्याला पण आश्चर्याचा धक्का बसू दे की. निशाचे मनातले मांडे फारच खरपूस रूप धारण करीत होते. त्या दिवशी केवळ निशिगंधाचाच विचार करीत निशा घरी पोहोचली. रात्रीची जेवणं आटोपली. वहिनीने आणि निशाने घरातील सर्व कामे उरकली. झोपण्यासाठी निशा खोलीत जात होती. भास्करराव अजून झोपलेले नव्हते. लेकीबरोबर त्यांना काहीतरी बोलायचे होते. त्यांनी निशाला हाक मारून जवळ बोलावून घेतले. बाबा कशाला बरं बोलावताहेत? आज दिवसभर तर आपण त्यांच्या बरोबरच होतो ना. त्यांना माझ्याविषयी काही संशय तर आला नाही ना? त्यावेळेस मला काय झाले होते हे खरंच काही कळत नव्हते. निशिगंधाला पहिले बक्षीस मिळाले. त्याच्या भाषणाने मला अगदीच प्रभावित केलं आणि मला देहभान विसरायला झालं. निशा पुरती गोंधळून गेली. बाबांनी याबाबत काही विचारलंच तर काय सांगावं याचा ती विचार करीतच भास्कररावांजवळ जाऊन उभी राहीली. अवघडल्यासारख्या स्थितीत उभ्या राहीलेल्या निशाला त्यांनी आपल्या जवळ बसायला सांगितले. बाबा काय विचारणार आहेत, हा विचार करीतच ती भास्कररावांजवळ जाऊन बसली. “निशा, तुझी सुट्टी संपत आली आहे. रविवारी तुला पुण्याला जावं लागणार आहे. तुझ्याबरोबर तुला सोडवायला मी येऊ का?” भास्करराव म्हणाले. गोंधळलेल्या आणि काहीसे घाबरलेल्या निशाला सुटका झाल्यासारखे वाटले. तसे पाहता तिच्याकडून असे काहीच विपरीत घडलेले नव्हते. निशा तरूण होती. एखाद्या तरुणाविषयी गुणात्मकदृष्ट्या जर तिला आकर्षण वाटले तर त्यात गैर काय आहे? निशिगंध हा तिचा क्लासमेट. अनपेक्षितपणे त्याने कथा स्पर्धेत भाग घ्यावा, त्याच्या भाषाकौशल्याने तिने प्रभावित व्हावं, त्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळावं आणि निशाला आनंद व्हावा ह्या गोष्टी कशा अगदी योगायोगाने जुळून आलेल्या होत्या. यापैकी कोणतीही गोष्ट ठरवून थोडीच झाली होती? निशा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती, हे तर निशिगंधाला ठाऊकही नव्हते. त्याच्याविषयी तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आल्या हे फक्त तिलाच ठाऊक होते. “बाबा, उगीचच कशाला धावपळ करता? मी जाईल की एकटी. बाबा, आता मी लहान आहे का हो?” मोकळेपणाने निशा म्हणाली. “बरं बाई, तू म्हणशील तसे! मग झालं तर? रात्र बरीच झालीय, जा आता झोपायला,” प्रेमळपणे भास्करराव लेकीला म्हणाले आणि ते स्वतः झोपायला निघून गेले. उद्या सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे. सकाळी सात वाजता बस आहे. पावणे सातला तरी स्टँडवर पोहोचायला हवं. ती बस चुकली तर सायंकाळी थेट पाच वाजता बस आहे. एवढ्या उशीरा जाणं आपल्याला शक्य नाही. पुण्यात तर प्रत्येक ठिकाणी वेळेचं बंधन पाळतात. उशीर झाल्यामुळे हॉस्टेलवर प्रवेश मिळणार नाही. कदाचित रात्रभर आपल्याला बाहेरच थांबावे लागेल. नाही नाही, जरा लवकर उठून सातच्या बसनेच  गेलं पाहिजे, निशा स्वतःच्याच मनात पुटपुटत होती. बॅग भरून खरं तर तिनं लवकर झोपायला हवं होतं पण तिला बॅग भरण्याचेही सूचत नव्हते आणि झोपही येत नव्हती. का कुणास ठाऊक त्या दिवशी मात्र तिच्या मनात निशिगंधा व्यतिरीक्त कोणतेच विचार येत नव्हते. त्याने तिच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला होता. ती मनाशीच विचार करीत होती, कोण हा निशिगंध? तसा त्याचा आणि आपला संबंध आलाच कुठंय? मग हे असं का होतंय? निशाला तिचे तिलाच समजेनासे झाले पण कोणत्या तरी अनामिक भावनेने तिला घेरले होते, हे ती नाकारू शकत नव्हती. बळे बळे ती उठली आणि पटापट आपली बॅग भरून अंथरुणावर आडवी झाली. निशाचे बाबा  सकाळीच तिला बस स्टँडवर सोडवायला गेले. दोन बॅगा घेऊन निशाला चालत चालत स्टँडवर जाता येणार नाही, म्हणून ते बॅग घेऊन तिच्याबरोबर गेले. स्टँडवर बस उभीच होती. “निशा, काळजी घे पोरी! वेळच्या वेळी जेवत जा. जास्त जागरण करु नकोस. आपल्या शेजारच्या काकाकडे फोन आहे. जमेल तसा फोन करीत जा,” भास्करराव एका पाठोपाठ निशाला सूचना देत होते. निशाचं मन भरुन आलं. डोळ्यात अश्रू गर्दी करीत होते पण मोठ्या शिताफीने तिने त्यांना आवरून धरले होते. बाबांचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे तिला चांगलेच ठाऊक होते. फक्त तिला ते व्यक्त करता येत नव्हते. “काय हो बाबा, आता मी लहान आहे का एवढ्या सूचना द्यायला? नका काळजी करू माझी,” कसेबसे निशा म्हणाली. “पोरी, तू कितीही मोठी झाली ना, तुझ्या बापाला तू लहानच आहेस. बॅगा नीट ठेव आणि सतत लक्ष ठेव. एसटीतून बॅगा चोरीला जातात असं मी ऐकलं आहे,” बस सुटण्याच्या वेळी भास्कररावांनी पुन्हा सूचना दिल्या. बरोबर सात वाजता बस पुण्याकडे निघाली. खिडकीतून एकटक, निशा आपल्या बाबांकडे पाहत होती. आता मात्र तिने आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. बराच वेळ निशाला काहीच सुचेना. आई गेल्यापासून तिचे बाबा खूपच हळवे झाले होते. नेमाने दर रविवारी त्यांना आठवणीने शेजारच्या काकांकडे फोन करायचा निर्धार तिने केला. शेजारच्या सिटवर बसलेल्या आजोबांकडे वर्तमानपत्र होते. बारीक अक्षरे चालू बसमध्ये वाचता येत नव्हती म्हणून त्यांनी मोठ्या अक्षरातील हेडलाईन्स वाचायला सुरूवात केली. अधूनमधून निशा पेपरकडे सहजच डोकावत होती. पुरवणी पेपरवर, जाड अक्षरातील, यात्रेतील कथा स्पर्धेच्या बातमीने तिचे लक्ष वेधून घेतले. बातमीच्या खाली मोठा फोटो पण छापलेला होता. निशाच्या मनात उत्सुकता जागृत झाली. यात्रेतील कथा स्पर्धेची तर ही बातमी असेल काय? निशा मनातल्या मनात पुटपुटली आणि पुन्हा तिचं मन वेगाने यात्रोत्सवाकडे धावत गेलं. “काका, थोडा वेळ मला ही पुरवणी देताय का?” निशा नम्रपणे शेजारच्या काकांना म्हणाली. “हो, घे ना मुली. हवा तेवढा वेळ वाच की,” काका म्हणाले. निशाने पुरवणी पेपर घेतला व प्रथम तिने ‌‘ती बातमी‌’ वाचायला सुरुवात केली. हो! त्या यात्रोत्सवाचीच ती बातमी होती. फोटोमध्ये कथा सादर करताना निशिगंध तिच्या दृष्टीस पडला. त्याचा फोटो पाहताक्षणीच तिचं सर्वांग रोमांचित झालं. सर्व काही विसरून ती फक्त निशिगंधाचाच विचार करु लागली. मागील कॉलेजच्या एक वर्षात निशाने निशिगंधाला फक्त पाहिलं होतं. वर्षाच्या शेवटी कोणत्या तरी कारणाने त्यांची फक्त तोंडओळख झाली, एवढाच काय तो त्यांचा परिचय होता. निशाने स्वतः होऊन कधी त्याच्याशी संवाद साधला नव्हताच. श्रीराम यात्रोत्सवात अगदी योगायोगाने तिने त्याला पाहिले ते कथा स्पर्धेच्या निमित्ताने. त्याला तर निशाबद्दल काहीच माहीत नव्हते. त्याच्या भाषण कौशल्यावर मात्र ती जाम खूश झाली होती. त्याचं रूबाबदार व्यक्तिमत्त्व तिला चांगलंच भावलं. त्याच्याबद्दल तिला आकर्षण वाटायला लागलं. जणू काही ती त्याच्या प्रेमातच पडली, असं म्हणायला हरकत नाही. कॉलेजला गेल्याबरोबर मी लगेच त्याला भेटणार आहे. मनापासून त्याचं अभिनंदन करणार आहे. यात्रेत मी त्याचं भाषण ऐकलं. मला ते खूप आवडलं. बिनधास्तपणे हे सांगणार आहे, निशाचं आक्रमक मन बंड करू पाहत होतं. तिचं संयमित मन पुन्हा तिला म्हणालं, काय निशा, झालंय तरी काय तुला? एवढी उतावीळ कशी झालीस? तुला तुझं करियर करायचं ना? मग अशा गोष्टीपासून तू दूरच राहायला हवं. आक्रमक मन मात्र तिला शांत राहू देण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, करियरचा आणि त्याचा काय संबंध आहे? एखादा माणूस आवडला तर कुठे बिघडलंय? करीयर करायचं म्हणजे, कुणी आवडायला नको काय? त्याचा करीयरवर, अभ्यासावर थोडाच काही परिणाम होणार आहे. आपल्या संयमी आणि आक्रमक मनातील विचारांना निशाने थोपविले. क्षणात ती बसमधील सहप्रवाशांचं सहजच निरीक्षण करु लागली. बसमधे तशी फारसी गर्दी नव्हती. निशा ज्या रांगेत बसली होती, त्या रांगेत प्रत्येक सिटवर तरूण व तरुणी बसलेल्या होत्या. तसा तो योगायोगच म्हणावा लागेल. निशाच्या उजव्या रांगेतील सिटवर मुले व वृद्ध महिला, पुरुष बसलेले होते. निशाने सहजच सगळीकडे नजर फिरवली. तिच्या रांगेतील चवथ्या सिटवर बसलेल्या तरुणांच्या जागेवर तिची नजर थांबली. विशेषतः खिडकीजवळ बसलेल्या तरुणाकडे ती एकटक पाहत होती. त्याचा चेहरा जरी पुढे होता, तरी त्याच्या केसाच्या स्टाइलवरून मागून पाहता, तो निशिगंध वाटत होता. निशा पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहत होती. तो खरंच निशिगंध आहे का? त्याची केशरचना तर आपण तो व्यासपिठावर उभा असताना पाहिली, अगदी तशीच आहे. घातलेला पांढरा शर्ट पण अगदी तसाच आहे. होय तो निशिगंधच आहे. जावं का त्याचे अभिनंदन करायला? मला त्याचे भाषण खूप आवडले आहे. चांगल्या कामाला उगीच उशीर कशाला हवाय? मला भेटून त्याला काय वाटेल बरे? मला भेटणे त्याला आवडेल काय? निशाच्या मनात निशिगंध सारखा धावत होता. काही समजण्याच्या अगोदर, अगदी अनाहूतपणे, आपण काय करतोय हे कळण्याच्या पलीकडे जाऊन, निशा आपल्या जागेवरून उठली. हळूहळू ती तिच्या रांगेतील त्या चार नंबरच्या सिटकडे पाहत चालू लागली. जवळ जाऊन पाहिले तर तिचा अगदीच भ्रमनिरास झाला. तो दुसराच कुणीतरी प्रवासी होता. आपल्या हालचालीकडे काही प्रवासी पाहताहेत हे तिच्या लक्षात येताच, घाईने ती आपल्या सिटवर येऊन बसली. बसल्यानंतर निशाला अगदी मेल्याहून मेल्यासारखे वाटले. चोरून ती इतर प्रवाशांकडे पाहत होती. काही जण मुद्दामच एकटक तिच्याकडेच पाहत होते. जणू काही ते म्हणताहेत, अशी कशी ही पोरगी? कुठं उतरायचं हेही तिला कळेना? डोक्यावर तर परिणाम झालेला नसेल ना हिच्या? त्या पोराकडे कशी एकटक बघत होती. काही न बोलताच पुन्हा आपल्या सिटवर येऊन काय बसली... निशाने डोळे बंद केले. मनातल्या मनात ती पुटपुटत होती, मला खरंच काय झालंय बरं? सारखा निशिगंधाचाच विचार का येतोय? अंतर्मन मला सांगतंय की, हे तुझं प्रेम आहे. तू निशिगंधाच्या प्रेमाने झपाटलेली आहेस. तुला तो आवडतोय, म्हणून तर तू सारखा त्याचा विचार करीत आहेस. तो भेटल्यावर सर्व काही सांगून टाक त्याला. तेवढ्यात तिच्या उजव्या बाजूच्या रांगेतील जवळचे काका म्हणले, “काय गं मुली, काही त्रास होतोय का तुला? कंडक्टरला गाडी थांबवायला सांगू का?” आपल्या विचारातून बाहेर येत हळुवारपणे निशा म्हणाली, “नाही काका, काही त्रास होत नाहीय मला. जरा पाय मोकळे करण्यासाठी उठले होते.” आपण धादांत खोटे बोलतोय, ही अपराधाची भावना तिला स्पर्श करून गेली आणि तेवढ्यात शिवाजीनगर बस स्थानकावर बस येऊन थांबली. आपल्या दोन्ही बॅगा घेऊन निशा बसमधून खाली उतरली. तिला तशी सपाटून भूक लागली होती. जवळच्याच उडपी हॉटेलमधे ती गेली आणि क्षणभर काय खावे याचा विचार करू लागली. वडा पाव म्हणजे तिची कमजोरी. लगेच तिने वडापावची ऑर्डर दिली. वडापाव खाल्ला तरी पोटोबाचे काही समाधान झाले नाही, म्हणून तिने मसाला डोसा मागवला. पोटोबाने तृप्तीच्या ढेकरांना बाहेर पडण्यास परवानगी दिली, तशी निशा हॉटेलच्या बाहेर आली. ऑटो थांबवून तिने आपल्या बॅगा आत ठेवल्या व रिक्षा चालकास वसतिगृहाकडे नेण्यास सांगितले. आपल्या पूर्वीच्याच रुमकडे निशा बॅगा घेऊन गेली. तिची रूम पार्टनर नुकतीच आलेली होती. रूममधे आल्यानंतर निशाने आपल्या बॅगेतील कपडे, पुस्तके, दैनंदिन लागणारे साहित्य कपाटात व्यवस्थित मांडून ठेवले. सगळी आवरा-आवर झाल्यावर अंघोळ करून निशा फ्रेश झाली. मेस दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार असल्यामुळे निशाला बाहेरच हॉटेलमधे जेवण घ्यावे लागणार होते. एव्हाना सायंकाळचे सात वाजले होते. निशाने आपल्या रूम पार्टनरला जेवणाबद्दल विचारले. “निशा, माझ्या आईने संध्याकाळच्या जेवणाचा डबा दिला आहे. भरपूर भाजी व पोळ्या आहेत. आपण दोघी इथेच एकत्र जेवू या ना.” निशाला संकोच वाटला पण पार्टनरच्या आग्रहाखातर ती तयार झाली. आपली आई असती तर आपण पण डबा आणला असता. आईच्या आठवणीने निशा क्षणभर अस्वस्थ झाली. वहिनीचा मत्सरी चेहरा तिच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहीला. निशाला संध्याकाळच्या डब्याबाबत ती एक शब्दानेही काही बोलली नाही. प्रवासाने तसा तिला थकवा आला होता पण निशिगंधाच्या होणाऱ्या भेटीमुळे ती स्वप्नात तरंगत होती. त्याला भेटण्याची तिला ओढ लागली होती. पुन्हा निशिगंधाविषयीचं विचारचक्र तिच्या मनात सुरु झालं. उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचंय आणि लेक्चर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास तरी अगोदर कॉलेजमध्ये पोहोचायचं. प्रथम निशिगंधाला भेटायचं. त्याचं मनःपूर्वक अभिनंदन करायचं. जमल्यास कॅन्टीनमधे त्याला चहा घेण्याचा आग्रह करायचा. वडापाव तयार असला तर त्याला खाण्याचा आग्रह करायचा. नंतर त्याला श्रीराम यात्रोत्सवाबद्दल सांगायचे. आपण आणि वडील कुठे बसलो होतो, त्याची माहिती द्यायची. कथा स्पर्धेत त्याने केलेल्या भाषणाचे कौतुक करायचे. प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन करायचे. जमल्यास हातात हात घेऊन अभिनंदन करायचे. त्याच्या घरची विचारपूस करायची. आपली पण माहिती सांगायची. “उठ निशा, उशीर होतोय. आज पहिल्या दिवशीच उशीर नकोय व्हायला,” तिच्या पार्टनरने तिला आवाज दिला. लगेचच निशा आपल्या मनोराज्यातून बाहेर आली. आवश्यक ते साहित्य घेऊन लगबगीने त्या दोघी कॉलेजकडे गेल्या. कॉलेज गेटजवळच कॉलेजकुमार आणि कुमारींची गर्दी उसळली होती. मोठमोठ्याने बोलण्याचा व हसण्या-खिदळण्याचा आवाज चहूकडे पसरला होता. कोण कुणाशी काय बोलतंय, हे लांबून पाहणाऱ्यांना कळतच नव्हते. सुट्टीनंतर सर्व जण भेटत होते. निशा आणि तिची रूममेट गेटमधून आत गेल्या. मोकळी जागा पाहून त्या क्षणभर तिथे स्थिरावल्या. शोधू मी कुठे तुला, अशा अवस्थेत निशा उभी राहीली होती. नजर मात्र चौफेर धावत होती. निशिगंध कुठे दिसतोय का, याच मनःस्थितीत ती उभी होती. आजूबाजूला काय घडतंय हे तिला कळतच नव्हतं. तिची रूममेट मित्र मैत्रीणीना भेटायला कधी व कुठे गेली हे तिला कळलेच नाही. तिची नजर फक्त निशिगंधाला शोधीत होती. बरीच मुलं-मुली घोळके करून उभी होती. स्वतःशीच स्वगतपर, निशा कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने बोलू लागली. काय हो निशिगंध, कुठे आहात तुम्ही? किती वेळेपासून मी तुम्हाला इकडे तिकडे पाहतेय पण तुम्ही कुठेच दिसत नाही. किती वेळ मला असं ताटकळत उभं करून ठेवणार? अहो मला तुमच्याबरोबर बोलायचंय. तुमचं अभिनंदन करायचंय. जाऊ दे, मीच वेडी आहे? मीच बावळट आहे. तसा तुमचा आणि माझा संबंध तरी काय आहे म्हणा? कोण कुठले तुम्ही, आहे का मला काही ठाऊक? कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला म्हणून काही जागतिक पराक्रम थोडाच केला आहे तुम्ही? तुम्हीच तेवढे रुबाबदार दिसता, बाकीचे काय गाढवासारखे दिसतात का? मी काय म्हणून तुमचा एवढा विचार करु? आता मात्र मला खरोखर वेड लागते की काय असे व्हायला झाले आणि तेवढ्यात विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जाण्याची अनाउसमेंट झाली. निशाने आपली रूममेट कुठे दिसतेय का ते पाहिले पण ती कुठेच दिसेना म्हणून निशा आपल्या वर्गाकडे गेली. दहा मिनिटातच सर्व वेगवेगळ्या वर्गातील मुलांना मोठ्या कम्युनिटी हॉलमध्ये एकत्र येण्यास सांगण्यात आलं. त्याप्रमाणे सर्व मुले-मुली हॉलमध्ये एकत्र येऊन बसले. आज काय बरं विशेष कार्यक्रम आहे? मुले-मुली आपापसात एकमेकांना हळू आवाजात विचारीत होते. निशा आणि तिची रूममेट अगदी मध्यावर एका बाकावर बसल्या होत्या. स्टेजपासून त्या बऱ्याच दूर अंतरावर बसलेल्या होत्या. पाच मिनिटातच प्राचार्य आणि त्यांचे सहकारी स्टेजवर दाखल झाले. स्टेजवर मागील रांगेत निशिगंध बसलेला होता. निशाने एवढ्या दुरून सुद्धा त्याला बरोबर ओळखले. प्राचार्यांनी प्रथम स्वागतपर भाषण केलं. नंतर निशिगंधला समोर बोलवून त्याचा सत्कार केला. नंतर त्याच्या कथा स्पर्धेविषयी व त्याने मिळविलेल्या यशाविषयी माहिती दिली. त्याच्या यशामुळे कॉलेजच्या नावलौकिकात कसा भर पडला हे अभिमानाने सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या गजरात त्याचं अभिनंदन केलं. कार्यक्रम संपल्याचे जाहीर झाले आणि मुलेमुली आपापल्या वर्गात निघून गेली. निशिगंधच्या विचारांनी निशाला पुन्हा एकदा चांगलंच घेरलं. पुन्हा त्याच्या यशाने, कौतुकाने आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाने तिला झपाटून टाकलं. निशिगंध व्यतिरीक्त ती कोणताच विचार करीत नव्हती. अशा अवस्थेतच रूममेट आणि ती त्यांच्या वर्गात जाऊन बसल्या. संगणक प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकासाठी मुले-मुली एकत्र येत असत. योगायोगाने निशा आणि निशिगंध यांचे टेबल शेजारी शेजारीच होते. पहिल्या दिवशी त्यांना एकमेकाबरोबर बोलण्याची संधीच मिळाली नाही. प्रात्यक्षिकाकडे वास्तविक तिचे लक्ष लागत नव्हते. निशिगंधला भेटल्याशिवाय मोकळं झाल्यासारखं तिला वाटणारच नव्हतं. दुसऱ्या दिवशी छोट्या सुट्टीत निशा चहा घेण्यासाठी  कॅन्टीनमध्ये गेली. कोपऱ्यात एका खुर्चीवर निशिगंध बसलेला होता. त्याच्या समोरील खुर्ची रिकामीच होती. गर्दी असल्यामुळे निशाला बसण्यासाठी काही जागा मिळेना. निशिगंधने तिच्याकडे पाहिले व तिला हाक मारली. त्याने खुणेनेच त्याच्या समोरील खुर्चीवर तिला बसायला सांगितले. “काय घेणार, चहा की कॉफी?” निशिगंधने तिला विचारले. “अं? काही पण!” काही न सुचल्यामुळे व गोंधळलेल्या स्थितीत निशा म्हणाली. “मला तर चहाच आवडतो, तू काय घेणार?” निशिगंधने विचारले. “मला पण चहा चालेल,” निशाने त्याला सांगितले. निशिगंधबरोबर तिला खूप बोलायचं आहे पण शब्द बाहेर पडायलाच तयार नव्हते. चहा येईपर्यंत अवधी होता. त्या संधीचा फायदा घेत निशा म्हणाली, “तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन बरं का!” “धन्यवाद निशा! आणि हो, हे तुम्ही, तुमचे अशा प्रकारची औपचारिकता आपल्या बोलण्यात कशाला हवीय? आपल्यात कशाला हवीय अहो, काहोची लुडबुड? आपण समसमान आहोत. औपचारिकतेचं कुंपण मधे मधे नकोय असायला. तसं असेल तर मोकळ्यापणाने आपल्याला बोलता येत नाही, असं मला वाटतं,” हसत हसत निशिगंध म्हणाला. लगेचच पुढचे प्रात्यक्षिक सुरू होणार होते म्हणून चहा घेतल्याबरोबर ते दोघे प्रयोग शाळेकडे गेले. धन्यवाद निशा ह्या शब्दांनी तर कमालीची जादू केली. निशिगंधच्या लक्षात आहे तर आपलं नाव. त्यांना अहो जाहोचा वापर करून बोललेलं आवडत नाही तर. आपण समसमान आहोत, ह्या निशिगंधच्या शब्दांनी निशा अगदीच भारावून गेली. मनातल्या मनात हर्षभरीत होऊन ती सारखी पुटपुटत होती, निशिगंध, तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. तू छान बोलतोस. तू मला खरंच खूप खूप आवडतो. तुझ्याबरोबर मला खूप बोलायचं आहे. त्या रात्री तिला झोपच येत नव्हती. लाईट बंद करून ती झोपण्याचा सारखा प्रयत्न करीत होती पण निद्रादेवीचा आशीर्वाद काही तिला मिळत नव्हता. निशिगंधना माझ्याविषयी काय वाटत असेल बरे? त्यांना (नाही, त्याला) मी आवडते का? तसा त्याचा आणि आपला संबंध कितीसा आला आहे? मग माझ्याशी एवढ्या अनौपचारीकपणे तो कसा काय बोलला?  निशा रात्रभर निशिगंधचाच विचार करीत होती. दिवसेंदिवस त्या दोघांचा संबंध वाढत चालला होता. निशा मात्र उघडपणे मनातील विचार त्याला सांगत नव्हती. निशिगंधला मात्र ती आवडू लागली होती. तो बिनधास्तपणे तिच्याबरोबर गप्पा मारायचा, सुट्टीच्या दिवशी पुण्यातील प्रेक्षणीय स्थळं पाहण्यास घेऊन जायचा. निशाला मनोमन, निशिगंध आपल्यावर प्रेम करतोय, असं वाटत होतं पण त्याने कोणत्याही मर्यादांचं कधीही उल्लंघन केलं नव्हतं. शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर संपला आणि प्रत्येक जण आपापल्या गावी जाण्याचे, सुट्टीचे नियोजन करु लागला. निशा आताशा कुठे बऱ्यापैकी धीट झाली होती. बऱ्याच मित्र मैत्रिणीशी ती मोकळेपणाने बोलू लागली होती. सायंकाळी निशिगंधाने पुढाकार घेऊन ठरावीक मित्र-मैत्रिणीना एकत्र बोलावले. प्रसिद्ध सारसबागेत जाऊन छान गेटटुगेदरचा आनंद घेण्याचे ठरले. ज्यांना जसे जमेल तसे त्यांनी तेथे एकत्र येण्याचे ठरले. सगळे जण बरोबर सात वाजता तेथे एकत्र आले. गाण्याची अंताक्षरी, विनोद, कथा, नृत्य इ. आपापल्या आवडीनुसार सादर करण्याचे ठरले. तसेच भेळपुरी, पाणीपुरी, रगडा, चाट, वडापाव यावर मस्त ताव मारण्याचे ठरले. प्रत्येक जण आपापल्या परीने आनंद लुटत होता. शेवटी निशा आणि निशिगंध आपल्या आवडीचा कार्यक्रम सादर करायचे राहीले. सर्वांनी निशाला आग्रह केला. तिला तर काहीच सूचेना काय करावे ते. तिला गाण्याची खूप आवड होती पण संधी न मिळाल्याने ती नेहमीच वंचित राहिली. मनाचा निर्धार करून तिने, हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता हे सुंदर गीत मधुर आवाजात सादर केले. तिच्या गोड आवाजाचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले. तिला चिडविण्याच्या हेतूने निशिगंध तिच्याकडे पाहत मोठ्याने म्हणाला, “निशा, कोण आहे तो भाग्यवान?” कधी नव्हे ती निशा कमालीची लाजली. त्याच्याकडे पाहून छान स्मित हास्य केले. निशिगंधने स्पर्धेत सादर केलेली कथा सांगण्याचा मित्रांनी आग्रह धरला. रात्रीचे दहा वाजले आणि सर्व जण आपल्या हॉस्टेलकडे निघाले. हॉस्टेलवर अर्धा तास पुन्हा काही मित्रमैत्रिणी एकत्र बसले. ज्यांच्याकडे फोन होते, त्यांनी एकमेकांना आपापले नंबर दिले. “फ्रेंडस, नशिबात असेल तर आपल्या भेटी पुन्हा होत राहतील. आपण सर्व जण माझ्या कायम स्मरणात राहतील. निशा, तुझं गाणं मला फार आवडलं बर का! पुढील वाटचालीस सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा!” म्हणत निशिगंध ने सर्वांचा निरोप घेतला. प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये गेले. रात्र बरीच झाली होती. सकाळी सामानाची आवरा-आवर करुन बॅगा भरण्याचे निशाने ठरविले आणि ती झोपण्यासाठी अंथरुणावर आडवी झाली. “निशा, तुझं गाणं मला फार आवडलं बरं का! निशा, कोण आहे तो भाग्यवान?” निशिगंधच्या ह्या दोन वाक्यांनी निशाच्या मनात त्याने चांगलीच जागा मिळवली. निशिगंधने केलेले कौतुक फक्त औपचारिक आहे, की त्याची प्रेमभावना आहे? खरंच त्याचं माझ्यावर प्रेम आहे का? निशाला काहीच समजेनासे झाले. आपण केवळ त्याने कथास्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अभिनंदनच केले. यात्रोत्सवातील आपल्या भावना का व्यक्त केल्या नाहीत? आपलं त्याच्यावर प्रेम आहे, हे आपण कोणत्याही पद्धतीने व्यक्त केले नाही. निशिगंध, जे वाटते ते किती स्पष्ट बोलतो. त्याच्या बोलण्यात प्रेमभावना आहे का? निशाचं मन अणि डोकं अक्षरशः चक्रावून गेलं होतं. उलट-सुलट विचार करीतच तिला केव्हा झोप लागली हे कळलेच नाही. सकाळी आठ वाजताच कॉलेजच्या शिपायाने, मुलांच्या आणि मुलींच्या हॉस्टेलवर येऊन सूचना फलकावर सूचनांचे कागद चिटकवले. सकाळी अकरा वाजता, दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी, पदवी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. दोन्ही हॉस्टेलवर संबंधित विद्यार्थ्यांना याविषयी लगेच माहिती मिळाली. निशाने सकाळी लवकरच आपल्या बॅगा भरुन ठेवल्या होत्या. हुशार आणि विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पसंती दिली जाते, हे सर्वश्रुत होते. शिवाय गलेलठ्ठ पगाराचे वार्षिक पॅकेज पण दिले जाते. निशा विशेष गुणवत्ताधारक मुलगी आहे, हे कॉलेजमधील प्राचार्य आणि इतर प्राध्यापकांना माहीत होते. निशाने मात्र या नोकरीबद्दल काहीही विचार केलेला नव्हता. फक्त शिक्षण पूर्ण करणे एवढेच तिला ठाऊक होते. शिवाय आता नोकरी करायची की लग्न करायचे, याबाबत भास्कररावांबरोबर अद्याप तिचे एकदाही बोलणे झाले नव्हते. पुढे काय हे घरी गेल्यावरच ठरणार होते. काही मित्र आणि मैत्रिणी तिला मुलाखत द्यायचा आग्रह करीत होते. तेवढ्यात दहा वाजता निशिगंध निशाकडे आला. “निशा, तू मेरीटमधे आहे, मुलाखत देऊन टाक. नंतर नोकरी करायची की नाही हे ठरवता येतं. मी सुद्धा मुलाखत देणार आहे,” निशिगंधने तिला सल्ला दिला. सल्ल्याने ती खूपच मोहरुन गेली. निशिगंध निघून गेल्यानंतर तिच्या मनात सकारात्मक विचार सुरु झाले. आपल्या नशिबात नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. निशिगंधपण मुलाखत देणार आहे. त्याची तर हमखास निवड होईल. माझी गुणवत्ता पाहता माझी पण हमखास निवड होईल. एकाच कंपनीत जर आम्हाला नोकरी मिळाली तर! ह्या विचारांनी निशाचं सर्वांग मोहरुन गेलं. ती कमालीची प्रफुल्लित आणि उत्तेजीत झाली. क्षणाचाही विलंब न करता ती बाबांच्या शेजारच्या काकांना फोन करण्यासाठी बाहेर गेली. “हॅलो काका, पुण्याहून मी निशा बोलतेय. बाबांना जरा बोलावता का? त्यांच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे.” “हॅलो निशा, थांब लगेचच बोलावून आणतो त्याला... अगं निशा भास्कर शेतावर गेला आहे. काही निरोप असला तर सांग. तो आल्यावर सांगतो मी तुझा निरोप.” “ठीक आहे काका, मी नंतर करते फोन,” आणि निशाने रिसीव्हर ठेवून दिला. काय करावं हे तिला सुचेना. बाबांना विचारल्याशिवाय? निशिगंधचा सल्ला? चालून आलेली संधी? वेळ तर थोडाच आहे. एव्हाना पावणे अकरा वाजले होते. सकारात्मक मनाचा आदेश तिने स्वीकारला. दहा मिनिटात स्वतःचे आवरून, चांगला ड्रेस घालून तिला कॉलेजवर जायचे होते. निशा घाईघाईत तयार झाली. एसएससी पासूनची सर्व कागदपत्रे आणि आत्तापर्यंत मिळालेली विशेष प्रमाणपत्रे तिने बरोबर घेतली. वेळेतच ती मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचली. मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांची मर्यादित संख्या होती. मुलींमध्ये तर निशा आणि अजून सोलापूरची एक, अशा दोनच मुली होत्या. बरोबर साडे अकरा वाजता मुलाखती सुरू झाल्या. निशाला एक वाजता केबिनमध्ये बोलावण्यात आलं. जवळजवळ पाऊण तास निशाची मुलाखत चालली होती. तिची गुणवत्ता व समर्पक आणि थोडक्यात दिलेल्या उत्तरांनी परीक्षक कमालीचे खूश झाले. अर्ध्या तासातच तिला ऑफर लेटर देण्यात आलं. त्यामधे तिला पंधरा लाखाचं वार्षिक पॅकेज व इतर काही सुविधा दिल्याचे नमूद केले होते. कामावर हजर होण्यासाठी तिला एक महिन्याचा अवधी दिलेला होता. दोन वाजता निशा ऑफर लेटर घेऊन रूमवर आली. प्रथम बाबांना फोन केला पाहिजे, म्हणून ती बाहेर पडली. निशा लगबगीने बॅगा घेऊन शिवाजीनगर बस स्थानकाकडे निघाली. स्थानकाजवळच एका दुकानात जाऊन तिने शेजारच्या काकांना फोन लावला. तिचे बाबा शेजारच्या काकाकडे येऊन तिच्या फोनची वाटच पाहत होते. “हॅलो काका, पुण्याहून मी निशा बोलतेय. बाबा आले आहेत का घरी? जरा त्यांना बोलवता का?” “थांब पोरी, भास्कर इथेच माझ्याजवळ बसलेला आहे” असे म्हणत त्यांनी रिसिव्हर भास्कररावांकडे सोपविला. “हॅलो बाबा, मी आता बस स्टँडवर आलेली आहे. अर्ध्या तासात बस मिळेल. गावाकडे पोहोचायला जरा  उशिरच होईल,” निशा. “हॅलो निशा, काही हरकत नाही. संध्याकाळी मी स्टॅण्डवर येऊन थांबेल. काही काळजी करु नकोस. बॅगावर नीट लक्ष ठेव,” भास्करराव. “होय बाबा, ठेवते फोन आता,” म्हणत तिने फोन ठेऊन दिला. फोनवर तिला तिच्या बाबांना काही सांगायचे नव्हतेच. घरी गेल्यावर त्यांच्याशी सविस्तर बोलता येईल हा विचार करून तिने फोन ठेवला होता. गावाकडे जाणारी बस लगेच फलाटावर येऊन उभी राहिली. निशाने ताबडतोब बसमध्ये जाऊन एका खिडकी जवळील सिटचा ताबा घेतला. बॅगाकडे सहज लक्ष ठेवता येईल अशा ठिकाणी त्या ठेवल्या. पाचच मिनिटात बस निघाली. मुलाखतीनंतर निशिगंधची आणि तिची भेट झाली नाही. त्याच्याबद्दल तिच्या मनात हरतऱ्हेचे विचार सुरु झाले. आपण मुलाखत द्यावी असा आग्रह त्याने आपल्याला का बरं केला असावा? यात त्याचा नेमका कोणता हेतू होता? आपली गुणवत्ता की प्रेम? काय समजावं आपण? त्याने मुलाखत दिली असेल ना? त्याची निवड झाली असेल? झाली असल्यास कोणत्या कंपनीत आणि कोठे? तो गावी गेला असेल का? आपल्याबद्दल त्याच्या मनात असेच विचार आले असतील का? आपल्याला भेटता आले नाही, म्हणून त्याला वाईट वाटले असेल? त्याची भेट न झाल्यामुळे आपल्याला जसे चुकल्यासारखे वाटते, तसे त्याला वाटत असेल का? दीर्घ श्वास घेत निशा त्याच त्या प्रश्नांची उजळणी करीत होती. त्याच्याबद्दल एवढा विचार करण्यासारखे तुमच्यामध्ये काही घडलेले आहे का? तो स्पष्ट बोलला, थोडं कौतुक केलं, चहा, कॉफी बरोबर घेतली, तुझ्या गाण्याचं कौतुक केलं म्हणजे त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, असा निष्कर्ष काढणं वेडेपणाच नाही का? बरं मग त्याला माझं कौतुक का करावं वाटलं? मी मुलाखत द्यावी असा आग्रह त्याने का केला? माझ्याशी नेहमी संवाद का करायचा? प्रेम की टाईमपास? निशाचं अंतर्मन तिला सारखं डिवचीत होतं. कोणत्याच प्रश्नांची अचूक उत्तरं निशाला मिळत नव्हती. तिने स्वतःचेच आत्मपरीक्षण केले. यात्रोत्सवात त्याला पाहिल्यापासून मी तर त्याच्या प्रेमात पडले नाही तर काय? प्रसंगानुसार, संभाषणातून मला त्याच्याविषयी आकर्षणच वाटत होते ना? माझे गाणे ऐकून, त्याने केलेल्या कौतुकाने मी का गोरीमोरी झाली होते? मला माझं प्रेम का व्यक्त करता आलं नाही? शेवटी निशा स्वतःलाच दोष देऊ लागली. एका ढाब्यावर बस, चहा पानासाठी थांबली आणि निशा विचारचक्रातून बाहेर आली. एक तासात बस गावात पोहोचणार होती. निशाचं मन वेगाने गावाकडे धावू लागलं. तिच्या बाबांना भेटण्यासाठी तिचं मन अधीर झालं होतं. बऱ्याच गोष्टी तिला त्यांना सांगायच्या होत्या. घटनांची जुळवाजुळव करताना तिला कसरत करावी लागत होती. प्रत्येक घटना बाबांना कशी सांगावी? आतापर्यंत बाबाबरोबर आपल्या खाजगी आयुष्याबद्दल बोलण्याची कधी वेळच आली नाही आणि मुख्य म्हणजे आपल्याला खाजगी आयुष्य होतेच कुठे? कोणती घटना प्रथम सांगावी? यात्रोत्सवात स्पर्धेत पाहिलेला निशिगंध, चहा घेताना केलेले त्याचे अभिनंदन, कॉलेजमध्ये त्याच्या सत्कारानंतर झालेली भेट, सारसबागेतील आपलं गायन, त्याच्या प्रतिक्रिया, मुलाखतीसाठी त्याने केलेला आग्रह, मुलाखतीत आपली नोकरीसाठी झालेली निवड, ऑफर लेटर, वार्षिक पॅकेज काय काय कसे सांगावे? निशा, तुझ्यात आहे हिंमत सर्व काही सांगायची? यापूर्वी तुझ्या बाबत सर्व काही बाबाच ठरवायचे ना? तुला कधी काही सांगायची वेळ आली होती का? तू कधी तसा प्रयत्न केला होतास का? बाबांच्या अपरोक्ष घडलेल्या घटना सांगण्याचं धारिष्ट आहे का तुझ्याकडे? निशाच्या अंतर्मनाने तिच्या स्वाभिमानाला आवाहन केले. ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली, तशी निशा भानावर आली. खिडकीतून बाहेर पाहिलं तर तिला समोर तिचे बाबा उभे असलेले दिसले. बॅगा घेऊन निशा बसच्या खाली उतरली. तिचे बाबा दरवाजासमोरच उभे होते. त्यांनी एक मोठी बॅग लगेचच निशाच्या हातातून घेतली. “कसा झाला प्रवास पोरी?” भास्कररावांनी निशाला विचारले. “छान झाला बाबा,” निशाने सांगितले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत दोघे घरी पोहोचले. निशाच्या वहिनीने स्वयंपाक करून ठेवलेला होताच. फ्रेश होऊन निशा तयार झाली. “आज आपण सर्व जण एकत्र जेवायला बसू या का? काय वहिनी चालेल ना?” वहिनीकडे पाहत निशा ने विचारले. “हा हा, जेवू ना,” थोडक्यात वहिनीने होकार दिला. जेवणात निशाच्या आवडीचं भरीत व ताकाची कढी वहिनीने बनवली होती. बहुधा भास्कररावांनी तसं सुनेला बजावलं असावं. रात्रीची जेवणं आटोपली, तशी निशा वहिनीला मदत म्हणून आवराआवर करण्यासाठी उठली. “तुम्ही आराम करा, मी आवरते सगळं,” वहिनी निशाला म्हणली. वहिनीची ही बदललेली भूमिका पाहून निशाला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. भास्करराव व निशा बाहेर येऊन ओट्यावर बसले. भास्कररावांचे एका पाठोपाठ प्रश्न विचारणे सुरू होते. दिवसभराची धावपळ, बसचा प्रवास यामुळे निशा खरोखर दमलेली होती. शिवाय आवडीचे वांग्याचे भरीत आणि ताकाची कढी यावर तिने चांगलाच ताव मारला होता. मधूनच जांभया देत ती भास्कररावांच्या प्रश्नांना उत्तरं देत होती. भास्कररावांच्या हे लक्षात आले व ते दोघे घरात लगेचच झोपायला गेले. सकाळी निशा जरा उशीराच उठली. बाबांबरोबर नेमके कोणत्या विषयावर बोलायचे याचा क्षणभर तिने विचार केला. निशिगंधबाबत व आपल्या त्याच्याबद्दल असलेल्या भावनाबाबत काहीही बोलायचे नाही, असा निर्णय तिने घेतला. आपली परीक्षा, त्यानंतर लगेच मुलाखत व नोकरीची ऑफर याविषयी त्यांच्याशी सविस्तर बोलायचे तिने ठरवले. आपल्या बाबाबरोबर अशा प्रकारे निशाला बोलण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता. शिवाय मुळातच तिला कौटुंबिक परिस्थितीने अबोल बनवले होते पण आता परिस्थिती बदलली आहे. शहरात राहून तिच्यात बऱ्यापैकी धीटपणा आला होता. शिवाय वाढत्या वयाने व अनुभवाने ती बोलकी झाली. तरी पण भिडस्तपणा कधी कधी आडवा येत होताच. मनातील सर्व काही बोलून टाकणं तिला जमतच नव्हतं. “बाबा आपण मळ्यातील झाडांकडे जाऊ या का?” निशाने भास्कररावांना विचारले. “हो जाऊ या बाळ. बरेच दिवस तुझं तिकडे जाणे झालेच नाही,” भास्करराव म्हणाले आणि लगेचच दोघे मळ्यात निघून गेले. आंब्याच्या झाडाखाली छानपैकी त्यांनी बैठक मांडली. सुरूवात काय करावी याचा विचार निशा करीत होती. प्रथम आपल्या मुलाखतीबाबतच सांगावे असे ठरवून ती बोलायला लागली. “बाबा, शेवटच्या वर्षाचे पेपर्स चांगले होते. प्रथम श्रेणी मिळेल याची मला पूर्ण खातरी आहे,” निशाने सुरूवात केली. “निशा, पोरी माझी खातरीच नाही तर पुरा विश्वास आहे की तू पहिल्या नंबरनेच पास होशील म्हणून,” आत्मविश्वासाने भास्करराव म्हणाले. “बाबा, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे पण तुम्ही रागावणार तर नाही ना?” भीत भीत निशा म्हणली. क्षणभर भास्करराव स्तब्ध झाले. मनात संशयाची पाल चुकचुकली. पोरीने भलते सलते तर काही केले नाही ना? क्षणात त्यांनी स्वतःला सावरले. स्वतःच्या मनातच ते पुटपुटले, नाही, माझ्या निशाकडून तसलं भलतं सलतं काही होणारच नाही. माझा तिच्यावर पुरा विश्वास आहे. “नाही रागावणार पोरी. तू काही वेडेवाकडे थोडेच सांगणार आहेस? माझा माझ्या लेकीवर पुरा विश्वास आहे. सांग बरं, काय सांगायचं ते?” “बाबा, शेवटचा पेपर झाला आणि काही निवडक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावले. दोन कंपन्यांचे अधिकारी नोकरीसाठी मुलाखत घेणार होते. मला पण थांबायला सांगीतले. पाऊण तास त्यांनी माझी मुलाखत घेतली. “बरं, पुढं काय झालं?” भास्कररावांनी उत्सुकतेने विचारले. “बाबा आनंदाची गोष्ट म्हणजे मी मुलाखतीत पास झाले. मला लगेच नेमणुकीचे पत्र मिळाले. बाबा, पगार किती देणार माहितेय? अहो, पंधरा लाख वर्षाला. शिवाय अजून बऱ्याच सुख सोयी देणार आहेत. जसे राहण्याची, जेवणाची, दवाखान्याची मोफत सोय देणार आहेत,” एका दमात निशाने सांगून टाकले. “पोरी, म्हणजे तुला नोकरी पण मिळाली तर! पण पंधरा लाख वर्षाला म्हणजे महिन्याला किती बरं?” कुतूहलाने भास्कररावांनी विचारले. “अहो बाबा, महिन्याला सव्वा लाख,” निशाने खुलासा केला. “बाप रे, पोरी खरंच नशीब काढलं बरं का तू. तुझी आई असती तर तिला किती आनंद झाला असता? आपल्या घराचं नाव काढलं माझ्या लेकीनं.” “बरं, नोकरी कुठं करावी लागणार?” आनंदातिरेकाने भास्करराव विचारते झाले. “बाबा, हैद्राबादमधील आयटी कंपनीत,” निशाने सांगीतले. “खूप चांगलं झालं. तुझं नशीबच उजाळून निघालं बघ. आता फक्त, मनासारखा, तुझ्यासारखा शिकलेला नवरा मिळाला की, मी मोकळा झालो बघ,” भास्करराव मोकळेपणाने बोलले. क्षणातच निशाच्या मनात निशगंधविषयी विचार सुरु झाले. * “निशिगंध पुण्याहून आला की लगेच त्याचं लग्न उरकून टाकू. मी आपल्या गावातील लक्ष्मणला मुलगी पाहायचं सांगितलं आहे. तो खूप चौकस आहे. तो सारखा फिरत असतो. त्याच्या बऱ्याच ओळखी पण आहेत,” रामराव आपल्या बायकोला म्हणाले. “अहो, अगदी माझ्या मनातलं बोलला बघा तुम्ही. पोरगं आता मोठं झालं. आता घाई केली पाहिजे,” सीतामाई (रामरावांची बायको) म्हणाल्या. “मी आजच लक्ष्मणला बोलावून घेतो आणि लावतो कामाला.” रामरावांनी घरगड्यामार्फत लक्ष्मणला निरोप देऊन बोलावून घेतलं. “अरे लक्ष्मण, आपला निशिगंध आज पुण्याहून येतोय. तो इंजिनियर झाला. आता त्याचं लग्न करायचं म्हणतोय. तेव्हा त्याला शोभेल अशी मुलगी पाहा. आपल्याला फक्त गुणवान पोरगी पाहिजे. देण्या-घेण्याची आपली काय बी अट नाही. घरची गरीब असली तर आपण सगळा खर्च करू पण पोरगी त्याला शोभल अशी त्याच्यासारखी शिकलेली पाहिजे. काय आलं ना सगळं धेनात?” रामरावांनी बित्तमवार माहिती दिली. “दादा, (रामरावांना सगळे दादा म्हणतात) तुम्ही काय बी काळजी करु नका. आठ दिवसात तुम्हाला जशी पाहिजे तशी मुलगी दाखवतो,” लक्ष्मणाने रामरावांना आश्वासन दिले. निशिगंध एक दिवस उशीराच घरी आला. मित्रांनी आग्रह केला होता. सर्वांना बालगंधर्वमध्ये एखादं नाटक पाहायचं होतं. घरी आल्याबरोबर रामरावांनी त्याचे लग्न करण्याचा निर्णय सांगून टाकला. त्याच्या होकार-नकाराची वाट न पाहता वधू संशोधन सुरू केल्याचे सांगितले. संध्याकाळी रामराव निशिगंधला मंदिरात घेऊन गेले. “बरं निशी, (निशिगंधला वडील प्रेमाने निशी म्हणायचे) मला सांग परीक्षा कशी होती? पुढं काय करायचा विचार आहे?” रामरावांनी निशिगंध ला विचारले. “दादा परीक्षा छान होती. चांगल्या मार्क्सने पास होईल. दुसरे असे की, परीक्षेच्या शेवटच्या दिवशी दोन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी काही मुलांच्या नोकरीसाठी मुलाखती घेतल्या. माझी पण मुलाखत घेतली. हैद्राबादमधील एका आयटी कंपनीत मला नोकरी देऊ केली. वर्षाला पंधरा लाख पगार देणार आहेत. महिनाभरात हजर व्हायला सांगितलं आहे,” निशिगंध ने सर्व काही सांगून टाकलं. “अरे वा! छानच झालं की लेका. सोन्याहून पिवळं बघ. आता तुझं लग्न बघ कसं ऐटीत आणि जोरात करून देतो ते,” रामरावांनी आपलं मत सांगितलं. दोन दिवसांनी लक्ष्मण स्थळ घेऊन रामरावांकडे लगेच आला. “दादा, आपल्या निशिगंधसाठी एकदम फिट्ट स्थळ आणलंय बघा,” लक्ष्मण रामरावांना म्हणाला आणि स्थळाविषयी सविस्तर माहिती सांगू लागला. “जवळच्याच गावातील शामराव पाटलाची मुलगी, नुकतीच मुंबईहून आपल्या घरी परत आली आहे. डिप्लोमाची परीक्षा देऊन आली आहे. घरची परिस्थिती खूप चांगली आहे. मुलगी पण छान आहे. आपल्या निशिगंधला शोभेल अशी आहे. निशिगंधविषयी आणि आपल्या घराविषयी सर्व माहिती मी त्यांना दिली आहे. पाहुणे मंडळी उद्याच आपल्याकडे येताहेत पण मला वाटतंय निशिगंधला आजच त्याच्या एखाद्या मित्राबरोबर मुलगी पाहायला पाठवून द्यावे,” चतुर लक्ष्मणाने आपले नियोजन रामरावांना सांगीतले. लक्ष्मण म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व, याची रामरावांना खातरी होतीच. “लक्ष्मण, तुझ्या कामावर मी खूश आहे. तू म्हणतोस त्याप्रमाणे निशीला आत्ताच पोरगी पाहून यायला सांगतो,” रामराव म्हणाले. वडिलांच्या सूचनेप्रमाणे निशिगंध बाईकवर एका मित्राला बरोबर घेऊन जवळच्या त्या गावात मिशन मॅरेजसाठी स्वार झाला. निशिगंधला मुलगी पसंत पडली नसल्यामुळे ओघानेच पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. लक्ष्मण हार मानणारा नव्हताच मुळी. लगेच नवीन मोहीम हाती घेतल्याचे त्याने जाहीर केले. आत्ता मोहीम फत्तेच करून दाखवतो तुम्हाला, असे पुटपुटत त्याने रामरावांचा निरोप घेतला. लक्ष्मणाची वधू शोधणे मोहीम जोरात सुरू झाली. कुणाचा दशक्रिया विधी, कुणाचा साखरपुडा, कुणाच्या नवीन घराची वास्तुशांती तर कुणाचा विवाहसोहळा अशा कार्यक्रमांना लक्ष्मणची हजेरी हमखास असणारच. बरं तो एवढ्या दिलदार मनाचा माणूस, की चुकून जरी त्याला निमंत्रण मिळाले नाही तरी तो आवर्जून हजर राहणारच. “काहे, कामाच्या गडबडीत राहिलं असेल निमंत्रण द्यायचं, म्हणून का कार्यक्रम चुकवायचा?”, लक्ष्मण आपल्या मनाला दटावित असे. एवढा समजुतदारपणा नेहमीच लक्ष्मण दाखवीत असे. त्यामुळे त्याचे सामान्यज्ञान अफाट वाढले होते. कोणत्याही कार्यक्रमात तो गप्पा मारताना, तो अमक्या गावचा मुलगा, ती तमक्या गावची मुलगी, एवढी शिकलेली व परिस्थिती अशी, असल्या माहितीची देवाण-घेवाण तो करीत असे. त्याच्या या सामान्य ज्ञानामुळे त्याने आत्तापर्यंत खूप होतकरु मुला-मुलींची लग्ने जुळवलेली आहेत. लक्ष्मण म्हटलं की, हमखास लग्न जुळणार, अशी पंचक्रोशीत त्याची ख्याती होती. अशाच एका सप्त्याच्या निमित्ताने लक्ष्मण भास्कररावांच्या गावी पोहोचला. संध्याकाळी बरोबर पाच वाजता लक्ष्मण आपल्या एका त्याच्या बरोबर नेहमी असणाऱ्या मित्रासोबत मारुतीच्या मंदिराजवळ पोहोचला. भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाला अवधी होता. मारुतीरायाचे दर्शन घेऊन, मित्रासोबत तो ग्रामपंचायतीकडे गेला. ओट्यावर चार-पाच माणसं अगोदरच येऊन बसलेली होती. त्यातील दोघांनी लक्ष्मणला ओळखले व आपल्या शेजारी बसविले. त्या चार-पाच जणांमधे थोड्या अंतरावरच भास्करराव पण बसलेले होते. लक्ष्मण नेहमीप्रमाणे, या न त्या विषयावर गप्पा मारीत होता. बोलण्याच्या ओघात त्याने रामराव पाटील, त्यांचे घर, परिस्थिती, निशिगंध, त्याचे शिक्षण आणि लग्नासाठी असलेली उमेदवारी याविषयी सविस्तर माहिती दिली. “पाहा, तुमच्या माहितीत असली एखादी चांगली मुलगी तर. मुलगी फक्त इंजिनिअर पाहिजे, ही महत्त्वाची अट आहे हो मंडळी. मुलगी पसंत झाली, की पुढची सगळी जबाबदारी माझी. फक्त मुलाला-मुलगी अन्‌‍ मुलीला मुलगा पसंत पडला, की लग्नाचा बार उडवलाच म्हणून समजा,” लक्ष्मणने मंडळीपुढे निशिगंधच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. उत्सुकतेने भास्करराव लक्ष्मणाचे सर्व बोलणे एकाग्रतेने ऐकत होते. “अरे ये भास्करा, जरा ये की इकडं आमच्या शेजारी. तुझी पोर बी आत्ताच इंजिनीयर झालीय ना? ह्यो लक्ष्मण काय सांगतूया बघ जरा,” एक वयोवृद्ध गृहस्थ भास्कररावांना म्हणाले. भास्करराव काही एक न बोलता, निमुटपणे मंडळींच्या जवळ येऊन बसले. लक्ष्मणने डायरेक्ट मुख्य विषयाला हात घातला. त्याला पडद्याआडून किंवा अप्रत्यक्ष बोलणे आवडत नसायचे. जे काही बोलायचे ते तोंडावर स्पष्ट बोलून टाकायचे. स्वतःला सावरत व भास्कररावाकडे पाहत लक्ष्मण म्हणाला, “तुम्ही भास्करराव तर. तुमची लेक इंजिनियर झाली आहे तर. लग्नाचा काही विचार आहे की नाही? असल्यास सांगा. तुमच्या पोरीसाठी लई झकास स्थळ आहे बघा. फक्त मुला-मुलीची पसंती झाली, की पुढची सारी जबाबदारी माझी. मुलगा तर खूप देखणा आहे. घरची परिस्थिती पण खूप चांगली आहे. बघा काय वाटतंय ते!” “लक्ष्मणराव, तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे. मी काय म्हणतो. आपण माझ्या घरी जाऊ, निवांत बोलू. माझी पोरगी पण तुम्हाला पाहता येईल, मग बघू, पुढच्या पुढे काय होईल ते,” भास्कररावांनी लक्षमणाच्या पुढे प्रस्ताव मांडला. भास्करराव लक्ष्मणला घेऊन आपल्या घराकडे गेले. दिवे लागणीची वेळ झाली होती. भास्कररावांच्या सुनेने घरात लाईट लावले होते. ती व निशा स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होत्या. भास्कररावांनी ओट्यावरील खाटेवर गादी टाकली. लाईटचे बटन बाहेरच होते. लगेच त्यांनी बाहेरचा लाईट सुरू केला. दोघे जण खाटेवर बसले. तेवढ्यात लाऊड स्पीकरवर टाळ मृदुंगाचा आवाज सुरू झाला. लक्ष्मणला कीर्तन ऐकण्यात काही रस नव्हता. भास्कररावांना मात्र कीर्तन ऐकण्याची आवड होती पण... तेवढ्यात सुनबाई चहा घेऊन आल्या. दोघांनी मस्त चहा घेतला. “थोड्याच वेळात स्वयंपाक तयार होईल. आपण इथेच बरोबर जेऊ. मग निवांत गप्पा मारू. आजचा मुक्काम इथेच आमच्याकडे करायचा,” भास्कररावांनी आग्रह धरला. भास्कररावांचे आदरातिथ्य व माणुसकीने लक्ष्मण कमालीचा भारावून गेला. यांना मी पहिल्यांदाच भेटतो. कसली ओळख नाही, नातेसंबंध नाही आणि एवढं अकृतिम आदरातिथ्य? यापूर्वी अनेक गावात अनेक ठिकाणी स्थळं जुळविण्यासाठी माझं जाणं येणं झालं पण एवढी आपुलकी आणि माणुसकी? वा भास्करराव!  ‌‘अतिथी देवो भव‌’ याचे साक्षात दर्शन तुम्ही मला घडवले. संस्कृती म्हणतात ती हीच का? परंपरा आणि संस्कृतीचा सुरेख मेळ घातलेला मला इथे दिसतोय. लक्ष्मण खूश होत आपल्या मनाशीच पुटपुटला. जेवणं आटोपली आणि बाहेरच ओट्यावर दोघांची झोपण्याची व्यवस्था केली होती. निशा शेजारच्या काकांकडे मैत्रीणीबरोबर गप्पा मारण्यासाठी गेली होती. तिला या आगंतुक आलेल्या पाहुण्याबद्दल काहीच अंदाज नव्हता. बाबांचे कुणीतरी ओळखीचे असावेत, आले असतील कीर्तन ऐकायला, एवढंच काय ती मनात पुटपुटली. सर्व झोपल्यानंतर भास्कररावांनी मुख्य विषयावर बोलण्यास सुरूवात केली. “हे पाहा लक्ष्मणराव, रामरावासारखी काही आमची परिस्थिती नाही. त्यांच्या मनासारखं काही लग्न आम्ही करु शकणार नाही. निशा हीच माझी श्रीमंती आहे. तिला शिक्षण देऊन, स्वतःच्या पायावर उभे करायचे हीच माझी इच्छा होती आणि मी ती पूर्ण केली. आईविना वाढलेल्या पोरीला जेवढं चांगलं देता येईल तेवढं तिला दिलंय. समजूतदारपणा, आहे त्यात समाधान मानणे आणि कोणत्याही परिस्थितीशी मिळते जुळते घेणे, हे तिच्यातील प्रमुख गुण आहेत. तिला कधी तक्रार करता येत नाही. आपल्या मनातील भावना, प्रेम व्यक्त करता  येत नाही. अशी माझी निशा आहे. तेव्हा तिला समजून घेणारा आणि जीव लावणारा मुलगा मला पाहिजे. गरीब घरचा असेल तरी आमची काहीच तक्रार नाही. तिला सुखात आणि आनंदात पाहिलं, की माझ्या जगण्याचं सार्थक झालं,” भावनाविवश होत भास्कररावांनी आपलं मन मोकळं केलं. कोणताही आडपडदा न ठेवता, जे सत्य आहे ते भास्कररावांनी सांगितल्याचे ऐकून लक्ष्मण भारावून गेला. त्याला मुलीच्या वडिलांची अशी भूमिका पहिल्यांदाच पाहायला मिळाली. स्थळं जुळवताना वधू वर पित्याकडून एक तर बरंच खोटं सांगितलं जातं किंवा काही माहिती लपविली तरी जाते, हा त्याचा नेहमीचा अनुभव आहे. भारावून गेलेला लक्ष्मण म्हणाला, “भास्करराव, तुम्ही आता काहीच काळजी करायची नाही. निशा माझीच लेक आहे असे समजा. मी योग्य तेच आणि तुम्हाला हवे तसेच करीन. अगदी निश्चिंत राहा,” भावविवश होत लक्ष्मणाने त्यांना आश्वासित केले. सकाळीच भास्कररावाबरोबर लक्ष्मणने चहा, नाश्ता घेतला. निशा सकाळी लवकर उठली होती. वडिलांना आणि पाहुण्यांना तिनेच चहा, नाश्ता दिला होता. लक्ष्मणने मुद्दामच सहज चौकशी म्हणून निशाला चार-दोन प्रश्न विचारले. त्याला निशा पसंत पडली. या स्थळाविषयी लक्ष्मणाचे पूर्ण समाधान झाले होते. त्याच दिवशी तो रामरावाकडे गेला आणि स्थळाविषयी सविस्तर माहिती दिली. रामरावसुद्धा या स्थळाविषयी खूश झाले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी निशिगंधला दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याच्या मित्राबरोबर मुलगी पाहून येण्याचे फर्मान सोडले. निशिगंधला एवढ्या तातडीने जाणे आवडले नाही. “दादा, जरा सावकाशीने जाईल की! एवढी घाई नको ना करायला,” आपली नापसंती निशिगंधने व्यक्त केली. “मला काही सबबी सांगू नको. उद्या म्हणजे उद्याच जाऊन यायचं,” रामरावांनी हुकूम सोडला. वडिलांच्या समोर निशिगंध काही जास्त बोलू शकला नाही. दादा म्हणतात तर जाऊन येऊ. चहा पोहे खाऊन येऊ. ठरलेला नेहमीचा नकार देऊन टाकू. मला तर अगदी निशासारखी मुलगी हवीय. नशिबात काय आहे, हेच आता कळेनासे झालेय, असे स्वतःशी पुटपुटत तो मित्राकडे निघून गेला. सकाळचे नऊ वाजून गेले तरी निशिगंधने स्वतःचे काही आवरलेले नव्हते. उगीचच काहीतरी किरकोळ काम तो करीत होता. रामरावांच्या तीक्ष्ण नजरेतून ही गोष्ट काही सुटली नाही. “अरे निशी, कसलं काम करतोस तू? नाश्ता करून घे आणि मित्राला घेऊन लगेच जा. तू अकरा वाजता तेथे पोहोचतोय, असा लक्ष्मणकाकाने भास्कररावांना निरोप पाठवलाय. उशीर झालेला मला नाही चालणार,” रामरावाने निशिगंधला सुनावले. निशिगंधने मित्राला फोन करून बोलवून घेतले. दोघांनी नाष्टा केला व  मुलगी पाहण्याच्या विषेश मोहिमेवर बाईकवर ते दोघे स्वार झाले. “निशी, एवढा पुण्यात राहिला आणि साधे तुला एखादी मुलगी पण पसंत करून ठेवता आली नाही. काय म्हणावं तुला?” गोपू (निशिगंधचा मित्र) हळूच त्याच्या कानात म्हणाला. “अरे गोपू, तसे पाहता, ते काय फार मोठे आणि अवघड काम थोडेच होते? तशी एक मुलगी मला आवडत होती पण मी काही तिच्याबरोबर याविषयी बोलू शकलो नाही. आमच्या घरातील वातावरण आणि संस्कार यांनी मला या गोष्टीपासून दूर ठेवले. दादा तर तुला माहीतच आहेत. ना जुन्या वळणाचे ना आधुनिक विचारांना पूर्णपणे स्वीकारणारे. तरी पण माझ्या पसंतीशिवाय ते माझे लग्न करीत नाहीत, हे काय थोडे आहे?” निशिगंधने गोपूला सांगीतले. आणि त्यांची बाईक भास्कररावांच्या घरापुढे येऊन थांबली. भास्करराव घरासमोरील मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सावलीमध्ये बसून उमेदवाराची वाट पाहत बसले होते. निशिगंधला पाहताक्षणी ते त्याच्याकडे आले. त्या दोघांचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. निशा आणि वहिनी स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होत्या. भास्कररावांनी त्यांना खास पदार्थ बनवायला सांगीतले होते. “मुलगा मोठ्या घरचा इंजिनियर आहे. शिरा, वरण-भात, भजे, पोळी भाजी, एकदम छान बनवा,” भास्कररावांनी त्या दोघींना सूचना दिल्या होत्या. निशाला बाबांच्या या सूचना नाही आवडल्या. मोठ्या घरचा म्हणून काय झालं? अजून तर कुठेच काही नाही. नुसता पाहायला तर येणार आहे, मनातल्या मनात तिने नाराजी व्यक्त केली. तिकडे तिच्या वहिनीला तरी कुठे मोठा आनंद झाला होता? नाक मुरडतच ती काम करीत होती. भास्करराव आणि निशिगंध यांच्या चहापानानंतर औपचारिक गप्पा झाल्या. निशा आतापर्यंत समोर आलीच नव्हती. सर्व कामं वहिनीच करीत होती. निशिगंधला गप्पा आवडतात व तो बोलका असल्यामुळे त्याच्याकडून भास्कररावांना सर्व बारीकसारीक माहिती मिळाली. त्यांना निशिगंधचा स्वभाव आवडला. त्याच्याकडे पुन्हा पुन्हा ते बारकाईने पाहत होते. काही तरी आठवल्यासारखे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी त्याला विचारले, “श्रीरामाच्या यात्रोत्सवात मागे काही स्पर्धा झाल्या होत्या. त्या स्पर्धेचे पहिले बक्षीस तुम्हाला मिळाले होते का? मला नीट आठवत नाही पण तो मुलगा दिसायला अगदी तुमच्यासारखाच होता बघा. काय छान बोलत होता म्हणून सांगू तुम्हाला. अहो आमची निशा तर त्याच्या भाषणावर जाम खूश झाली होती.” “जेवण तयार आहे,” वहिनीने आतून आवाज दिला आणि पाहुण्यासह भास्करराव जेवायला बसले. जेवण वाढण्याचे काम वहिनीच करीत होती. निशाने ते काम करण्यास वहिनीला साफ नकार दिला होता. भास्कररावांना निशा वाढपाचे काम करीत नसल्याचे पाहून आश्चर्य वाटले. खरे तर हे काम तिने करायला हवे. या निमित्ताने तिला व निशिगंधला अधूनमधून एकमेकांना पाहता येईल. “निशा, गरम भजी घेऊन ये,” मोठ्याने भास्करराव सहेतूकपणे म्हणाले. निशाचा नामोल्लेख ऐकताच निशिगंधचा हातातला घास हातात आणि तोंडातला घास तोंडातच राहीला. तो एकटक निशा स्वयंपाकघरातून बाहेर येण्याची वाट पाहू लागला आणि निशा गरम भजी घेऊन बाहेर आली. निशिगंधची आणि तिची नजरानजर झाली. दोघांनाही आश्चर्याचे मोठे सुखद धक्के बसले. निशाने स्वतःला लगेच सावरले. तिने त्या तिघांना गरम भजी वाढली. निशिगंधच्या ताटात दोन भजी जास्तच टाकली आणि ती लगेच स्वयंपाकघरात निघून गेली. निशिगंधचं जेवणात काही केल्या लक्ष लागेना. ताटातील पदार्थ आहे तसेच दिसत होते. भास्कररावांनी ते पाहिले आणि त्याला म्हणाले, “अहो जेवताय ना? जेवण आवडले नाही का?” “नाही नाही, अहो पदार्थ मस्त झालेत.” भजी तोंडात टाकत टाकत निशिगंध म्हणाला. निशिगंध मुळातच धाडसी प्रवृत्तीचा आणि बिनधास्त स्वभावाचा असल्यामुळे, तो लगेच भास्कररावांना म्हणाला, “निशा तुमची मुलगी आहे? अहो काका, निशा आणि मी एकाच कॉलेजात शिकत होतो पुण्याला. आम्ही एकमेकांना चांगले ओळखतोय.” एवढ्यावरच न थांबता त्याने निशाला हाक मारली. “निशा अगं, जरा बाहेर ये ना.” निशा पण लगेच बाहेर आली. निशिगंधला पाहिल्यापासून तिचे मन ठिकाणावर नव्हतेच. तिचे सर्व अंग मोहरुन गेले. अशा पद्धतीने आपल्याला निशिगंध भेटावा, हा विलक्षण योगायोग म्हणावा की ईश्वरी संकेत! आपल्याला तर तो मनापासून आवडतो. देवा, तुझे आभार कसे मानावेत हे मला समजेनासे झाले, निशा आपल्या मनाशीच बोलत होती. “एक मिनिट हं, आलेच मी,” निशा म्हणाली आणि देवघरात देवासमोर नत मस्तक झाली. देवावर श्रद्धा असेल, मनात निरपेक्ष भावना असेल तर तो कोणत्या स्वरूपात दर्शन देईल, हे माणसाला काही कळत नाही, हेच सत्य आहे. तो आपल्या इच्छा कशा पूर्ण करील, हे फक्त त्यालाच ठाऊक. “निशा, अगं काय करतेस, पोरी? लगेच बाहेर ये बरं,” मोठ्याने भास्करराव म्हणाले. निशा बाहेर येताना, पुढे काय होणार, हा विचार नकळत तिला स्पर्श करून गेला. निशा लगेचच बाहेर आली. निशिगंध आणि भास्कररावांशेजारी ती येऊन बसली. तिच्या मनातील संकोच बऱ्याच अंशी कमी झाला होता. मनात मात्र धडधड होत होती. निशिगंध मात्र बिलकूल तणावविरहित होता. मनातून त्याला खूप आनंद झाला होता. “काका, निशा आणि मी समोरच्या झाडाखाली बसू का? तुमची हरकत नसेल तर बरं का! म्हणजे आम्हला थोडं मोकळेपणाने बोलता येईल,” निशिगंधने नम्रपणे भास्कररावांना विचारले. “हो हो, बसा की! माझी काहीच हरकत नाही. विचारा की एकमेकांना आपल्या मनात काय आहे ते!” भास्करराव मोकळेपणाने म्हणाले. जवळ जवळ एक तास निशा आणि निशिगंध दोघे गप्पा मारीत होते. निशा फारसी बोलत नव्हती पण ती सकारात्मक प्रतिसाद देत होती. मागील सर्व छोट्या मोठ्या प्रसंगाना उजाळा देण्यात आला. शेवटी दोघांनी एकमेकांची पसंती व लग्न गाठ बांधून घेण्याचा निर्णय घेतला. दोघे भास्कररावाकडे आले. निशा लगेचच स्वयंपाक खोलीकडे निघून गेली. निशिगंधने त्या दोघांचा निर्णय भास्कररावांना सांगून टाकला. भास्करराव मनातून खूप खूश झाले. निशाला अगदी तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा त्यांना खूपच आनंद झाला. “काका, आता आमच्या लग्नाबद्दल व पुढील आयुष्याबाबत काहीच काळजी करायची नाही. योगायोगाने आम्हा दोघांना एकाच ठिकाणी नोकऱ्या पण मिळाल्या आहेत. माझ्या दादाबाबत फार विचार करु नका. आमच्या दोघांबद्दल जेव्हा मी त्यांना सविस्तर सांगेन तेव्हा त्यांना पण आनंदच होईल.” एव्हाना गप्पांच्या नादात सायंकाळ केव्हा झाली, ते त्यांना कळलेच नाही. “निशिगंध, आज इथेच मुक्काम कर. घरी जाईपर्यंत रात्र होईल,” निशा बाबाकडे पाहत म्हणाली. “हो निशिगंध, निशा अगदी बरोबर म्हणतेय. रात्रीचं नका जाऊ,” भास्करराव त्याला म्हणाले. निशिगंधने त्यांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि मित्राला आपल्या घराकडे पाठवून दिले. सगळं कसं अगदी मनासारखं घडलं होतं. * निशा आणि निशिगंध हैद्राबादला आनंदात राहत होते. मध्येच रामराव पाटलांनी केवळ मूल होत नाही, म्हणून निशिगंधच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला होता. निशा आणि निशिगंधला  तो प्रस्ताव पटलेला नव्हता व मान्यही नव्हता. सुट्टी काढून लगेच गावाकडे येण्याचा आदेश  रामरावानी दिल्यामुळे ते दोघेही नवरा-बायको अस्वस्थ झाले होते. ह्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे ह्याचाच ते विचार करीत होते. “निशिगंध, आज सायंकाळी आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ. सकाळपासून सारखे चक्कर येतात व मळमळ पण होतेय. काही खाण्याची पण इच्छा होत नाही. मासिक पाळी चुकून पण दहा दिवस अधिक झालेत,” अचानक निशाने होत असलेल्या बदलाबाबत निशिगंधला सांगीतले. “ठीक आहे निशा, सायंकाळी जाऊ या आपण डॉक्टरकडे,” निशिगंध म्हणाला. सायंकाळी बरोबर सात वाजता ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सर्व तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी सर्व रिपोर्टस पाहिले आणि निशिगंधच्या हातात देत ते म्हणाले, “तुमच्या दोघांचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही आई-बाबा होताहात.” हे डॉक्टरांच्या तोंडचे गोड शब्द ऐकून दोघांनाही कमालीचा आनंद झाला. निशिगंधने आनंदातिरेकाने तर निशाला आपल्या जवळ ओढत दीर्घ आलिंगन दिले. “निशिगंध, अरे आपण दवाखान्यात आहोत,” म्हणत तिने आपली सुटका करून घेतली व थोडी दूर जाऊन उभी राहीली. आनंद तर तिच्या हृदयात मावत नव्हता पण तिला तो व्यक्त करता येत नव्हता. मनातल्या मनात ती गुणगुणत होती. आनंदाच्या डोही आनंद तरंग “निशा आठ दिवसांची सुट्टी घेऊन आपल्याला गावाकडे जायचयं आणि हो भरपूर मिठाई पण सोबत हवीय बरं का,” उत्साहात निशिगंध म्हणाला. आणि रविवारी सायंकाळी ते दोघे गावाकडे पोहोचले. निशाच्या गरोदरपणाचे गुपित त्यांनी अद्याप कुठेच उघडे केले नव्हते. त्यांना सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का द्यायचा होता. इकडे रामरावांनी निशिगंधसाठी मुलगी शोधूनच ठेवली होती. - सयाजी शिंदे (सयाजी शिंदे यांच्या 'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'चरैवेती' या कथासंग्रहातून)

Recent Posts

See All
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar

It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were n

 
 
 

Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

© Copyright

Sign up for our newsletter

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page