एक अती संवेदनशील संवाद
- Apr 11
- 3 min read
‘पत्र’ म्हणजे आपल्या मनातल्या भावना अगदी मुक्तपणे व्यक्त करण्याचे अतिशय प्रचलित असे एक सर्वोत्कृष्ट साधन होय. वास्तविक पाहता ‘पत्र’ लिहिणे ही एक कलाच आहे. ‘पत्र’ म्हणजे शब्द अन् शब्द मोजून, मापून, तावून, सुलाखून, विषयाचा गाभा लक्षात घेऊन साधलेला एक अती संवेदनशील संवाद आहे. ‘पत्र’ हे प्रगल्भ विचारांनी आणि भावनांनी भरलेली एक खाणच असते. ‘पत्र’ म्हणजे व्यथा, कथा, जाणिवा, उणिवा, सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा उत्तम संगमच आहे मला वाटते.

कधी कधी आपण प्रत्यक्षात समोरासमोर आल्यावरही फारसे व्यक्त होऊ शकत नाही किंवा संकोचून व्यक्त होण्याचे टाळतो, तेच आपण पत्राद्वारे मात्र अगदी नि:सकोचपणे कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या संवेदना अथवा भावना व्यक्त करू शकतो. पत्राद्वारे संवेदनशील भावना व्यक्त करून समजप्रबोधनाचे कार्यही उत्तमरित्या साध्य करता येऊ शकते हे मात्र नक्की. अगदी असेच काहीसे मला ‘पत्रास कारण की...’ हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षण ह्या एकाच विषयावर 16 पुस्तके लिहिणारे लेखक संदीप वाकचौरे यांचे ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे वाटले.
छत्रपती शिवाजी महाजांना लिहिलेल्या पत्रात वाकचौरे यांनी आपले अतिशय निर्भीड आणि परखड विचार व्यक्त केले आहेत. शिवरायांनी एका आदर्श स्वराज्य उभारणीसाठी आपले आयुष्य पणाला लावले, त्याच स्वराज्याची स्वातंत्र्योत्तर झालेली वाताहत, बोकळलेला व्यभिचार, भ्रष्टाचाराचा झालेला शिष्टाचार, राजरोसपणे महिलांवरील होणारे अत्याचार, बलात्कार, भोंदुगिरी इत्यादी गोष्टींचा अनागोंदी कारभार अत्यंत पोटतिडकीने व्यक्त केला आहे. हे पत्र वाचताना संवेदनशील वाचकाचे रक्त उसळते आणि आपणही ह्याच समाजाचे एक घटक आहोत याची जाणीव होऊन शरमेने मान खाली जाते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अब्राहम लिंकन ह्या दिग्गजांच्या आदर्श विचारांचा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वाकचौरे यांच्या विचारांवर, आचरणावर आणि लेखणीवर जबरदस्त पगडा आहे हे सहजपणे जाणवते. त्यांना लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून ह्या थोर व्यक्तिंच्या, विचारांची, तत्त्वज्ञानाची, संस्कृतीची चाललेली पायमल्ली व्यक्त करताना त्यांनी कुठलीही भीड ठेवली नाही आणि कोणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही. त्यांना लिहिलेली पत्रे वाचताना आपणही त्याच समाजाचे एक घटक आहोत आणि आपण आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या दुराचाराला, भ्रष्टाचाराला, व्यभिचाराला, महिलांवरील अत्याचाराला, अन्यायाला रोखू शकत नाही अथवा त्याच्या विरुद्ध आवाज उठवू शकत नाही, याची मनोमन लाज वाटते. आपले वैयक्तिक दुबळेपण जाणवते आणि राजकारणी लोकांची मतलबी वृत्ती समजल्यावर मन खजील होते. हे असे वाटणे हेच या पुस्तकाचे उद्दिष्ट साध्य झाल्यासारखे आहे असे मला वाटते.
साधना आणि पीयूष ह्या दोन अभाग्या मुलांना लिहिलेल्या पत्रांनी तर आपले काळजी पिळवटून जाते. स्वत:च्या वैयक्तिक आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी पालकच जर आपल्या कोवळ्या मुलांचे असे जीव घेत असतील तर आपल्यातील माणसाच्या विकृतीने गाठलेला कळसच वाकचौरे यांच्या पत्रातून प्रतिध्वनीत होऊन आपले समाजकारण किती निष्ठुर आणि हिंसक बनले आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे इंद्रकुमार या दलित मुलाचे केवळ जातपातीच्या आणि धर्माच्या भेदभावाने झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडणे हे तर अतिशय लांच्छनास्पद असून, स्वातंत्र्यानंतर आपण स्वीकारलेली राज्यघटना आणि कायद्याचे राज्य किती कुचकामी आणि सत्ताधीशांसाठी किती आपमतलबी आहे हे इंद्रकुमारला लिहिलेल्या पत्रावरून सिद्ध होते. स्वातंत्र्य मिळवून 76 वर्षे झाली तरी आपण अजूनही स्वार्थी, निष्ठुर, ढोंगी आणि अहंकारी विचारसरणीच्या जगात जगत असून हे कुठल्या प्रगतीचे अथवा विकासाचे लक्षण आहे हे वाकचौरे यांनी त्यांच्या पत्रांतून व्यक्त केल्यामुळे मन अजूनच सुन्न होऊन जाते.
वर्ध्याच्या सायलीला लिहिलेल्या पत्राने, तिच्या शिक्षणासाठीची तरतूद तिचे गरीब आईवडील करू न शकल्यामुळे तिने केलेली आत्महत्या कळल्यावर तर आपल्या स्वार्थी सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे ते वाचून मन आणखीच हळहळते. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचीही दु:खद किनार उघड होते. वृत्तपत्रात या संदर्भातल्या बातम्या वाचून आपण त्याकडे किती सहजपणे दुर्लक्ष केलेले असते परंतु जेव्हा त्याच घटनेचे वाकचौरे यांच्या पत्रांनी उघड केलेली झाकलेल्या सत्याची बाजू किती भीषण आहे ते समजल्यावर मनाला खोलवर वेदना होऊन ते अक्षरशः विव्हळते.
वाकचौरे यांनी आपल्या शाळेला आणि आईबाबांना लिहिलेल्या पत्रांनी विद्यार्थीदशेतील मुलांच्या भावनांना व्यक्त करून पालकांच्या डोळ्यात एक प्रकारे अंजनच घातले आहे. तसेच ते हताश होऊन गणपतीबाप्पाला आणि आपल्या लाडक्या विठ्ठलालाही पत्र लिहून त्यांच्या व्यथा सांगतात तेव्हा मात्र मन आक्रंदते, रुदन करते आणि म्हणते की, आमच्या भारतीय (हिंदू) संस्कृतीचा अजून किती हृास बघायचा राहिला आहे? विद्येची देवताच जर या सगळ्यात हताश झाली असेल आणि 28 युगे विटेवरी उभा असलेला आमचा पांडुरंगही हतबल झाल्याचे अतिशय जळजळीत सत्य वाकचौरे यांनी त्यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून वाचकांच्या समोर ठेवून, समाजाच्या बोथट झालेल्या भावनांना कर्तव्याची व कर्तृत्वाची धार लावण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
ज्येष्ठ उद्योजक डॉ. संजय मालपणी आणि प्रवीण शिरसाठ यांना भावनेने लिहिलेली अपवादात्मक वैयक्तिक पत्रेही अत्यंत वाचनीय आहेत. आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींतून सकारात्मकतेची वाट दाखवणाचे महत्त्वाचे कार्य ही पत्रे करून वाचकांच्या भावनांचा समतोल राखण्याचे काम मात्र नक्कीच करतात. त्याचे सर्व श्रेय संदीप वाकचौरे सरांना द्यायला हवे.
‘वाचाल तर वाचाल’ आणि ‘उत्तम दर्जाचे वाचले तरच उत्तम लिहू शकाल’ त्याचे ‘पत्रास कारण की..’ हे एक अतिशय संयुक्तिक उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावे असेच आहे.
- रवींद्र कामठे
9421218528
प्रसिद्धी - साप्ताहिक चपराक (१३ ते १९ एप्रिल २०२६)
.jpg)



Comments