top of page

मोबाईल व्यसन  

  • Apr 11
  • 3 min read

रात्रीचे साडेअकरा वाजले होते. घरात सगळीकडे शांतता पसरली होती. आई-वडील झोपले होते, खिडकीबाहेरून येणारा वाऱ्याचा मंद आवाज वातावरणात एक वेगळीच निवांतता निर्माण करत होता पण रोहनच्या खोलीत मात्र अजूनही उजेड होता, मोबाईलच्या स्क्रीनचा. रोहनच्या चेहऱ्यावर त्या निळसर प्रकाशाचे प्रतिबिंब पडत होते. त्याचे डोळे थकलेले होते पण बोटे मात्र सतत स्क्रीनवर नाचत होती. कधी सोशल मीडियावर स्क्रोलिंग, कधी गेम तर कधी एखादा व्हिडिओ. वेळ कधी निघून जात होती, त्याला कळतच नव्हतं.


एकेकाळी तो खूप उत्साही मुलगा होता. मित्रांसोबत क्रिकेट खेळणे, सायकल चालवणे, पुस्तकं वाचणे हे सगळं त्याच्या आयुष्याचा भाग होतं पण हळूहळू मोबाईल त्याच्या आयुष्यात आला आणि बाकी सगळं मागे पडत गेलं. सुरुवात साधीच झाली होती. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन क्लासेससाठी त्याला मोबाईल मिळाला. सुरुवातीला तो फक्त अभ्यासासाठी वापरायचा पण एके दिवशी मित्राने त्याला एक गेम सुचवला. ‌‘फक्त पाच मिनिटं खेळून बघ,‌’ मित्राने सांगितलं होतं. त्या पाच मिनिटांनी त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. गेम खेळताना त्याला एक वेगळंच समाधान मिळू लागलं. जिंकताना त्याला अभिमान वाटायचा, हरताना पुन्हा जिंकायची जिद्द निर्माण व्हायची. मग सोशल मीडिया, रील्स, व्हिडिओ सगळं हळूहळू त्याच्या दिनक्रमाचा भाग बनलं.


आई अनेकदा म्हणायची, “रोहन, थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेव. डोळे खराब होतील.” तो फक्त “हो” म्हणायचा पण हातातून मोबाईल खाली ठेवत नसे. वडीलही काळजीत पडले होते. “पूर्वी हा मैदानावर धावत असायचा, आता फक्त स्क्रीनसमोर बसतो,” ते आईला म्हणायचे.


रोहनच्या लक्षात येत होतं की काहीतरी बदलत आहे पण तो स्वतःला थांबवू शकत नव्हता. शाळेत त्याचे गुण कमी होऊ लागले. शिक्षकांनी विचारलं, “रोहन, काय झालंय? अभ्यासात लक्ष नाही का?”


तो शांत राहिला. मित्रही त्याच्यापासून दूर जाऊ लागले. मैदानावर त्याची जागा आता दुसऱ्यांनी घेतली होती. एक दिवस आईने त्याला हाक मारली, “रोहन, जेवायला ये.”


तो म्हणाला, “दहा मिनिटं!”


पण त्या दहा मिनिटांनी एक तास घेतला. आई जेवण घेऊन त्याच्या खोलीत आली तेव्हा तो अजूनही मोबाईलमध्ये गुंतलेला होता.


“तुला स्वतःची काळजी आहे का?” आईचा आवाज हलका थरथरत होता. त्याने चिडून उत्तर दिलं, “आई, प्लीज! त्रास देऊ नकोस.”


त्या क्षणी आईच्या डोळ्यात आलेलं दुःख त्याला दिसलं नाही. रात्री उशिरापर्यंत जागरण, सकाळी उशिरा उठणं, डोळ्याखाली काळी वर्तुळे त्याचा चेहरा बदलू लागला. मनात चिडचिड वाढू लागली. एके दिवशी शाळेत त्याला अचानक भोवळ आली. तो वर्गातच कोसळला. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. डॉक्टर शांतपणे म्हणाले, “जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर ताण येतोय. झोप अपुरी आहे. हे सगळं थांबवायला हवं.”


आई-वडील बाजूला उभे होते. रोहनला पहिल्यांदाच जाणवलं तो स्वतःला हरवत चालला आहे. घरी परतल्यावर मोबाईल काही दिवस बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. पहिल्या दिवशी त्याला खूप अस्वस्थ वाटलं. हात सतत मोबाईलकडे जायचा. मन बेचैन व्हायचं. जणू काही त्याचं काहीतरी हरवलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. मुलं मैदानावर खेळत होती. त्याला आठवलं तोही एके काळी तिथे असायचा. तिसऱ्या दिवशी तो मैदानावर गेला. मित्रांनी सुरुवातीला थोडं आश्चर्याने पाहिलं पण मग त्याला खेळात सामील करून घेतलं. तो धावला खूप दिवसांनी. त्या धावण्यात त्याला मोबाईलपेक्षा जास्त आनंद मिळाला. हळूहळू त्याने पुन्हा पुस्तकं उघडली. आईसोबत स्वयंपाकघरात बसून गप्पा मारल्या. वडिलांसोबत फिरायला गेला. त्याला जाणवलं खऱ्या आयुष्याचा स्पर्श स्क्रीनमध्ये मिळत नाही.


एके रात्री तो शांतपणे आईजवळ बसला. “आई सॉरी,” तो म्हणाला. आईने फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो पुन्हा मोबाईल वापरू लागला पण आता मर्यादेत. त्याने स्वतःसाठी नियम बनवले. मोबाईल फक्त आवश्यक तेवढाच! आणि उरलेला वेळ खऱ्या आयुष्यासाठी. कधी कधी तो स्वतःकडे मागे वळून पाहतो. त्या निळसर प्रकाशात हरवलेला चेहरा त्याला आठवतो आणि मग तो खिडकीतून बाहेर पाहतो सूर्याच्या उजेडात न्हालेलं खरं जग. आता त्याला समजलं होतं स्क्रीनचा उजेड तात्पुरता असतो; पण आयुष्याचा उजेड तो खऱ्या जगण्यातच सापडतो!


- मयूर बागुल

+91 90962 10669

प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)


Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page