top of page

20 ‌‘गुणां‌’चा विषय

  • 52 minutes ago
  • 4 min read

अगदी लहानपणापासून, म्हणजे सहावी-सातवीत असल्यापासून परीक्षा सुरू झाली की मनावर एक प्रकारचे दडपण यायचे. त्याआधी चौथी-पाचवीपर्यंत परीक्षांची इतकी समज नव्हती आणि तोपर्यंत मी अगदी हुशार विद्यार्थिनी होते (असे माझ्या आईचे तरी ठाम मत होते!) पण सहावी-सातवीपासून मुलांच्या मनात दहावीच्या बोर्डाची परीक्षा नावाच्या एका भूताची भीती घालण्याची पद्धत तेव्हापासूनच रूढ होती. मुले आतापासूनच अभ्यासाला गांभीर्याने लागतील, असा पालकांचा त्यामागे एक भाबडा समज असायचा. अर्थात, आम्हा मुलांचा अभ्यास हा कायम परीक्षेचे वेळापत्रक हाती आल्यावरच सुरू व्हायचा.


माझ्यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत, इतिहास आणि भूगोल हे विषय फार काळजीत पाडणारे नव्हते. खरी भीती वाटायची ती विज्ञानाची आणि त्याहीपेक्षा जास्त गणिताची! गणिताचा पेपर समोर आला की, भरल्या परीक्षा हॉलमध्ये मला दिवसा तारे दिसायचे... जणू काही तो माझा स्वतःचा ‌‘तारे जमी पर‌’ प्रयोगच असायचा!


मुळात भाषेबद्दल कायमच प्रेम असल्यामुळे मराठी-हिंदी विषयांचा कधी त्रास झाला नाही पण या सगळ्यात माझा एक आवडता, छोटासा विषय असायचा तो म्हणजे नागरिकशास्त्र. इतिहास आणि भूगोलाच्या सोबतीने पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अवघ्या काही पानांचा आणि 20 मार्कांचा हा विषय! त्यावेळी वाटायचे, फक्त 20 मार्कांसाठी हा विषय कशासाठी शिकवत असतील? पण आज जगाची समज आल्यावर मनापासून वाटते की, संपूर्ण देशातल्या प्रत्येकाला 100 मार्कांसाठी हा विषय पुन्हा-पुन्हा शिकवण्याची नितांत गरज आहे.


नागरिकशास्त्र म्हणजेच सिव्हील सायन्स याची सोपी व्याख्या सांगायची तर नागरिकांचे हक्क, कर्तव्ये आणि त्यांचे समाजातील स्थान व जबाबदाऱ्या यांचा अभ्यास. म्हणायला हा अभ्यास अगदी साधा-सुधा आणि सुबोध वाटतो पण आजूबाजूची सामाजिक परिस्थिती पाहिली की लक्षात येते, की त्याचे ज्ञान आपल्याला किती अपुरे पडत आहे.


आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाप्रती आपली काही प्राथमिक कर्तव्ये आहेत. त्यातले सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे स्वच्छता. ही स्वच्छता फक्त स्वतःच्या घरापुरती मर्यादित नसावी तर ती संपूर्ण परिसराची आणि सार्वजनिक ठिकाणांचीही असायला हवी. जगात आपण कुठेही असलो तरी ही शिस्त पाळलीच पाहिजे. दुर्दैवाने या साध्या विषयात आपला देश काहीसा मागासलेलाच वाटतो. आज जिथे-तिथे रस्त्यांवर प्लास्टिक पिशव्या, कागद, सिगरेटची थोटके आणि पानाच्या पिचकाऱ्या सहज दिसतात. सार्वजनिक शौचालयांबद्दल तर न बोललेलेच बरे!


लोक देशाच्या प्रगतीबद्दल किंवा सरकार आणि समाजाबद्दल तावातावाने गप्पा मारतात पण स्वतः मात्र सहज कुठेही कचरा फेकून देतात. त्यावेळी एक नागरिक म्हणून आपण स्वतः किती चुकीचे वागतोय, याची जाणीव त्यांना नसते. जेवण करणे किंवा अंघोळ करणे जशा सवयी आहेत, तसेच कचरा भिरकावणे ही देखील अनेकांची सवय झाली आहे.


एकदा माझ्यासोबत असेच घडले. एक ओळखीची व्यक्ती मला भेटली. गप्पा मारता मारता त्यांनी गाडीतून पाण्याची बाटली काढली, पाणी प्यायले आणि रिकामी बाटली सहजपणे मागच्या रिकाम्या जागेत फेकून दिली. मी त्यांना तात्काळ टोकले, “अरे, तिथे कोपऱ्यात कचऱ्याचा डबा आहे ना!”


त्यावर ते अतिशय सहजपणे म्हणाले, “अगं, नको काळजी करू (डोन्ट वरी), सकाळी सफाईवाले येतातच ना!”


मी काहीही न बोलता ती बाटली उचलून डब्यात टाकली; कारण आपण कचरा करतोय ही जाणीवच जर त्यांच्या मनात नसेल तर त्यांना काहीही बोलणे म्हणजे मूर्खपणाच होता. म्हणूनच परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, हे नागरिकशास्त्रातून पुन्हा एकदा ठसवण्याची गरज आहे.


जागोजागी असणाऱ्या खाऊ गल्ल्या किंवा भाजी मार्केट यांचे रात्रीचे चित्र पाहिले की खूप वाईट वाटते. जिथे तुम्ही तुमची भाकरी कमावता, ती जागा स्वच्छ करून जाणे हे तुमचे कर्तव्य नाही का? काही ठिकाणी लोक स्वच्छता राखतातही पण बहुतांश ठिकाणी परिस्थिती अत्यंत गलिच्छ असते. आश्चर्य म्हणजे, लोकांनी घाण करू नये म्हणून भिंतींवर देवांचे फोटो लावले जातात पण आपल्या परिसराच्या कणाकणात देव आहे, ही जाणीव आपल्याला का होत नाही? स्वच्छता ही केवळ एका व्यक्तिची किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.


प्लास्टिक पिशव्यांमुळे मुंबईत आलेले महापूर आपण पाहिले आहेत पण आपण धडा घेतलेला नाही. प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि घरातच ओला व सुका कचरा वेगळा करणे, हे तर आपल्याच हातात आहे. अनेक संस्था प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी (रियुझ) पुढाकार घेत आहेत, त्यात सहभागी होणे अजिबात कठीण नाही.


स्वच्छता ही आपल्याकडून आपसूक घडणारी गोष्ट व्हायला हवी. अस्वच्छता करणाऱ्याला सांगायला गेले तरी मोठी पंचायत होते. काही लोक ऐकतात पण काही जण “तू कोण मला सांगणारा?” किंवा “मी एकट्यानेच केलंय का? बाकीचे पण तेच करत आहेत ना!” अशी बालिश कारणे देऊन भांडायला येतात. एखाद्याला समजावून सांगताना आपण आपली सद्सद्विवेक बुद्धी गमावून बसतो की काय, असे वाटते. हल्ली तर रस्त्यावरच्या भांडणाचे व्हिडिओ काढून ते पोस्ट करण्याचा एक वेगळाच प्रकार सुरू झाला आहे. अशा पत्रकारितेबद्दल बोलायचे झाले तर एक वेगळे प्रकरणच लिहावे लागेल!


आज आपण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करतोय पण तिथली शिस्त मात्र घेत नाही. परदेशातील वेस्ट मॅनेजमेंट आणि सार्वजनिक स्वच्छता खरंच कौतुकास्पद असते. एखादी जागा किंवा तिथली माणसे यांची पर्सनल स्पेस आणि शांतता जपली पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. भारतात तर शांतता या शब्दाचा विचार मिरवणुका आणि रॅलीमध्ये अजिबात केला जात नाही. मोठ्या आवाजात डीजे लावणे, फटाके फोडणे आणि प्रचंड घाण करणे म्हणजे आनंद व्यक्त करणे, अशी एक विचित्र विचारसरणी समाजात पसरली आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर हवं तसं वागणाऱ्या लोकांमुळे मला पुन्हा पुन्हा त्या नागरिकशास्त्र विषयाची आठवण येते.


सण साजरे करणे चुकीचे नाही पण ते करताना प्रदूषण टाळून आणि शिस्तीत केले तर कोणाचीच हरकत असणार नाही. संपूर्ण देशासाठी शिस्त हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रांगा मोडून पुढे जाणे, ट्रेनमध्ये धक्काबुक्की करणे या गोष्टी लोकसंख्येचा भार म्हणून मान्य केल्या, तरीही शिस्तबद्ध पद्धतीने त्या नक्कीच सुधारता येऊ शकतात. यासाठी कोणत्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही, फक्त ‌‘हा माझा देश आहे आणि त्याची शिस्त मी राखली पाहिजे‌’ ही भावना रुजणे गरजेचे आहे.


रस्त्यावर थुंकताना आपण विसरतो की, तो रस्ता आपल्याच पैशातून तयार झाला आहे. रेल्वे प्रवासात एक साधी पिशवी सोबत ठेवून त्यात आपला कचरा जमा केला आणि स्टेशनवरच्या डब्यात टाकला तर आपण कितीतरी घाण कमी करू शकतो. मुंबईसारख्या शहरात पार्किंगचा तर मोठा स्वैर कारभार सुरू असतो. मोठी गाडी रस्त्यात कुठेही उभी करून गायब होणाऱ्या लोकांमुळे ट्रॅफिक जाम होतो आणि इतरांना त्रास होतो. पार्किंगची जागा कमी आहे हे मान्य केले तरी आपला सिविक सेंस वापरून आपण इतरांना होणारा त्रास नक्कीच कमी करू शकतो.


नागरिकशास्त्र म्हणजे फक्त कर्तव्येच का? मग हक्कांचे काय? असा प्रश्न अनेकांना पडेल. हक्क मिळायलाच हवेत, त्याबद्दल दुमत नाही पण आपण आपली कर्तव्ये पार पाडायला सुरुवात तर करूया! हक्कांची लढाई सुरूच राहील पण कर्तव्यांमुळे जर आपले जीवन सुखकर होणार असेल तर सुरुवात स्वतःपासून का नको?


चला, आपण एक उत्तम नागरिक बनूया. नागरिकशास्त्र हा विषय परीक्षेसाठी 20 मार्कांचा असला तरी तो व्यवहारात पक्का असणे आपल्या आणि देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचा आहे. हो की नाही?


- श्वेता म्हसकर, मुंबई

+91 9967203579

प्रसिद्धी साहित्य चपराक मासिक एप्रिल २०२६


Comments


Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page